बुधवार, ८ एप्रिल, २०२०

Fourteenth Day of Corona locked down in India

मागे - पुढे

07.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा चौदावा दिवस सुरू झाला . आज मंगळवार. आज पहाटे विचित्र स्वप्नं पडले. मागच्या दारी असलेला परिसर दिसला. पण तो माझ्या बालपणीचा. त्यावेळी घरात आणि अंगणातही सिमेंटकाँक्रीट नव्हते. सर्वत्र मातीच होती. मागच्या अंगणात पश्चिमेच्या गडग्यापासून तीन चार फुटाचा मातीचा भराव टाकलेला होता. प्राथमिक शाळेत आम्हांला पैशाचे झाड नावाचा धडा होता. माझ्या काही बालमित्रांनी मातीत काही पैशांची नाणी त्यांचे झाड होईल या भाबडया कल्पनेने ठेवली होती. मीही माझ्या मागील दारच्या त्या मातीच्या भरावात दहा पैशाचे एक नाणे रूजत घातले होते ! खरेच, त्यावेळी किती निरागस होतो आम्ही ! तर स्वप्नात तो मातीचा भराव , तो मागील दारचा जुुना परिसर , ते जुने घर आले.  मी भरावाच्या दक्षिणेला असलेल्या केळीच्या झाडाजवळ उत्तरेकडे तोंड करून उकीडवा बसलेला असतो. तिथे मी कसा गेलो, खाली बसून मी काय करीत होतो , हे मला त्या स्वप्नातही समजलेले नाही. तर मी उत्तर दिशेला तोंड करून समोरच्या मातीकडे बघत असतानाच मातीमध्ये चर खणलेला किंवा खड्डा पडलेला दिसला व त्यावर मध्येमध्ये अंतर ठेवून तीन चिरे ठेवलेले असतात. त्यापुढे मात्र तो चर दोन भागात विभागलेला असतो. एक फाटा वायव्येकडे तर दुसरा फाटा ईशान्येकडे गेलेला दिसतो. हे दोन्ही फाटे गडग्यापर्यंत गेलेले असतात. म्हणजे माझ्यापासून साधारण पाच सहा फूट लांब. त्या चरात पाणी भरतांना दिसते. त्यात छोटया लाटा उठतात. नदीच्या पात्रातल्या लाटांसारख्या . पाण्याला अचानक वेग येतो आणि ते एकदा वायव्येला , एकदा दक्षिणेकडे तर एकदा ईशान्येकडे या क्रमाने मागे पुढे फिरत राहते. तीन ठिकाणी फिरणारे ते पाणी अन्यत्र कुठेही जात नसते. आश्चर्य म्हणजे लाटा असूनही व पाण्याला वेग असूनही पाणी त्या चराच्या वर येत नव्हते. ही मर्यादा त्याला कोणी घातली होती ? पाण्याचे ते कसले हेलकावे होते ? पाण्याची ती कसली आंदोलने होती ? त्याला कोण दिशा देत होते ? कोण त्याची दिशा नियंत्रित करत होते ? हे मला त्या  स्वप्नातही कळले नाही आणि स्वप्नं संपल्यानंतर जागा झाल्यावरही कळले नाही. कसली विचित्र स्वप्नं पडतात मला ! एक तर माझे पोट खराब असावे किंवा त्या स्वप्नाने काही तरी सूचवले असावे. दक्षिण , वायव्य , उत्तर , ईशान्य आणि पूर्व असाही स्वप्नातील घटनांचा दिशाक्रम होता. ते पाणी ठराविक पध्दतीनेच दिशा न बदलता कसे फिरत होेते ? या दिशांना काय घडणार आहे ? की तो कोणत्या प्रांताचा नकाशा तर नसेल ना ? कोरोना हाॅटस्पाॅटसशी याचा काय संबंध असेल का ? मी टीव्ही लावला तेव्हा एका चँनेलवर मुंबईतले कोरोनाबाधितांचे हाॅटस्पाॅटस् दाखवत होते तेव्हा मुंबईचा नकाशा काहीसा स्वप्नातल्यासारखाच वाटला. कदाचित तो भासही असेल. उलटे झाले असेल. स्वप्नी वसे ते समोर भासे, असेही असेल. कोणाला असे काही स्वप्नं पडले असेल तर त्यांनी हया पोस्टखाली अवश्य कमेंट करावी. तुमच्यापैकी कुणाला माझ्या स्वप्नाचा अर्थ लागला तरी कळवावे , ही विनंती.

             अलिकडे माझ्या एक गोष्ट लक्षात येऊ लागली आहे. माझे पाय पुन्हा दुखू लागले आहेत. खाली बसतांना आणि वर उठतांनाही मला त्रास होतोय .  मध्यंतरी असे होत नव्हते. नाश्ता करता करता मी त्याचाच विचार करत होतो. अचानक माझ्या लक्षात आले की माझी लवचिकता कमी झाली आहे कारण हल्ली माझ्या कसरती थांबल्या आहेत. नेहमीच्या कामांतून हालचाली होत होत्या , पण त्या ठराविकच साचेबध्द होत्या. हल्ली बराच काळ मी विहीरीवरून पाणीही आणले नव्हते. कोरोनामुळे घरातच बंदिस्त झाल्याने हिंडणे कमी झाले . लवचिकतेसाठी मी पूर्वी कसरती करीत होतो त्याच आज संध्याकाळपासून सुरू करायच्या हे मी चहा पीता पीता ठरवले.

             स्वप्नाचाच विचार करत करत मी आठ वाजता आलेले पाणी भरले. टीव्ही लावला. पुणे , मुंबईत कोरोना वाढतोय. बातम्या बघणे कठीण झाले तसा मी टीव्ही बंद केला. स्नान करून देवबत्ती केली. श्रीपाद श्रीवल्लभांवरील दोन अध्याय वाचले. गेले दोन तीन दिवस या दरम्याने कोणीच येत नसल्याने दोन्ही अध्याय विनाव्यत्यय वाचले जात आहेत. वाचनानंतर मात्र लंबूवहिनी आली. ती बाजारात गर्दी करणा-या मुंबईकरांबाबत बातमी घेऊनच आली . तसं मी तिचं जरा बौध्दिक घेतलं. गळयापर्यंत आलं तरी , निवडणुकीच्या काळात मतं मागायला येणारे सर्व पक्षीय प्रचारक लोकांना गर्दी करण्यापासून रोखण्यासाठी , पोलीसांना मदत करण्यासाठी अजून बाहेर का येत नाहीत ? मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लोकांना गर्दी करू नका असे आवाहन करण्यासाठी , पोलीसांना मदत करण्यासाठी हया प्रचारकांनी व कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे.  प्रचार करायला बाहेर पडायचे त्यांचे आवाहन जसे लोक ऐकतात व उन्हातान्हातून बाहेर पडतात , तसेच प्रचारक व कार्यकर्त्यांचे घरातच राहण्याचे आणि गर्दी न करण्याचे आवाहनही लोक ऐकतील . माझे हे बोलणे तिला चांगलेच झोंबलेले दिसले.  लंबूवहिनीने विषयच बदलून टाकला. ही तीच लंबूवहिनी आहे जी कुणाच्या तरी सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाचा प्रचार न करणा-या लोकांबद्दल तिच्या पक्षाच्या लोकांकडे तक्रारी करीत असायची. जिला बूथवर कोणी वडापावसुध्दा देतांना मारामार होती ती अडाणी बाई आज आम्हांला चिथवायला आणि शिकवायला बघत होती. तिचे ऊत आलेले धर्मांध बोलणेही मी असेच खोडून काढले होते. वेळ काय , आपण करतोय काय ! शिकूनही अडाणी असलेले तिचे बोलाविते धनी मला माहीत होते. ती एवढी मूर्ख की त्यांना स्वत:चा असा वापर करू देत होती. मी तिचे ब्रेन वाँशिंग करून तिला वास्तवतेची जाणीव दरवेळी करून देतो आहे. दुर्दैवाने आमच्या शहरात तिसरा कोरोनाग्रस्त सापडला. ही एक महिला आहे. याची चिंता न करता दुस-यांनी हेतूपुरस्सर पेरलेले विचार उचलणारे काही गावठी सुशिक्षित अडाणी त्यावर नको ती चर्चा करतील आणि लंबूवहिनीसारख्या द्वेषफैलावकर्तीला आमच्याकडे बातमी सांगायला पाठवतील. मला पुन्हा तिचा ब्रेनवाँश करावा लागेल.

               हळूहळू दुपार झाली. जेवणं झालीत. वामकुक्षीही पार पडली. चहा घेऊन सौ. बीनाच्या आईबरोबर काही अत्यावश्यक कामासाठी गावातील दुकानात जाऊन आली . तिकडून येऊन मीतला बघायला निघाली. मला तुम्ही नका येऊ म्हणून सांगितलं. पण मी का नको म्हटल्यावर येता तर चला नाही तर मग तुम्ही उद्या जा , असं म्हणाली. मी दोन्ही बाबीना नकोच , तू जा , हे एकच उत्तर दिल्याने ती एकटीच निघून गेली. मी सकाळी ठरवल्याप्रमाणे कसरती सुरू केल्या. पाच दहा मिनिटातच मला खूप बरे वाटले. आनंद मिळाला तशा मी अधिक कसरती सुरू केल्या. वेगात चाललो. जागच्या जागेवर धावलोसुध्दा ! खूप बरं वाटलं. ही आली तेव्हा मी देवाजवळ बत्ती लावत होतो. मग टीव्ही लावला तर लाँकड डाऊनचा नवा आराखडा केंद्र सरकार तयार करीत असल्याची बातमी होती. तिकडे एबीसी आँस्ट्रेलियावर चीनमध्ये काही तासात एकही नवा कोरोना बाधीत रूग्ण नसल्याची बातमी होती. लुहान शहर हळहळू मोकळा श्वास घेणार असे दिसत होते. बीबीसीवर पण कोरोनाबाबतच सुरू होते. मग मी  मालिका बघण्यासाठी सौ.कडे रिमोट सोपवला. काही काळाने आम्ही जेवलो. पौर्णिमेचे दिवस असल्याने बाहेर मस्त चांदणे होते. मग अंगणात शतपावली करून अकरा वाजता झोपी गेलो.

    ( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: