रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

Devanandchya cinematil gaane

देवानंदच्या सिनेमातील गाणे 

Dev Anand and his film


#जुनी_गाणी कुणाला आवडत नाहीत ?

आजही गाण्यांच्या विविध स्पर्धांमध्ये जुनी गाणी अत्यंत तन्मयतेने म्हटली जातात.‌ त्यांना भरपूर प्रतिसादही मिळतो ! अगदी आजही ! ही जुनी गाणी पडद्यावरही खूप कलात्मक रीतीने सादर केली गेली होती. त्यातले नायक नायिकाही खूप छान वाटायचे.‌ विशेषतः देव आनंद सारखा रोमॅंटिक हिरो असला तर खूपच बहार यायची ! देव आनंद माझा खूप आवडता. मराठी शाळेत असतांनाच शेजारी राहणाऱ्या गंगाराम रेवाळेने मला एकदा रात्रीच्या पिक्चरला शहरातल्या टाॅकीजमध्ये नेलं. खरं तर , मी आदल्या दिवशीच पडलो होतो आणि माझं उजवं ढोपर ठणकत होतं. पण गंगाराम ऐकत नाही म्हटल्यावर माझाही नाईलाज झाला. त्याने माझ्या घरच्यांची परवानगीही मिळवली . मला तेव्हा फारसं काही कळत नव्हतंच. मी तेव्हा पाचवीत शिकत होतो ! हिंदी भाषेचा नुकताच कुठे परिचय होऊ लागला होता ! 

मी पाहिलेला देव आनंदचा पहिलाच चित्रपट : हरे रामा हरे कृष्णा . 

मी पाहिलेला तो देव आनंदचा पहिलाच आणि एकूणच माझा दुसरा चित्रपट होता ! सखू आली पंढरपुरा हा मराठी चित्रपट मी चौथीत असताना पाहिला होता. तो गुरवांच्या बेबल्याने मला दाखवला होता. मला बहीण नाही. तिला भाऊबीजेला मी ओवाळायचो.‌ मराठी शाळेत जायच्या आधीपासूनच मी गुरव मंडळीत जास्त असायचो. बेबल्याताई आज हयात नाही पण तिच्या स्मृती आहेत !

गंगारामने मला पिक्चरला नेलं तो पिक्चर होता हरे रामा हरे कृष्णा ! 

Dev Anand's cinema


देव आनंदचा चित्रपट ! पण मला मूळात तो चित्रपट पाहण्यापूर्वी देव आनंदच काय , कुठलाच हिरो माहीत नव्हता ! गंगारामचं याबाबतीतलं ज्ञान मात्र भारीच होतं. त्यानेच मला हा हिरो देव आनंद आहे म्हणून सांगितलं , तेव्हा कुठे मला कळलं की ह्या चिकण्या नटाला देव आनंद म्हणतात ! चित्रपटात छोटा देव आनंद  आणि त्याच्या बहिणींचं जे विदारक आयुष्य दाखवलं ते पाहून त्या छोट्या वयात मला रडू कोसळलं होतं. ते गाणं ऐकू या...





पण पुढे  नायिकेच्या मागे दुडक्या चालीत तिरका तिरका धावणारा देव आनंद पाहण्यातही मी रमून गेलो ! कोणाला त्याचं दिल तोडावेसे वाटेल...? बघा ना , कांची रे कांची रे ...म्हणत देव आनंद कसा धावतोय ते....



हा देव पाहण्यात मी इतका की माझ्या दुखावलेल्या ढोपरावरची जखम चिघळत जातेय याचंही मला भान राहिलं नव्हतं ! चित्रपट संपला तेव्हा मी खुर्चीतून उठायला गेलो तर माझा उजवा पाय आखडल्याचं जाणवलं. मला पाऊल पुढे टाकता येईना ! गंगारामने मला कसंबसं टाॅकीजच्या बाहेर आणलं , सायकलवर बसवलं आणि घरी आणलं. मी गुपचूप अंथरूणात शिरलो.‌ सकाळी मला उठवेना ! थंडी भरून ताप आला ! मग शाळा तीन चार दिवस  बुडालीच !  

तर...देव आनंदशी माझी ओळख ही अशी झाली


Dev sahab

Dev Anand the stylish hero



पुढे पुढे तो भेटतच गेला. प्रकर्षाने भेटत गेला ! त्याच्या विविधांगी व्यक्तिमत्वावर चे अनेक लेख वाचले.‌ त्याची खूप गाणीही मी पाहिली, ऐकली . 

देव आनंदच असंच एक जुनं गाणं... 

खणखणतं नाणं... मला खूप आवडतं... आवडेल तुम्हांलाही... कमेंट्स करालच...

ख्वाब हो तूम या ... कोई हकीगत....


तीन देविया या चित्रपटातील हे सुंदर गीत आहे.  

देवानंदचं गाणं

( फोटो सौजन्य : गुगल व यू ट्यूब .)

#देव_आनंद

#देवानंद

#cinema

#devanand

#picture

#gaana

#hindigeet


Ye dil tum bin

जुनी गाणी आजही अवीट आहेत. खूप खूप आवडतात. त्यापैकीच एक हे गाणं... तुम्हांलाही आवडेल ... आणि तुम्हीही म्हणाल... ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं....

ये दिल तुम बिन

हिंदी गीत

प्रेमात पडलं की...

खरंच , प्रेमात पडलं की... खरं तर... पडलं की जखम होणं स्वाभाविक आहे म्हणा...इथेही जखम होतेच , पण ती मनाला, काळजाला ! जखमेची तीव्रता ही इथे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे , काही वेळा , विशेषतः सुरूवातीला , थोडी छेडाछेडी , मस्करी , लाडालाडाची धूसफूस , खोटाखोटा राग रुसवा , मग कधी तरी खराखुरा राग , खरेखुरे भांडण , आदळाआपट , बाचाबाची आणि कधी कधी तर चक्क मारामारीही होते ! म्हणजेच , हवीहवीशी हूरहूर , गोड भांडण , एकमेकांना आजमावणे, टोकाचे भांडण ते दुरावा , तडफड , तगमग , मारामारी...कधी कधी कायमची सुटका ... असाही हा प्रवास होतो !

खरं प्रेम खूप हळवं असतं ! 

काही असो ; पण खरं प्रेम खूप हळवं असतं ! जणू ऊनपाऊस मिश्रित श्रावणधाराच ! रिमझिम रिमझिम प्रेम पुढे सरकत असतं. मध्येच कुठेतरी मिठाचा खडा अलगद पडतो आणि एक गोड स्वप्नं विस्कटतं. उगाचच दुरावा दोघांमध्ये येतो.‌ रुसवाफुगवा होतो. पण कितीही राग रुसवा झाला तरी , कितीही ताटातूट झाली तरीही वेडी मनं एकमेकांशिवाय कुठेच रमेनाशी होतात !  मनाला काही रुचेनासं होत जातं ! मन कातर होतं , मन व्याकुळ होत जातं ! अगदी घायकुतीला आणि रडकुंडीलाही येतं... दुरावा आता सहन होत नाही ; अजिबात सहन होत नाही . भेटीसाठी मन पेटून उठतं. मन बेचैन होतं आणि ओठ गाऊ लागतात... ये दिल तुमबिन कहीं लगता नहीं... 

#ye_dil_tum_bin

#juni_gaani

#gaana








सोमवार, ६ जून, २०२२

Devidasachi Diary a : new youtube channel

  नवीन यू ट्यूब चॅनेल : देवीदासाची डायरी

#diary

#devidasachi_diary

Devidasachi Diary

नमस्कार रसिकहो ! मी देवीदास हरिश्चंद्र पाटील आपलं स्वागत करतो देवीदासाची डायरी या माझ्या नव्या यू ट्यूब चॅनेल वर ! ही डायरी सुरू होते ती दि. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी !

 योगायोग असा की नेमके याच दिवशी मी माझे देवीदास पाटील हे पहिले वहिले यू ट्यूब चॅनेल निर्माण केले होते . नुकतेच त्याचे नांव मी देवीदास पाटील क्रियेशन असे ठेवले आहे. गेली दोन वर्षे आपण सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याने ते प्रगतीपथावर आहेच.



माझे आणखी एक मराठी चॅनेल आहे आणि एक इंग्रजी चॅनेल आहे. मग हे चौथे चॅनेल कशाला ? खरं सांगू ? गेली दोन वर्षं आपण मला जे प्रेम देत आहात , त्यामुळे तुमच्याशी माझे एक वेगळेच नाते जुळले आहे . आता मला तुमच्याशी अधिक जवळीक साधायची आहे. माझं अंतर्मन तुमच्याशी बोलू इच्छितय . निव्वळ याचसाठी ही देवीदासाची डायरी आहे ! 

डायरी सलग लिहिली जातेच असे नाही. माझेही डायरी लेखन सलग झालेले नाही. पण जे मी डायरीत लिहिले आहे ते तुम्हांला मी सांगणार आहे. ही डायरी आयुष्यातल्या घटनांचा जिवंत चित्रण आहे. अनेक प्रवाहांमधला तो प्रवास आहे.



कशी झाली आहे तुमच्या देवीदासाची डायरी ते हया पहिल्या भागापासून कमेंट्स द्वारे सांगा बरं का ! व्हिडिओ लाईक करा , शेअर करा , चॅनेल सबस्क्राईब करा. चला तर मग देवीदासाची डायरी वाचायला सुरूवात करूया. 



या पहिल्या भागाला मी शिर्षक दिलंय : 


माझ्या मना, तुला सलाम !


याला कारणही असंच आहे . ऐका म्हणजे नक्की कळेल बरं का....


माझ्या मना, गेल्या वर्षी मी डायरी लिहिण्याचा संकल्प सोडला होता. पण डायरीत एक अक्षर लिहिले असेन तर शप्पथ ! 


... आणि एक वर्षानंतर प्रत्यक्ष डायरी लेखनाला अशी सुरुवात केली आहे बघा ...:


माझ्या मना , एक वर्षानंतर आपण इथे भेटतोय ! तसे आपण खूप ठिकाणी सतत भेटत आलोय . आपण दोघे आहोतच कुठे ? आपण एकच तर आहोत. हे माझ्या मना , एक वर्ष आपण ह्या डायरीत भेटलोच नाही . पण आपलं स्वगत चालूच होतं ! 


अनेक प्रसंग या दरम्यान आले .बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले . आपण दोघांनी मिळून ते पहिले ! अनेक विसंगत बाबी आयुष्यात आल्या . आपणच त्या सुसंगत करीत गेलो ! अश्यावेळी तुझी साथ नसती तर ? माझे एकट्याचे काय झाले असते कोण जाणे ! 


पण तू सतत सोबत राहिलास ! अनेकदा मी नाउमेद झालो ! खचून गेलो ! डोळे भरून आले ! पण तू धीर दिलास ! समजावलेस ! खरेच मी तुझा किती आभारी आहे याची कदाचित तुलाही कल्पना नसेल !


शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होत होतो ! खूप खोल घाव झाले होते ! पण माझ्या बरोबरीने तू ते सारे सोसलेस !


 तू माझा सखा झालास . तू माझा परमेश्वर झालास ! माझे प्रत्येक खचणारे पाऊल तू उचलून धरलेस ! कधीही तोल जाऊ दिला नाहीस ! हे माझ्या मना , केवळ तू होतास म्हणून मी तरलो !


तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता . त्यातला गेल्या वर्षभरातला कालावधी तर अंत पाहणारा होता . पण तुझ्या सोबतीने हा सारा प्रवास थोडाफार सौम्य झाला ! आज १२ नोव्हेंबर २०१२ . दिवाळीच्या आदला दिवस . ह्या पवित्र दिवशी , माझ्या मना, माझा तुला सलाम ! 

#devidas_patil

..............




 

बुधवार, ३० मार्च, २०२२

तारण : मराठी गझल

 तारण 

#gazal

#marathi_gazal


सोडून व्हायचे मी साजण दिले कधीचे

तेव्हा तसे तिनेही कारण दिले कधीचे...



जमिनीवरीच माझा संसार थाटला मी 

आकाश पाखरांना आंदण दिले कधीचे...



मजलाच हाय माझे झाले नकोनकोसे

सोडून हाय मीही भांडण दिले कधीचे 



माझा अखेर मीही झालो समुद्र होतो

त्यांना चिपीतले मी खाजण दिले कधीचे



आयुष्य सर्व माझे गेले तिच्याचसाठी !

गझलेस मीच माझ्या तारण दिले कधीचे



... देवीदास हरिश्चंद्र पाटील



शुक्रवार, १८ मार्च, २०२२

Superb Facebook Post

 गुरूवर्य सुरेश भटांची एक आठवण...

#sureshbhat


आदरणीय सुरेश भटांना मी एक गझल पाठविली होती, जी त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करीत होती. गेली अनेक वर्षे मी ही गझल आणि माझ्या त्यासंदर्भातील भावना याबद्दल कोठेही लिहिले नव्हते.‌ पण आजच्या विशेष दिनी ती माझ्या रसिक चाहत्यांसाठी फेसबूकवर पोस्ट केली . त्या फेसबूक पोस्टची ही लिंक  ओन्ली देवीदास वरील माझ्या रसिक चाहत्यांसाठीही इथे देत आहे. फेसबूकवर खूप सुंदर अभिप्राय आले आहेत ; आपलाही अभिप्राय इथे जरूर द्यावा, ही विनंती. 

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

Teer once again पुन्हा एकदा तीर

 पुन्हा एकदा " तीर " गझल 

( दोन प्रसिद्ध शेर )



https://youtu.be/pJJz7h5qHcY



#bhimrao_panchale

मा. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नुकतीच ही गझल त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर अपलोड केली आहे. ही गझल आहे गझलकार श्री. दिलीप पांढरपट्टे यांची ! 

त्या गझलच्या अगदी सुरुवातीला आलापी नंतर मा. भीमरावजींनी श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील यांच्या तीर या मराठी गझलचे दोन सुप्रसिद्ध शेर गायले आहेत व प्रस्तावनेत याबद्दल त्यांनी आवर्जून लिहिलेही आहे.


असा मी तीर होतो जो चुकीने मारला गेलो


 ओन्ली देवीदास या आपल्या ब्लॉगच्या रसिक चाहत्यांसाठी हा उल्लेख इथे केला आहे. आपण अवश्य व्हिडिओ पहावा व कमेंट करावी, ही विनंती. 

......................

पूर्वी मी म्हणालो होतो : 

" मीच मजला पेश केले पाहिजे

जगाच्या दारात नेले पाहिजे "

थोडक्यात, जग आपल्याकडे येणार नाही , तर आपल्याला जगाच्या दारात स्वतःला नेले पाहिजे. आज तीस चाळीस वर्षांनी जगापुढे स्वतःला पेश करतात करता , जग माझ्याकडे येऊ लागले आहे, असा निदान भास तरी आता होऊ लागला आहे, हेही कमी नाही 😀😀😀😀😀 .


मराठी गझलबद्दलचा अशी शिकावी मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा : 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील .

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

Supuche lagna

मागे पुढे मागे पुढे होऊ नको बाय

सुपूच्या लग्नाला जायाचं हाय ....‌ || धृ ० ||


हळद लावली सुपूला काल

आज घाणा नि निमाची धमाल

आता नवरीला बाहेर काढायची हाय ... || ०१ ||


सासरची ओढ वाटते गोड

पण माहेराला नाही तोड

सुपूचा निघता निघेना पाय ... || ०२ ||


कसली हाय सुपूची आय

तुला बी मला बी ठावं हाय 

उशीर तिला गं खपायचा नाय ... || ०३ ||



....‌देवीदास हरिश्चंद्र पाटील


सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

The man who brought first rikshaw in Ratnagiri

 31 जानेवारी - 


कोकणात पर्यायाने रत्नागिरी शहरात पहिली पॅसेंजर रिक्षा आणणारे विष्णू लक्ष्मण गोगटे यांचा वाढदिवस / जयंती - 


जन्म -  31 जानेवारी, 1937 .
मृत्यू - 17 डिसेंबर, 2020 .


विष्णू यांचा जन्म 31 जानेवारी, 1937 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे व माध्यमिक  शालेय शिक्षण रत्नागिरी येथे झाले. फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथून 1956 साली ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांचे रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे ल. V. Gogate & Sons नावाने दुकान होते.  घरच्या व्यवसायात सन 1956 ते 1970 या काळात जात असत.  


त्याकाळची रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक

त्याकाळी रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक बैलांची सारवट, सायकल किंवा टॅक्सी मधून होत असे. 1970 च्या सुमारास वाघधरे  यांच्या गलबतातून त्यांना कालिकत येथे जाण्याची संधी मिळाली होती. कालिकत हे शहर रत्नागिरी शहरासारखेच. त्या परिसरात त्यावेळी रिक्षा व्यवसाय सुरू झाला होता. तिथूनच त्यांना त्यांच्या मनात असलेला रिक्षा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली  व त्यांनी पॅसेंजर ऑटो रिक्षा परमिट असलेली आणण्याचे ठरवले. 


रिक्षा परमिट मिळवण्यासाठी

त्यांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु परमिट मिळवण्यासाठी त्यांना 2 - वर्षे सतत पाठपुरावा करावा लागला होता. याकामी राजाभाऊ लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 


शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान

बजाज कंपनीची रिक्षा बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन त्यांनी आणली होती. रत्नागिरी शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान त्यांचाच. " वैशाली "हे त्यांच्या रिक्षाचे नाव. 7 फेब्रुवारी, 1972 रोजी लोकनेते शामराव पेजे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांनी रिक्षा व्यवसायाला प्रारंभ केला. शंकरराव पटवर्धन हे त्यांचे पहिले प्रवासी होत. 

रिक्षा व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. सन 1998 पर्यंत ते रिक्षा व्यवसायात कार्यरत होते. रत्नागिरी रिक्षा संघटनेचे अनेक वर्षे ते पदाधिकारी होते.


25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल सत्कार

त्यानंतर तिलक नगर परिसरात गोगटे कम्युनिकेशन अँड जनरल स्टोअर्स नावाने काही वर्षे व्यवसाय केला होता. सन 2012 सालच्या मे महिन्यात 25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती व सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने तत्कालिन मा. जिल्हा न्यायाधीश विजय मुन्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शालेय जीवनात पोहण्याची त्यांना विशेष आवड होती. याव्यतिरिक्त बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो -खो , कबड्डी इत्यादि मैदानी खेळातही त्यांचा सहभाग असायचा. 


उत्तम बॅडमिंटनपटू

रिक्षा व्यवसाय होताच असे असले तरी ते उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होते. बरीच वर्षे ते बॅडमिंटन स्वतः जरी खेळत होते तरीही ते कोच म्हणूनही प्रसिद्ध होते. रत्नागिरी शहरातील अनेक बॅडमिंटनपटू त्यांनी तयार केले. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता व अनेक बक्षीसेही मिळवली होती.  

रत्नागिरी बॅडमिंटनमध्ये रत्नागिरीतील आणखीन एक बॅडमिंटनपटू कै. डॉ. मु. न. पानवलकर यांच्यासोबत बॅडमिंटन डबल्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. रत्नागिरी शहरातील ही बॅडमिंटनमधली अभेद्य जोडी मानली जात होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर 45 वर्षांवरील वयोगटातील डबल्सचे उपविजेतेपद या जोडीने मिळवले होते. 

याव्यतिरिक्त अहमदनगर व  पुणे येथे सन 1982, 1984,1987,1992,1997 मध्ये खेळल्या गेलेल्या ओल्ड मॉंक्स व्हेट्रन बॅडमिंटन स्पर्धेत पाच वेळा ही जोडी विजयी ठरली होती.

1 ऑगस्ट, 2019 रोजी सर्वंकष विद्यामंदीरच्या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन गोगटे- पानवलकर या जोडीच्या हस्ते झाले होते. 


17 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली. 


अशा या विविधांगी  व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन . 


माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

History in Konkan Railway

  *कोकण रेल्वे मार्गांवर आज धावली पहिली विजेवरील दिवा - रत्नागिरी पॅसेंजर* 


*रत्नागिरीच्या सुपुत्रांनी केले पहिल्या गाडीचे सारथ्य!* 


 *रत्नागिरी-* कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी काल गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला.


*पहिल्या गाडीचे सारथ्य यांनी केले*


*लोको पायलट- शैलेश पवार

सहाय्यक लोको पायलट- सचिन पाडळकर

गार्ड -प्रणय तांबे.


गेल्या वर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या.


*कोकण रेल्वे मार्गावर प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु*


कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला.


गेल्यावर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. रात्री पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर येणार आहे.


विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. 

विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दरम्यान दिवा ते रत्नागिरी धावणारी गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.

काल गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे विद्युत इंजिनसह धावली. पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रात्री रत्नागिरी स्थानकावर येणार आहे. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. 

यावेळी रेल्वे युनियनचे विलास खेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला. गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दरम्यान दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक इंजिनसह धावणार आहे.