रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

स्फूट लेखन ६

 जीवन शिक्षण


शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात. संवाद, वादविवाद आणि मग वाद होतात. स्थानिक राजकारण आणि समाजकारण यांचे व्दंव्द यात हिरीरीने भर घालते. शैक्षणिक विकास हा विषय कधीच गायब होतो. उरतात ते आरोप प्रतीआरोप आणि वैयक्तिक हेवेदावे ! सामाजिक विषय वैयक्तिक पातळीवर हमरीतुमरीवर येतो. पूर्ण वेळ शाळा अर्धवेळ होत होत अखेर बंद होते. पिक्चर संपता संपताच पुन्हा सुरू होतो. पालक मुलांना दुसऱ्या शाळेत घालतात. तिथेही शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात... पूर्णवेळ.. अर्धवेळ.. .. होत....तीही शाळा अखेर बंद होते आणि हाच पिक्चर ठिकाणं बदलून चालूच राहतो ! पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१


.................

जलद, विश्वसनीय सेवा...जगभर


मुंबईहून आठ तारखेला कुरीयर केलं गेलं. केल्याची कुरीयरवाल्याची स्लीप मला कुरीयर करणाऱ्याने लगेच व्हाॅटस अॅपवर पाठवली. कुरीयर किमान तिसऱ्या दिवशी येणे अपेक्षित होते. तीन दिवस फोनवर नकारघंटा ऐकून चौथ्या दिवशी कुरीयर आॅफीसलाच गेलो. तिथल्या माणसाला स्लीप दाखवली. म्हटलं आज चौथा दिवस उजाडला. एक लखोटा यायला एवढे दिवस लागतील असं वाटतं नाही. तसा आतला दुसरा माणूस बोलला , लखोटा आहे का, मला पार्सल बोलले होते. लखोटा बघतो हा. मी आशेने हो म्हणालो. पण दोन मिनिटे शोधून तो मान हलवत नाही म्हणाला. मी निराश ! तसा पहिल्या माणसाने मुंबई आॅफीसला फोन लावला. स्लीपचा फोटोही व्हाॅटस अॅपवर पाठवला. मुंबईवाला बोलला बघून सांगतो. मी म्हटलं आम्ही सांगून बघितलं, तू बघून सांग ! मी थांबतो. पंधरा मिनिटे झाली तसा समोरचा माणूस बोलला, तुमचा नंबर द्या, मी फोन करतो. नंबर देतांना माझं लक्ष समोरच्या बोर्डाकडे गेलं. त्यावर जाड ठसठशीत ठळक अक्षरात छापलं होतं : जलद, विश्वसनीय सेवा...जगभर ! मी जग विसरून जलदगतीने घर गाठलं !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

विषय कट !


पोरं कसली तरी वर्गणी गोळा करीत होती. नेमके त्याचवेळी त्यातल्याच कुणाच्या तरी मोबाईलवर गाणे सुरू होते : " तुझ्या नामाचा व्यवहार ..." . विषय कट !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

देवळासाठी निधी संकलन


काही वर्षांपूर्वी गावातील देवळासाठी निधी संकलन करीत होतो. मी देवळाच्या शेजारीच राहतो. शेजारधर्म म्हणून मीही पावती पुस्तक घेऊन शहरात गेलो. ओळखीचे लोक भेटत होते. कोणी पावती फाडत होते, कोणी बहाणे सांगून सटकत होते. एकाने कहर केला. तोही ग्रामीण भागात राहणारा होता. त्याचं गांव तर अवघ्या दहा किमी वर होतं. गावातली परिस्थिती त्याला चांगलीच माहिती होती . त्यामुळे मला वाटलं तो चांगलीच पावती फाडेल. मी देवाचे आभार मानले. झालं भलतंच. तो म्हणाला, " मी राहतो दहा किमी वर. तुमच्या गावच्या देवळाचा मला काय फायदा? मी तर तिकडे कधी येत पण नाही. " आणि तो निघून गेला. अवघ्या दहा किमी अंतरावरच्या माणसाची ही कथा !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०२.२०२१

.................


बाबू, ये पब्लीक हैं !


मांजर भलेही चोरून दूध पितांना डोळे झाकत असेल; पण ते दूध पितानाचा चपाचपा किंवा पचापचा येणारा आवाज काही थांबवू शकत नाही. जग उघड्या डोळ्यांनी ( आणि कानांनी पण ! ) बघते ! बाबू, ये पब्लीक हैं , सब जानती हैं ! बोलो हैं ना ...?


   अरे हो, 💞💞 हॅपी व्हॅलेंटाईन डे !💕💕


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०२.२०२१

.................

गांवपॅनेल : लोकशाहीची नवी दिशा


नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी गांवपॅनेल्सनी बाजी मारली. गांवपॅनेल्सचा हा प्रवास राजकीय पाठिंब्यावर की अराजकीय लोकमतातून झाला हे पाहणे आवश्यक आहे. राजकीय पाठिंब्यावर निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्या व पूर्णत: अराजकीय लोकमतातून निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्याही अभ्यासली जाणे आवश्यक आहे. गांवपॅनेलला विरोध झाला का आणि झाला तर तो पक्ष , काही राजकीय / अराजकीय लोक की दोन्हींकडून झाला , हे पाहणेही आवश्यक आहे. तसेच गांवपॅनेल्सच्या पुढील प्रवासाबाबतही विचारमंथन झाल्यास ते महत्त्वाचे ठरेल. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०२.२०२१

...................

जया

आज त्याची आठवण आली. सुधरीन वहिनी सौ.ला कुवरी खातेस काय म्हणून विचारत होती. जया अशाच कुवऱ्या विकायला यायचा. तो माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. जया घरंदाज कुटुंबातला मुलगा. केवळ दारू प्यायला पैसे हवेत म्हणून दारोदारी कुवऱ्या विकायचा. माझ्या लग्नापूर्वीची ही सत्यकथा आहे. अखेरीला त्याची हालत बघवत नव्हती. दारूने त्याला पोखरलं होतं. खूप वाईट वाटायचं. आम्ही कधी कधी कुवऱ्या घ्यायचो. तो मागेल ते पैसे द्यायचो. जया ढोल खूप छान वाजवायचा. पण शिमग्यात ढोल वाजवण्यावरून त्याच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. खरं तर तेव्हा माऱ्यामाऱ्या हा ट्रेंडच होता. आता बरीच सुधारणा झाली. जया आता असता तर सुधारला असता का, हा विचार मनात येतो. 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०२.२०२१

...............


आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

काही वेळा आपल्याला चांगली परिस्थिती मिळते. तिचा उपयोग जीवन अधिक चांगले करण्यासाठी आपण किती करतो, हे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन इथून पुढे सुखी झाले पाहिजे, ही आपली प्रामाणिक ईच्छा असली पाहिजे. यासाठी वास्तवतेने विचार केला पाहिजे. मिळालेल्या छान परिस्थितीचा लाभ कसा घ्यायचा हे लक्षपूर्वक तपासले पाहिजे. आताची एक चूक सुंदर वर्तमान आणि भावी जीवन , दोन्हीही उध्वस्त करू शकतात.‌ इथे भावनेने नव्हे तर वास्तव विचार केला पाहिजे. असे केले तर काय होईल, तसे केले तर काय होईल, हे कागदावर निरपेक्षपणे मांडले पाहिजे. उत्तर मिळेल. वास्तव निर्णय घेतला तर आहे ती परिस्थिती आणि पुढचीही परिस्थिती चांगली राहीलच. पुढचे आयुष्य अधिक सुंदर होईल. आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०२.२०२१

...............


मी नाही त्यातली ....


सार्वजनिक अव्यवस्थेबद्दलचा काहींचा पुळका हा तात्कालिक विरोधासाठी किंवा फायद्यासाठी असू शकतो. सोयीस्कर असू शकतो. म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे ! अगदी नालायक कार्टे ! अंदरकी बात अशी असते की त्याच नालायक कार्ट्याशी विरोधकांची आतून व्यावसायिक भागीदारी पण असू शकते ! म्हणजेच साळसूदपणे वरून कीर्तन, आतून तमाशा ! त्यामुळे विरोधही , खबरदारी घेऊनच , तुटणार नाही अशा पद्धतीनेच होतो. कारण दोघांची लफडी दोघांना माहीत असतात. तंगडयात तंगडी, लंगडयात फुगडी चालतेच ! मी नाही त्यातली , कडी घाला आतली , यातलाच हा सोज्वळ प्रकार ! आता भ्रष्टाचार निर्मूलन कसे करायचे ब्बा ! 😃😄😃😄 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०२.२०२१

..............

देवाक काळजी 

हतबल सामान्य माणूस देवाक काळजी असं म्हणून सगळं देवावर सोडून देतो आणि देव म्हणतो, ही तुझी लढाई आहे, तू लढ ! वर फळाची (म्हणजे जिंकण्याचीही) ईच्छा धरू नकोस असं सांगतो ! काय करावं बा, चांगल्या सामान्य माणसांनी ?


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

...............

एका लग्नाला गेलो होतो. कोरोनाची दाट छाया कुठेही जाणवत नव्हती. सोशल डिस्टंसिंगवगैरे काही भानगड नव्हतीच. काहींनी मास्क घातले होते. काहींचे मास्क गळ्यात टांगलेले होते. काहींनी नियमानुरूप ठेवले होते. महिलावर्गाची काहीशी गोची होत होती. मास्क सौंदर्याला मारक की तारक हा त्यांच्याबाबतीत संशोधनाचा विषय होता. लग्नं लागलं . आईस्क्रीम आलं. त्यासरशी माझ्यासहीत होती तीही मास्क गळ्यात आलीत. विषय संपला !

....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

................

२५.०२.२०२१

वाह वाह वाह....सगळेच शेर अप्रतिम...

किती खुल्या मनाची असतात नाही माणसं ! पटकन दाद देऊन मोकळी होतात.‌ ही खरी माणसं.‌ शेर पूर्ण व्हायच्या आधीच ह्यांची दाद पूर्ण झालेली असते. कवी महाराजांनाही आता सराव झालेला असतो आणि ते उफाळून येऊन कविता सादर करीत असतात. तेव्हाही त्यांच्या मनात आपल्यालाही दुसऱ्या कवींना अशीच दाद द्यायची आहे हा एकमेव उदात्त विचारच असतो. 

हा त्याला म्हणतो, तो हयाला म्हणतो . दोघांनाही दाद हवी, दुसरे काय ? ते ठराविक वर्तुळातले ' अखिल विश्व एकमेकांची पाठ थोपटू ' मंडळातले कवी असतात. त्यांची पाठ थोपटायला कोणी येतच नाहीत. मग कवी तरी काय करणार ! हा कवी असो वा तो कवी असो ; शेवटी कवीला दाद तर हवीच असते ना मित्रांनो ! देव जसा भावाचा भुकेला असतो तसा कवी (पित्ताच्या नव्हे !) दादीचा भुकेला असतोच की ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

मागे पुढे पुन्हा एकदा

 ०९.११.२०२०


गेले २ - ३ दिवस राकेश तसा झालाय. 


शेवटच्या गझलकाराच्या गझला , परिचय , फोटो म. नानिवडेकरांकडे आजच पाठवल्या. 


सायं. ०६.३७ ला सुनील आडीवरेकरचा सावंतवाडीहून फोन आला. भाऊ सुधीर व दोन मित्र असे चौघेजण उद्या रत्नागिरीत व आमच्याकडेही येणार आहेत.


अरविंद ग्रील बसवायला आज येणार होता. आला नाही.‌ फोन करून उद्या यायला सांगितले. 

........


१०.११.२०२०


स. ०९.३० वा. सुनीलला फोन केला तर त्याच्या आईची तब्येत बिघडल्याने सुधीर येत नाही व सुनील आत्ताच मित्रांसह निघाल्याचे कळले. 


संध्या. ०४.३० वा. अरविंद व पब्यादादा चंदरकर ग्रीलचे साहित्य घेऊन आले व अंगणात ग्रील तयार करू लागले. 


.....तोच सुनीलची गाडी आली. सावंत , कंग्राळकर हे सावंतवाडीचे व मागाहून आलेले टाकळे मिऱ्याचेच असे चौघेजण आले.‌ एल एम एल बिझीनेस. नो इंटरेस्ट.


११.११.२०२०

काल रात्री एक गझल सुचली. पण मधल्या एका शेराची दुसरी ओळ स्फुरली पण दुसरी समर्पक ओळ येईना. अखेर आज सकाळी ती ओळ सुचली. 


काल सतीश टोपकर आमच्याकडे येणार होता तो आला नव्हता. खालच्या अंगणात ठेवलेल्या वाळूच्या २८ पिशव्यांपैकी ०२ कमी झाल्याचे लक्षात आल्याने सतीशला त्याच्या माणसांकरवी त्या आमच्या अंगणात ठेवायला सांगितले होते. आता हे नोंदीत असतानाच सतीश त्या पिशव्या हलवतोय. सकाळचे १०.२० झाले आहेत. तेव्हढ्यात उदू आलाय.‌ दिवस पुढे सुरू झाला आहे.


दुपारी जेवणाच्या वेळी समोर लक्ष गेले. तीन तरूण बंगल्याच्या रहाटाजवळ दिसले. कदाचित भैय्या भाभी सोडून गेल्याने रिकामा झालेल्या बंगल्यात काॅलेजकुमार रहायला येणार असतील किंवा ती मालकाची मुलेही असतील, असा विचार करून मी किचनकडे वळलो. 

संध्याकाळी केस कापायला गावातला मुलगा आला. मी केस कापून घेतले. उद्या सौ. ते रंगवणार आहे. केस कापले जातांना कडीपत्ता न्यायला विकास आला. त्याला 

विचारले तर बंगल्यात नवीन कोण रहायला येणार हे त्यालाही माहिती नाही म्हणाला.


संध्याकाळी पुढच्या दारी पायरीवर मोबाईल बघत बसलो होतो तर क्रांती आली. ती स्वत:च म्हणाली की ती बंगल्यात रहायला येतेय. म्हणजे लवकरच आमच्या शेजारी क्रांतीपर्व सुरू होणार...

........


१२.११.२०२०


आज वसुबारस. 

सकाळी स्वप्नं पडले. मी व नार्वेकर एका काॅलेज हाॅस्टेलमध्ये आहोत. आणखी तीन चार जणही आहेत. ते फिरायला जाणार आहेत. तत्पूर्वी नार्वेकर मला संगणकावर महाकोष दाखवण्यासाठी संगणक सुरु करीत असतात. मी पासवर्ड नीट बघून ठेवला पाहिजे, हे बाहेर गेले की पंचाईत नको, असा विचार करतो. प्रोग्रामच्या टचमध्ये राहिले पाहिजे, असे मी बोललो तर तेही म्हणाले की , नाही तर विसरायला होतं. तेवढ्यात दोन काॅलेजकुमारी काही तरी विचारतात. मी त्यांना तुम्हाला तिकडे रुम दिली आहे असे समोर बोट दाखवून सांगतो. इथेच स्वप्नं संपते. 



आज सकाळी सौ.ने माझे केस काळे केले. 



आज‌ मुलाने मला नवीन शर्ट आणला आणि हिच्यासाठी दोन साड्या आणल्या. तीनही सुंदर आहेत. मुलाने स्वत:ला मात्र सांगूनही काहीच घेतले नाही. त्याचा मूड नाही हे मला कळते आहे. पण मी काही करू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. आयुष्यात कधी नाही तेवढा मी हताश झालो आहे. काळाच्या मनात काय आहे ते कळत नाही. आज मी तुम्हांला काही सांगू शकत नाही.



आज क्रांती बंगल्यात येईल असे वाटले होते पण अजून तरी कुठे जाग नाही. 



दुपार झाली. अरविंद अजून तरी आलेला नाही. संध्याकाळी तरी येतोय का ते बघू. 



अरविंद आला नाहीच. पण संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बंगल्यात झाडलोट सुरू झाली. सतरा तारीखच्या आत रहायला येणार असं क्रांती माझ्या सौ.ला म्हणाली . 


.................


१३.११.२०२०


सकाळी ०७.३० वा. अरविंदला फोन केला. तो थोड्या वेळाने येतो म्हणाला. तासाभरात जोशी , चौगुले व अरविंद पण आला. आज दिवसभरात दुसरे ग्रील तयार होऊन दोघांनाही रंग पण काढून झाला. साडेपाच वाजता ते तिघेही निघून गेले. उद्या दिवाळी आहे. परवा येतो म्हणाले. 


संत्याने दोन्ही घरात आकाश कंदील लावून दिले.‌


स्वाती वहिनीने घरातली सगळी लादी पुसून काढली व ती गेली.  सौ.ने व मी पणत्या लावल्या. दोन्ही घरातील आकाश कंदील पेटवले. दरवर्षीप्रमाणे आम्ही लायटींगही केली आहे. पण खरं सांगू, आमच्या मनालाच उजेड हरवलाय. आताही रात्री साडेनऊ वाजता मुलगा गाडी घेऊन बाहेर गेला. बाहेर जातोय हे सांगितले पण आता रात्रीचा कुठे जातोयस विचारले तर जाऊन येतो म्हणाला आणि निघून गेला. मुलाचं हे विक्षिप्त वागणं आम्हां दोघांनाही अनाकलनीय झालंय. तो वीस मिनिटात परत आल्याने आमच्या जिवात जीव आला.‌



१४.११.२०२०


काही विशेष नाही.


१५.११.२०२०


आज दिवाळी. लक्ष्मीपूजनही. 


पहाटे स्वप्नं पडले. मी एका घरात पहिल्या मजल्यावर खिडकी जवळ खुर्चीत बसलेला. समोर कोणी तरी आहे. मी खिडकीतून बाहेर बघतो तर रिक्क्षाजवळ उभा असलेला रिक्षा ड्रायव्हर अगदी ओळखीचा असल्यासारखा मला हात दाखवून हसतो.‌ दुसऱ्याच क्षणी तो अनोळखी असल्याचे लक्षात येऊन मलाच विचित्र वाटते. मी खुर्चीतून खाली बसतो. पण तरीही तो मला दिसत असतो व त्यालाही मी दिसत असतो. तो पुढे येऊ लागतो. मी मान आणखी खाली घालतो. तो पुढे येऊन सांगतो की साॅरी हा, मला माझ्या ओळखीचेच वाटलात... म्हणून मी हात केला. त्यालाही आता ओशाळवाणे वाटत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.‌ इथे स्वप्नं संपले.




१६.११.२०२०


बंदूचे व त्याच्या वहिनीचे जोरदार भांडण झाले. सौ.चे आजारपण, मुलांचा गंभीर होणारा प्रश्र्न या पार्श्र्वभूमीवर एकूणच सगळे कठीण बनले आहे. 


 २७.११.२०२० ला तुळशी विवाहादिवशी अशोक व गार्गी आली.  


२९.११.२०२० ला अशोकच्या कारने वेंगुर्ल्याला गेलो.१.१२.२०२० ला सकाळी सावंतवाडीला गेलो.

वीस दिवस तिकडेच होतो. मुलांचे वर्क फ्राॅम होम सावंतवाडीतूनच चालू होते. सौ.च्या पायदुखीमुळे तिथल्या एका डाॅक्टरने तिच्या पायातून रक्तही काढले. नासके रक्त आहे म्हणाला.


मध्येच एक दिवस वेंगुर्ल्यात खवणे बीचला  पेडणेकर व हडकर फॅमिली बरोबर जाऊन आलो. तिथेही मुलाचा व सौ.चा खटका उडालाच.


वीस दिवसांनी घरी आलो.


२१.१२.२०२० पासून मुलाचे वर्क फ्राॅम होम नवीन बांधलेल्या वरच्या माळ्यावर सुरू झाले. 


२१.१२.२०२० ला बावादादा आला.


२५.१२.२०२० ख्रिसमस


मंगलला ११.४५ ला झोप लागल्यानंतर मुलगा खूप डिप्रेस्ड झाल्याचे लक्षात आल्याने , काल रात्री १२ ते १.३० पर्यंत त्याच्याशी बोललो. त्याला समजावून माळ्यावरुन खाली आलो आणि दोन वाजता सौ. अंगावर रॅशेस उठल्याने अंग खाजवत जागी झाली.  सुदैवाने मुलाचे काम लवकर संपले होते. मग आम्ही चार वाजेपर्यंत सौ. वर उपचार करीत राहिलो. नंतर थकून झोपलो तो ७.३० ला बावादादाने बेल मारली तेव्हा जागे झालो. असा आमचा हॅपी ख्रिसमस झाला.


.......

०२.०१.२०२१

मुलगा ३१.१२.२०२० रोजी रात्री मुंबईला गेला. आई आजारी असूनही थांबला नाही. त्याचा चेहरा बघून थांबवणेही जमले नाही. ०४ तारीखला सकाळी येतो म्हणालाय. 


भाची , तिचे मिस्टर, त्यांचा मामेभाऊ , दुसरी भाची तिची मुलगी गौरांगी असे कुडाळातून आले‌. जेवले आणि गेले पण. एवढ्या ला़बून येऊन थांबले नाहीत. 


संस्थेची पॅन अॅप्लीकेशनची रिसिप्ट आज ११ वा.  मिळाली. बॅंकेत फोन केला. बॅंकेचे साहेब म्हणाले , चार वा. या. गेलो. दिली. संस्था रजिस्ट्रेशनला एक वर्ष लागले ! आता बॅंक अकाऊंट कधी ओपन होणार त्याची वाट बघायची. जागतिक महासत्तेच्या स्वप्नांचा वेगच जास्त आहे. 


संध्याकाळी ०६ वा. पुण्याहून कांतीचा फोन आला. गेले काही दिवस आजारी असलेली विलासची छोटी गेली. अतिशय दुर्दैवी घटना.  


घरात सौ.ची पायदुखी वाढलीय. तेलाने माॅलीश करून इस्त्रीने शेकतोय. काय करावे तेच कळत नाहीय. 


...................


१०.०१.२०२१

आज सकाळी दादाची तब्ब्येत बिघडली. परकार हाॅस्पीटलला नेलं. बरा झाला. दादाची काळजी वाटते. 


दुपार चांगली गेली. संध्याकाळ सुंदर होती. 


पण रात्री साडे दहाला आम्हां तिघांचे घरगुती नाट्य सुरू झाले. ते दोन वाजेपर्यंत चालले. अडीचच्यानंतर कधीतरी झोप लागली असेल. 


.................


गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री असे द्रष्टे कवी सुरेश भट साहेब लिहून गेले. अशा ओळी कालातीत असतात. अमर असतात. अक्षय असतात. भटांनी केवळ विजा घेऊन येणाऱ्या पिढीलाच ओळखले होते असे नव्हे, तर आणखीही काही जणांची कुंडली त्यांना ज्ञात होती. म्हणूनच वाकुल्या दाखवी निकाल मला असेही ते लिहून गेले होते. उच्च पातळीवर काय होऊ शकते , हे सर्वसामान्य माणसाला कळतही नाही आणि कळू दिले जातही नाही. 


शिखंडी आडून येतो बाण एखादा

लबाडीने प्राण घेतो बाण एखादा


यंत्रणांना शिखंडी समजून त्यांच्याद्वारे अशी गत केली जाते. खास खोज्यांनी तशी व्यवस्था केलेली असते. भटांनी यावर कायम स्वरूपी मार्मिक भाष्य केले आहे. तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते हेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हे खोजे वेळकाढूपणा करणार. समिती जन्माला घालणार, भिजत घोंगडे ठेवणार आणि त्यांना सोईच्या वेळेला ते वरही काढणार . म्हणून भटसाहेबांनी त्यांना बेगुमान म्हटलेलं आहे. आपण काय म्हणायचे ते ठरवा आणि म्हणा पण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१

...............


२४.०१.२०२१ रविवार एका फाॅर्मसाठी निलेश पाटील ने माळनाक्यावर आहार रेस्टाॅरंटमध्ये बोलावले. दादा व मी सह्या करून आलो. 


२६.०१.२०२१ सुट्टी


२७.०१.२०२१ निलेश पाटील ना अॅक्सिस बॅंकेत जाऊन बावादादासह भेटलो. आवश्यक त्या अंतिम दुरूस्त्या करून दिलेल्या.निलेश पाटील म्हणाले, आता फक्त एक फाॅर्म ६०चं एक अॅप्रूव्हल राहिले आहे. एक आठवड्यात ते मिळेल. मग अकाऊंट ओपन होईल. तेव्हा तिथे शेजारचा  हर्षद हेमंत सावंत (अॅक्सिस बॅंक कर्मचारी ) आला. त्यालाही ही गोष्ट बोललो. तो म्हणाला मी बघतो. एका बॅंकेत खाते उघडायला महिना लागतो ही डिजीटल युगाची शोकांतिका आहे. 

२८.०१.२०२१ सकाळी बावादादा मुंबईला रवाना. सौ. व मी बावनदीला डाॅ. बनेंकडे आजपासून जायला सुरुवात केली.

........

०७.०२.२०२१

आज बावनदीला जाण्याचा शेवटचा दिवस. घराजवळच रिक्षा भेटली. रिक्शावाला ओळखीचा निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याने रिक्शा थांबवली. सरपंचपदी निवड जवळजवळ निश्र्चित झालेल्या उमेदवाराचे त्याने अभिनंदन केले. मग आम्हीही केले. पुढे रहाटाघरातून पांगरीमार्गे देवरूख बसने नेहमीप्रमाणे बावनदीला गेलो. अडीच वाजता घरी आलो तर मुलगा शहरात निघालेला. नीटसं जेवलाही नव्हता. नीट बोललाही नाही. मी लवकर ये म्हटलं. तो हा म्हणाला. त्याचा मूड कालपासूनच ठीक नव्हता. काळजी वाटत होतीच. साडेपाच वाजले तरी तो आला नाही. म्हणून फोन करीत असतांनाच एक बाई पाटीलवाडीत सुनील पाटीलने आत्महत्या केल्याचं सांगत आली. आमच्या काळजात धस्स झालं. मुलाला फोन करीतच होतो, पण रिंग होऊनही तो उचलत नव्हता. आमचं टेंशन वाढतच होतं. आम्ही फोन करीतच होतो. शेवटी साडेसहाला त्याने फोन उचलला. घरी येतोय म्हणाला. आम्ही पुन्हा पुन्हा फोन करीत राहिलो. तो येतो म्हणत राहिला. शेवटी तो रात्री आठ वाजता आला तेव्हा आम्ही सुटकेचा श्वास सोडला. रात्री आमच्याजवळ झोपवला. आता उद्या काय होईल या विचारात झोप नीट लागलीच नाही.‌

............

१०.०२.२०२१

पहाटे पाच वाजता मला स्वप्नं पडलं. पुढच्या अंगणात दक्षिण दिशेला दादा उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला माझा मुलगा बहुतेक खाली बसलेला आहे. ते दोघे काही तरी शोधतायत. मी उत्तरेकडे उभा राहून काय शोधतायत ते विचारतो. दादा सांगतो की ते आमचा जुना खुणेचा दगड शोधतायत. माझ्या हातातल्या काठीने मी वायव्य आग्नेय अशी खूण करून तो दगड या पट्ट्यात कुठे तरी जमिनीत गाडला गेला आहे, असे सांगतो. इथे स्वप्नं संपलं. खरं तर तो दगड दादाच्याच अंगणात आमच्या शेवटच्या पायरीपासून दीडेएक फुटांवर पूर्वापार होता.  दादाने जुने घर पाडून नवे घर बांधले तेव्हा तो उभा दगड अंगणात घातलेल्या नवीन लादीखाली गेला. तो आम्हां तिघांनाही माहीत होता. मग दादा तो आताच का शोधत होता आणि मी छेद द्यावा तशी काठीने माझ्याच अंगणात रेषा आखून का दाखवतो ? काही तरी तिरकस घडणार या विचाराने मी दिवसभर अस्वस्थ होतो. तो छेद मनातून जात नव्हता. गेले काही दिवस मुलगाही विचित्र वागत होता. नीटसं जेवतही नव्हता. कुठलेच उत्तर सरळ आणि सहजतेने देत नव्हता. संध्याकाळी घाईघाईने शहरात गेला. परत आला तो चिडलेलाच होता. रात्री तो जेवलाच नाही. भूक नाही म्हणाला. आम्ही दोघंही टेंशनवरच होतो. काय झालंय तेही सांगेना.  रात्री अकरा वाजले तरी तो जेवायला तयार होईना.  आमचा जीव राहिना. अखेर मी जिन्याने वर जाऊन पुन्हा विचारले तर तो भडकलाच. मला एकट्याला राहुद्या म्हणाला. मी निराश होऊन खाली आलो. साडेअकरा वाजता त्याला वरती गारठा असल्याने खाली ये म्हणून हिने त्याला सांगितले. खूप मिनतवारीनंतर तो दणदणत खाली आला. शेजारी झोपला. पण रडू लागला. ही समजवायला गेली तर त्याने हिला झिडकारलंच. मी पण आमच्या दोघांच्या आजारपणांना आणि मुलांच्या ह्या विचित्र वागण्याला कंटाळलो होतो. मी माझ्या दुर्दैवाबद्दल काही तरी बोललो. त्यावर हिने मला दुजोरा दिला. त्यामुळे भडकून मुलगा हिला काही तरी बोलला ‌ झाले, मायलेकांचे भांडणं सुरू झाले. ही हायपर झाली. त्या उद्रेकामुळे हिच्या अंगाला खाज सुटली. हिचे दुखणे पुन्हा सुरू झाले. श्र्वास कोंडून ही तडफडू लागली. तसा तो माझ्या मदतीला आला. 

..............

१३.०२.२०२१ रात्रीच्या बसने मुलगा पुण्याला गेला. मित्राचे लग्नं आहे.

...............

१९.०२.२०२१ मित्राचे लग्न काल झाले. काल रात्री पुण्याहून निघून मुलगा आज सकाळी घरी आला. 

............................................................


गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

Short stories - 5

 स्फूट


बंडखोर संतकवी


आठवीत होतो. कवितेचा तास होता. सर संत , पंत, तंत कवींबद्दल सांगत होते. संत कवींबद्दल सर म्हणाले संत कवी हे बंडखोर कवी होते. त्यांनी अन्यायावर कठोर शब्दप्रहार केले. झाले. सरांचे हे वाक्य माझ्या डोक्यात जाऊन बसले. माझ्या बुद्धीमान डोक्यात बंडखोरपणा शिरला. मला अन्याय दिसू लागला. शिक्षकही काही वेळा मुलांवर अन्याय करतात असे मला दिसून येऊ लागले. मी शिक्षकांविरूध्दच बंडखोरी करू लागलो ! अक्कल ठिकाणावर येईपर्यंत हे चालूच होते. तोपर्यंत शाळेत आणि शाळेतल्या तक्रारी घरी आल्याने घरीही बराच (+बौध्दिक!) मार पडला होता !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२१

...............................


काही तरी असेलच ना ?

परवा एकाकडे बऱ्याच वर्षांनी जायचा योग आला. घरात दोघंजणच दिसली. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोन मुलांपैकी एकही दिसेना. ती दोघंही मुलांबद्दल काहीच बोलत नाहीत हे लक्षात आल्याने मलाही विचारण्याचा धीर झाला नाही. अखेर मी निघालो. पण मनात एकच विचार आला म्हातारा म्हातारी ब्लाॅकमध्ये बंदिस्त. पंख फुटलेली पाखरे स्वाभाविकपणे उडून गेली असावीत. पण त्यांचा विषयही आई वडिलांनी का काढला नसावा ? काही तरी असेलच ना ? हसऱ्या चेहऱ्याआडही काही दु:खं असेलच ना ?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२

................................


फुटुराचा तवा


परवा शेजारणीची घरभरणी होती. घर म्हणजे चाळीस लाखांचा सुंदर बंगलाच तो ! स्विमिंग पूल नाही एवढीच त्रुटी फारतर ! बाकी तिच्यासारखाच भरभक्कम बंगला ‌. घरभरणी पण सुंदर झाली. कशात कमतरता नव्हती. पण शेजारणीला एक कमतरता जाणवलीच ! ती माझ्या सौ.ला म्हणाली, " मला प्रेझेंट म्हणून पाकीटातून पैसे घालू नकोस. तवा दे, तो पण फुटुराचाच दे ! " दिला. आम्ही हजार रूपयाचा फुटुराचा तवाच तिला प्रेझेंट म्हणून आणून दिला ! आमचे (मनातले !) आणखीचे हजार रूपये वाचले म्हणून आम्ही खूश आणि तवा मिळाला म्हणून शेजारीण खूश ! करना पडता हैं भाई !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.०१.२०२१

...............................


तावातावाने....


नोकरीत असतानाचा एक प्रसंग. एक कर्मचारी तावातावाने बोलत माझ्या टेबलसमोर उभा राहिला. मी शांतपणे त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. माझी ती पध्दतच होती. हो ना करता करता तो अखेर बसला. काय झालंय , एवढा का वैतागलायस , असं मी विचारता तो घुश्श्यातच बोलला, किती दिवस झाले माझं तुम्ही कामच करीत नाहीयत. हे काय चाललंय ? त्यावेळी मी नेमकं त्याचंच काम करीत होतो. मी कागद पुढे केले. हे बघ मित्रा तू यायच्या आधीच मी तुझंच तर काम हातात घेतलेलं आहे. यावर किंचित नरमून तो म्हणाला, होय पण किती दिवस लावलेत ? मी शांतपणे त्याला त्याच्या विभागाकडून माझ्याकडे त्याचा अर्ज पाठविल्याची आणि माझ्याकडे अर्ज आल्याची तारीख दाखवली. आजच माझ्याकडे अर्ज आल्याचं आणि मी आजच त्यावर कार्यवाही करीत असल्याचं बघून तो गडबडलाच ! आठ दिवस त्याचा अर्ज त्याच्याच विभागात होता हे बघून त्याने माझी क्षमा मागितली आणि धन्यवादही दिले. पुढच्याच क्षणी , मघाशी ज्या तावातावाने तो माझ्याकडे आला होता त्याच तावातावाने तो त्याच्या विभागाकडे भांडायला निघून गेला ! तिकडे काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०२.२०२१

....................

भविष्य जाणले कुणी ?

वास्तव ओळखूनही पुढे काय होणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. अनेकदा भविष्यात असेही होते, तसेही होते. सर्वसाधारण आकलन होऊनही तारूण्याच्या उर्मीमुळे वा बुध्दीला पडलेल्या भुलीमुळे मन मानत नाही. मन ऐकत नाही; बुध्दी चालत नाही अशी अवस्था होते ! हेलकावे खात खात शेवटी काही तरी निर्णय घ्यावाच लागतो. तो बरोबर निघाला तर आनंदच. पण  तो चुकीचा निघाला की वाईट वाटतेच, पण वेळ निघून गेलेली असते. दुर्दैव आहे ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०८.०२.२०२१

.........................................................

पोटदुखीसे मजबूर !

तो आज त्या पदापर्यंत पोचला तशी काहींची पोटदुखी जागी झाली. हा जगभरातला आजार. कायमचा. कोरोनापेक्षाही चिवट. काहींनी तो इथपर्यंत कसा पोचला याची खमंग चर्चा सुरू केली. कोण म्हणाला कोणाच्या तरी पाठी फिरून, तर कोण म्हणाला , बायकोचे योगदान आणि ते सारे छद्मी हसले. पण कोणीच म्हणाला नाही की तिथपर्यंत येण्यासाठी त्याने काय काय आणि किती किती सोसले ! किती वर्ष पड खाऊन काय काय भोगले ! त्याची ही किंमत कोणीच जाणली नाही. पोटदुखीसे मजबूर ! काय करणार !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

........................................................

डॅंबीस

" तो तसो चांगलो हाय, पण त्याच्याभवती जे हायत ना, ते डॅंबीस हायत " एक अशिशित खेडूत महिला एका राजकारण्याला सर्टिफिकेट देतांना म्हणाली. खरं तर, राजकारणात आता चांगलेपणाचा उपयोग आणि एकूणच राजकारणाची पातळी यातून सर्वत्र जे पसरायचे ते पसरले तर नवल नाही  ! आता हेच बघांना, जिने हे सर्टिफिकेट दिलं ते काय तिचं खरं मत थोडंच होतं ! तिला त्या नेत्याकडून पैसे उकळायचे होते ( तीच म्हणाली !) ! न जाणो तो पक्का डॅंबीस आहे हे तिचं खरं मत ती माझ्याशी बोलली आणि मी ते त्यालाच सांगितलं तर....या हुशारीने तिने सराईतपणे भाषा बदलली होती. गंमत म्हणजे तो नेता तिला अशिक्षित, अडाणी , गरीब बाई म्हणतो ! आता यात नक्की डॅंबीस कोण ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

................

रोजगार उद्योगाची गंमत


नुकतीच बातमी वाचली. सगळ्या योजना तालुक्यातील एकाच गावात राबवून तरूणांना रोजगारामार्फत उद्योगशील बनवायचे व एक आदर्श गाव तयार करायचा , ही  योजना एका चांगल्या संस्थेने सदहेतूने जनकल्याणार्थ जाहीर केली होती. पण जाहीर केलेल्या योजनेला शून्य प्रतिसाद मिळाल्याचे संयोजकांना जाहीर करून पुन्हा जाहीर आवाहन करावे लागले आहे.‌ बहुतेक तरूणवर्ग तालुक्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील काही 'उद्योगा'त गुंतवला गेला असावा ! कोण म्हणतो युवक बेरोजगार आहेत म्हणून आणि त्यांना 'उद्योग' नाहीत म्हणून ? 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

११.०२.२०२१

................