शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

मना तुला सलाम !


माझ्या मना, तुला सलाम !


आता असे काही विशेष नाही. पुन्हा केव्हातरी बघू.  भेटू.  बोलू.  थोडं विचित्र  वाटत असेल पण त्याला इलाज नाही. काही काही वेळेला हे असेच असते. त्याला तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार ? बरोबर ना ? हुशार  आहेस. बरोबर ओळखलंस. . . . . .


एक वर्षानंतर :

आपण दोघे आहोतच कुठे ?

माझ्या मना , एक वर्षापूर्वी मी हे तुझ्याशी बोललो होतो ! एक वर्षानंतर आपण इथे  भेटतोय ! तसे आपण खूप ठिकाणी सतत भेटत आलोय . आपण दोघे आहोतच कुठे ? आपण एकच तर आहोत. हे माझ्या मना , एक वर्ष आपण ह्या पोस्टवर भेटलोच नाही . पण आपलं स्वगत चालूच होतं ! अनेक प्रसंग या दरम्यान आले . बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले . आपण दोघांनी ते मिळून पहिले ! अनेक  विसंगत बाबी आयुष्यात आल्या . आपणच त्या सुसंगत करीत गेलो ! अश्यावेळी तुझी साथ नसती तर ? माझे एकट्याचे काय झाले असते कोणजाणे ! पण तू सतत सोबत राहिलास ! अनेकदा मी नाउमेद झालो ! खचून गेलो ! डोळ्यात पाणी भरून आले ! पण तू धीर दिलास ! समजावलेस ! खरेच मी तुझा किती आभारी आहे याची कदाचित तुलाही कल्पना नसेल !

शनीच्या साडेसातीतले ते दिवस


शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होतो ! खूप खोल घाव झाले होते ! पण माझ्या बरोबरीने तू ते सारे सोसलेस ! तू  माझा सखा झालास . तू माझा परमेश्वर झालास ! माझे  प्रत्येक खचणारे पाऊल तू उचलून धरलेस ! कधीही तोल जाऊ दिलास नाही !  हे माझ्या मना , केवळ तू होतास म्हणून मी तरलो !

तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता . त्यातला गेल्या वर्षभरातला कालावधी तर अंत पाहणारा होता .  पण तुझ्या सोबतीने हा सारा प्रवास बराच सौम्य झाला ! आज १२ नोव्हेंबर २०१२ . दिवाळीचा आधला दिवस . ह्या पवित्र दिवशी , माझ्या मना, माझा तुला सलाम !


.............

सहा वर्षांनंतर....


आज 30.01.2018 ! सहा वर्षांनी मनाला पुन्हा सलाम करावासा वाटला ! 24.01.2018 ला 11.00 , 11.15 च्या दरम्याने माझ्या आईचे निधन झाले . ती नव्वद वर्षे जगली . वडील गेल्यानंतरही 17 वर्षे ती माझ्या सोबत होती . खरे तर , माझ्यापेक्षा माझ्या पत्नीच्या सोबत होती ! माझ्या पत्नीचे आणि तिचे नाते सासू सुनेचे कधीच नव्हते ! माझ्या लग्नाला 27 वर्षे झाली . एवढ्या वर्षात सासू सुनेची भांडणे झालीच नाहीत , असे स्वप्नवत विधान मी करणार नाही . माझी आई तशी कडकच ! पण माझ्या पत्नीने तिकडे पूर्णपणे कानाडोळा करून तिला माया लावून बरीच नरम केली होती . आई , आई म्हणून तिने आईला आपलीशी केली होती . संपूर्ण गावात सून कशी हवी , याचं उदाहरण म्हणून लोक माझ्या पत्नीचं नांव गेली कित्येक वर्षे घेत होते. तेव्हा आईच्या जाण्याचा धक्का तिलाच अधिक बसला . जाण्याच्या आदल्या रात्री आई यमयांतनांनी विव्हळत होती . ते बघून पत्नीला ताप आला . आजपर्यंत ती त्यातून सावरलेली नाही . 23.01.2018 च्या रात्रीपासून आजपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा नाही !  मना , तू सोबत आहेस म्हणून मी उभा आहे . म्हणूनच , तुला सलाम !

.......

०७ जून , २०२३ सकाळ ०९.२४


मी पूर्वी लिहिले होते : 

शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होतो ! खूप खोल घाव झाले होते ! ... आणि ...

तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता.‌

आणि आता...

त्या भयानक कालखंडातून बाहेर पडलो खरा... पण ....

आगीतून फुफाट्यात....


त्याहूनही खराब कालावधी सेवानिवृत्तीनंतर आला ! ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मी सेवानिवृत्त झालो ! नोकरीचा तो निरोपाचा क्षण... वाटलं आता आयुष्य साधं , सरळ, सहजसोपं जगता येईल. पण तसं व्हायचं नव्हतं...

आतापर्यंत तसं आयुष्य सरळ चाललच नव्हतं. पण आता नोकरीतील दगदग संपली होती. उशिरा का आलात , लवकर का चाललाय , रजा कशाला हवी , असले प्रश्नं आता तरी कोणी विचारणारे नव्हतं. तुम्हांला अमक्या ठिकाणी जावंच लागेल , तुमची तमक्या ठिकाणी बदलीच करतो , असंही धमकावणारं आता कोणीच नव्हतं. त्यामुळे मला हवं तसं निवांत आयुष्य आखता येईल आणि त्यानुसार चालता येईल , असं वाटलं तर वावगं नव्हतं. बरोबर ना ?  फार मोठ्या अपेक्षा नव्हत्याच , फार हौसमौज करायची नव्हतीच . पण किमान मुलाचं चांगलं लग्नं करावं , चांगल्या घराण्यातील, सालस पण खमकी , व्यवहारी सून मिळावी , आमच्या सारखीच हसून खेळून रहावी , घराचे गोकुळ व्हावे , हीच साधी अपेक्षा होती. पण... हाच गळ्याचा फास होऊन बसला....

मुलाची निवड त्याच्या आईला मान्य नाही. त्याने विचारताक्षणीच , हे होणार नाही , ही काळया दगडावरची रेघ आहे , हे तिचे उत्तर होते ! त्याला आता चार वर्षे झाली . या चार वर्षांत एकही क्षण खऱ्या अर्थाने सुखाचा झालेला नाही.  

गेली चार वर्षे घरात दोन विरूध्द प्रवृतींना सांभाळत जगतोय . कधी दोघांना फटकारून भानावर आणावं लागतं , कधी आंजारागोंजारावं लागतं... तर कधी दोघांनाही उमेद दयावी लागते. उभारी द्यावी लागते. उभे करावे लागते. पण मी ? मी कसा उभा रहात असेन ? मला कोण उभा करीत असेल ? 

अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या दोन ओळी सतत आठवत राहतात : 

माझ्यात बांधल्या मी साऱ्या अजिंक्य भींती
माझी मला दिली मी सारी इथे उभारी !


इथे हे मना, मी म्हणजे केवळ मी एकटा नव्हे ! तू सोबत आहेस ! बुध्दी साथ देते आहे आणि शरीर हे सर्व सहन करते आहे. पण हे मना , तू खंबीर आहेस , म्हणून मी उभा आहे ! तुला पुन्हा एकदा सलाम ! 

थोडं अधिक अवघड झालं आहे 

आज २९ जून , २०२३ .‌ आज पायाचा पट्टा डाॅक्टरला दाखवण्यासाठी सौ. ला दवाखान्यात न्यायचे होते. पण सकाळपासूनच धुंवाधार पाऊस सुरू झाला तो तू पाहिलासच. तीही म्हणाली आज नको जाऊया. तू हेही ऐकलंस .‌ आपण दोघेही घरीच थांबलो मग. पण माझी कमरदुखी आज वाढलीय. हे प्रकरण आता थोडं अधिक अवघड झालं आहे. हे कधी बरं होणार ? मला हिंडता फिरता येणार नाही का ? कुठेच प्रवास करता येणार नाही का ?  माझ्या मना ,  तू खंबीर रहा. मला लुळं पडायचं नाहीय.‌ 


#salute_to_mind

#mostpowerfulmind

#mindispowerful

#मनाला_सलाम