मागे - पुढे
( क्रमश: )
14.04.2020
आज लॉक्ड डाऊनचा एकविसावा दिवस. आज भारताच्चे महान सुपूत्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. पस्तीस वर्षापूर्वी याच दिवशी माझी पहिली कविता दै. रत्नभूमी मध्ये छापून आली होती आणि तिचं शिर्षक होतं : ' राजकारण गेलं चुलीत ! ' मी पुढे कसा झालो ते सांगायला नकोच ! सर्वसामान्यांसाठी सतत लढणा-या नि:स्वार्थी महात्म्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणा-या लबाडांनी अनेक महात्म्यांच्या नावालाच काळीमा फासला आहे ! कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. या अवस्थेतही काही लोक राजकारण आणि राजकीय टिप्पण्या यातच मश्गूल आहेत. स्वत:चे घर जळायला आले तरी दुस-यांच्या घरात आगी लावणारे गेल्या काही वर्षात वाढलेले आहेत. त्यांच्याकडे लोकांनी आपली अक्कल गहाण टाकली आहे , हे ओळखण्याइतके ते बेरकी नक्कीच आहेत. इकडे लोक थाळया , टाळया वाजवायला सांगितल्यावर आणि दिवे लावायला सांगितल्यावर गर्दी करून ड्रम आणि फटाके वाजवत आहेत. पाचशे रूपयांसाठी बँकांच्या दारात सोशल डिस्टन्सचे बारा वाजवून गर्दी करत आहेत. कधी खाल्ले नाही तसे भाज्या आणि मासे याकरिता लोक जीव धोक्यात घालून गर्दी करीत आहेत. गेल्या काही वर्षात लोक उद्देशहीन होऊन अधिक भरकटत आहेत. या लोकांना आवाहने करतांना तारतम्य बाळगणेही कठीण झाले आहे. चार लबाडांकडे अक्कल गहाण टाकल्यावर माणसांची अशी मेंढरे झाली नसती तरच नवल ! सर्वत्र बेभानपणे धावून आपलीच माणसे कोरोनाचा जाहीर प्रसार करीत आहेत. कोरोना मेंदूवर ताबा मिळवतो अशी एक शंका आहे. काल रात्रीही ब-यापैकी झोपलो. आज एकही स्वप्नं पडले नाही. नेहमीसारखी सहाला जाग आली. मागच्या दारी जाऊन पंपाने पाणी वरच्या टाकीत चढवले. साफसफाई केली. तोवर पाणी आले ते भरले. आजही झोपेच्या गोळीचा अंमल लांबल्याने सौ. सातनंतरच उठली. आज फारसे कोणी आलेच नाही. आज कोरोना संचारबंदी तीस एप्रिलऐवजी तीन मे पर्यंत वाढवण्यात आली . दुपारी जेवणापूर्वी मुलाने व्हिडीओ कॉल केला. जरा फ्रेश दिसत होता. सुरूवातीला चांगला बोलला पण काय झाले कुणास ठाऊक , कदाचित संचारबंदी लांबल्याने आमचे पुण्याला जाणे लांबल्याने त्याच्या मनावरचा ताण वाढला असावा. तो घर फिरून दाखवा म्हणाला. घर बघूनही त्याचे मन भरून आले . बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले. तो रडल्याने आम्हां दोघांनाही रडू आवरले नाही. अखेर त्याला समजावून शांत केला. त्यानंतर थोडे बोलल्यानंतर मग तिघांनाही बरे वाटले. फोन झाल्यानंतर आम्ही जेवलो. जेवणात मन लागतच नव्हते. जेवायचे म्हणून जेवलो.
दुपारी मी वामकुक्षी केली. संध्याकाळी दोघी तिघी येऊन सौ. शी बोलत बसल्या. मी अंगणात फिरत होतो. मग मी पाणी शिंपायला गेलो आणि दरवाजा बंद करून ही बीनाच्या आईकडे गेली. ती आली तोवर सात वाजले. तिने आमच्या देवाजवळ दिवाबत्ती केली . मी भावाच्या घरात दिवाबत्ती केली. रात्रीही फारसे काही घडले नाही. तसे लवकरच झोपलो.
( क्रमश: )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा