माणूस आत्महत्त्या का करतो ?
व्यवहाराच्या कसोटीवर भावनेचा संयम टिकत नाही तेव्हाच माणूस टोकाचा निर्णय घेतो. आत्महत्या ही एका क्षणात झालेली नसते , खूप अगोदर पासून ढग जमू लागलेले असतात. दु:खद पाऊस नंतर कोसळतो. जीव कोणाला नको असतो ? पण अखेरच्या पर्यायांचाही पर्याय उरत नाही , तेव्हा हे दुर्दैवी कृत्य घडते. असे घडू नये... कधीही...कुणाच्याही बाबतीत....
नितीन देसाईंबाबत फेसबूकवरची पोस्ट ...
नुकताच नितीन देसाईंच्या आत्महत्त्येने प्रचंड धक्का दिला. आत्महत्या नेहमीच धक्कादायक असते. त्यात ती नितीन देसाईंसारख्या एका महान कला दिग्दर्शकाची , सिने दिग्दर्शकाची , कलाकाराची आत्महत्या ही अधिकच धक्कादायक असते. अनेकांना चटका लावणारी असते. समाजमाध्यमांमध्ये यावर खूप काही येत असते. तसे ते आलेच व अजूनही येत आहे.
नुकतीच नितीन देसाईंच्या आत्महत्येवर फेसबूकवर अशीच एक पोस्ट वाचली. तेव्हा मनात वरील विचार आले. खरेच , माणूस आत्महत्या का करतो ? अनेक कारणं असतात. आत्महत्या करण्यामागची १ , २ , ३..... कारणे... अशी यादी बरीच करता येते. पण त्या यादीत माणसाच्या होत गेलेल्या कोंडीची नेमकी भावना कशी पकडता येईल ? ही कोंडी काही एकाएकी झालेली नसते. मग ही कोंडी कशी कशी होत गेली ? कोंडी इतकी वाढावी की अनेकांना आधार देणाऱ्या , आयुष्यात उभे करणाऱ्या विचारी माणसाने स्वतःच मृत्यूला कवटाळावे ? आत्महत्येच्या निर्णयाचा आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा तो नेमका क्षण कसा पाहता येईल ? कसा पकडता येईल ? आता काही जण आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतिम उपयोग करून स्वतःच्याच आत्महत्तेचा व्हिडीओही बनवतात ! केवढी सुधारणा झाली आहे पहा ! माणसाचे जीवन सुधारण्यासाठी झालेली सुधारणा त्याचा आत्मघात चित्रित करण्यासाठी माणसालाच उपयोगी पडावी , हे किती दुर्दैवी आहे ! हे खूपच यातनादायी आहे !
घालमेल आणि उलाघाल
कारणे कोणतीही असोत , माणूस एका सर्वात अप्रिय निर्णयाला अंतिम स्वरूप देतो हे खरे ! इथपर्यंत यायला त्याला किती प्रयास पडले असतील ! त्याची केवढी घुसमट झाली असेल ! ही घुसमट माणूस कुणाशीच व्यक्त का करू शकत नाही ? त्याच्या मनाची घालमेल का होते ? उलाघाल का होते ? आत्महत्येत नेमके हेच का होते ? इतके आप्तस्वकीय असतात , इतके मित्र असतात ! आतापर्यंत त्याची अशी आख्खी दुनिया त्याच्या अवतीभवती नुसती फेर धरून असते , ती नेमकी याच वेळी त्याला परकी का वाटते ? इतकी परकी की एक गोष्ट , फक्त एक गोष्ट त्याला त्यातल्या कोणालाच सांगावीशी का वाटत नाही ? अगदी आजपर्यंत गळ्यात गळे घालून असलेल्या मित्रांपैकी कुणा एकालाही त्याला आपले दु:खं सांगताच येऊ नये ? का वाटत नाही त्याला कुणाशीच मन मोकळे करावेसे ? बोलून तरी बघायला काय हरकत असते ? नंतर चुकचुकणाऱ्यांच्या मनात ही एक शंकाही हुरहुरत राहते.
तो का बोलू शकत नाही ?
खरेच आत्महत्या करणाऱ्याला कुणाशीच बोलावेसे वाटत नसेल ? वाटत असले तरी तो बोलू शकत नाही , हा कटू अनुभव आहे. तो का बोलू शकत नाही ? एक तर हे बोलणे बोलणाऱ्याला खूप क्लेशदायक असते. कोणाला कसे सांगावे हा प्रश्न खूप वेळ खातो. हे सांगणेही तसे कठीणच असते ! उराच्या तळात जपलेले गूपित सांगताना खूप कष्ट पडतात . त्यातही हे गूपित बरेचदा सांगण्यासारखे नसते. ही दुनिया चांगली नाही. हशा होऊ शकतो. तमाशा होऊ शकतो. त्यात पुन्हा आपले आपल्याला काय म्हणतील , समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहील , त्यावेळी मेल्याहू़न मेले होण्यापेक्षा खरोखरचे मेलेलेच बरे , असे वाटून माणूस कोणाशीच बोलत नाही. खरे तर ही चूक होते . बदनामीपेक्षा जीव मोठा असतो. देशाला चुना लावून परदेशात उजळ माथ्याने फिरणारे काही कमी नाहीत. आसपासच्या समाजातही नको ते धंदे उघडपणे करून मी नाही त्यातली , कडी लावा आतली अशा प्रवृत्तीची किती तरी लबाड माणसे उजळमाथ्याने सहज फिरताना आढळतात. ती आत्महत्या करीत नाहीत , मात्र प्रामाणिक , पापभीरू माणूस खोट्या पाप पुण्याच्या कल्पनांना व प्रतिष्ठेला भुलून जीव गमावतो. हे ठीक नाही . पण असे होते हे खरे आणि हेच दुर्दैवी आहे !
सारे काही संपल्याची तीव्र भावना
माणसाला सारेच संपल्याचे जाणवते तेव्हाच तो आपले जीवन संपवतो ! सारेच संपल्याची , कोणताच मार्ग किंवा उपाय आता शिल्लक राहिला नसल्याची जाणीव माणसाला नक्की केव्हा आणि कशी होते ? का होते ? हे सांगणे आपल्याला कठीण आहे , पण अशी भावना प्रबळ होते आणि माणूस आत्महत्त्या करतो हे सत्य आहे. नितीन देसाईंसारख्या कलाकाराच्या हृदयात दबलेले दु:खं आणि आत्महत्त्या करण्यापर्यंतची विवशता त्यांच्यापुरती तरी त्यांच्यासोबतच अनंतात विलीन झाली आहे , हे खरे ! परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो , हीच परमेश्वरचरणी प्रार्थना !
#nitin_desai
#suicide
#facebook_story
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा