गिधाडे
विजयोन्माद वाढतो पराभूतांना खिजवण्यासाठी
पुढे काळ बदलतो चक्र , विजेत्यांची जिरवण्यासाठी !
काय नेतो सोबत सांग दुनियेचा निरोप घेतांना ?
आयुष्यभर असते धडपड , आयुष्यच हरवण्यासाठी !
युगे युगे हे गूढ कुणाला कळले नाही सृष्टीचे
काहींना मारले जाते, काहींना जगवण्यासाठी !
मी दिले व्यथेस माझ्या धुमारे नवनिर्मितीचे अन्
अश्रुत मिसळले हास्य मी, हुंदक्यांना हसवण्यासाठी !
प्रेताच्या टाळूवरचे लोणी खातातच केव्हाही ....
जगतात गिधाडे ही फक्त स्मशानात मिरवण्यासाठी !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा