मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

असा एक दिवस...

मागे - पुढे

28.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग पस्तीसावा दिवस. काल संपूर्ण रात्र दोघांनाही झोप लागली नाही. गोळी न घेतल्याचा परिणाम. रात्री दीड वाजता मुलाला फोन केला तर त्याचे वर्क फ्राँम होम सुरू होते. मग ही यूट्यूबवर व्हिडीओ बघत बसली आणि मी कोरावर उत्तरे देत बसलो. मला माझाच एक शेर आठवून हसू आले. तो असा आहे : 

        माझ्यापाशी जगाला हवी ती उत्तरे नव्हती !
        मी असा प्रश्न होतो जो कुणाला पडलो नाही !
....आणि असा मी रात्री दोन तीन वाजता कोरावरच्या प्रश्नांना उत्तरे देत बसलो होतो ! .... काय बोलणार ! तर....कित्येक वर्षांनी ही पहाटे पावणेपाचला उठली व नित्यकर्माला लागली. तिथपर्यंत मीही टक्क जागा होतो. नंतर माझा डोळा लागला असावा. सहाला जाग आली तेव्हा मी नुकताच स्वप्नातून बाहेर पडलो होतो. स्वप्नं अगदी बेकार पडले . अगदी विचित्रच ! आम्ही कुठल्या तरी बिल्डींगमध्ये दोघेही एका भींतीला डोकी लाऊन उभे आहोत. डोक्यापासून पायापर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत. सगळया शरीरावर रक्तच रक्त पसरलेले आहे. मी सौ.ला सांगतो की आपल्या आधीचे जोडपे भींतीला लागलेली डोकी काढून बाजुला न झाल्याने गत:प्राण होऊन बाजुला पडलेले आहे. आपल्याला काहीही करून भींतीला लावलेली डोकी मागे घेऊन इथून पटकन गेले पाहिजे. त्या प्रयत्नात असतानांच मला जाग आली. मी हे स्वप्नं सौ. ला सांगितले नाहीय. आज काय घडेल सांगता येत नाही. काही वाईट घडू दे नको म्हणजे झाले. आता धक्के सहन होत नाहीत. आज तिने परिसर सफाई केली.  वरच्या टाकीत पाणीही चढवले . पिंपळपानांचा काढा पिऊन व मला प्यायला सांगून ही झोपली ती आठ वाजता उठली . दरम्याने मी नळाचे पाणी भरले . आज व्हिडीओ करून अमेय धोपटकरना पाठवायचा आहे , त्याची तयारी केली. दोन तीन सुटे शेर व एक संपूर्ण गझल निवडून ठेवली. कलाकाराला अशावेळी शांतता लागते. सलग शांतता लागते. आमच्याकडे कागदपेन घ्यायचा विचार करतो नाही तोच अर्जंट प्रापंचिक हाक येते , अहो, तो नारळ फोडा , कडीपत्त्याचे टाळे आणा नाही तर आधी आंघोळ करा, एकवीस दुर्वा काढा वगैरे वगैरे ! स्वयंपाकघरातून ही हाकही अशी नेमकी वेळेवर येते ना... म्हणजे कमालच म्हणायला हवी...लग्नाचा मुहुर्त एक वेळ चुकेल , पण हा मुहुर्त कधीच चुकला नाही ! एवढे परफेक्ट टायमिंग सचिन तेंडूलकरकडे पण नाही (त्याच्या पत्नीकडे असणारच !) . आज अठ्ठावीस वर्षे सतत हा एकच जिवंत अनुभव घेतो आहे ! प्रपंच नेटका करण्यात कोणतीही कसूर न ठेवणारा मीही कधीकधी ऐन वेळच्या हया हाकांनी त्रस्त होत असतो. बरे ही हाकही इतकी अधीर असते ना की आपणाला क्षणाची उसंत मिळू शकत नाही. अशावेळी माझ्यातला नवरा माझ्यातल्या कलाकारावर सवयीने मात करत राहतो . शेवटी सौ.चाही नाईलाज असतो. तिलाही कामे असतातच व हक्काचे असे स्वयंपाकघरातील कामे करणारे तिसरे कुणीच नाही !( कोरोनाच्या काळात धर्मयुध्द खेळत बसणारी लंबूवहिनी तर आपल्याला परवडणारच नाही ! ) अठ्ठावीस वर्षे तेच तर करत आलो आहे. सवय झाली आहे आता. यातूनच काही तरी निर्मिती करण्याचा , छंद जोपासण्याचा कसाबसा प्रयत्न करत जगतो आहे. मनाप्रमाणे जगायचा विचार केला तरीही क्षणाप्रमाणेच विचार करावा लागतो. दुपारी बारा वाजता ही मिलेशच्या गाडीवरून मसाल्याच्या गिरणीत गेली तेव्हा मी व्हिडीओकडे वळायचा विचार करत होतो. खुर्चीसमोर टेबल ओढले तोच वरच्या बाजूस अगदी घराशेजारीच आंबे काढायला गडी आले . मग त्यांचा आरडाओरडा सुरू झाला. आता कसला डोंबलाचा व्हिडीओ बनवणार ! सांगितलेना क्षणापूर्वी की मनापेक्षा क्षणाप्रमाणेच जगावे लागते ! क्षणापुढे शरणागती पत्करून गप्प बसलो. सौ. गिरणीतून आली. नंतर आम्ही जेवलो. आता जेवल्याजेवल्या ही रूपाचा फोन आल्याने उन्हातून धावत तिच्याकडे गेली आहे. मागचे दार उघडले तर शेजारीच वबीनाच्या अंगणात शिरकाव करून विरेश कुठून तरी धान्य मिळवून आणून वाटप करीत बसलाय. ही बहुतेक तिकडेच धावली . खरोखरच्या गरीबांना धान्य मिळायला हवे आहे. आम्हांला निदान आता तरी देणे चूक आहे. पण बायकोपुढे बोलणेही चूक आहे !  अशावेळी आपण काय बोलणार , नाही का ? क्षणाप्रमाणेच जगणार ! जाऊदे ! आता बघा किमान तासभर तरी मला रिकामा वेळ आहे , पण जेवल्याजेवल्या रेकाँर्डींगही योग्य नाही , म्हणून शतपावली सुरूवात केली. अर्ध्या तासाने रेकाँर्डींगची जुळवाजुळव केली आणि सुरूवातही केली. गझलच्या  पाचपैकी चौथ्या शेरावर आलो आणि खालचे गेट वाजले. व्यत्यय आलाच. मी रेकाँर्डींग बंद केले आणि बघतो तर लंबूवहिनी आलेली. मी खिडकीतूनच सौ. घरी नाहीय म्हणून सांगितले तशी ती गेली. पाच मिनिटांनी मी नव्याने सुरूवात केली तर पहिला शेर संपतासंपता पुन्हा गेट वाजले. सौ. आली ! दुसरा व्यत्यय आला ! मग मी माझा गाशा माझ्या घरातून गुंडाळलाच आणि खालच्या घरात जाऊन रेकाँर्डींग करून परत आलो तर ही झोपलेली ! रेकाँर्डींग फारसे चांगले झाले नाही. एक तर कालच्या रात्रीचे जागरण , वयानुसार आवाजावर आलेली बंधने आणि सकाळपासून येत गेलेले व्यत्यय बघता मात्र ते ठीक झाले असे म्हणता येईल.  खालच्या घरात असतांना गेट वाजवत कोणी आले नाही , हे नशिब ! तरी सुरूवातीची दोन तीन मिनिटं कावळ्यांनी व्यत्यय आणलाच ! त्यांच्या कर्कश पार्श्वसंगीत सुरूवातीला तरी लाभलंय बुवा !  काय करणार, क्षणाप्रमाणे जगतो आहे. मनाप्रमाणे थोडाच जगतो आहे !अमेय धोपटकरांना सर्व साहित्य पाठवलं तोपर्यंत चहाची वेळ झाली. मग काय लवंडताही आलं नाही. पुन्हा क्षणाप्रमाणेच ! 

          चहा झाल्यानंतर उद्याच्या लेडीज मटन पार्टीच्या वाटपासाठी लसूण सोलून दिली. ही कांदालसूण शेगडीवर ढवळत असतांना लंबूवहिनी कांदेवाला आलाय म्हणून किंचाळत धावत आली ! ती धावली म्हणून ही धावली. जवळपासच्या सगळया धावल्या ! ही बायकांची सवयच असते. मी कांदालसूण ढवळत राहिलो. ही कांदे घेऊन आली तेव्हा मी सुटलो. पुढच्या पायरीवर लेखन करीत बसलोय. पावणेसहा वाजलेयत. मुलाला फोन केला. तेवढयात स्नेहा आली. पांडवीनकाकी आली. ही मैफील जमली. तेवढयात बंदूही वरती आला. तोही सामील झाला. अखेर मी झाडांना पाणी द्यायला उठलो तशी मैफीलही उठली. आज खालच्या बागेतल्या झाडांना पाणी दिले. सायंकाळ नेहमीसारखीच ढळली. कातरवेळ सरली. रात्र आली. आता नऊ वाजून गेलेत. सौ. ने सात वाजताच गोळी घेतली आहे. मी आता घेतोय. बघूया किती वाजेपर्यंत झोप येते ती. तसा आजचा दिवस चांगला नव्हताच. अर्धा दिवस तर मूड गेलाच होता. सकाळी एखादं माणूस आपला मूड बिघडवतं , मग दुपारपर्यंत याचीच पुनरावृत्ती करणारी माणसे भेटत राहतात. हे चक्रच असते. दुपारनंतर जरा बरी परिस्थिती आली. मूडही जरा बरा होता. संध्याकाळी झाडांना पाणी मिळाल्यावर तर खूपच फ्रेश वाटले. अरे हो, आज दिवस असा काही गेला की जाधव मॅडमच्या गझलकडे लक्ष द्यायलाच विसरलो. (आज स्वत:च्याच गझलचा विचार करण्यात बराचसा वेळ गेला ! ) जाधव मॅडमची क्षमा मागितली पाहिजे. कालच्या त्यांच्या *भारत शिक्षण मंडळाचे,  देव-घैसास-कीर कला,वाणिज्य ,विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय,रत्नागिरी* यांच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष (IQAC) सहाय्याने *कोरोना कोविड १९* विषाणूमूळे महाराष्ट्र व भारत सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांची दैनंदिन जीवनशैली बदलून गेली आहे. हा बदल एक भारतीय सुजाण नागरीक म्हणून *लॉकडाऊन काळातील बदललेली जीवनशैली* हा बदल कसा स्वीकारत आहात, याबद्दलचे सर्वेक्षण महाविद्यालयामार्फत करीत आहोत.यासाठी 
https://forms.gle/v3JKyffkmkD6AGYW7
दिलेल्या लिंकवरती क्लिक करा व त्यानंतर येणारी प्रश्नावली  सोडवा.  या संदेशानुसार,  लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनशैली बदलून गेल्याबाबतची प्रश्नावली आताच सोडवली. 


( क्रमश: )
...........







     








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: