सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

फुलेल प्रीत ही कधी ?


फुलेल प्रीत ही कधी ?



प्रत्येक क्षेत्रात नवोदित असतात . साहित्य क्षेत्रातला तोही काव्य प्रांतातला एक नवोदित मला परवाच भेटला . गोष्ट साहजिकच त्याच्या भावी वाटचालीवर आली .
तो त्याबाबत ठाम होता. कवीच तो , त्याने मला दोन दोन ओळी ऐकवल्याच !  

                       तुझेच श्वास लाडकेतुझेच भास अंतरी  
                      अजून दूर तू तरी , तुझा निवास अंतरी

                ती त्याची अत्यंत लाडकी होती ! तिचे श्वास, भास सर्व काही त्याच्या मनात होते . ती दूर असली तरी तो तिला विसरूच शकत नव्हता ! तिचे  स्थानच मुळी त्याच्या काळजात होते ! प्रश्न एवढाच होता की ती अंतरात असूनही खूप खूप दूर होती. कोण होती ती ? ती  तर त्याची प्रतिभा होती ! तो नवोदित होता याची त्याला जाणीव होती. म्हणूनच  तो तिला वर काढू इच्छित होता .

                आपण जुने ते  सोने म्हणतो . पण तो म्हणत  होता :

                                 नकोनकोच  वाटती   जुनेच  मार्ग कालचे 
                                 तुझेच लागले  अता नवीन  ध्यास अंतरी

               तो नाविन्याचा  भक्त आहे .  त्याला रोज नवीन ध्यास लागलेले आहेत .   अर्थात प्रतिभेचेच !  कारण तो तिच्यावर जिवापाड प्रेम करतो . त्याने मला सांगितले की तो तिला सारखा विचारता असतो :

                             फुलेल प्रीत ही कधी ?  जुळेल गीत हे कधी ?
                              कधी फुलेल गे तुझा वसंतमास अंतरी ?

                 आणि मला ही  भीती वाटत होती की , वसंत आला निघून गेला , मला कुठे ( त्या नेमक्या वेळी ) देहभान होते, अशी तर ह्याची अवस्था व्हायची नाही ना ? नको नकोच ! देवा असे होऊ देवू नकोस ! कारण तो तर  बिचारा  तिच्या भेटीसाठी आतुर झाला होता ! अतिशय आर्तपणे तो तिला साद घालीत  होता : 

                           उशीर लावतेस का ?   दुरून छेडतेस का ?
                          अधीर  जाहली अता . . .  तुझीच  प्यास अंतरी !

                 मला वाटते की आता तिने त्याला भेटावेच !  कारण ,                     
                        " क्षणोक्षणी जिथे तिथे दिसे मला तुझा ऋतू 
                          तुझाच जाहलो अता , तुझाच  दास अंतरी  "    


                
याप्रकारे तो आता तिचाच दास झालेला आहे ! त्याचा देवदास होता त्याची मनोदेवता - साहित्यप्रतिभा -  त्याला भेटावी , हीच ईच्छा  !

खुदबू वायच गॉड दी !

चाळीस  वर्षापूर्वी


अणुउर्जा प्रकल्पामुळे जैतापूर अलिकडे  प्रसिद्धीस आले अश्या जैतापुरात चाळीस  वर्षापूर्वी माझं माध्यमिक शिक्षण झालं . माझे वडील  तिथे सरकारी नोकरीत होते .  मी पाचवीपासूनच तिथे जायचा हट्ट धरला होतामाझी तीव्र इच्छा पाहून मला इयत्ता आठवीपासून न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरमध्ये जायला वडिलांनी परवानगी  दिली. मी तसा हट्ट का धरला होता  हे मला आजही सांगता येणार नाही. एक तर वडिलांची ओढ होती आणि भविष्यात मी जो काय साधा सरळ राहणार होतो त्यासाठी ते तसे घडले असावे . आज मागे वळून पाहिले की ते बरोबरच होते हे पटते . कारण , मी सरळ साधा घडलो तो निव्वळ जैतापुरातील शिक्षकवर्ग , माझे मित्र , त्यांचे कुटुंबीय , आमचे शेजारी आणि तेथील निकोप वातावरणामुळेच ! परवानगी मिळताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता एवढे मात्र खरे

कुठे जातात आपले दहावीतले सवंगडी ? 


खरे तर माझा त्या हायस्कूलशी तसा थेट संबंध त्यापूर्वी कधी आलेला नव्हता. आम्ही वडिलांच्या ऑफिस शेजारीम्हणजे मांडवीत रहायचो .  वडिलांचे साहेब हायस्कूलच्या थोडे पुढे   रहायचेवडिलांसोबत मी कधी कधी त्यांच्या साहेबांकडे जायचोमी हायस्कूलला जायला लागल्यानंतर त्यांच्यासमोरच प्रतिभा जनार्दन मयेकर हीआमची वर्गमैत्रीण रहायची .ती आमच्या गावाकडची होती.  मी मग कधी कधी प्रतिभाकडे जायचोदहावी झाल्यानंतर आजपर्यंत प्रतिभा दिसलेली नाही. कुठे जातात जीवनाच्या प्रवासात वाहत आपले दहावीतले सवंगडी ? बहुतेकांचा प्रवास असा दूरदूरून का होतो ? दहावीच्या निरोप समारंभात दाटून आलेले ते सर्वांचे डोळे आणि भरू न आलेली मने ... ते आतले उचंबळून आलेले भाव.... कुठे जातात ? कुठे जातात ? 

ती आठ खोल्यांची चाळ 


जैतापुरात आम्ही सरकारी चाळीत  रहायचो . आठ खोल्यांची ती चाळ होती. शेख , पाटील , वेंगुर्ल्याचे मांजरेकरखानोलीचे खानोलकर, चिपळूणचे चव्हाण आणि आमच्या  गावातले आमचे शेजारी हातिसकर ही नावं मला आजही स्मरतात. त्याच शंकर हातिसकर  (तात्या) यांनी मला वर्तमानपत्र वाचण्याची गोडी लावली . मी आज जे काय लिहितो आहे त्याचे मूळ तात्यांच्या त्या वर्तमानपत्र वाचनाची गोडी लावण्यात आहे.आज तात्या हयात नाहीत,  त्यावेळचे इतरही अनेकजण हयात नाहीतपण त्यांची स्मृती हृदयात आहे !

त्यावेळचे जैतापूर  बसस्थानक  म्हणजे तेव्हा गावात येणाऱ्या  दोन चार गाड्या  वळायची मोकळी  जागा होती . तिकडून  येणारा एक रस्ता थेट  मांडवीतील वडिलांच्या  ऑफिसच्या  पटांगणात यायचा.   आमच्या खोल्यांसमोरून तो  रस्ता  जरासा  पुढे   जावून   वडिलांच्या  ऑफिसच्या  पटांगणात  संपत   होताआमच्याकडून पुढे निघाले की दोन फाटे फुटायचे . एक थेट बाजारात  तर   दुसरा  भोपळे यांच्या घराकडून पोस्टाकडे  तिथून पुढे  बसस्थानकाकडे जायचा . तिथे दोन्ही  फाटे एक व्हायचेपुढे  ते  पुन्हा   दोन  व्हायचे . एक हायस्कूलकडे  दुसरा राजापूरकडे  जायचा .

खुदबू वायच गॉड दी ! 


बाजारात जाणाऱ्या रस्त्याच्या सुरवातीलाच  खुदबूचे किराणा मालाचे  दुकान होते . आज त्याची ती  ठेंगणी , ठुसकी मूर्ती अंधुकशी स्मरते . मात्र त्याचा स्वभाव पक्का आठवतो .  लहान मुलांनी काही खरेदी केले की  तो त्यांना  गुळ  आणि चणे द्यायचा. मुलेच ती , ती पुन्हा पुन्हा " खुदबू वायच गॉड दी ! " " खुदबू वायच गॉड दी ! "असे ओरडायची.    विशेष म्हणजे  खुदबूही ते त्यांना प्रेमाने पुन्हा  द्यायचा . ती त्याची खासियत  होती !   मी कित्येक वर्षात जैतापुरात गेलो  नाही . पण   मुलांना  स्वत:होउन चणे , गुळ देणारा हसरा, प्रेमळ  खुदबू  आणि  " खुदबू वायच गॉड दी ! " असं खास जैतापुरी भाषेत मागणारी  मुलं  मला आजही आठवतात ! तेव्हा कुणाला माहिती होते की पुढे कधी तरी आसपासच्या परिसरात अणुऊर्जा प्रकल्प होईल आणि त्यावरून एवढे आंदोलन होईल  ! तेव्हा कुठे माहिती होते की तो खुदबू आता दिसणार नाही आणि ती मुले ... कुठे पांगली असतील ?