Story लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Story लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

बाल्याची अटक एक कथा

 बाल्याची अटक टलली !

https://youtu.be/FUDRqrLC7zc


आमी सातवीत व्हतो तवाची गोष्ट. आमच्या वर्गात तीन तीनदा नापास झालीली दांडगी पोरं व्हती. त्यातला बाल्या माझा मैतर झालीला व्हता. त्या दिवशी बगा , शाला सुरू झाली. वर्गबी भरला. आमी समदे सावरूनबी बसलो.‌ पन गुरूजींचा पत्ताच नव्हता. असं कधी झालीलं नव्हतं . गुरूजी एकदम वक्तशीर मानूस.‌ त्यातच कधी नव्हं ता बाल्या जरा टेंशनमधी दिसत व्हता. मी बाल्याला इचारनार एवढयात गुरूजीच आत आलं. पण त्यांच्यासंगं हेडगुर्जी पण आलं. हेड गुरुजीं जाम चिडलीलं दिसत होतं.‌ आमास्नी काय समजंना.‌ आमी समदे उभे राहिलीलं. तेवढ्यात, हेडगुर्जी म्हनालं, " बाळ्या सोडून सगळे बसा. " उभा राहिलील्या बाल्याकडं बघून हेडगुर्जी गरजलं. " बाळया काल संध्याकाळी गुरुजींना काय बोललास ? पन बाल्या काय बोलंना. तसं हेडगुर्जीच बोललं. काय रे गाढवा, काय बोललास तू गुरूजींना ? तुला कोणाला काय बोलायचं ते कळतं का ? ते कुठल्या पदावर, तू कुठल्या पातळीवर ! पदाचा मानबीन कळतो की नाही तुला ? " बाल्या कायबी बोलंना हयं बघून हेडगुर्जींनी बाल्याच्या एक मुस्काटात ठेवून दिली ! आमी समदे गपगार झालीलं. पन बाल्या आपला उभाच. थोडासा गाल चोलया लागलीला इतकंच .‌ हेडगुर्जी पुन्हा गराजले. " निगरगट्टा, तुला अक्कल आहे का काही ? याच्यापुढे जर मोठ्या माणसाला असलं काही बोललास तर याद राख. पोलीसातच देतो तुला ! अटक झाली म्हणजे समजेल तुला ! " असं म्हनून मोठं गुर्जी त्यांच्या खोलीत गेलं.‌ इतक्यातच एकदम पोलीस गाडीचा सायरन वाजला. तं बाल्यानं सुंबाल्या केला. त्याला वाटलं पोलीस शालेकडंच येतायत. तं बाल्या धावत जो निंघाला ता एकदमच लेडीज मुतारीत जाऊन लपला ! मैदानात पोरी लगोरी खेलत व्हत्या. त्यांनी ध. रा. जवलकर बाईना सांगलं. त्यांनी बाल्याला हाका मारल्या. तसा बाल्या बोलला मी येतो बाहयर, पन मला जवल धरा. मला पोलीसांची जाम भीती वाटते बाईनु. इकडं काही पोरींना घाई झालीली व्हती. त्या बाईंना करंगळ्या झालाय लागलील्या. भयंकर अटीतटीचा प्रसंग व्हता तो.‌ बाईंचा इलाज चालंना, बाल्या बाहयर निघंना. शेवटी बाल्याची अट बाईंनी मान्य केली तसा बाल्या बाहयर आला आनि जवळकर बाईंना त्यानं घट्ट मिठीच मारली. समदया पोरी किंचालल्या आणि हेड गुरुजींचं लक्ष खिडकीतनं बाहयर गेलं. त्यांना बाल्याची भीती दिसलीच नाही. दिसलं तं भलतंच ! झालं, गुरुजींनी फोन फिरवला. पोलीस गाडी गावातच व्हती. दुसऱ्या मिनिटाला पोलीस आलं. त्यांनी बघला तो बाल्या थरथर कापया लागलीला. भीतीपायी त्यांनं जवलकर बाईंना आणखीनच जवल केलीलं ! बाईंना मिठीतनं सुटता येईना. शेवटी पोलीसांनी त्यांना सोडीवलं आणि सगल्यांना हेडगुर्जींच्या खोलीत नेलंनी .‌तिथं समद्यांच्या जबान्या झाल्या. जबानीतनं पोलीसांना सगला परकार कलला. ते हसू लागलं आनि बाल्याची अटक टलली ! हयं पोर आपल्याला टराकतं हय बघून पोलीस खुशीत निघून गेलं. पोलीस गेलं. शाला सुटली. आमी समदं बाहयर पडलो.‌ त्या समद्यात बाल्या गुरूजींना काय अपमानास्पद बोलला व्हता तं आम्हा पोरांपैकी कुनालाच कललं नाय. मी बाल्याला इचारलं तं ता म्होरलाच बोलून गेला. काय तं म्हने मी काय असा तसा वाटलो काय त्यांना ! समाजतात काय सौताला ? मला अटक करया यांचं बापजादं याया हवंत ! संध्याकाल होयत आली व्हती. घराकडं जावन मला कोंबडी झाकयाची व्हती. मी आपला गप व्हवून घरचा रस्ता धरला. 

मंगळवार, २५ मे, २०२१

एक आवडलेली गोष्ट

 कोरोनाच्या ऐन भरातली ही डॉ . श्रीकृष्ण जोशी यांच्यासारख्या मातब्बर लेखकाकडून साकारलेली कथा.‌ तिच्यात काळजाला भिडणारं असं काही तरी नक्कीच आहे ! आपल्या ' मागे पुढे ' या पानासाठी बरेच दिवसांनी पोस्ट करीत आहे. अवश्य वाचा. व अभिप्राय द्या .‌‌‌‌‌...



*🌹इम्युनिटी अनलिमिटेड 🌹*


           *- डॉ . श्रीकृष्ण जोशी*


तिनं कटिंगचा ग्लास त्याच्यासमोर आदळला .

" हा चहा सातव्यांदा आणलाय , आता नाही म्हणालास तर..."

" सातव्यांदा ? मग माझ्या कसं लक्षात नाही आलं ? मग अगोदरच्या चहाचं काय झालं ?"

" आम्ही प्यालो ."

सगळे एका सुरात ओरडले .

" हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव . मोन्या , तुला आज नकला करून दाखवायच्या आहेत नाना नानी पार्क मध्ये , पण तिथल्या व्हीलचेअर वरच्या आजोबांचा हात हातात घे . त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही , याची काळजी घे . जगन , तू जिथं जाणार आहेस ,त्या अपार्टमेंटमध्ये चार जण पॉझिटिव्ह आहेत , त्या चारही जणांचे जेवणाचे डबे , त्यातलं अन्न गरम असेपर्यंत नेऊन दे . विन्या , त्या टीपॉय वर सामोसे , वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या आहेत , सगळ्या ऍम्ब्युलन्स मधल्या ड्रायव्हर्सना आणि स्मशान ड्युटी लागलेल्या सगळ्यांना दे आणि स्मशानात काम करणाऱ्या दादांना पण दे .कुणीही भुकेला राहता कामा नये . आता कोण राहिलं ? इरा , तुला दिलेल्या एरियातील हॉस्पिटलच्या बाहेर कुणी भांबावलेले , राहण्याची सोय नसलेले असे कुणी असतील तर त्यांची विचारपूस करून व्यवस्था कर , काही अडचण आली तर कॉल कर . नरेश तुझे पोलीस तुझी वाट पाहत असतील , त्यांना जेवणाचे पॅक नेऊन दे ."

" आणि तू काय करणार ? किमान तो चहा तरी पी ." आभा म्हणाली.


त्यानं चहा संपवला .


" - आणि कुठे कसं जायचं , आवश्यक ते फोननंबर्स अशी सगळी माहिती त्या टेबलावरच्या रजिस्टर मध्ये आहे . आणि हो , प्रत्येकाच्या नावाचं एक एक पाकीट ठेवलंय , त्यात खर्चासाठी लागणारी रक्कम आहे .ती कम्पलसरी घ्यायची आहे ."

" पण तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ."


" मी ? "


तो गप्प झाला .

त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं .

त्यानं ते वाहू दिलं .

" सॉरी वेदांत , आभानं असं विचारायला नको होतं , मी तिला सांगतो , ती नवखी आहे , उत्साहाच्या भरात विचारून गेली ."

जगननं त्याच्या खांद्यावर हात ठेवला .

" आम्हाला माहित्येय तू कुठे जाणार आहेस . " 

" ए चला रे , उशीर नको व्हायला ."


- सगळे निघाले .

आभा दारातून परत आली .

" सॉरी , माझं चुकलं " 

" इट्स ओके , चलता है , "

त्यानं डोळे पुसत आंगठा उंचावला .

ती बाहेर गेली .


त्यानं मोबाईल हाती घेतला . आणि व्हॉटसअपवर मेसेज टाइप करू लागला ...

" मित्रांनो , आभार नाही मानत मी तुमचे , पण कृतज्ञता व्यक्त करतो . तुम्ही आहात म्हणून इम्युनिटी अनलिमिटेड ला अर्थ आहे . थँक्स !"

मेसेज फॉरवर्ड करून तो उठला .

पुन्हा बसला .

 समोर भिंतीवर आजीआजोबांचं छायाचित्र होतं . 

त्यानं मनोमन नमस्कार केला .

आणि हृदयात कळ उठावी , तसा आभाचा प्रश्न मनात कल्लोळ माजवून गेला .

" तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ..."


काय सांगायचं ?

लहानपणी आईवडील गेल्यावर आजीआजोबांनी वाढवलं ते सांगायचं ?

की आजीआजोबांचा , दोघांचाही कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यावर बेड्स मिळाले नाहीत , ऑक्सिजन मिळाला नाही , ते सांगायचं ?

की ज्यावेळी ते तडफडत होते तेव्हा आपण मदत करू शकलो नाही हे सांगायचं ?

की खूप पैसे जवळ असूनही शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलायला , विचारपूस करायला आपल्याला जमलं नाही , शासकीय व्यवस्थेनं ते करू दिलं नाही , हे सांगायचं ?

की अंत्यदर्शनाऐवजी दोघांची डेथ सर्टिफिकेट्स तेव्हढी मिळाली , हे सांगायचं ?


-- विचार करकरून त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता .


आजीआजोबांना कुठं अग्नी दिला असेल ते माहीत नसल्यानं त्यानं स्मशानात अंदाजानं एका जागेसमोर उभं राहून हात जोडले . 

आणि जड पायानं परत फिरला .


थ्री बेडरूम किचनची मोठाली जागा त्याच्या अंगावर आली .

तो मटकन खाली बसला .


आजीआजोबांच्या छायाचित्राकडे बघताना त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं .


शेवटच्या दिवसात आजी आजोबांना काय वाटलं असेल ? 

त्यांची विचारपूस कुणी केली असेल का ? 

कुणी बोललं असेल का त्यांच्याशी ?

त्यांना वेळेवर जेवण मिळालं असेल का ?

तडफडत असताना माझ्या आठवणीनं हळवे झाले असतील का ?

आपण तरी ऑफिस टूर साठी जायलाच हवं होतं का ?

त्या सात आठ दिवसात सगळ्या भावविश्वात एवढी उलथापालथ ...?


सगळं चुकलंच म्हणायचं आपल्या कडून .


तो मनानं विदीर्ण झाला . खचला . 


पुढच्या आठदहा दिवसात तो वेड्यासारखा फिरत होता . 

हॉस्पिटल्स . 

स्मशानं.

ऍम्ब्युलन्स च्या जागा .

डॉक्टर्स , नर्सेस , सगळे कर्मचारी , पोलीस ...

सगळ्यांना भेटत होता ...


सगळ्यांचं एकच म्हणणं .

सगळ्यांनी इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे .

अन्न चांगलं हवं .

हवा शुद्ध हवी .

औषधं मुबलक हवीत .

शरीरापेक्षा मनानं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे .

आणि सर्वांनी संवाद वाढवला पाहिजे .


- ऍम्ब्युलन्स च्या एका ड्रायव्हरनं एकच वाक्य ऐकवलं .

तो म्हणाला ,

" विचारपूस करणारा कुणी असला की आम्हा सगळ्यांना बळ मिळतं . आणि माणूस कितीही आजारी असला तरी तो बरा होऊ शकतो ."


तो चक्रावला .

त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला .

तो तसाच घरी आला .

आणि त्याच्या डोक्यात अफलातून कल्पना आली .

त्याक्षणी त्यानं नोकरीचा राजीनामा पाठवून दिला , मेलनं .


आणि नव्या उपक्रमाची सुरुवात केली , *इम्युनिटी अनलिमिटेड* , या नावानं .

पुढच्या काही दिवसात तो पुन्हा सगळीकडे हिंडत राहिला .

आपल्यासारखे अनाथ झालेले शोधत राहिला .

त्यांच्या मनात तो उतरू लागला .

एकाचे दोन , दोनाचे सहा व्हायला वेळ लागला नाही .

काय करायचं ते स्पष्ट होतं .

पैशांचा प्रश्नच नव्हता त्याला .


संवाद साधायचा .

विचारपूस करायची .

कसलीही अभिलाषा न ठेवता , इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जेजे करता येईल ते करायचं .


आजी आजोबांना हीच श्रद्धांजली !


त्याला हवा तसा ग्रुप मिळाला आणि अल्पावधीत रिझल्ट्स मिळायलाही लागले .

दिवसेंदिवस ग्रुपमध्ये वाढ होत होती आणि अनेक ठिकाणाहून वाट पाहिली जात होती .


- तो उठला .

आभाच्या प्रश्नानं उठलेलं वादळ शमलं होतं .


त्यानं बॅग उचलली .

त्या बागेत असंख्य खेळणी , वैविध्यपूर्ण खाऊ , गोष्टीची पुस्तकं आणि बरंच काही होतं .


अगदी लहान वयात आईवडिलांचं छत्र हरपलेली अनेक बाळं , त्याची वाट पाहत होती .


डोळे पुसून , आजी आजोबांच्या छायाचित्राला नमस्कार करून तो बाहेर पडला ...


*- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी*

९४२३८७५८०६

-----------

कथा आवडली तर नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .


आणि हो , 

आपल्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अभिप्रायाची सुद्धा वाट पहात आहे .