My marathi articles लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
My marathi articles लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !

 आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !

परवा निवेंडीवाडीच्या शाळेत वह्या वाटप करण्यासाठी गेलो होतो. सौ. निरजा शेट्येला तिच्या घरून‌ गाडीत घेतलं. ती ग्रामपंचायत सदस्य आहे. निवेंडीवाडीची शाळा तिनेच सुचवली होती. तिने तिथली अधिक माहिती असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्या सौ. भरणकर यांनाही वाटेत सोबत घेतलं.‌ त्या असल्याने प्रवास योग्य रस्त्यावरून झाला. पाऊस सुरूच होता. वाट बिकट होती. निरजाचा भाऊ निलेश‌ पेडणेकर गाडी चालवत होता. त्याने गाडी सफाईने चालवली. शाळेच्या थोडं पुढे गाडी पार्क करावी लागली. आम्ही चौघेही पाऊस थांबण्याची वाट पहात बसलो.‌ दहा मिनिटे वाट पाहूनही पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसेना. माझी एकमेव छत्री कारमध्ये होती. तिचा आधार घेऊन एकाने शाळेत जावे , मग कोणी जावे , वह्या आणि छत्री एकाच वेळी कसे धरायचे आणि वह्या न भिजवता शाळेत कसे पोचायचे यावर पुढची पाच मिनिटे चर्चा करून झाल्या. आता काय करायचं याच प्रश्नावर चर्चेची गाडी पुन्हा थांबली. आम्ही उगाचच अडकून पडल्यासारखे झालो होतो. उगाचच टेंशन वाढले होते.  ते तिघे समस्येवर चर्चा करत होते आणि मी सोल्यूशनवर विचार करत होतो. मला उत्तरही सुचले. मी निरजाला म्हणालो, शाळेत फोन कर आणि मुलांना छत्र्या घेऊन पाठवायला सांग. झाले, तिच्याकडे मुख्याद्यापकांचा नंबर असल्याने, त्यानुसार तिने फोन केला आणि चार मिनिटातच चार मुलं छत्र्या घेऊन गाडीजवळ आली.  आम्ही आणि वह्याही शाळेत सुखरूप गेलो ! थोडक्यात, परिस्थिती आपण कशी घेतो हे फार महत्वाचे असते.

अशाच घटना अनेकदा आयुष्यात घडतात. ही घटना तर किरकोळ होती, पण त्यावर चर्चा किती मिनिटे  झाली ! मनाचा गोंधळ किती उडाला ! घटनेची सुरूवात हा घटनेचा सुरूवातीचा बिंदू . पण हा एकच बिंदू रहात नाही. या एका घटनेतून पुढे अनेक घटना घडू लागतात. हेच तुमचे कालचक्र असते. जीवन असते. अशा अनेक घटनांचे बिंदू पुढे सरकत राहतात. याच बिंदूंची एक रेषा बनते. कोणत्याही घटनेच्या सुरूवातीपासून निघालेली ही रेषा पुढे पुढे होत जाणाऱ्या घटनांना घेऊन पुढे सरकत राहते. तेव्हा आपण सावध झाले पाहिजे. ही रेषा कुठपर्यंत जाईल , तिची दिशा काय असेल याचा विचार सर्वसामान्य माणूस करत नाही. असं काही असतं हेच मुळी त्याच्या गावी नसतं. आपण काही घडलं की हबकून जातो. आपला गोंधळ उडतो. आपण विचार आणि विश्लेषण करत नाही. शक्याशक्यता पडताळून पहात नाही. आपण जे जीवन जगतो किंवा आपल्या वाटेला जे काही जीवन म्हणून येतं , त्या सर्व शक्यता असतात. त्या आधीपासूनच अस्तित्वात असतात. आपण त्यांना कुठे तरी भेटतो. नकळत सामोरे जातो. कोणत्या तरी अक्षांश रेखांशांवर ही भेट होते ! जे काही घडायला सुरूवात झाली आहे त्यात हे पण घडू शकते , घडेल ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही ! आपण अक्षांश रेखांशही काल्पनिक समजतो. पण इथे काहीच काल्पनिक नाही. ते अगोदरपासूनच अस्तित्वात असते म्हणून तर त्याचा विचार मानवी मेंदूत येतो. काही काळाने सत्य समोर येते पण तितका काळ खोटे असतेच ! काही काळ का होईना ; खोट्याचेही अस्तित्व असतेच ! थोडक्यात , शक्यतांचं अस्तित्व आधीपासूनच अस्तित्वात असतं. याचाच उपयोग करून काही जण प्रकरणांचा छडा लावतात ! आपण आपल्या आयुष्यात नवीन घटना घडायला सुरूवात झाली की ती चांगली असेल तर आनंदून जातो आणि वाईट असेल तर गोंधळून जातो. समस्यांमुळे तर आपण खचून जातो . स्वतःला स्थिर न करता अधिकच अस्थिर करतो . आपल्याला काही समजेनासं होतं. छोट्याश्या समस्येला आपण पार शनीच्या पीडेपर्यंत भिडवतो ! आपलं असं होणं हे अगदी स्वाभाविक असतं. हे असं का होतं ? एक तर मागील पिढ्यांनी वारंवर भीतीचे संस्कार केलेले असतात आणि दुसरे असे की आपलीही चूक होते ! आपण एखादी घटना कशी घेतो यावरच खरे तर तिच्या आपल्यावरील होणाऱ्या मनोकायिक परिणामांची तीव्रता व व्याप्ती अवलंबून असते. साधीच घटना घ्या. केळ्याच्या सालीवरून आपण घसरून पडलो तर आपणही हसतो की चार लोक आपल्याला हसले म्हणून आपल्या मनाला ते खूपच लागते ? खरं तर ही क्षणिक घटना असते. पण मनाला लावून घेतले तर त्या क्षणिक घटनेतूनही अगदी मारामारीचे प्रसंगही जन्म घेतात. थोडक्यात, आपण परिस्थितीच्या किती आहारी जातो , भावनेच्या भरात कसे अविचाराने वागतो , कसा विवेक हरवून बसतो , हे इथे लक्षात येते. इथे आपण हसत हसत उठून पुढे चालत गेलो असतो तर ते हसणारे लोक कधीच मागे पडले असते आणि आपल्यालाही त्या घटनेचा लगेचच विसर पडला असता. प्रकरण हातघाईवर येऊन राडा झाला नसता. शनीच्या पीडेचा तर मनास विचारही  शिवला नसता ! थोडक्यात , आपण परिस्थितीच्या दडपणाखाली येतो. परिस्थितीचा समतोलपणे विचार करत नाही . बरेचदा, परिस्थिती चुकीच्या पध्दतीने घेतल्यामुळे आपण दुष्टचक्रात सापडतो. स्वतःवरचा विश्वास हरवून वेगळ्याच मार्गाला लागतो . हे बदलता येतं . फक्त त्यासाठी आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे असते.


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

गझल , तूम मेरी जिंदगी बन गयी हो ...

तेरा मतला मेरा काफिया 


जो न मौका मिला था कभी, वो मौका मिलने लगा 

बढ़ने लगी मुलाकाते ....  प्यार में रंग भरने लगा ...


चेहरे पे हंसी आ गयी, दिल में उमंग छा गयी

तिरछी नजर का इशारा अब समझने लगा


नींद ऐसी लगी... ख्वाब ऐसे आये के पूछो मत

किसी तालाब में चांद उतरकर थिरकने लगा


न जाने ये क्या हो गया, न जाने ये कैसे हो गया

तेरी आखो में मेरा खयाल अब झलकने लगा 

 

गझल, तुम मेरी जिंदगी बन गयी हो,  क्या कहूँ ? 

तेरा मतला मेरा काफिया इक दुजेमें ढलने लगा !


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०८.२०२३ दोपहर ०३.३०

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

Namsaptah 2023 Part 1

शंभर वर्षाहून जुन्या मंदिरातील 

नामसप्ताह २०२३ ...

रत्नागिरीतील जाकीमिऱ्या गावच्या नवलाई पावणाई मंदिरातील सालाबादप्रमाणेचा नामसप्ताह 

Namsaptah 2023 at Navalai Pavnai Temple

मंदिर स्थापना : सन १९१३ . जिर्णोध्दार : सन २०१७


17.08.2023 रोजी दुपारी ०१.०० वाजता सुरूवात. 



नामसप्ताह २०२३ पाहण्यापूर्वी ...


प्रथम आपण नामसप्ताह २०२२ ची झलक पाहू.... Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवरून  व्हिडिओज साभार ....







श्रावण मासारंभ !


तर आज श्रावण मासारंभ ! श्रावणातल्या या पहिल्याच दिवशी जाकीमिऱ्या येथील नवलाई पावणाई मंदिरात नामसप्ताहाची दरवर्षी सुरूवात होते ! यंदाही ती तशी होत आहे. मंदिर व्यवस्थापन समिती यंदा बदलली असून तिचा हा पहिलाच नामसप्ताह आहे. 

नूतन मंदिर व्यवस्थापन समिती





नामसप्ताहाला सप्ता असेही म्हणतात.  नामसप्ताहात तीन तीन तासांच्या अवधीने अखंड भजन केले जाते. जाकीमिऱ्यात मराठवाडी , देऊळवाडी , शिवलकर वाडी , तळेकर वाडी व पाटील वाडी असे पाच पोटविभाग आहेत.  प्रत्येक पोटविभागाला वाडी असे संबोधले जाते. दर तीन तासाने एक वाडी भजन करते. दर तीन तासांनी बदलणाऱ्या या भजनाला पहारा असे म्हटले जाते.  दिवसाचे चोवीस तास असे आठवडाभर सलग उभे राहून खांद्यावर वीणा घेऊन टाळ मृदुंगाच्या साथीने हे भजन करण्यात येते.

कालपासूनच मंदिरात नामसप्ताह प्रतिष्ठापनेची विविध कामे सुरू आहेत. आज सकाळी या कामांनी वेग घेतला आहे. दुपारी एक वाजता नामसप्ताह प्रतिष्ठापना होऊन नामसप्ताहाची सुरूवात होईल. 

गेले काही दिवस इकडे पाऊस गायब झाला होता . पण नामसप्ताहात हटकून पाऊस पडतो. आता सकाळचे दहा वाजत आहेत आणि जाकीमिऱ्यामध्ये पहिली श्रावणसर सुरू झाली आहे. आपण पुढील व्हिडीओमधून तिचा आनंद घ्यावा.  



नामसप्ताहाची सुरूवात 

साडेबारा वाजता मंदिरामध्ये नामसप्ताह प्रतिष्ठापनेला सुरूवात झाली.  बरोबर एक वाजता नामसप्ताहाला सुरूवात झाली. आता पर्यंत पाचही वाडयांचे मृदुंग एकसाथ वाजत होते. पण आता बाकीचे मृदुंग थांबवून पहिला पहारा असलेल्या मराठवाडीच्या मृदुंगावर थाप पडली आणि पहिला पहारा सुरू झाला.  त्याची झलक दाखवणारा छोटासा व्हिडीओ पहा : 



एक वाजता सुरू झालेला मराठवाडीचा पहिला पहारा चार वाजता सुटेल व त्याचवेळी पुढील वाडीचा म्हणजे देऊळवाडीचा पहारा भरेल. तो सात वाजता सुटेल. पहारा जितके वाजता सुटतो त्यापासून बरोब्बर बारा तासांनी त्या वाडीचा पुढचा पहारा येतो. उदा. मराठवाडीचा आज संध्याकाळी चार वाजता सुटलेला पहारा बरोबर बारा तासांनी उद्या पहाटे चार वाजता भरेल. तसेच, देऊळवाडीचा आज संध्याकाळी सात वाजता सुटणारा पहारा उद्या सकाळी सात वाजता पुन्हा भरेल. अशा पध्दतीने सलगपणे सात दिवस मंदिरात नामघोष सुरू राहील . याचा वृत्तांत वेळोवेळी इथे देणार आहोत.‌ 

क्रमशः ....


#देवाचिये व्दारी

#अभंग

#नवलाईपावणाई

#नामसप्ताह

#सप्ता





गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

Manus aatmhattya ka karto

माणूस आत्महत्त्या का करतो ?

व्यवहाराच्या कसोटीवर भावनेचा संयम टिकत नाही तेव्हाच माणूस टोकाचा निर्णय घेतो.‌ आत्महत्या ही एका क्षणात झालेली नसते , खूप अगोदर पासून ढग जमू लागलेले असतात. दु:खद पाऊस नंतर कोसळतो. जीव कोणाला नको असतो ? पण अखेरच्या पर्यायांचाही पर्याय उरत नाही , तेव्हा हे दुर्दैवी कृत्य घडते. असे घडू नये... कधीही...कुणाच्याही बाबतीत....

Nitin Desai


नितीन देसाईंबाबत फेसबूकवरची पोस्ट ...

नुकताच नितीन देसाईंच्या आत्महत्त्येने प्रचंड धक्का दिला. आत्महत्या नेहमीच धक्कादायक असते. त्यात ती नितीन देसाईंसारख्या  एका महान कला दिग्दर्शकाची , सिने दिग्दर्शकाची , कलाकाराची आत्महत्या ही अधिकच धक्कादायक असते. अनेकांना चटका लावणारी असते. समाजमाध्यमांमध्ये यावर खूप काही येत असते. तसे ते आलेच व अजूनही येत आहे.  

नुकतीच नितीन देसाईंच्या आत्महत्येवर फेसबूकवर अशीच एक पोस्ट वाचली. तेव्हा मनात वरील विचार आले. खरेच , माणूस आत्महत्या का करतो ? अनेक कारणं असतात. आत्महत्या करण्यामागची १ , २ , ३..... कारणे... अशी यादी बरीच करता येते. पण त्या यादीत माणसाच्या होत गेलेल्या कोंडीची नेमकी भावना कशी पकडता येईल ? ही कोंडी काही एकाएकी झालेली नसते. मग ही कोंडी कशी कशी होत गेली ? कोंडी इतकी वाढावी की अनेकांना आधार देणाऱ्या , आयुष्यात उभे करणाऱ्या विचारी माणसाने स्वतःच मृत्यूला कवटाळावे ? आत्महत्येच्या निर्णयाचा आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा तो नेमका क्षण कसा पाहता येईल ? कसा पकडता येईल ?  आता काही जण आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतिम उपयोग करून स्वतःच्याच आत्महत्तेचा व्हिडीओही बनवतात ! केवढी सुधारणा झाली आहे पहा ! माणसाचे जीवन सुधारण्यासाठी झालेली सुधारणा त्याचा आत्मघात चित्रित करण्यासाठी माणसालाच उपयोगी पडावी , हे किती दुर्दैवी आहे ! हे खूपच यातनादायी आहे ! 

घालमेल आणि उलाघाल


कारणे कोणतीही असोत , माणूस एका सर्वात अप्रिय निर्णयाला अंतिम स्वरूप देतो हे खरे ! इथपर्यंत यायला त्याला किती प्रयास पडले असतील ! त्याची केवढी घुसमट झाली असेल ! ही घुसमट माणूस कुणाशीच व्यक्त का करू शकत नाही ? त्याच्या मनाची घालमेल का होते ? उलाघाल का होते ?  आत्महत्येत नेमके हेच का होते ?  इतके आप्तस्वकीय असतात , इतके मित्र असतात ! आतापर्यंत त्याची अशी आख्खी दुनिया त्याच्या अवतीभवती नुसती फेर धरून असते , ती नेमकी याच वेळी त्याला परकी का वाटते ? इतकी परकी की एक गोष्ट , फक्त एक गोष्ट त्याला त्यातल्या कोणालाच सांगावीशी का वाटत नाही ? अगदी आजपर्यंत गळ्यात गळे घालून असलेल्या मित्रांपैकी कुणा एकालाही त्याला आपले दु:खं सांगताच येऊ नये ? का वाटत नाही त्याला कुणाशीच मन मोकळे करावेसे ? बोलून तरी बघायला काय हरकत असते ? नंतर चुकचुकणाऱ्यांच्या मनात ही एक शंकाही हुरहुरत राहते.

तो का बोलू शकत नाही ?


खरेच आत्महत्या करणाऱ्याला कुणाशीच बोलावेसे वाटत नसेल ? वाटत असले  तरी तो बोलू शकत नाही , हा कटू अनुभव आहे. तो का बोलू शकत नाही ? एक तर हे बोलणे बोलणाऱ्याला खूप क्लेशदायक असते. कोणाला कसे सांगावे हा प्रश्न खूप वेळ खातो. हे सांगणेही तसे कठीणच असते ! उराच्या  तळात जपलेले गूपित सांगताना खूप कष्ट पडतात . त्यातही हे गूपित बरेचदा सांगण्यासारखे नसते. ही दुनिया चांगली नाही. हशा होऊ शकतो. तमाशा होऊ शकतो. त्यात पुन्हा आपले आपल्याला काय म्हणतील , समाज आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहील , त्यावेळी मेल्याहू़न मेले होण्यापेक्षा खरोखरचे मेलेलेच बरे , असे वाटून माणूस कोणाशीच बोलत नाही. खरे तर ही चूक होते . बदनामीपेक्षा जीव मोठा असतो.‌ देशाला चुना लावून परदेशात उजळ माथ्याने फिरणारे काही कमी नाहीत. आसपासच्या समाजातही नको ते धंदे उघडपणे करून मी नाही त्यातली , कडी लावा आतली अशा प्रवृत्तीची किती तरी लबाड माणसे उजळमाथ्याने सहज  फिरताना  आढळतात. ती आत्महत्या करीत नाहीत , मात्र प्रामाणिक , पापभीरू माणूस खोट्या पाप पुण्याच्या कल्पनांना व प्रतिष्ठेला भुलून जीव गमावतो. हे ठीक नाही . पण असे होते हे खरे आणि हेच दुर्दैवी आहे !

सारे काही संपल्याची तीव्र भावना

माणसाला सारेच संपल्याचे जाणवते तेव्हाच तो आपले जीवन संपवतो ! सारेच संपल्याची , कोणताच मार्ग किंवा उपाय आता शिल्लक राहिला नसल्याची जाणीव माणसाला नक्की केव्हा आणि कशी होते ? का होते ? हे सांगणे आपल्याला कठीण आहे , पण अशी भावना प्रबळ होते आणि माणूस आत्महत्त्या करतो हे सत्य आहे. नितीन देसाईंसारख्या कलाकाराच्या हृदयात दबलेले दु:खं आणि आत्महत्त्या करण्यापर्यंतची विवशता त्यांच्यापुरती तरी त्यांच्यासोबतच अनंतात विलीन झाली आहे , हे खरे ! परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो , हीच परमेश्वरचरणी प्रार्थना !

#nitin_desai
#suicide
#facebook_story 

मंगळवार, १ जून, २०२१

आपली एस. टी....आपली माणसं..

आपली एस. टी....आपली माणसं...

१ जून १९४८ रोजी महाराष्ट्रात पहिली एस. टी. बस पुणे अहमदनगर मार्गावर धावली. 

आज तिचा ७४ वा वर्धापन दिन. 

त्यानिमित्त एस्.टी. शी संबंधित 

सर्वांचेच अभिनंदन !


आमच्या जाकीमिऱ्या गावात पहिली 

एस्. टी. बस सन १९६९ मध्ये आली. 

अगदी बालपणी. तेव्हा ती निळ्या, 

हिरव्या आणि पांढऱ्या रंगात 

होती. पुढे त्यात पिवळा रंग मिसळला. 

कधीतरी लाल रंगही आला. त्यांने 

बरीच वर्षे राज्य केलं. त्याचा मनावर 

एक पगडा बसलेला आहे.  अगदी " ये 

लाल रंग कब मुझे छोडेगा " या जुन्या

हिंदी गाण्याची आठवण यावी इतका. 

लाल डब्बा म्हणूनच एस. टी. फेमस झाली. 

आता पुढे ....

मग खाजगी गाड्यांच्या स्पर्धेमुळे एस. टी.ही चकचकीत झाली. रंगीतसंगीत झाली. आधुनिक झाली. 

काही झाले तरी एक गोष्ट मात्र कायम राहिली. दिवस रात्र थकण्याची पर्वा न करता अखंड प्रवास आणि आपुलकी !एस. टी. ची प्रवाश्यांबद्दलची  आपुलकी ! हजारो किलोमीटर, हजारो माणसे...!


पहिली बस धावली ती पोलीस बंदोबस्तात 

 पहिली बस धावली ती बेडफोर्ड कंपनीची ३० आसनक्षमतेची होती. 

शिवाजीनगर कार्पोरेट जवळ बसचा 

शेवटचा थांबा होता. खाजगी 

वाहतूकीच्या व्यवसायावर 

परिणाम होईल या भीतीने हल्ला होईल 

म्हणून माळीवाडा वेशीपासून 

पुण्यापर्यंत ही बस पोलीस बंदोबस्तात 

नेण्यात आल्याची माहिती मिळते. 

याप्रकारे, सुरुवातीपासूनच खाजगी 

वाहतूक, कच्चे रस्ते, अपुरी 

साधनसामग्री आणि इतर अनेक 

घटकांचे अडथळे पार करणारी आपली 

एस. टी. आजही अथक धावते आहे. 

अगदी रेल्वे आली तरी एस. टी. 

माणसे आणि बोज्यांची ने आण 

करतेच आहे. 

डबघाईला आली आली असं म्हणता 

म्हणता पुन्हा पुन्हा उभारी धरते आहे. 

ऊर्जितावस्थेला येते आहे.‌ संघर्ष सतत 

चालूच असणारी ही महाराष्ट्राची 

माऊली आहे.  तिच्या प्रत्येक 

कर्मचाऱ्यावर आणि प्रवाशावर विश्वास 

ठेवून , बहुजन हिताय बहुजन सुखाय 

या ब्रीदपूर्ततेसाठी ती सतत धावत 

आहे. 

चांगले वाईट सगळीकडेच असते. 

कच्चे दुवे सगळीकडेच असतात. एस्. 

टी. मध्येही आहेत, पण म्हणून ती काही वावगी ठरत नाही. ७४ वर्षे करोडो प्रवाशांची अखंड सेवा करणारी एस. टी. म्हणूनच आपल्याला आपली  वाटते.‌ 


पहिलेवहिले चालक वाहक 

 महाराष्ट्रात पहिली एस्. टी. 

अहमदनगर - पुणे मार्गावर ज्यांनी 

नेली ते चालक श्री. लक्ष्मण केवटे व 

वाहक श्री. किसन राऊत यांच्यासह 

आजपर्यंतचे सर्व चालक व 

वाहक म्हणूनच आम्हांला आपले 

वाटतात. इतकेच नव्हे तर एस्. टी. ला सतत तंदुरूस्त व उत्साही ठेवणारे 

महाराष्ट्रातले आजपर्यंतचे सर्व 

मेकॅनिक्स, कार्यशाळा, भांडार , 

कार्यालय यातील सर्व श्रेणीतील सर्व 

अधिकारी व कर्मचारी आपले वाटतात. 

यांच्याच जिवावर एस्. टी. अहोरात्र

धावते आहे. एस्. टी. ह्या 

जीवनरेखेची निर्मिती करणारे 

महाराष्ट्रातले सर्व संबंधित आम्हांला 

आमचे सगेसोयरे वाटतात.‌ 

महाराष्ट्राच्या ज्या मंत्र्यांनी , प्रशासकीय 

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एस्. 

टी.साठी मनापासून योगदान दिले आहे 

तेही सर्व आपलेच वाटतात . हा केवळ 

लाल डबा नाही, केवळ पत्रा नाही, 

एस् . टी. ही सजीव धावती 

गोष्ट आहे.  प्रवाशांप्रती तिचा 

समर्पित सेवाभाव अत्युच्च श्रेणीचा 

आहे. जी आपुलकी एस् . टी . ने 

चौऱ्याहत्तर वर्षे जपली आहे ती 

यापुढेही ती जपत राहील यात 

तीळमात्र शंका नाही.  प्रवाशीही 

एस्. टी. त्यांना जी आपुलकी 

देत आली आहे तशीच आपुलकी 

एस्.टी.ला देतील आणि महाराष्ट्राच्या 

ह्या वाहतूक जीवनरेखेशी सातत्याने 

ॠणानुबंध वाढवतील, जपतील, अशी 

खात्री बाळगतो आणि आपल्या

एस्.टी.ला मानाचा मुजरा 

करून इथेच थांबतो ! 


#मानाचा_मुजरा


... देवीदास हरिश्चंद्र पाटील




महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वेबसाईट 

https://msrtc.maharashtra.gov.in/



Maharashtra State Transport Corporation.

बुधवार, १७ मार्च, २०२१

Palas

 पळसाला पाने तीनच 


            ती लग्नं होऊन सासरी आली … बावरलेली … स्वतःचे सर्व काही सोडून सासरी आली …. मनात धाकधूक होतीच... नवीन परिस्थिती... नवीन माणसं … नवीन नाती ... सगळंच तिला नवीन होतं . ते घर ... हे घर … गैरसमजातून बेघर व्हायची तर वेळ येणार नाही ना ? ती जरा साशंकच होती . तिचंही बरोबर होतं . तिच्या काही मैत्रिणींचेही असं झालं होतं . 


            अनेक ठिकाणी असं होतं . अशावेळी जी मुलगी आपल्या कुटुंबाचा नवी सदस्य झाली आहे तिला समजून घेताना सासर कमी पडतं . बावरलेल्या , गोंधळलेल्या अवस्थेमुळे काही चुकलं तर तिला सांभाळून घेणे , समजावून सांगणे सासरच्यांना कठीण जाते . गंमत अशी आहे की बायकाच बायकांना जास्त छळतात.  काही नातीच गैरसमज निर्माण करणारी आहेत . सासू सून आणि नणंद भावजय ही दोन नाती म्हणजे तर कळसच ! गैरसमज आणि भांडण हे यांचे खास मित्र ! त्यातही जाणीवपूर्वक पसरवलेले गैरसमज आणि मुद्दाम उकरून काढलेली भांडणे हे तर खडाजंगीतले चौकार-षटकार ! निमित्ते तर पाचवीलाच पुजलेली ! निमित्ते तयार करण्यात या जोड्यांचा हात , ज्याने ह्यांना निर्माण केलं असं म्हणतात तो खुद्द परमेश्वरही धरू शकणार नाही ! कांगावखोरपणा हा यांचा सर्वोत्तम जन्मजात आदर्श गूण ! कुरघोडी करणे त्यांच्या हातचा मळच ! कळ काढण्यात ह्या हुशार !  अपवादात्मक परिस्थितीत सन्माननीय अपवाद ठरण्याचा विक्रमही ह्याच करू जाणोत ! स्त्रियांना स्त्रियांच इतक्या का छळतात हे एवढं रामायण होऊनही सांगणे कठीण आहे ! राम जाणे ! बाकी काय !


             हजारो वर्षे झाली तरी स्त्रीच्या नशिबीचा प्रामुख्याने स्त्रीकडून केलेला सासुरवास काही टळत नाही ! स्त्रीला देवता समजणारी आपली उच्च संस्कृती स्त्रीची प्रत्यक्षात कशी पूजा करते ते पाहण्याजोगे आहे ! हतबल पुरूष द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेसारखे माना खाली घालून आजही गप्प बसतात !  आजच्या तथाकथित स्त्री स्वातंत्र्य युगातही हे कमी झालेले नाही हे विशेष !  घरोघरी त्याच चुली, बोलत नाही तीच बरी ही म्हण यामुळेच इतकी वर्षे टिकून आहे. विषय आलाच आहे म्हणून सांगतो . दुसरीही एक म्हण अशीच टिकून आहे . ती आहे पळसाशी संबंधित . वसंत ऋतूत पळस बहरतो . पळस आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पळस त्वचारोग नाहीस करतो असं म्हणतात . लाल केशरी व किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पळस  लक्ष वेधून घेतो. पळस माझं लक्ष वेधून घेतो तो आणखी एका सामाजिक कारणासाठी. बेल आणि  निर्गुंडी यांनाही पळसाप्रमाणे तीनच पाने असतात.  पण पळसाला पाने तीनच ही म्हण पळसालाच का चिकटली हा प्रश्न मला पडतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे घरोघरीच्या चुली आपला गुण काही केल्या सोडत नाहीत. आपला गूण न सोडण्याची ही प्रवृत्ती मला पळसाला पाने तीनच या म्हणीच्या जवळची वाटते . काहीही केले तरी पळसाला पाने तीनच येणार ! अखेर,  अनेक नववधूंचे रडवेलले चेहरे आणि त्यांचा सासुरवास मला टोचत राहतो . मनात एक बेचैनी भरून राहते.



…. देवीदास हरिश्चंद्र पाटील, रत्नागिरी. 

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

कोरोना विषाणू भारतीय पद्धतीने

Corona




#कोरोना भारतात पसरतोय. आजची आकडेवारी दहशत पसरवणारी आहे. राज्य सरकारे व केंद्र सरकार आपापले काम करीत आहेत. काही महत्वाच्या घडामोडी पहा.

एक दिवसीय लॉक डाऊनचे अपील 


1. दि. 22 मार्च एक दिवसीय लॉक डाऊनचे अपील व सायं. 05 वा. थाळी नाद ज्याचे लोकांनी ढोलवादनात व गर्दी करण्यात रूपांतर केले. काही लोकांनी  लॉक डाऊनच्या उद्देशाचे तीन तेरा वाजवले.

24 मार्चच्या मध्यरात्रीपासून


2. दि. 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 21 दिवसांचा म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जाहीर झाला. वेळ रात्री 8 ची. परंतु अनेक ठिकाणी खरेदीसाठी लोकांची झुंबड सुरू आहे. पोलीसांना गर्दी आवरण्यासाठी दंडूकशाही करावी लागते आहे आणि लोकांचे काही ठिकाणी पोलीसांवर आक्रमण होते आहे. तसेच डाँक्टरांविरूध्दही काही लोक आक्रमक झाले आहेत.

आर्थिक पॅकेज जाहीर


3. दि. 26 मार्च ... केंद्र सरकारमार्फत अर्थमंत्र्यांकडून आर्थिक पँकेज जाहीर झाले आहे.

      जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 * 7 चालू ठेवण्याचाही निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला आहे..

        मुंबईत कोरोनाची संख्या एकाच दिवसात वाढली आहे.

        काही सामाजिक संस्थांनी गरीबांना मदतीचा हात देण्यास सुरूवात केली आहे.

गंभीर प्रश्न

         सगळयात मोठे दुर्दैव म्हणजे शहरांत हातावर पोट असलेले लोक शहरे सोडून जात आहेत. काहींचे गांव तर 400 किमी. वर आहे. बायकामुलांना घेवून हे लोक एवढे अंतर पायी कसे पार पडतील , हा गंभीर प्रश्न आहे. त्याशिवाय, रस्त्यावरील गर्दीही वाढत आहे. काही ठिकाणी कंटेनरमधून लोक कोंबून प्रवास करीत आहेत. असे काही कंटेनर्स पोलीसांनी पकडलेही आहेत.


4. दि. 27 मार्च .   काही ठिकाणी लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नाही अशी अवस्था आहे. काही ठिकाणी दर वाढवून वस्तू मिळत असल्याच्याही बातम्या येत आहेत. गॅस सिलेंडर्स घरपोच मिळत नसल्याने मुंबईत लोक सिलेंडर्ससह रस्त्यावर आल्याचे बातमीपत्रात दाखविण्यात आलेले आहे. सरकारी घोषणा , आवाहने आणि लोकांच्या मनातला वाढता संभ्रम यांचा ताळमेळ होत नसल्याने गोंधळ वाढतो आहे. त्यातच सोशल मिडीयांवर फिरणारे काही संदेश अफवा पसरवत आहेत. आदमापूर येथे बाळूमामांच्या नावाने चहामध्ये हळद , भंडारा टाकून चहा प्याल्याने कोरोनाला प्रतिबंध होतो , अशी अफवा पसरली व कोल्हापूरमध्ये गर्दी करून लोकांनी हेच सुरू केले. आज कोल्हापूरात कोरोना वाढल्याचे दिसून येते आहे. ट्वीटसचीही भर पडतेच आहे .  नेमकेपणा नसल्याने लोकांना धीर कुठून मिळणार हाच खरा प्रश्न आहे. लोक अजूनही लॉक्ड डाऊन गंभीरपणे घेत नसल्याने कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे कठीण होत आहे. भारतात बाधीतांची संख्या हजाराच्या दिशेने वाटचाल करते आहे.

 महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा पाचवा बळी

 
           महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. लोक अजूनही शहाणे होत नाहीत. भारतातील लोक घोषित लॉक्ड डाऊनही गंभीरतेने पाळत नाहीत .  हे लोक स्वत:ची जबाबदारी ओळखून , काही नेत्यांच्या मागे मेंढरासारखे धावणे सोडून , आवाहने करण्याची वेळ येऊ न देता , पोलीसांचे फटके पडू न देता , स्वयंप्रेरणेने , स्वयंबुध्दीने व जबाबदारीने निर्णय घेतील , तो भारतात सुदिन म्हणावा लागेल !

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

कशामुळे काय घडते ?


कशामुळे काय घडते ?


हे विश्व निर्माण झाले ही जर विश्वातली पहिली घटना मानली तर त्या क्षणापासून घटना घडायला सुरूवात झाली असे म्हणता येते. यानंतर दुसरी , तिसरी , चौथी , पाचवी अशाप्रकारे क्रमाने घटना घडल्या की एकाच क्षणाला काही घटना एकदम घडल्या ? जर घटना क्रमाने घडत गेल्या असतील तर त्यामध्ये काही परस्पर संबंध होता की प्रत्येक घटनेचे घडणे स्वतंत्र होते , हेही प्रश्न उपस्थित होतात. कदाचित सुरूवातीला प्रत्येक घटनेचे घडणे स्वतंत्र होते असेलही आणि कधी तरी घटनांमध्ये परस्पर संबंध निर्माण झाले असण्याचीही शक्यता वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असतेच. कारणाशिवाय काही घडत नाही असे म्हणतात. थोडक्यात, एक घटना दुस-या घटनेच्या घडण्याला कारणीभूत होत असली पाहिजे. म्हणजेच, एका घटनेतूनच दुसरी घटना जन्म घेत असावी , असे वाटते. अशाप्रकारे, घटनांचे एक चक्र चालू झाले असावे , जे काळ फिरवत असावा. घटनांच्या ह्या चक्रालाच कालचक्र म्हटले गेले असावे. याचाच अर्थ, एक घटना घडली की तिच्यातून दुसरी , दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी अशा असंख्य घटना घडत असल्या पाहिजेत. जर घटनांचा क्रम , त्यातला परस्पर संबंध व कार्यकारणभाव माणसाला निश्चितपणे समजला तर पुढे होणा-या घटनांचे आकलन होवून माणूस सावध होईल व काही उपाययोजनाही करू शकेल. 

             

 विश्वातील वैशिष्ठ्यपूर्ण घटनाक्रम


आपण ज्याला विश्व म्हणतो त्यात हा जो क्रम आहे तो निश्चितपणे न समजल्याने अनेक अडचणी येतात. नुकसान होते. हा क्रम एका गणितीय मांडणीत बसला असता तर निश्चित असे काही हाती लागले असते. कदाचित तो मूळातच गणितीय मांडणीत असावा पण मानवाला अजूनही गणितीय मांडणी सापडली नसावी. जर ती सापडली तर अनेक समस्यांवर उपाय करता येतील. काही वेळा काही चांगल्यावाईट घटनांची सुरूवात ही आपल्याच मनात होत असते. विशेषतः वाईट गोष्टींची होणारी सुरूवात लक्षात घ्यावी लागेल. याचे कारण वाईटाला असलेली अधिकची तीव्रता आपल्या अंतरमनाला फार भिडत असावी आणि म्हणूनच की काय मनात वाईट आले तर ते प्रत्यक्षातही फार लवकर घडते. कधी कधी एखादा विचार मनात येतो आणि काही वेळातच तो प्रत्यक्षातदेखील येतो. इतकेच नाही तर त्या घटनेपासून अनेक घटना क्रमाने घडत जातात. मन चिंती ते वैरी न चिंती असे का म्हटले जाते , ते मी स्वतः अनुभवले आहे. मी तेव्हा नोकरीत होतो. एके दिवशी चारच्या सुमारास हातातले काम संपले म्हणून जरा खुर्चीत निवांत बसलो होतो. क्षणात अचानक मनात विचार आला की आपले कसे बरे चालले आहे. अलिकडे काही वाईट घडलेले नाही. पुढ्च्याच क्षणी मी चपापलो . भानावर आलो. आपण वाईट घडले नाही म्हणून चुकचुकलो तर नाही ना ? ते खरेच होते आणि केवळ दीड तासात मला मुंबईहून मित्राचा फोन आला. माझ्या बदलीचे आदेश बाहेर पडले असून पाच मिनिटातच ऑफिसला फॅक्स पाठवला जातोय. पाच मिनिटात तो आलाही. त्यावेळी मला बदली नको होती. मी घराचे कंपाऊंड करायला दोन दिवसातच सुरूवात करणार होतो आणि इतरही कामे होती. मी कंत्राटही दिले होते. पण बदली झाल्याने मला ते सर्व काम पत्नीवर सोडून जावे लागले होते. घरात माझी आई , पत्नी व मुलगा होते. मुलगा तर खूपच लहान होता. घरात अन्य कोणी मोठा पुरूष माणूसही नव्हता . वेळ अशी होती की एक तर बारा वर्षांनी मला बढती मिळत होती. बदलीचे ठिकाण दूर आणि जंगलात वसलेल्या एका खेडेगावात होते . तिकडे भलतेच झाले. कामाची पध्दत आणि प्रामाणिकपणा पाहून साहेब माझ्या प्रेमात पडले. त्यांनी सहा महिन्यांशिवाय बदलीचा अर्जच वरिष्ठ कार्यालाकडे पाठवणार नाही म्हणून सांगितले. ईश्वरकृपेने मी केवळ पाचच महिन्यांत बदलून आलो . पण ते पाच महिने मला खूप त्रासाचे गेले. प्रत्येक क्षण मी परमेश्वराची मनोमन मनधरणी करीत होतो व अखेर त्याने ऐकले होते. पण आदेश येवूनही ते साहेब मला सोडायलाच तयार होत नव्हते. आणखी किमान दीड दोन महिने तरी मी त्यांना तिथे पाहिजे होतो असे त्यांचे म्हणणे होते. मी नंतर कामाला काही काळ येईन पण मला आता सोडा असे मी खूप सांगून पाहिले. मला तो ताण सहन होईनासा झाला होता . अटॅक येईल की काय असे वाटले होते. अखेर त्यांनी माझ्या दोन वरिष्ठ अधिका-यांची अर्धा तास मिटींग घेतली . त्यात मला आता सोडायचे व मागाहून कामाला बोलवायचे असे ठरले. खुद्द साहेबांनी येवून मला हे सांगितले. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. एकातून दुसरा व दुस-यातून तिसरा अशी वाईट प्रसंगांची साखळी अशा वेळी तयार होते . फार विचित्र घटना घडतात. ते एक दुष्ट चक्र असते.


आणखी एक विचित्र उदाहरण

काही वेळेला कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा योगायोग होतोही. शिवाय , तुमची मनःस्थिती नेमकी त्यावेळेला कशी आहे त्यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. मात्र, काही वेळेला काही गोष्टी क्रमाने घडतात हे नक्की ! पहिल्या घटनेनंतरच दुसरी घटना घडते अशा वेळी मात्र त्या दोन गोष्टींचा काही ना काही संबंध असूही शकतो. इथे प्रत्यक्ष माझ्या जीवनातले आणखी एक उदाहरण देतो. मला अशा गोष्टी पटत नसूनही एक विचित्र अनुभव आला होता. सन २०१४ मध्ये मी घर बांधायला घेतले होते. त्यावेळी प्लॅस्टर करणारे शोधत होतो. कोणी मिळत नव्हते. एके दिवशी एकाने एक सुचवला. मी फोन केला तसा तो त्याचे दोन साथीदार आले. चर्चा करता करता मी त्यांना घर दाखवायला जात असतांनाच आमच्या दारात एक विचित्रसा काळा कुत्रा आम्हांला आडवा गेला. क्षणभर त्याची माझी नजरानजरही झाली. त्याच्या डोळ्यांचा रंग बदलून तीव्र गडद पिवळा झाल्याचे मला दिसले . मला त्या नजरेत काही तरी विचित्र जाणवलेही. त्याच क्षणी त्या लोकांना कंत्राट देवू नये अशी भावनाही मनात निर्माण झाली. पण इतके होवुनही माझ्यापुढे मला पर्याय दिसल्याने मी त्यांना ते कंत्राट दिले व वर रू. २०००० ॲडव्हान्सही दिले.  दुस-याच दिवशी सकाळीच त्याचा फोन आला की त्याच्या शेजारीच प्रेत झाले आहे त्यामुळे उद्या येतो. मी म्हटले ठीक आहे. दुस-या दिवशी त्याची भावजय घरात पडली आणि तिला कोल्हापूरला न्यावे लागल्याचा फोन आला. ते चार पाच दिवस तसेच गेले. आठवड्याने ते लोक आले आणि काम सुरू झाले. मी निश्वास सोडतोय तोच त्यांची मशीन सतत बिघडू लागली. ती शहरात नेवून दुरुस्त करून आणावी लागली. त्यातच कामापेक्षा त्यांची सतत बडबडच चाललेली असायची. प्लॅस्टरही खराब होत होते. शेवटी मी त्यांना झालेल्या कामाचे पैसे विचारले चार हजार कमी देवून घालवून दिले. उरलेले काम मी दुस-याकडून पूर्ण करून घेतले ! हे नक्की त्या कुत्र्याने मला नजरेतून सूचित केले असावे का ? काही कळत नाही. अजूनही निसर्गातला घटनाक्रम आपल्याला निश्चितपणे समजलेला नाही. कशामुळे काय होते हे समजलेले नाही. हे समजल्याशिवाय निश्चितपणे नेमके भाष्य करणे उचित वाटत नाही