रविवार, ८ एप्रिल, २०१८

“ डोळ्यात आसवांच्या ”

“ डोळ्यात आसवांच्या ”



शोधतो मी रंग त्याचा मझिया रंगांमधे
काल जो सांगून गेला रंग माझावेगळा !

       हे जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हाच मी ओळखले की मीही तोच रंग तीस वर्षापूर्वी शोधत होतो ! तो आणखी असेही बोलला “ मी वरवर कोठे जगलो , आयुष्य गझलमय होते ! ” तेव्हाच मला त्याच्या खोलीचा अंदाज आला होता ! बंगल्यामधुनी निघाल्या चळवळी , घेत साध्या झोपड्यामधले बळी ”  , असे त्याने लिहिले आणि तो मला अधिक पटू लागला ! पुढे , “ मी दाखवतो डोळ्यांना जगण्याचे वास्तव माझ्या  स्वप्नांच्या येण्यावर केव्हाच विसंबत नाही ”, असाही त्याचा शेर भेटला ! होय , मी त्याच गझलगोविंदाबद्दल बोलतोय जो भयानक वास्तव गझलांमधून सहजतेने मांडतो आणि त्याच वेळी , “  कोण अंकुरले मघाशी माझिया गात्रांतुनी , हा कुणाचा श्वास आहे पाकळ्यांहुन कोवळा ”, असेही म्हणतोय ! “ पान अळवाचे तशी तू .. थेंब पाण्याचा असा मी , भेट होते .. स्पर्श होतो .. पण बिलगता येत नाही ! ” ही तरल लाडीक तक्रारही तो किती सहजतेने करतोय ! “  डोळे भरून माझ्या वाचू नकोस गझला , पडतील शब्द माझे प्रेमात आसवांच्या ” , असे गोविंद नाईक या ताज्या दमाच्या गझलकाराने सांगितल्यामुळे मग “ डोळ्यात आसवांच्या ” ह्या त्याच्या पहिल्या गझलसंग्रहाकडे वळणे स्वाभाविकच होते ! तसा मी वळलोही. पण गेले काही महिने त्यासाठी पुरेसा वेळ देवू शकलो नाही , याबद्दल मला अपराधीपणा जाणवतो .

        रंग पुन्हा ह्या रानाचा हिरवा झाला तर ?
        ढग एखादा ओलेता हळवा झाला तर ?

        असा हळवा होणारा गोविंदा ,

        एक तिरंगा जपून ठेवा काळजातही
        रंग उध्या झेंड्याचाही भगवा झाला तर ?

        असे उध्याचे वास्तव छातीठोकपणे लिहितो !

        पुतळ्यांनी आकाश गाठले
        माणुसकी तळ गाठत आहे

        अशी उंची ह्या संग्रहात गाठतोय ! पुढे तो असेही सांगतोय –

        सोडुनी गेलेत जे रण काळजी त्यांची नको
        जे उभे आहेत त्यांचे धैर्य टिकले पाहिजे !
         मग खरी समजेल रामाच्या मनाची थोरवी
          रावणाने शिवधनुष्याला उचलले पाहिजे ! म्हणजेच आपण फक्त एकाच बाजूचे कौतुक न  
    करता आयुष्याची दुसरी बाजूही तितक्याच समतोलपणे पाहिली पाहिजे ! हा खरा गझलकाराचा दृष्टीकोण असला पाहिजे आणि तो गोविंदाकडे आहेही !

          आसपासचे भयाण वास्तव गझलकारांने टिपून त्यावर तितकेच प्रत्यंतकारी लिहिले पाहिजे . केवळ स्वप्नंरंजन आणि मनोरंजन हा गझलचा हेतू नाही ! हे गोविंद जाणतो आणि म्हणूनच तो लिहितो -         
   केवढा श्रीमंत होता बाप .. कळले
   राख पोरांनी विकाया काढल्यावर !

हे तो लिहू शकतो , कारण , “ शिकवते बाराखडी आयुष्य माझे , पुस्तके मी पाळली नाहीत कुठली ! असे त्याचे आयुष्य त्याला शिकवून चुकले आहे !

           कधी तरी बघ डोळे उघडून वर देताना
           काय तुझ्या चरणावर अर्पण होते आहे … आणि
          
           दूरदूर माणसे चालती माणसांतली
           हे कुठल्या शतकात पदार्पण होते आहे , तसेच

           हळू हळू वाढत जाते इच्छांची उंची
           रोज तोकडी नशिबाची चादर आठवते

           हे शेर माणसांना विचार करायला लावणारे आहेत !

           अशाच काही सुंदर , प्रभावशाली ओळी मला ह्या संग्रहात मिळाल्या –

           मलाच देण्यास मी दिलासा फिरुन माझ्याकडे निघालो , बघून आक्रोश चाललेला समोर लाचार यौवनाचा , घरात मी घेतले उगीचच अनोळखी चेह-यास माझ्या , धरून हातात हात माझा कुठे तुझी सावली निघाली , अखेर मारेकरीच माझा जिवास माझ्या फितूर झाला, असे कसे हे भरून प्याले समोर तू ठेवलेस दैवा , हरेक क्षण ऐकवून गेला जगावयाची उदात्त गीता इ. मात्र , शेरांच्या ह्या पहिल्या ओळींना दुस-या ओळींची अधिक उंचीची साथ लाभायला हवी होती , म्हणजे गझलची अधिक मजा घेता आली असती , असे वाटते ! अर्थात , मी जुना गझलकार असलो तरी मी काही समीक्षक नाही . एक रसिक म्हणून लिहिले आहे . तेव्हा चुकल्यास जाणकारांनी क्षमा करावी . गोविंदाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतांना एक आश्वासकता जाणवते आहे . ती ही की तो यशाची हवा डोक्यात जावू देणार नाही ! जो रंग तो शोधतो आहे , त्या रंगाने डोक्यात हवा जावू देवू नका आणि अधिकाधिक चांगले लिहा असेच त्याच्यासोबतच्या आणि त्याच्या नंतर विजा घेवून येणा-या प्रत्येक गझलकाराला सांगितले आहे ! तो रंग म्हणजेच आदरणीय सुरेश भट ! मराठी गझलचा खराखुरा रंग ! गोविंद नाईक हा रंग नक्कीच ओळखतो !


…. श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील