मागे - पुढे
12.04.2020
( क्रमश: )
12.04.2020
- आज लॉक्ड डाऊनचा एकोणीसावा दिवस. काल सौ.ची तब्ब्येत बिघडल्याने घरगुती उपाय करता करता पहाट झाली. तिला चक्कर येत होती. ताकत संपल्यासारखे झाले होते. ती झोपल्यानंतरच पहाटे मी झोपलो. सकाळी सहा वाजता जाग आलीच. आज निग्रहाने उठलोच कारण पाणी लवकर येणार ही आठवण आज मनात होतीच. पावणेसात वाजता पाणी आले. मीच ते भरले. आज ती उठूच शकत नव्हती. मी तिला उठवलेही नाही. मी कालच्या फेसबूकवरील अभिनंदनांना धन्यवाद देत राहिलो. लाईक्सची नोंद घेत राहिलो. हल्ली व्हॉट्सॲपवर मी अकरा साडेअकराच्या सुमारासच गुड माँर्निंग करायचो ती वेळ ब-याच दिवसांनी सातची केली ! संदेश स्वीकारणा-यांनाही आश्चर्य वाटले असणार . होते असे कधी कधी. 😀😀😀😀 चालायचेच. बरे नसले तरी सौ. झोपून राहण्यातली नाहीच. आठ वाजता ती उठलीच. जरा फ्रेश झाली. आम्ही चहा घेतला. मी आज चहानंतरच परिसर स्वच्छता केली. आता कसे असते की कुठेही जायचे नसते. कोणी पाहुणेही कुठून येणार नसतात. कोरोनाचा प्रभाव आहे. पण काही लोकही जरा आरामदायी वागू लागल्याचे माझ्या पाहण्यात व ऐकण्यातही आले आहे. आमच्या गोव्यात याला सुशेगादपणा म्हणतात ! नऊ वाजले तसा पुन्हा हिला अशक्तपणा जाणवू लागला. मी हिला बेडवर झोपवले . मीठसाखरपाणी करून उठवले व प्यायला लावले. तिला जरा बरे वाटले. मग जरा झोपते म्हणाली. मग तिला झोपू दिलं व मी इतर उद्योगांकडे वळलो. दहा वाजता ही पुन्हा उठली व आंघोळीला गेली. आंघोळीनंतर मात्र तिला खूप बरं वाटलं. मग तिने जेवण करण्यास सुरूवात केली. मी मुलाला फोन केला. आम्ही त्याच्याशी बोललो. उद्यापासून त्याच्या एरियात तीन दिवस बाहेर पडायचे नाहीय. आमच्याकडे अजून काही नवीन बातमी नाही. आमचा वार्ताहरही अजून आलेला नाही. पेपरवाला आला तेव्हा बातम्या वाचायला मिळाल्या. कोरोनाशीच संबंधित बातम्या.
दुपारी जेवलो. ही वामकुक्षीकडे वळली. आज मीही सततच्या जागरणांनी थकलो होतो. पण सौ. ला अशक्तपणामुळे तहानवगैरे लागली किंवा उठण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला तर , या विचारांनी मी जवळच शतपावली करीत होतो. चार वाजायला आले तसा पाठ टेकावी म्हणून मी खाली वाकतच होतो तितक्यात मुलाचा फोन आला. काल दुपारपासून त्याच्या आईचे व त्याचे भांडण सुरू होते. तो व्यथित होऊन बोलत होता. मी त्याला पाऊण तास समजावत होतो. पण त्याचा होणारा कोंडमारा त्याला सहन होत नव्हता. मी सौ.लाही परोपरीने सांगितले होते की वेळ कसली आहे ते बघ. तो तिथे परक्या ठिकाणी एकाकी आहे. त्याची मानसिक स्थिती खालावली तर त्याची प्रतिकारशक्ती कमी होईल. आज कोरेनाच्याबाबतीत जे सांगितलं जातंय ते प्रतिकार शक्तीचंच महत्व सांगितलं जातंय. आज भांडून उपयोग नाही. तुमचे दोघांत जे काही मुद्दे आहेत ते नंतरही बघता येण्यासारखे आहेत. अपेक्षांचे ओझे सतत बाळगू नये , कुणाच्याही मानेवर सतत ठेवू नये. प्रत्येकाला त्याचे स्वत:चे असे थोडे तरी आकाश हवे असते. मी स्वभावाला मुरड घातली म्हणून तोही घालू शकेल असे नाही. सगळेच आपल्या मनासारखे आणि आपल्याला हवे तेव्हा होत नाही . आयुष्यात खूप धीर धरावा लागतो. धीर धरूनही नेहमीच खीर मिळतेच असेही नाही. त्यालाही आपण तयार असलो पाहिजे. प्रश्नातच अडकून उपयेगाचे नसते तर प्रश्न निर्माण झाल्या क्षणीच आपण उत्तराच्या दिशेने कूच केले पाहिजे. मी मुलालाही हेच सांगितले आणि कोणत्याही परिस्थितीत नाउमेद होऊ नकोस , कारण परिस्थिती नेहमीच बदलत असते. असे पाऊण तास बोलल्यावर तो निदान वरवर तरी थोडा शांत आला. मग त्यानेच फोन बंद करा , मी आता झोपतो म्हणून सांगितले. तो फोन सुरू असतांनाच लंबूवहिनीने कालवी आणून दिली. मी भांडे घेतले आणि ही नुकतीच झोपली आहे म्हणून सांगितले. ती नंतर येते असे सांगून गेली. मी ये म्हणालो. कालवीचे भांडे मी फ्रीजमध्ये ठेवले. फोन संपला तोवर पावणे पाच झाले होते. मी जरा पाठ टेकली तर पाच मिनिटांनी सौ. जागी झाली. चहा घेऊया म्हणाली. मी टेकलेल्या पाठीसह उठलो. चहा घेतला. बाहेर येवून पायरीवर बसलो. अजून मुलाचे विचार जात नव्हते. मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. त्याची कधी भेट होणार, तो कसा असेल , या कल्पनेने मन व्याकुळ होत होते. सौ.ही याच विचाराने हैराण झाली आहे.
साडेपाच वाजता लंबूवबिनी आली. मग बीनाची आई आणि धंज्या आले. धंज्या गेला आणि संत्या आला. मी अंगणात फिरत फिरत त्यांच्याशी बोलत राहिलो. अशी माणसे सोबत असतात तेवढा वेळ तरी मनावरचे दडपण जाणवत नाही. उद्या पाणी येणार नसल्याने आज झाडे शिंपायचाही प्रश्न नव्हताच. बीनाची आई गेली तरी लंबूवहिनी व संत्या होतेच. सौ.ही गप्पात सामील होती. विषय कोरोना काळात मिळणा-या सवलतींचा होता. आमचे रेशनकार्डच मुळी पांढरे आहे, त्यामुळे आमचा संबंध नव्हताच. तरी पण ज्यांना गरज आहे त्यांना काही मिळत असेल तर त्यांना आम्ही जरूर माहिती देतो. कोरोनासारख्या परिस्थितीत तेवढीच खारीची का होईना मदत ! संत्याला गावातल्या सेंटरवर फाँर्म भरायला सांगितले आहे. ज्यांना खरोखरच सवलतींचा आधार आवश्यक असतो त्यांना सवलती द्यायला काहीच हरकत नाही. पण ऊठसूट सवलतींचाच पाऊस पाडून माणसाची उद्यमशीलता , कल्पकता व कष्ट करण्याची प्रवृत्ती नष्ट करणे चूक आहे . ते कोरोनासाठी रेड , आँरेंज , ग्रीन झोन पाडले ना , तसे सवलतींचे पण झोन पाडले तर सवलतींचा गैरफायदा घेणा-या लबाड चोरांना बराचसा पायबंद बसेल. शासन हे बरेचदा पक्षबाधित असते व पक्ष विस्ताराला आवश्यक म्हणून मते मिळवण्यासाठी सवलतींचा बेमालूम वापर करते. यासाठी प्रथम शासन बनले की त्याची पक्षीय नाळ तोडली पाहिजे व लोककल्याणकारी , वास्तव , निरपेक्ष निर्णय शासनाने घेतले पाहिजेत. असो, हे सद्या तरी अवास्तव वाटते आहे ! 😀😀😀😀
संध्याकाळ संपून रात्र झाली. आमच्याकडे जमलेली मानवपाखरे त्यांच्या घरटयात गेली. आम्ही जेवण केलं आणि शतपावली करीत होतो कोच लंबूवहिनी आली. काही थोडेफार तिच्यासाठी राखून ठेवलेले हिने तिला दिले. तिने नको नको म्हणतानांही भांडी घासली व ती गेली. मग दहा वाजता सौ. कालच्यासारखंच लवकर झोपूया म्हणाली. काल ती असं बोलली आणि ती रात्र भयंकर गेली. आज तसे काही होऊ दे नको , असे म्हणतच मी पुढचा दरवाजा लावला आणि झोपायला गेलो.
( क्रमश: )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा