शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

कोणीतरी आहे तिथे

                     चाहूल  ...

सारे मजेत चालले होते . कालपर्यंत . तसे आज थोडेसे बिनसले . आपली मनात शंका येते ना ! पुन्हा ग्रह फिरले की काय ? पुन्हा संकटांची सुरूवात ? जरा आपण काही ठीक केले की कुठेतरी बिनसते . असे तरी का व्हावे ? सतत सगळे सुरळीत का चालू नये ? नवे प्रसंग , नवी वाट , नवी लढाई की काय ? आपले मनात येते. बाकी तसे ठीक आहे. फारसे बिघडले नाही . थोडी चाहूल मात्र लागली. पाहूया काय होते ते . . .


निराळा अनुभव 


नाही . वाटले होते तसे आणि तितके काहीच वाईट झाले नाही. उलट परिस्थिती माझ्याच हातात आली ! तसा हा अनुभव मला तरी निराळाच आहे .  अनेक वर्षे झाली . सुखाची साधी चाहूलही लागली नव्हती . आता सुख बरेचसे मला ओळखू लागले आहे. प्रथम आपण स्थिर होणे आवश्यक आहे. ईश्वर तेही करीलच . त्यानेच तर एवढे केले आहे. मी प्रथमच त्याचा मनापासून आभारी आहे. शेवटी त्याच्याशिवाय आपले कोणी नाही . तो तर सर्वांचाच आहे.

तीन महिन्यानंतर :


तीन महिन्यानंतर थोडासा वाईट अनुभव आला . पण प्रसंगावर प्रसंगावधानाने मात करता येते हेही आपण अनुभवले ते त्या ईश्वरामुळेच ! ईश्वर सर्वाना सद्बुद्धी देईलच ! काही वेळा कळत नाही.  खरंच कळत नाही.  आपल्या हातात काहीच नसते,  असे वाटते. आपण फक्त पुढे जात रहायचं . आपले आयुष्य आपले असतेच कुठे  ? म्हणजे आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच ! कोण घडवतो हे सगळे ? दिसत नाही पण कोणी तरी आहे तिथे ! त्यालाच आपण ईश्वर म्हणतो का ?

२० जून , २०२३

ये रे माझ्या मागल्या 

अनेक वर्षांनंतर असे अनुभव येत आहेत की ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच मनात शंका निर्माण होत आहे. शंकाच काय , दोन तीनदा तर खात्रीच होत गेली.... पण पुन्हा आपले ये रे माझ्या मागले होत आहे ! आपण केवढे , विश्व केवढे ! आपल्याला यातले नक्की काय कळते ? हा जो अज्ञानीपणा आपण घेत आहोत ना तो चिकित्सकपणाला आणि संशोधनाला मारक ठरतो आहे . पण आपण तरी काय करणार ? काय ते नक्की होत नाहीय. असलाच परमेश्वर तर त्याने यावे की समोर ! तो असा लपून का बसला आहे ? जीवनात इतकी उलथापालथ होत असतांना तो कुठे झोपून राहिला आहे , हेच कळत नाही. चांगले वागा , वाईट वागा , जीवनात दु:खं आहेच ! शांती करा , नवस बोला, काहीही करा , भोग टळता टळत नाहीत ! अशा वेळी ज्याचा #आधार घ्यायचा तोच बेपत्ता ! त्या अज्ञाताची #KYC कशी करायची ? तो आहे तर संभ्रमात का टाकतो आहे ? की त्यालाही कधी प्रगट व्हायचं हा संभ्रम पडलाय ? त्याचाही ये रे माझ्या मागल्या झालाय ?  आपला मेंदू माणूस म्हणे दहा टक्केच वापरतो. पण मग नव्वद टक्के कुठे लपून राहिलाय ? तो कसा कळणार ? त्याला कुठे शोधायचे ? की नुसतेच म्हणत बसायचे : कोणी तरी आहे तिथे ! खरंच का आहे तो तिथे ? दिसला , भेटला कधी तुम्हांला तर सांगा मला !

#kyc


#kyc_of_god


#kycofunknown


#somebody_is_there


#कोणीतरीआहेतिथे