मागे - पुढे
19.04.2020
आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सव्वीसावा दिवस. काल संपूर्ण रात्रभर झोप आली नाही. नेहमीप्रमाणे दीड वाजेपर्यंत झोप आलीच नव्हती . नंतर झोप लागेल असे म्हणून पडून होतो. दोन वाजल्यापासून मागच्या दारी पत्र्यावर रेवा म्हणजे अगदी बारीक दगड मारल्याचा आवाज येऊ लागला. एक तर रात्रीचेे दोन वाजलेले. डावी उजवीकडे शेजार नाही. डाव्या बाजुला तर जंगलच. मागचे पुढचे शेजारी ऐन झोपेत. सकाळीच दंगलीचे स्वप्नं पडलेले. त्यात सोबत पत्नी. तीही भित्री. जाम टरकली होती. मी काय प्रकार आहे ते बघतो म्हटलं तर तिने मला उठूच दिलं नाही. साडेतीन वाजेपर्यंत मी कानोसा घेत होतो. त्यातच उत्तरेकडच्या खिडकीतून जंगलाच्या भागातून विजेरीचा प्रकाशझोत पडला. कोणी तरी आहे तिथे असेच वाटू लागले. मला खिडकीतून बाहेरचे स्पष्ट दिसू शकत नव्हते , पण बाहेरून आतले दिसत असेल तर ? हे कधी आपण तपासलेच नव्हते. अनेक प्रश्न पडू लागले. आता मलाही थोडी भीती आणि काळजीही वाटू लागली. वरच्या बाजुच्या बागेतल्या अवघ्या दोनच कलमांवर आंबे होते. ते चोरायला कोण आले असावेत , असा एकूण परिस्थितीतून अंदाज येत होता. पण बराच वेळ झाला तरी पुन्हा विजेरीचा झोत पडला नाही , म्हणजेच तो उजेड वरच्या वळणावर गाडी वळतांना पडलेला हेड लाईटसचा असावा. या विचाराने मलाही जरा धीर आला. मी शांत होऊन पत्र्यावरचे आवाज ऐकू लागलो. पुढच्या दारात अधून मधून वा-याचा आवाज येत होता. मग मी पडलेल्या स्थितीतच मागच्या दाराचाही कानोसा घेतला. तेव्हा मला आज वारा सुटल्याचे नक्की कळले. वा-याने पानगळ होत होती व तिचा आवाज मागच्या पत्र्यावर येत होता. बहुतेक अधूनमधून झाडाची एक फांदी वा-यामुळे कोप-यावर पत्र्याला घासतही असावी. पण वारा नसतांनाही रेव्याचा अधूनमधून येतच होता. मग लक्षात आले की झाडावर पक्षी जागे झाले असावेत व त्यांच्या हालचालींनी मोहोर व पाने गळून आवाज येत होते. वारा आणि पक्षी यांचा हा कावा होता तर. मी हे हळू आवाजात सौ.ला समजावून सांगितले व भिण्याचे काहीच कारण नसल्याचेही सांगितले. पण ती घाबरलेलीच होती. अखेर ती आपण हॉलऐवजी बेडरूममध्येच झोपू म्हणाली. तिथे फॅन जवळ असल्याने कसले आवाजच येत नाहीत. मग आम्ही बेडरूममध्ये जाऊन झोपलो. तरी एकदा मोठा वारा आल्याने आवाज आलाच. तो मी सौ. ला दाखवला . ती जरा शांत झाली. पण तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. सहा वाजता मी उठण्याचा प्रयत्न केला पण डोळेच उघडत नव्हते. मग मी झोपून दिले आणि नेमकी मला झोप लागली. सात वाजता शेजारची मम्मी खालच्या रस्त्स्याने चालली होती . तिला खालच्या टाकीतले पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहतांना दिसले, तशी ती बोंबटत आली. तिने पुढच्या दारावर थापा मारल्या. तरी आम्ही डाराडूर होतो. मग तिने बेडरूमच्या खिडकीवर टकटक केली तशी मला जाग आली. सौ.सुघ्दा धडपडत उठली. मम्मीचे धन्यवाद मानून आम्ही पाण्याकडे धावलो. पाणी जातच आले होते. जेमतेम एक हंडा व कळशीभर पाणी भेटले. आम्हां दोन माणसांना दिवसाला ते पुरेसे होते ! पाणी भरून झाल्यानंतर मी साफसफाईला पुढच्या बाजुला आलो तेव्हा माझे लक्ष दरवाजावरच्या तोरणाकडे गेले. ते मध्यभागीच्या चुकेतून निसटून थोडे खाली लोंबत होते. म्हणजे , खरेच कोणी तरी रात्री दरवाजाकडे काही तरी करीत होते की काय ? कदाचित , ते मम्मीचा हात लागून तर खाली आले नसेल ना ? पण मम्मीची उंची पाहता ते शक्य वाटत नाही. मी मम्मीच्या दरवाजावर हात मारण्यामुळेच ते तसे झाले असणार असे बोलून ते तोरण व्यवस्थित लावले.
बाकी दिवस नेहमीसारखाच असला तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढवणाराच ठरला. कमी होतोय असे वाटत असतांनाच एकदम वाढ झाली. बहुतेक रविवार असल्याने आज चिकनची दुकाने उघडी ठेवल्याचा हा परिणाम असावा. कोरोना आणला कोणी , सुरूवातीला पसरवला कोणी हे प्रश्न आता मागे पडले असून आता हे गर्दी करणारे , भाजी , चिकन प्रेमी व मॉर्निंग वॉकप्रेमी कोरोना प्रसारक कोण आहेत , याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
( क्रमश: )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा