रविवार, १२ एप्रिल, २०२०

Corona virus becoming dangerous

मागे - पुढे

11.04.2020


  1.                   आज लॉक्ड डाऊनचा अठरावा दिवस. काल रात्रभर झोप लागलीच नाही. सौ.ला तर झोपेची गोळी घेऊन झोप लागली नाही. अखेर सहा वाजता उठलोच. पण काय वाटले कुणास ठाऊक पुन्हा पडलो. नेमका डोळा लागला. काल सत्त्या सकाळी सात वाजता पाणी येईल म्हणून बोलला होता. पण माझ्या डोक्यातच तो विषय सकाळी आला नाही. नशीब बंदिनी वहिनीनी फोन करून पाणी आल्याचे सांगितले. धडपडत उठलो आणि पाणी भरायला मागच्या दारी गेलो. पण पाणी जात आल्याने एक हंडाच पाणी मिळाले. खालच्या अंगणातली टाकी मात्र पूर्ण भरली होती. आज शहरातून उर्मिला आली. ती म्हणाली खाली बाजाराच्या इथे पोलीस चौकी टाकणार आहेत. बरे झाले. मासे खरेदीसाठी शहरातले अनोळखी लोक यायला लागले होते व ही चिंतेची बाब होती. लॉक्ड डाऊनला अजूनही लोक गंभीरपणे घेत नाहीत . कोरोनाचा प्रसार जगभर ज्या झपाटयाने होतो आहे ते पाहता कोरोना स्पर्शाशिवायही होतोय की काय अशी शंका येऊ लागली आहे. जगाने आताच त्यावर मात करायची उचल खाल्ली पाहिजे .  यासाठी आधी लोकांना आपली जबाबदारी कळली पाहिजे. हा विचार डोक्यात होताच. सकाळीच ते कागदावर गझल स्वरूपात उतरले. तीच रचना मी फेसबूकवर पोस्ट केली.  ती अशी 


ते कौलारू घर कुठे दिसते का ते बघ !
गोठयात उभी गाय हंबरते का ते बघ !

उरल्यासुरल्या माणसांचा शोध घे !
मातीत , राखेत कुणी मिळते का ते बघ !

अंतर ठेव , पण कधी अंतर करू नकोस !
कोणासाठी काळीज जळते का ते बघ !

नवे विषाणू येत राहतील , सावध हो !
आयुष्याची किंमत समजते का ते बघ !

मानवाच्या अस्तित्वाचीच ही लढाई !
ही निवडणुक नाही , हे कळते का ते बघ !
   
...देवीदास हरिश्चंद्र पाटील

       आज सकाळी आण्णीन आली. तिच्या नव-याला आण्णा म्हणायचे , म्हणून ती आण्णीन. तिने तिच्या माहेरच्या पुढच्या गावातल्या तीन डाँक्टरांना पोलीसांनी तपासणीला सिव्हीलला नेल्याचे सांगितले. एका डाँक्टरने तर एका रूग्णाला तपासून कोरोनाची शंका आल्याने स्वत:च सिव्हीलला जायला सांगितले आणि आपण मात्र आणखी पेशंटस तपासले. पोलीसांना कळताच त्यांनी तो दवाखाना बंद करून डाँक्टरला सिव्हीलला नेले.  आण्णीनने भाजी चिरून दिली आणि ती गेली. दुपारी जेवायला बसलो . चार घास खातोय तेवढयात कांदयाबटाटयाचा टेंपो आला. खालच्या बाजूला असलेल्या भावाच्या घराशेजारीच मागील भागात जाणारा रस्ता आहे. तो नेमका गेटजवळच थांबला. लंबूवहिनी वासावरच असल्यासारखी धावत आली. तिची केवढी घाई उडालेली.  ती बोंबटत आल्याबरोबर माझी सौ. पण जेवण अर्धवट टाकून  पिशवी व पैसे घेऊन तिकडे गेली. तिकडे ब-याच बायका आणि काही ( हौशी ! ) पुरूषही जमले होते हे कलकलाटावरून कळून येत होते. मी व्यवस्थित जेवलो. हिचे ताट ओटयावर नेऊन झाकून ठेवले. अर्धा तास तरी हा गोंधळ संपणार नव्हता . लॉक्ड डाऊन करा नाही तर आणखी काही करा , लोक करायचे तेच करतात. थाळया वाजवायला सांगितल्या तरी गर्दी करून फटाकेच वाजवतात ! पणत्या लावायच्या वेळीही लोकांनी फटाकेच लावले !  सुधारक आगरकर किती अचूक होते , ते हया लोकांवरून समजते. शेवटी कांदे खरेदी करून ही आली आणि त्यानंतर जेवली. पोत्यातले कांदे कसे आहेत ते पोते सोडल्यानंतरच कळेल ! हिच्या जेवणानंतर ती वामकुक्षीकडे वळणार तोच मुलाचा फोन आला. त्याने खिचडी बनवली होती आणि ती खाता खाता तो बोलत होता. त्यात अर्धा तास गेला. फोन संपतोय नाही ताेच सत्त्याची बायको कंपाऊंडमधल्या दुर्वा काढायला आली. मी झाडे शिंपतो त्या ठिकाणी दुर्वा आल्या आहेत. दुर्वा काढल्यानंतर ती नंतर अर्धापाऊण तास बोलत बसली. कोरोनामुळे तिच्या कमावत्या मुलाचे काम गेले आहे. कुटुंबात कोणीही कमावते नाही. काय करायचे या विचाराने ती हैराण आहे. यंदा मुलाचे लग्नं करायच्या तिच्या विचारांची कोरोनाने पार वाट लावली आहे.  आमच्याबराेबर तिने मन मोकळे केले. ती गेली तोच अनमोलची आई रडत आली ! तिला मन मोकळे करायचे होते आणि सल्लाही हवा होता. प्रत्येकाची एक कथा आहे. प्रत्येकाची एक व्यथा आहे. सख्ख्या मुलाने खोली दे , मी भाडे देतो असे सांगितल्याने तिच्या मनाला फारच लागले होते. खरे तर त्याच्या दोन मुली आता वयात येत आहेत. घर अपुरे पडू लागले आहे. भाडेकरूची खोली रिकामीच होती. त्याने मुलींची पुढे दरमहा येणारी आणि होणारी अडचण समजून खोली मागितली असणार. आई देणार नाही म्हणून कदाचित त्या अनमोल रतनने भाडयाचा उल्लेख केला असावा. तरी तो चुकीचाच होता. हे सौ. च हे हुशारीपूर्ण उत्तर तिला पटले व ती जरा शांत आली. तिला जरा हलके वाटले. ती म्हणाली मलाही नातींसाठी खोली दयावीशी वाटतेच , पण मुलाने हे असे विचारले. काय करू तो सल्ला दया. आम्ही दोघींनीही एकाच वेळी खोली अवश्य दे म्हणून सांगितल्याने तिला बरे वाटले. मनमोकळे झाल्याच्या आनंदात ती निघून गेली. तोपर्यंत साडेपाच वाजले. मग आम्ही चहा पिण्यासाठी किचनमध्ये गेलो तोच लंबूवहिनी आली. तिलाही चहा दिला. दहा मिनीटांनी ही बीनाच्या आईकडे गेली . तिच्याबरोबर लंबूवहिनीही गेली. मी झाडांना पाणी द्यायला गेलो.  नंतर दिवाबत्ती केली. आमच्या अंगणात फिरलो.  तोपर्यंत सौ. इव्हीनिंग वाँक करून आली. तिने टीव्ही लावला.  लॉक्ड डाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढला आहे. 

                मी पुढच्या दाराच्या पायरीवर बसून फेसबूक उघडले. तोच मला कोकण किनारा ग्रूपने जाहीर केलेल्या गुणवंताच्या यादीत पहिला मान देऊन गौरविल्याची पोस्ट दिसली. पाठोपाठ अनेक जण अभिनंदनही करू लागले होते. त्या पोस्टची लिंक सर्व वाचकमित्रांसाठी इथे देत आहे :

Konkana kinara fb post

               हा माझ्यासाठी अचानक आलेला सुखद धक्का होता . कोरोनाने मन विषण्ण झाल्या अवस्थेत तर तो खूपच दिलासादायक व मन दुसरीकडे वळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त होता. मी कोकण किनारा ग्रूपचे आभार मानणारी पोस्ट केली. त्याचीही लिंक अशी :

My fb post

                      अभिनंदनांची नोंद घेता घेता मला काही दिवसांपूर्वी पडलेले स्वप्नं आठवले. ते स्वप्नं मी माझ्या '  ओन्ली देवीदास  ' ( याच ) मराठी ब्लाॅगवर मागे पुढे सदरात नमूद केले आहे.  स्वप्नात माझा मित्र प्रदीप मालगुंडकर हा माझ्या घरी येवून माझ्या लेखनासंदर्भात काही तरी बोलतोय व त्याच्यासोबत असलेल्या मित्राकडे माझे लक्ष जाण्यापूर्वी माझे डोळे उघडतात . तो न दिसलेला मित्र म्हणजेच यासिन पटेल ! त्याचे न दिसणे पण तिथे असल्याची जाणीव होणे म्हणजेच तो स्वत: मागे राहून मला पुढे आणीत असल्याची पावती होती ! मी ती पोस्ट सौ. ला दाखवली. तिलाही आनंद झाला. मग मी पोस्टची लिंक सौ.च्या विभावहिनीला पाठवली. विभा  उच्चशिक्षित आहे. वेंगुर्ल्यात माध्यमिक शिक्षिका आहे. तिला साहित्याची चांगली जाण आहे . तिचा अभिनंदनाचा संदेशही आला. 

            आज दूध प्यावे की जेवावे यापैकी जेवावे हा अाॅप्शन निश्चित करून आम्ही जेवलो. दोनच दिवसांपूर्वी आम्ही दूध पिऊन झोपलो होतो. जेवल्यानंतर आम्ही अंगणात शतपावली करू लागलो. तोच लंबूवहिनी आली. पाठोपाठ तिचा नातू राज आला. तो वीस वर्षाचा आहे. त्याच्या डोक्यात कोरोना प्रसाराबाबत काहीनी भरवलेले गैरसमज काढून टाकले. त्याच्या आजीलाही हे डोस होते. ती त्यावर विरोधात्मक व हिरीरीने असे काही बोलली नाही. तिलाही आता थोडीफार वास्तव बाजू पटू लागली असावी. मानव वंश प्रथम वाचवणे महत्वाचे आहे. काही लोक चुकतात , घाणेरडे वागतात , देशद्रोही असतात हे अगदी खरे आहे. पण ते दोन्हीकडे असतात आणि सगळयानाच एका मापाने मोजणे चुकीचे आहे. त्यातच हेतूपुरस्सर चिथावणीखोर अफवा पसरवणे हा तर गुन्हा आहे. ब-याच कच्च्या मडक्यांना हे माहीतही नाही. गप्पा मारता मारता आम्ही फिरत असतांना पावणे दहा वाजता सौ. ला अस्वस्थ वाटू लागले. ती म्हणाली चला , झोपूया. तिचे डोळे जड होऊ लागले होते. असे कधी झाले नव्हते. पण काल संपूर्ण रात्र ती टक्क जागीच होती , दुपारी कांदा खरेदीत जेवण अर्धवट टाकून उन्हात फिरली होती आणि माणसं येत गेल्याने जमिनीला पाठही लावू शकली नव्हती. तिला चक्कर आल्यासारखे झाले. मी तिला धरून बेडवर झोपवले. थोडया वेळाने मीठसाखरपाणी दिले. ताकत गेल्याने ती घाबरली होती. आम्ही दोघेच असल्याने मला घाबरून जाणे परवडणारे नव्हतेच. मी तिच्या डोक्याला व पोटाला बाम लावला . ढेकर आल्यावर तिला जरे बरे वाटले. तेवढयात विभाचाच फोन आला. तिला मी हिच्याविषयी सांगितले व हिलाही बोलायला दिले. अर्धवट ग्लानीतच ही बोलली. नंतर ग्लानीतच पडून राहिली. मी बारा वाजेपर्यंत बसूनच होतो. पुन्हा साडेबारा वाजता आणि नंतर पावणेतीन वाजता हिला बाथरूमला नेऊन आणले. पाणी प्यायला दिले. तीन साडेतीन वाजता बेडवर खूपच गरम होऊ लागल्याने लादीवर चटई अंथरू की चादर टाकू असे तिला विचारले तर ती म्हणाली चटईच टाका. मी चटई टाकून हिला खाली झोपवली व मीही पाठ टेकली. अधूनमधून मी उठून बघतच होतो. पण ती पहाटे झोपी गेली व मीही तासदीड तास बरा झोपलो. 


( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: