गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

कशामुळे काय घडते ?


कशामुळे काय घडते ?


           हे विश्व निर्माण झाले ही जर विश्वातली पहिली घटना मानली तर त्या क्षणापासून घटना घडायला सुरूवात झाली असे म्हणता येते. यानंतर दुसरी , तिसरी , चौथी , पाचवी अशाप्रकारे क्रमाने घटना घडल्या की एकाच क्षणाला काही घटना एकदम घडल्या ? जर घटना क्रमाने घडत गेल्या असतील तर त्यामध्ये काही परस्पर संबंध होता की प्रत्येक घटनेचे घडणे स्वतंत्र होते , हेही प्रश्न उपस्थित होतात. कदाचित सुरूवातीला प्रत्येक घटनेचे घडणे स्वतंत्र होते असेलही आणि कधी तरी घटनांमध्ये परस्पर संबंध निर्माण झाले असण्याचीही शक्यता वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक घटनेमागे काही ना काही कारण असतेच. कारणाशिवाय काही घडत नाही असे म्हणतात. थोडक्यात, एक घटना दुस-या घटनेच्या घडण्याला कारणीभूत होत असली पाहिजे. म्हणजेच, एका घटनेतूनच दुसरी घटना जन्म घेत असावी , असे वाटते. अशाप्रकारे, घटनांचे एक चक्र चालू झाले असावे , जे काळ फिरवत असावा. घटनांच्या ह्या चक्रालाच कालचक्र म्हटले गेले असावे. याचाच अर्थ, एक घटना घडली की तिच्यातून दुसरी , दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी अशा असंख्य घटना घडत असल्या पाहिजेत. जर घटनांचा क्रम , त्यातला परस्पर संबंध व कार्यकारणभाव माणसाला निश्चितपणे समजला तर पुढे होणा-या घटनांचे आकलन होवून माणूस सावध होईल व काही उपाययोजनाही करू शकेल. याबाबतीत जगभरातील शास्त्रञांनी व ज्योतिषांनीही अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.    

             

 विश्वातील वैशिष्ठ्यपूर्ण घटनाक्रम


               आपण ज्याला विश्व म्हणतो किंवा निसर्ग म्हणतो त्यात हा जो क्रम आहे तो निश्चितपणे न समजल्याने अनेक अडचणी येतात. नुकसान होते. हा क्रम एका गणितीय मांडणीत बसला असता तर निश्चित असे काही हाती लागले असते. कदाचित तो मूळातच गणितीय मांडणीत असावा पण मानवाला अजून ही गणितीय मांडणी सापडली नसावी. जर ती सापडली तर अनेक समस्यांवर उपाय करता येतील. काही वेळा काही चांगल्यावाईट घटनांची सुरूवात ही आपल्याच मनात होत असते. विशेषतः वाईट गोष्टींची होणारी सुरूवात लक्षात घ्यावी लागेल. याचे कारण वाईटाला असलेली अधिकची तीव्रता आपल्या अंतरमनाला फार भीडत असावी आणि म्हणूनच की काय मनात वाईट आले तर ते प्रत्यक्षातही फार लवकर घडते. कधी कधी एखादा विचार मनात येतो आणि काही वेळातच तो प्रत्यक्षातदेखील येतो. इतकेच नाही तर त्या घटनेपासून अनेक घटना क्रमाने घडत जातात. मन चिंती ते वैरी न चिंती असे का म्हटले जाते , ते मी स्वतः अनुभवले आहे. मी तेव्हा नोकरीत होतो. एके दिवशी चारच्या सुमारास हातातले काम संपले म्हणून जरा खुर्चीत निवांत बसलो होतो. क्षणात अचानक मनात विचार आला की आपले कसे बरे चालले आहे. अलिकडे काही वाईट घडलेले नाही. पुढ्च्याच क्षणी मी चपापलो . भानावर आलो. आपण वाईट घडले नाही म्हणून चुकचुकलो तर नाही ना ? ते खरेच होते आणि केवळ दीड तासात मला मुंबईहून मित्राचा फोन आला. माझ्या बदलीचे आदेश बाहेर पडले असून पाच मिनिटातच ऑफिसला फॅक्स पाठवला जातोय. पाच मिनिटात तो आलाही. त्यावेळी मला बदली नको होती. मी घराचे कंपाऊंड करायला दोन दिवसातच सुरूवात करणार होतो आणि इतरही कामे होती. मी कंत्राटही दिले होते. पण बदली झाल्याने मला ते सर्व काम पत्नीवर सोडून जावे लागले होते. घरात माझी आई , पत्नी व मुलगा होते. मुलगा तर खूपच लहान होता. घरात अन्य कोणी मोठा पुरूष माणूसही नव्हता . वेळ अशी होती की एक तर बारा वर्षांनी मला बढती मिळत होती. बदलीचे ठिकाण दूर आणि जंगलात वसलेल्या एका खेडेगावात होते . तिकडे भलतेच झाले. कामाची पध्दत आणि प्रामाणिकपणा पाहून साहेब माझ्या प्रेमात पडले. त्यांनी सहा महिन्यांशिवाय बदलीचा अर्जच वरिष्ट कार्यालाकडे पाठवणार नाही म्हणून सांगितले. ईश्वरकृपेने मी केवळ पाचच महिन्यांत बदलून आलो . पण ते पाच महिने मला खूप त्रासाचे गेले. प्रत्येक क्षण मी परमेश्वराची मनोमन मनधरणी करीत होतो व अखेर त्याने ऐकले होते. पण आदेश येवूनही ते साहेब मला सोडायलाच तयार होत नव्हते. आणखी किमान दीड दोन महिने तरी मी त्यांना तिथे पाहिजे होतो असे त्यांचे म्हणणे होते. मी नंतर कामाला काही काळ येईन पण मला आता सोडा असे मी खूप सांगून पाहिले. मला तो ताण सहन होईनासा झाला होता . अटॅक येईल की काय असे वाटले होते. अखेर त्यांनी माझ्या दोन वरिष्ठ अधिका-यांची अर्धा तास मिटींग घेतली . त्यात मला आता सोडायचे व मागाहून कामाला बोलवायचे असे ठरले. खुद्द साहेबांनी येवून मला हे सांगितले. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. एकातून दुसरा व दुस-यातून तिसरा अशी वाईट प्रसंगांची साखळी अशा वेळी तयार होते . फार विचित्र घटना घडतात. ते एक दुष्ट चक्र असते.

           आणखी एक उदाहरण

          
काही वेळेला कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा योगायोग होतोही. शिवाय , तुमची मनःस्थिती नेमकी त्यावेळेला कशी आहे त्यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. मात्र, काही वेळेला काही गोष्टी क्रमाने घडतात हे नक्की ! पहिल्या घटनेनंतरच दुसरी घटना घडते अशा वेळी मात्र त्या दोन गोष्टींचा काही ना काही संबंध असूही शकतो. इथे प्रत्यक्ष माझ्या जीवनातले आणखी एक उदाहरण देतो. मला अशा गोष्टी पटत नसूनही एक विचित्र अनुभव आला होता. सन २०१४ मध्ये मी घर बांधायला घेतले होते. त्यावेळी प्लॅस्टर करणारे शोधत होतो. कोणी मिळत नव्हते. एके दिवशी एकाने एक सुचवला. मी फोन केला तसा तो त्याचे दोन साथीदार आले. चर्चा करता करता मी त्यांना घर दाखवायला जात असतांनाच आमच्या दारात एक विचित्रसा काळा कुत्रा आम्हांला आडवा गेला. क्षणभर त्याची माझी नजरानजरही झाली. त्याच्या डोळ्यांचा रंग बदलून तीव्र गडद पिवळा झाल्याचे मला दिसले . मला त्या नजरेत काही तरी विचित्र जाणवलेही. त्याच क्षणी त्या लोकांना कंत्राट देवू नये अशी भावनाही मनात निर्माण झाली. पण इतके होवुनही माझ्यापुढे मला पर्याय दिसल्याने मी त्यांना ते कंत्राट दिले व वर रू. २०००० ॲडव्हान्सही दिले.     दुस-याच दिवशी सकाळीच त्याचा फोन आला की त्याच्या शेजारीच प्रेत झाले आहे त्यामुळे उद्या येतो. मी म्हटले ठीक आहे. दुस-या दिवशी त्याची भावजय घरात पडली आणि तिला कोल्हापूरला न्यावे लागल्याचा फोन आला. ते चार पाच दिवस तसेच गेले. आठवड्याने ते लोक आले आणि काम सुरू झाले. मी निश्वास सोडतोय तोच त्यांची मशीन सतत बिघडू लागली. ती शहरात नेवून दुरुस्त करून आणावी लागली. त्यातच कामापेक्षा त्यांची सतत बडबडच चाललेली असायची. प्लॅस्टरही खराब होत होते. शेवटी मी त्यांना झालेल्या कामाचे पैसे विचारले चार हजार कमी देवून घालवून दिले. उरलेले काम मी दुस-याकडून पुर्ण करून घेतले ! हे नक्की त्या कुत्र्याने मला नजरेतून सूचित केले असावे का ? काही कळत नाही. अजूनही निसर्गातला घटनाक्रम आपल्याला निश्चितपणे समजलेला नाही. कशामुळे काय होते हे समजलेले नाही. हे समजल्याशिवाय निश्चितपणे नेमके भाष्य करणे उचित वाटत नाही

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

फ्लॅट भाड्याने घेण्याबाबत कोणती चौकशी करावी ?



फ्लॅट भाड्याने घेण्याबाबत कोणती चौकशी करावी ?


                जेव्हा तुम्ही भाड्याच्या फ्लॅट्सचा शोध घेता तेव्हा तुम्हांला काही चौकश्या ह्या कराव्याच लागतात . ह्या चौकश्या दोन प्रकारच्या असतात.

१.    प्राथमिक चौकशी (फ्लॅट भाड्याने घेण्यापूर्वी करावयाची चौकशी)

२.    फ्लॅटोत्तर चौकशी (फ्लॅट भाड्याने घेतल्यानंतर करावयाची चौकशी)

              

प्राथमिक चौकशीः-


                        ही चौकशी फ्लॅट भाड्याने घेण्यापूर्वी करावयाची असून ती फारच बारकाईने करावी लागते . विशेषतः तुम्ही जर त्या भागात नवीनच असाल आणि प्रथमच तिथे जात असाल , तर मग फार विचारपूर्वक ही चौकशी करावी लागते . अर्थात, प्रत्यक्ष नवीन भागात थेट जाण्यापूर्वी तुम्ही काही संदर्भ मिळवू शकता. तुमच्या भागातील कोण कोण नवीन भागात आधीपासून रहात आहेत , ते किंवा त्यांचे कोणी ओळखीचे वा मित्र तिकडे असतील तर त्यांच्याकडे साधारण चौकशी करू शकता . काही धागे त्यातून मिळू शकतात. ते धागे पकडून किंवा स्वतंत्रपणेही नवीन भागात जावून तुम्ही चौकशी करू शकता . काही एजंट्स किंवा ब्रोकर्स असतात. सोशल मिडियावर काही ग्रुप्स असतात. वर्तमानपत्रातही फ्लॅट भाड्याने घेण्याच्या जाहिराती असतात. काही वेबसाईट्सही असतात. तुम्ही त्याव्दारे एजंट्स किंवा ब्रोकर्स किंवा अगदी मालक लोकांशीही संपर्क करू शकता. ही चौकशी तुम्ही नवीन भागात प्रत्यक्ष जाण्यापूर्वीही करू शकता वा तिथे गेल्यावरही करू शकता .

           प्राथमिक चौकशी ही अनेक गोष्टींशी संबंधित असते. त्यातही काही बाबी अधिक महत्वाच्या असतात. फ्लॅट भाड्याने घेण्याचे तुमचे कारणही विचारात घ्यावे लागते . हे कारण म्हणजे तुमचा याबाबतीतला हेतू होय. ह्या हेतुनुसार तुमच्या आवश्यकता ठरतात . ह्या आवश्यकतांच्यानुसार तुमच्या फ्लॅटचे स्वरूप तुम्ही ठरवणार असता . तुमच्या गरजांचे प्रतिबिंब तुमच्या फ्लॅटमध्ये उमटणार असते . त्यानुसार तुमच्या फ्लॅटचे स्वरूप , त्यातील तुम्हांला हव्या असलेल्या सोयी आणि सुविधा या बाबींची प्राथमिक चौकशी तुम्ही करणार असता . फ्लॅट हे साधारणतः फर्निश्ड , सेमी फर्निश्ड व अनफर्निश्ड या तीन प्रकारचे असतात. तुम्हांला तुमच्या आवश्यकता व तुमचे बजेट यानुसार निवड करावयाची असते. बजेट म्हणजे तुम्ही फ्लॅट भाड्याने घेण्यासंदर्भात किती खर्च करणे तुमच्या खिशाला परवडणार असते ती तुमच्याजवळ असलेली रक्कम होय. बजेट हा विषय पुढेही कायमच येत राहणार असतो. तुमच्याजवळ किती रक्कम आहे आणि तुम्हांला काय काय हवे आहे याचा ताळमेळ तुम्हांला वेळीच करावा लागतो. म्हणूनच तर, फ्लॅट भाड्याने घेण्यासंदर्भातील प्राथमिक चौकशी फार बारकाईने करावी लागते.

      फ्लॅट भाड्याने घेण्यासंदर्भातील प्राथमिक चौकशी करतांना अनेक बाबींचा साकल्याने विचार करावा लागतो ; त्यापैकी काही प्रमुख बाबी आपण आता पाहूः

१.    परिसर

२.    नेहमी संपर्कात येणारे स्थानिक लोक

३.    दस्तूरखुद्द फ्लॅट

४.    सोई व सुविधा                  

आता आपण एकेक पाहू –


१.    परिसर 


  इथे परिसर म्हणजे तुमच्या फ्लॅट्च्या आजुबाजूचा भाग . हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. तुम्हांला अपेक्षित परिसर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी राहू ईच्छिणार नाहीत. तुम्ही तो एरिया पाहिल्यावर तो सुरक्षित वाटला पाहिजे , तुम्हांला तिथे दीर्घ काळ रहायचे आहे , तेथील लोक, बाजारपेठ , वाहतुकीची साधने याबाबतीत तुम्ही समाधांनी असला पाहिजेत , तुम्हांला अनुकूल स्थिती त्या परिसरात असली तर तुम्ही तिथे राहण्याचा विचार कराल. म्हणून परिसर महत्वाचा ठरतो .


२.    नेहमी संपर्कात येणारे स्थानिक लोक


                आपण जेव्हा एखाद्या परिसरात राहतो आणि विशेषतः भाड्याच्या फ्लॅट्मध्ये राहतो , तेव्हा तेथील स्थानिक लोकांशी आपला संपर्क येतोच. ह्या स्थानिक लोकांमध्ये अर्थातच मुख्य संपर्क येतो तो घरमालकाशी ! पण त्याचबरोबर तेथील दुकानदार , गॅस पुरवठादार , पाणी पुरवठादार, रिक्शावाले , ओला व अन्य कॅबवाले , अन्य वाहतूकदार इ. लोकांशी आपला संपर्क येतो. त्यांच्याशी आपल्याला चांगले संबंध ठेवावे लागतात. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातही नीट चौकशी करावी लागते .


३.    दस्तूरखुद्द फ्लॅटः-



 फ्लॅट हे तर तुमचे अवघे विश्व असते ! अगदी भाड्याचे असले तरी ! याचे एक चित्र तुमच्या मनात असतेच. इथेच तर तुमच्या आयुष्यातल्या अनेक घडामोडी घडणार असतात. तुमच्याकडे कधी तरी मित्र , नातेवाईक व अन्य पाहुणे येणार असतात. काही कार्यक्रम होणार असतात. म्हणूनच, फ्लॅट कोणत्या वस्तीत आहे , कोणत्या इमारतीत आहे, कोणत्या मजल्यावर आहे, कसा दिसतो आहे, तो फर्निश्ड आहे , सेमी फर्निश्ड आहे की अनफर्निश्ड आहे , तुम्हांला अपेक्षित सोईसुविधा त्यात आहेत का , घरमालक व त्यांचे कुटुंब कसे आहे , इ.बाबत सखोल चौकशी तुम्हांला करावी लागेल . तुम्ही एकटे राहणार की तुमचे कुटुंब राहणार यानुसारही तुमच्या चौकशीची दिशा ठरते. इतकेच नव्हे ; तर तुमच्या गरजांनुसार आजुबाजूच्या परिसरातही सोईसुविधांची उपलब्धता किती आहे व फ्लॅटपासून किती अंतरावर आहे याचीही सखोल चौकशी तुम्हांला वेळीच करावी लागते.  


४.    सोईसुविधाः-


वर उल्लेख केल्याप्रमाणे , आपल्याला आपल्या राहणीमानानुसार काही सोईसुविधांची फार गरज पडते . यामध्ये फ्लॅटमधील बाबी जसे स्वयंपाकाचा गॅस, वीज , पाणी यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. त्याचबरोबर आपल्याला फ्लॅट भाड्याने घेण्यासंदर्भात करार तसेच पोलीस व्हेरिफिकेशन वा अन्य काही कायदेशीर बाबींची पुर्तता करणा-या एजन्सीजही लक्षात घ्याव्या लागतात . मुले शिकणारी असतील तर शैक्षणिक संस्थांची चौकशीही आलीच . अर्थात , तुम्ही त्या भागात नवीन असल्याने शक्यतो घरमालक हा संपर्क करून देतात. वीजेच्या बीलाबाबतही आधीच ठरविलेले बरे असते .

ही झाली फ्लॅट भाड्याने घेतांना ढोबळ मानाने करावयाची प्राथमिक चौकशी. पण फ्लॅट भाड्याने घेतल्यावरही आपल्याला गरजेनुसार काही चौकश्या कराव्या लागतातच. त्या आता पाहूः-


२.फ्लॅटोत्तर चौकशी (फ्लॅट भाड्याने घेतल्यानंतर करावयाची चौकशी)



फ्लॅट भाड्याने घेतल्यानंतर काही कमतरता आढळतात, काही समस्या उद्भवतात. काही उणीवा जाणवतात. त्यानुसार ह्या चौकश्या ठरतात. ह्या बाबी आपण त्या भागात साधारण सरावलो की आपल्या लक्षात येतात. मुले शिकणारी असल्यास त्यासंदर्भातल्या चौकश्या करून निर्णय घ्यावे लागतात. नवीन ठिकाणी आजारी पडण्याची शक्यता असतेच. त्यामुळे चांगले डॉक्टर्स कुठे आहेत याची चौकशी करावी लागते. बॅंकांचीही चौकशी करावी लागते. हॉटेल्स, भाजी मंडई ,  किराणा, मेडीक्ल्स व अन्य दुकाने यांच्याबाबतीतही चौकशी करावी लागते. मांसाहारी असाल तर मासळी बाजार , मटण मार्केट यांचीही चौकशी करावी लागते. एकूण बाजारपेठ फ्लॅटपासून किती अंतरावर आहे हेही पहावे लागते. कोणत्या भागात कोणत्या वस्तुंची महागाई , स्वस्ताई आहे याची चौकशी करावी लागते. विशेषतः दूरवर फिरायला जातांना खर्च व वेळ वाचवणारी वाहतुकीची साधने, त्यांची ठिकाणे व वेळापत्रक इ.बाबतही आपल्याला चौकश्या कराव्या लागतात. स्थानिक परिस्थिती व येणारे अनुभव यातून कोणत्या चौकश्या कराव्या , कुठे चौकश्या कराव्या हे हळुहळू लक्षात येतेच. म्हणूनच, दर दिवशीच्या तसेच प्रसंगानुसार येणा-या आपल्या समस्या दूर करण्यासाठी फ्लॅट भाड्याने घेतल्यानंतर करावयाच्या चौकश्याही महत्वाच्या ठरतात.

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

मराठी गझल : किनारे

किनारे



जसे हे दिलासे फसू लागले
मला दुःखं माझे हसू लागले


जिथे जायचे ना तिथे पोचलो
अता जे नको ते दिसू लागले


किती काल केली तयारी तरी
कमी आज काही असू लागले


अशी येत आहे सफाई अता
अता हात माझे बसू लागले


कुठे नांगरू मी बरे नाव ही ?
तुला का किनारे नसू लागले ?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील