सोमवार, ६ एप्रिल, २०२०

कोरोनाचा महत्त्वाचा दिवस

मागे - पुढे

05.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा बारावा दिवस सुरू झाला . मागच्या दारी जाऊन पाण्याची व्यवस्था केली. पुढे आलो तर पुढे खालच्या बाजूला मासळीबाजार जोरात भरला होता. काल एक नेता सावधपणे म्हणाला  , '' लोकांचे अनेक प्रश्न आहेत .'' पण खरा प्रश्न असा आहे हे सारं लोकांचाच जीव वाचवण्यासाठी तर चालंलय . मग गर्दी करणा-या बेजबाबदार लोकांनाच त्याची पर्वा नसेल तर उद्या हे लोक मतं द्यायलाही शिल्लक राहणार नाहीत ! एकूण काय तर , गावातले मासळीमार्केट संचारबंदी आणि सोशल डिस्टंन्सचे तीन तेरा वाजवीत चालूच ! यात शहरातला कोणी कोरोनाग्रस्त आला तर ... ? निदान सुरक्षित अंतर तर ठेवावे ! मी परिसर स्वच्छता केली . आम्ही नाश्ता केला. टीव्ही लावून बसलो. मध्येच बंदिनी वहिनींची आठवण आली . मागे गेलो. चेतन घरीच होता. त्याला हाक मारली. चौकशी केली. तर वहिनी बरी असल्याचे कळले.  तिकडून हाँलमध्ये आलो एवढयात लंबूवहिनी सकाळी  साडेनऊ वाजता कालवी घेवून आली. कालवीचं टोपलं बाहेर ठेवून आली ती थेट घरातच....गप्पा मारायला बसली....ही मधली माणसे ...घरात बसलेल्यांना बाजार आणि बाजारवार्ताही आणून देणारी . हातावर पोट असलेली , भोळीभाबडी माणसे. पण हयांना काही बदमाश प्रवृत्तींनी कोरोनाच्या हया जीवनमरणाच्या प्रसंगीही आपले हत्यार बनवले आहे. हयांच्यामार्फत छुपा प्रचार सुरू केला आहे. तिथे करोडोनी माणसे मरत असतांना इथे जगाच्या कोप-यातल्या टीचभर गावात व्देषयुक्त अफवा पसरवण्यासाठी हयांचा ते नालायक शिताफीने वापर करून घेत आहेत. शिकूनही लोक सद्या अडाणी वागत आहेत , तिथे लंबूवहिनीसारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळया होणा-या अशिक्षित अडाण्यांचे काय घेऊन बसलात ! अशात गरीबाला कोणी पाचशे रूपयाची फुकट मदत केली तर गरीबाला ते हिमालयाएवढे मोठे उपकार वाटणारच ! त्यांना कळतच नाही की त्यांच्याच शोषणातून कमावलेल्या रकमेतलाच तुकडा त्यांच्या तोंडावर फेकला जातो आहे ! खरे तर ही माणसाला लाचार बनवण्याची , त्याला आपला अंकीत करून ठेवण्याची , पुढच्या काळात तो आपलीच री ओढील असे करण्याची तजवीज आहे. ही भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वल्गना करणा-यांनीच दिलेली लाच आहे , हे हया अडाण्यांना कसे समजणार ! कोरोना प्रसारकांइतकेच हे अडाणी लोकही धोकादायक आहेत. त्यांच्या गरीबीचा गैरफायदा घेवून त्यांना प्रबळ दुष्ट लोकांनी तसे बनवले आहे. हा विचार करत करत दुपार झाली. जेवण झाले. वाचन, लेखन पार पडले. काही मिनिटांची वामकुक्षीही झाली.

                पाच वाजले. चहा झाला. ही बीनाकडे गेली. मी उद्या सोमवार असल्याने पाणी येणार नसल्याने आज झाडांना पाणी लावले नाही. त्याऐवजी गच्चीवर फिरायला गेलो. तिथून सूचलेली कविता फेसबूकवर पोस्ट केली ती अशी

इमारती , माणसे आणि पाखरे ....

दूरवर नजर टाकली तर फक्त इमारतीच दिसत आहेत
इमारतींचे चेहरेही रंगीतसंगीत आहेत
माणसे मात्र कुठेच दिसत नाहीत
पाखरांचा चिवचिवाट सुरू आहे
माणसांचा शोध घेत असल्यासारखा
मी समजूत घालतो आहे पाखरांची
ती घराकडे परतत असतांना ....

           आणखीही एक कविता सुचली. ती अशी ....

तुझ्या घरी तू सुखी रहा !
माझ्याकडे येऊ नकोस असे नाही ,
पण येतांना सर्व आधुनिक अलंकार म्हणजे , मास्क , स्कार्फ , सँनिटायझर इतकेच काय
हेल्मेट वा ऐतिहासिक शिरस्त्राणासहच ये !
पण तुझं हे साग्रसंगीत रूप आरशात मात्र पाहू नकोस कारण तूच किंचाळशील तुला पाहून !
आणि यासाठी तुझ्या नेहमीच्या तयारीसाठीचा वेळ
किमान तासभर तरी नक्कीच वाढेल ,
शिवाय
तुझ्या आणि माझ्या मनात कोरोना धगधगत राहील तो वेगळाच !
त्यापेक्षा , तू तुझ्या घरीच रहा ,
काय दिवे लावायचे आहेत ते तिथेच लाव सँनिटायझर न वापरता ,
आणि दिवे ओवाळायचे असतील तर खुशाल ओवाळ तिथूनच !
परवा ढोल बडवलेस , फटाके फोडलेस गर्दी करून
आज कदाचित तुझ्यामुळे पुन्हा गर्दी वाढेल रस्त्यावर !
तू चुकूनही गर्दी होऊ नकोस आंबटशौकीनांची !
काहीही कर , पण घरातच कर !
खरे तर पेटता दिवा घालवणे अपशकून असतो असं माझी आज्जी सांंगायची आणि तिला तिची आज्ज्जी सांगायची असं पुन्हा मला तीच सांगायची !
तरी पण मी दिवे विझवूनच दिवे लावणार आहे !
जाणीवपूर्वक अंधार करून दिवे लावणार आहे !
पण माझ्या घरातच !
ते बघायलाही तू माझ्याकडे येऊच नकोस ...
तुझ्या घरी तू सुखी रहा !

       कविता संपली तोच बंदूचा फोन आला. अरे ही बघ मला कशी त्रास देते ती ! मी म्हटलं काय झालं ? तर म्हणे तिला घराजवळचा पर्या दिसतोय आणि शेजारची झाडं दिसतायत. घरी जायचंय म्हणते. उद्या दुपारी 12 वाजता डिस्चार्ज देणार आहेत. मी म्हटलं बारा सांगू नकोस , एक वाजता सांग. चुकून उशीर झालाच तर चला , चला करतील वहिनी . तो मला म्हणाला बोल हिच्याशी. मग मी बोललो वहिनींशी. त्या म्हणाल्या , मला सगळं सांगा. मग मी त्या दिवशीच्या सकाळपासूनची कथा त्यांना ऐकवली. जरा विनोद केले तश्या त्या हसू लागल्या. जरा मोकळया झाल्या. बोलणे संपले तरी मी गच्चीवर फिरतच होतो. शेवटी दिवाबत्तीची वेळ झाली तसा मी खाली आलो. दिवाबत्ती केली . रात्री नऊ वाजता आवाहनानुसार सर्वांनी वीज बंद करून दिवे लावले. पण अपेक्षेप्रमाणेच घडले. मागच्या वेऴेला घंटेसोबतच लोकांनी रस्त्यावर गर्दी करून ड्रम बडवले . यावेळी पणत्या लावून फटाके फोडले. गर्दी करून मोठा आरडाओरडा केला. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी आम्हांला वेळ काय , आवाहन काय आणि आम्ही करतो काय , हे कळत नाही ! बाकी झोपेपर्यंत वेळ चांगला गेला. काल रात्री फक्त एकदाच जाग आली हे विशेष !

    ( क्रमश: )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: