गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

Corona lock down in process

मागे - पुढे

15.04.2020

               आज लॉक डाऊनचा बावीसावा दिवस. काल रात्री आम्ही झोपण्याची जागाच बदलली. बेडरूममधून सरळ हॉलमध्ये झोपायला सुरूवात केली. बेडरूममध्ये पलंगावरच्या गादीमुळेही खूप गरम होत होते. झोपण्यापूर्वी अंगणातल्या लादीवर पाणी मारले जेणेकरून हॉलमध्ये थंडावा मारील. पण तसे वेळेवर झोपूनही सौ.ला झोपच येत नव्हती. मला झोप येऊनही मी झोपू शकत नव्हतो. अखेर रात्री सव्वा वाजता तिने विचारचक्र थांबवण्यासाठी गोळी घेतली.  ती झोपल्यानंतर मी कटाक्षाने जागा राहण्याचे प्रयत्न सोडून झोपेच्या अधीन झालो तेव्हा बहुतेक रात्रीचे अडीच वाजले असावेत. सकाळी सहाला जाग आली तसा मी उठलोच. इथे झोपलो असतो तर पाणी येवून गेल्यानंतरही ब-याच वेळाने उठलो असतो. ते उपयोगाचे नव्हते. पावणेसातला पाणी येईपर्यंत शक्य तेवढी इतर कामे आटोपली. पाणी आल्यावर पाणी भरले. पाणी भरतानाच मला पडलेले स्वप्नं आठवले. अगदी छोटे. मी एस. टी. बस मध्ये उभा असतो. गर्दी असते. बस एका ठिकाणी थांबते आणि माझ्या बाजुच्या सीटवरची सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आजी उठते व बसमधून उतरते. ती चहा घेऊन परत येईल की ती खरोखरच तिच्या मुक्कामावर उतरली हा विचार मनात येत असतांनाच काही असो आपण बसून घ्यावे , असा विचार करून मी  रिकाम्या जागेवर बसतो. इतक्यातच मला जाग आली. त्यानंतर माझे व्यवहार सुरू झाले. आज सौ. लवकर उठणे शक्यच नव्हते.


              आज गुरूवर्य सुरेश भट यांची जयंती.  खरे तर इयत्ता नववीपासूनच मी कविता लिहीत होतो. माझी वाटचाल कवितेकडून गीतकाराकडे होत असतानाच 1984 च्या दिवाळी अंकात मला दादासाहेबांची गझल प्रथम वाचनात आली . त्या एकाच रचनेने मी सुरेश भटांकडे ओढला गेलो.  तेव्हा मराठी गझल हा प्रकारच मी ऐकला नव्हता .  पण त्यानंतर भटांच्या आणि म.भा. चव्हाण , सर्वोत्तम केतकर , दीपक करंदीकर....यांसारख्यांच्या गझलाही वाचनात आल्या. दादासाहेबांचे रंग माझा वेगळा आणि एल्गार हे संग्रह तर मी झपाटल्यासारखे वाचले. त्यातल्या गझलांची लय माझ्या मनावर कोरली गेली. तर पुढे मी ब-यापैकी गझल हा काव्यप्रकार लिहू लागल्यावर ' सावली ' ही गझल खुद्द सुरेश भटांना उद्देशून लिहिली . ती पुढे दैनिक मुंबई रविवार सकाळ मध्ये दि. 28.02.1993 रोजी प्रसिध्द झाली.  त्यावेळी दादासाहेब कधी नागपूरला तर कधी पुण्याला असायचे. त्यावेळी वाहतुकीची साधनेही अपुरी होती. मला त्यांना भेटायची ओढ लागली होती. पण ते शक्य होत नव्हते.  व्याकुळ होऊन मी गझल लिहिली, ती अशी होती :

                  सावली

तू न भेटलास तर मी कुणीच ना इथे !
नांव-गांव कोठले ? ती हमीच ना इथे !

घे मला तुझ्याजवळ... साथ दे तुझी मला ...
पाहिजे मला तशी जिंदगीच ना इथे !

नेहमीच हा तुझा संग लाभु दे मला !
सांग भेटशील तू नेहमीच ना इथे !

आरशात हे तुझे सारखे दिसे हसू
अन् तयार झाकण्या पापणीच ना इथे !

गावही तुझे कसे ... दूर तारकांपरी....!
काय चालले तिथे ? ... बातमीच ना इथे !

काय चांदण्या करू ? काय चंद्रही करू ?
साथ जी हवी तुझी नेमकीच ना इथे !

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !

            खरंच होतं , नागपूर ते रत्नागिरी हे हजार किमी.चं अंतर. एवढया अंतरावरून दादासाहेबांनी रत्नागिरीतल्या जाकीमि-या गावच्या धुळीतलं फूल उचललं ! ते नसते तर मी गझलकार म्हणून कुणीच नसतो. त्या काळातच नव्हे तर त्यानंतरही अनेक वर्षे रत्नागिरीत मराठी गझल लिहिणारे कोणीही नव्हते. ( सुदैवाने, आता आताशी परिस्थिती बदलते आहे ! ) गझलची कसलीही माहिती त्यावेळी रत्नागिरीत कोणी देऊ शकत नव्हते. माझा मित्र अजिज हसन मुकरी फक्त माझ्यासोबत होता. आम्हीच आमचे परीक्षक होतो. समीक्षक होतो. भटसाहेबही कधी नागपूर तर कधी पुणे असे वास्तव्य करायचे. म्हणूनच मी म्हटले होते :

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !

              सुरेश भटांच्या आठवणीतच दुपार झाली. जेवण , वामकुक्षी , लेखन , वाचन यात दुपार जाऊन संध्याकाळ आली. एक एक करता पाच सहाजणी आमच्याकडे जमल्या आणि काही वेळातच कलकलू लागल्या. गंमत म्हणजे वाद दोघीतच होता . पण बाकीच्या त्यात प्रचंड उत्साहाने उतरल्या. बराच वेळ बायांचे धिमशान चालूच होते. अखेर मी दम दिला आणि फक्त दोघीनीच काय ते बोला आणि तेही मोठयाने बोलायचे असेल तर तुमच्या घरी जाऊन बोला. आता पोलीसांची गाडी येण्याची वेळ झालीच आहे. हे सांगताच पाच मिनिटात सगळया सरळ आल्या. सात वाजले तसे आम्ही दिवाबत्तीकडे वळलो. मग त्याही आपापल्या घरी गेल्या. रात्री लवकर झोप लागत नव्हतीच . साडे अकरा वाजता अंथरूणावर पडलो. पण बाराच्या दरम्याने झोप लागली. सौ. ने गोळी घेतली होती. दीड वाजता ती जागी झाली. परत पाच मिनिटात झोपी गेली. पण मला आलेली जाग चालूच राहिली. मला पहाटे कधी तरी झोप लागली.

( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: