Corona virus लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Corona virus लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

कोविड टेस्ट

 

व्हॉट्सॲप संदेश 

संदेश पाठवणार : श्री.  उदय मयेकर , रत्नागिरी

संदेश : 



----------------

कोविड आजाराचा सध्या सगळीकडेच समुहसंसर्ग ( Community spread ) झाला आहे. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कधी कोणती तपासणी करावी ? कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे ? कोणत्या तपासणीला अधिक खर्च येतो ? कोणत्या तपासणीला किती वेळ लागतो ? HRCT व त्याचा score म्हणजे काय ? Rapid antigen test आणि RT--PCR  यांच्यात फरक काय ? या सर्व गोष्टी आपण या चवथ्या कोरोणा लेखात पाहणार आहोत.


कोरोनाच्या मुख्यत: २ प्रकारच्या तपासण्या असतात

1) Viral Test

2) Antibody Test


कोरोनाचे निदान होण्यासाठी Antibody Test चा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही.


कोरोना निदानासाठी Viral Test  चाच मुख्यतः वापर होतो. त्याशिवाय रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास HRCT चा निदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी उपयोग होतो.


Viral Test या मुख्यत्वेकरुन ३ प्रकारच्या असतात.

1. Rapid Antigen test

2. RT--PCR

3. True Nat Test


तपासण्यांचा खाजगी लॅबमध्ये येणारा खर्च

-----------------------------------------------------

1) Rapid Antigen test -- 450 रु

2) RT--PCR-- 2500 रु

3) True Nat Test -- 1200 रु

4) HRCT -- 6000 -- 8000 रु


तपासण्यांसाठी लागणारा वेळ

--------------------------------------

1) Rapid Antigen test -- अर्धा तास

2) RT--PCR-- 24 ते 48 तास

3) True Nat Test -- अर्धा तास

4) HRCT -- अर्धा ते एक तास


कोणती तपासणी कधी करावी

--------------------------------------

यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.


# Antigen Test

a.) ज्या रुग्णांना त्वरीत उपचाराची गरज आहे त्यांच्यामध्ये


# RT--PCR

a.) ज्यांची Antigen Test ही निगेटिव्ह आली आहे पण लक्षणे असणारे पेशंट.

b.) कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या contact मधील लोक.

c.) परदेशातून येणारे लोक.


# True Nat Test

a.) Brought Dead व्यक्ती

b.) बाळंतपणासाठी आलेल्या माता

c.) Emergency Operation चे रुग्ण


( जर True Nat चाचणी उपलब्ध नसेल तर Antigen Test करावी. ) 


महाराष्ट्र शासनाने HRCT ला कोविडच्या निदानासाठी परवानगी दिलेली नाही. ही तपासणी कोविड निदानासाठी शासनातर्फे ग्राह्य मानली जात नाही.


आता सर्व तपासण्यांची विस्तारीत माहिती पाहुयात.


Rapid Antigen Test

--------------------------------


१) यामध्ये विषाणूंच्या surface spike मधील antigen protein तपासले जाते.


२) यासाठी नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो.


३) या चाचणीचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासात समजू शकतो.


४) ही तपासणी RT--PCR तपासणी पेक्षा स्वस्त व लवकर होणारी आहे.


५) या तपासणी साठी प्रशिक्षित व्यक्तीची ( Well Trainer ) ची गरज लागत नाही.


६) तपासणी तील दोष

a. कोरोना सदृशच लक्षणे असणाऱ्या फ्लू सारख्या  आजारात या तपासणीची sensitivity ही केवळ ३४ ते ८० टक्के असते. 

याच तर्काने अर्धे किंवा त्याहून अधिक कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते.


b. बऱ्याच Asymptomatic ( लक्षणे नसलेल्या ) पेशंट मध्ये  नाकातून व घशातून योग्य प्रमाणात विषाणू मिळत नसल्याने ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते

कारण या तपासणीत antigen चे amplification केले जात नाही.


७) मग ही तपासणी का केली जाते ??

a.) ज्यावेळी viral load जादा असतो त्यावेळी ही तपासणी highly sensitive असते. त्यामुळे बाधित पेशंटचे विलगीकरण करणे सोपे जाते.


b.) ही तपासणी RT--PCR पेक्षा स्वस्थ व पटकन होणारी आहे.


c.) सर्व पेशंटची RT--PCR तपासणी करणे शक्य नसते अशावेळी RT--PCR चाचण्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी.


d.) समुह संसर्ग ( Community spread ) होत असताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करुन त्यानुसार पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण ( Isolation ) करणे व त्याअनुषंगाने रोगाचा प्रसार टाळण्यासाठी.


e.) Antigen test निगेटिव्ह येवूनही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत अशा रुग्णांची नंतर RT--PCR तपासणी केली जाते.


f.) Antigen मशिन हे Treu Nat मशिनच्या तुलनेत स्वस्त असते व या मशिनवर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे शक्य असते.


RT--PCR

--------------

Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction


१) यामध्ये ठराविक रसायनांद्वारे विषाणूच्या थोड्या RNA पासूनही हजार पटीने DNA तयार केले जातात जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात ( जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असतील तरीही ).


२) यामुळे कोविड निदानासाठी ही सर्वात खात्रीशीर व अचूक तपासणी आहे.


३) पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. याचा रिपोर्ट यायला २४ ते ४८ तास इतका वेळ लागू शकतो.


४) यासाठी नाकातून व घशातून swab घेतला जातो. किंवा थुंकीही तपासायला घेतली जावू शकते.


५) या तपासणीसाठी योग्य प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागते.

जी इतर दोन तपासण्या करिता इतकी गरजेची नसते.


६) कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घश्यामध्ये वाढत असतो त्यानंतर तो फुफ्फुसांत वाढायला सुरु होतो. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतूसंसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधी साठी पॉझिटिव्ह येतो. नंतर Throat swab हा False Negative येण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी जंतूसंसर्गाच्या दुसऱ्या आठवड्यात श्वासनलिकेतील स्वॅब अथवा कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे असते.


बरेच असे video बघण्यात आले की आपण RT--PCR चा रिपोर्ट ज्यावेळी मागून घेतो त्यावेळी त्यातील CT value ( Cyclic Threshold ) ही विचारुन घ्या. ती जर २४ पेक्षा जादा असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा कमी असतो म्हणजेच त्या व्यक्तीद्वारे इतरांना संक्रमण ही कमी प्रमाणात होते व जर CT value ही २४ पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा जादा असतो म्हणजेच हे लोक इतरांमध्ये जादा संक्रमण पसरवतात.


हे जरी खरे असले तरी बऱ्याचदा असे पाहायला मिळते की अनेकदा viral load जादा असूनही त्यांच्यामध्ये लक्षणे ही अल्प किंवा मध्यम स्वरुपात बघायला मिळतात. जसे की लहान मुले ज्यांच्यामध्ये क्वचितच लक्षणे तीव्र स्वरुपाची असतात पण त्यांच्याद्वारे जंतूसंसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवला जातो.


याउलट वयस्कर लोकांमध्ये viral load कमी असूनही तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसतात.


हा खरं तर विरोधाभास आहे.


व त्याचे कारण हे आहे की कोविड मध्ये होणारी complications ही केवळ शरीरात जाणाऱ्या विषाणू मुळे होत नसतात. तर ती प्रामुख्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीने ( Immune system ने ) त्या virus ला किती व कशा प्रकारे प्रतिसाद दिला व त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या Inflammatory changes मुळे होत असतात. Immune system च्या प्रतिक्रिया व त्यामुळे होणाऱ्या Inflammatory changes या प्रत्येक पेशंट नुसार वेगवेगळ्या असतात. व त्यामुळे कोणाकोणामध्ये काहीच लक्षणे दिसत नाहीत तर कोणामध्ये खूपच Complications निर्माण होवू शकतात.


CT value ही प्रामुख्याने viral load किती आहे ते सांगते. कोविड किती घातक ठरु शकतो हे नाही. त्यामुळे ICMR ने RT--PCR च्या रिपोर्ट मध्ये CT value देण्यास परवानगी दिलेली नाही.


 TrueNAT test

----------------------

१) हे मशिन गोव्यातील Malbio Diagnostic या कंपनीद्वारे बनवले आहे.


२) हे मशिन पूर्वी TB ची टेस्ट करण्यासाठी वापरले जात होते. अलिकडेच ICMR ने COVID 19 टेस्ट करण्यासाठी या मशिनला परवानगी दिली आहे.


३) हे मशिन छोट्या आकाराचे असून ब्रिफकेस मधून कोठेही घेवून जाता येवू शकते.


४) हे मशिन बॅटरीवर चालते एकदा बॅटरी चार्ज केली की १० तासांपर्यंत चालू शकते.


५) या मशिन मध्ये एका वेळी एकच टेस्ट करता येते. मशिन जर ४ स्लॉटचे असेल तर जास्तीत जास्त ४ टेस्ट एका वेळी करता येवू शकतात. ८ तासाच्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त ४५ टेस्ट होवू शकतात.


६) दुर्गम भागात जिथे मोठ्या लॅबची संख्या कमी आहे व जेथून स्वॅब घेवून RT--PCR साठी मोठ्या लॅबमध्ये पाठवणे हेदेखील मुश्किल असते अशा ठिकाणी प्रामुख्याने हे मशिन वापरले जाते.


७) या तपासणी मध्येही RT--PCR प्रमाणे विषाणूचा Genome हा Amplify केला जातो. त्यामुळे यामध्येही स्वॅबमधील विषाणूंचे प्रमाण कमी असले तरी टेस्ट रिपोर्ट अचूक येतो.


८) या तपासणीत मुख्यत: कोरोना विषाणूचा E Gene व विषाणूच्या RNA मध्ये असणारे RdRp हे Enzyme शोधले जाते.


९) ही तपासणी RT--PCR पेक्षा बऱ्याच जलद होते ( अर्धा ते एक तासात ) तसेच या तपासणीसाठी लागणारा खर्चही कमी असतो. (१२०० ते १३०० रुपये) तसेच ही  तपासणी करायला सोपी आहे व त्यासाठी खास प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागत नाही.


१०) असे असले तरी या मशिनची किंमत जादा असल्याने (६.५ ते १२ लाख ) व पुरवठा कमी असल्याने हे मशिन अजून सगळीकडे उपलब्ध नाही आहे.


Antibody Test

-----------------------

१) शरीरात एखादा Antigen ( बाहेरचा कोणताही सजीव घटक जसे bacteria, virus इत्यादी ) गेल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी जे घटक शरीरामार्फत तयार केले जातात त्यांना Antibody म्हणतात.


२) Antibody Test ही मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराची माहिती सांगते.


३) Infection झाल्यानंतर शरीरात Antibodies तयार व्हायला साधारण १ ते २ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कोविड निदानासाठी या तपासणीचा कोणताही उपयोग होत नाही.


४) सर्वच लोकांना कोविडमध्ये लक्षणे निर्माण होतील असे नाही. अशावेळी किती लोकांना हा आजार होवून गेला हे लक्षात येण्यासाठी व त्यावरुन या आजाराचा मृत्यूदर निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने या तपासणीचा उपयोग होतो.


HRCT

----------

१) ही चाचणी म्हणजे छातीचा CT scan असतो. 


२) ही चाचणी कोविड निदानासाठी शासनातर्फे जरी ग्राह्य धरली जात नाही.


३) तरीही लक्षणे सुरु होवून ४ ते ५ दिवसांनंतर रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास  रोगनिदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.


४) RT--PCR च्या तुलनेत याचा रिपोर्ट लगेच मिळत असल्याने तसेच न्युमोनियाची तीव्रता लक्षात येत असल्याने याचा कोविड उपचारासाठी चांगला उपयोग होतो.


५) RT--PCR प्रमाणे याचा रिपोर्ट ही अधिक खात्रीशीर व अचूक असतो. तसेच यावरुन पेशंटच्या शरीरात सुधारणा होवू शकते की पेशंटची स्थिती आणखी बिघडू शकते याचेही याचेही अचूक निदान करता येते.


६) लक्षणे दिसायला लागल्यानंतर पहिल्या ४ दिवसांत HRCT हा इतकी sensitive नसते त्यामुळे ५०% कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये HRCT चा रिपोर्ट नॉर्मल येण्याची शक्यता असते. पण त्यानंतर HRCT ही Highly sensitive म्हणजेच एकदम अचूक असते. 


७) HRCT च्या रिपोर्टमध्ये खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात


a.) सुरवातीला ( कोविड लक्षणे सुरु झाल्यानंतर ७ दिवसांमध्ये ) -- Ground Glass Opacity (GGO)


b.) ७ दिवसानंतर न्युमोनिया वाढल्यास ---

1. GGO वाढणे

2. Crazy paving pattern

3. Consolidation

4. Fibrosis


८) HRCT Score

------------------------

a.) न्युमोनिया हा फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात वाढला आहे हे समजण्यासाठी HRCT मध्ये Score दिला जातो.


b.) हा स्कोर 0 ते 25 या दरम्यान असतो. 0 स्कोर याचा अर्थ फुफ्फुसांत न्यूमोनिया अजिबात पसरलेला नाही असा होतो तर 25 स्कोर म्हणजे न्यूमोनिया फुफ्फुसांत सर्वत्र पसरलेला आहे असा अर्थ होतो. 


c.) 25 पैकी स्कोर असताना 


1) कमी प्रमाणातील न्यूमोनिया -- 12 पेक्षा कमी स्कोर असणे.


2) मध्यम न्यूमोनिया -- 12 ते 18 स्कोर असणे.


3) तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया -- 18 पेक्षा जास्त स्कोर असणे.


d.) फुफ्फुसे किती टक्के बाधित झाली आहेत हे कळण्यासाठी HRCT Score ला ४ ने गुणले जाते. पण ते दरवेळी बरोबर येईलच असे सांगता येत नाही.


e.) बऱ्याच रिपोर्ट मध्ये HRCT Score हा ४० पैकी दिला जातो त्यावेळी वरील दोन्ही नियम लागू पडत नाहीत.


९) पेशंटची न्यूमोनिया आणखी वाढू शकतो की कमी होवू शकतो हे कळण्यासाठी HRCT सोबतच C Reactive Protein,

 serum ferritin, lymphocytes या तपासण्या करणेही गरजेचे असते.


१०) X रे मध्ये कोविड ची सुरवातीची GGO सारखी लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे X रे चा कोविड निदानासाठी हवा तितका उपयोग होत नाही.


कोविड टाईम लाईन

-------------------------

कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात हे आता पाहू.


दिवस ० -- जंतूसंसर्ग


दिवस ५ -- लक्षणे दिसण्यास सुरुवात


दिवस १ ते २८ -- RNA व Antigen पॉझिटिव्ह


दिवस २८ -- RNA व Antigen निगेटिव्ह


दिवस ० ते ७ -- फक्त RT--PCR टेस्ट पॉझिटिव्ह


दिवस ९ -- HRCT मध्ये लक्षणे दिसतात


दिवस ७ -- IgM Antibody पॉझिटिव्ह


दिवस १४ -- IgG Antibody पॉझिटिव्ह


दिवस २१ -- IgM Antibody निगेटिव्ह


दिवस १४ ते २१ -- रोगाचा लक्षणे कमी होण्याचा टप्पा पण तरीही इतरांना जंतूसंसर्ग करु शकतो.


दिवस २१ ते २८ -- RT--PCR

कधी कधी पॉझिटिव्ह येवू शकते पण इतरांना जंतूसंसर्ग होत नाही.

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

कोरोनाबाबत कोणती काळजी घ्याल ?

 

व्हॉट्सॲप फाँरवर्डेड मेसेज

ग्रूप : बिलव्हड् फँमिली, सावंतवाडी , जि. सिंधूदुर्ग


मेसेज बाय : श्री. राजेंद्र सदानंद नाईक , सावंतवाडी


अतिशय सुंदर संदेश :


कोरोनाशी लढा



*किमान सहा महिने हे पाळाच.*


🔴


∆ *नातेवाईक कितीही जवळचा असला तरी तूर्तास माया मोह टाळा.*

∆ *जवळचेच कोरोनाला जवळ आणून सोडतील. तेंव्हा राग आला तरी चालेल पण  भेटण्यास येवू नका असे स्पष्टपणे कळवा.*

∆ *अती गरजेचे असल्याशिवाय आपण स्वत:हून कोणाकडे जाऊ नका.*

 ∆ *कोरोना कुणाच्या मदतीने घरात येईल हे सांगता येत नाही.*

∆ *कोरोनाग्रस्त रूग्णांपासून शारिरीक बाजूने दुर व्हा, मनाने मात्र जवळच रहा, त्यांना आधार द्या. आम्ही तुमच्या सोबतच आहोत याची ग्वाही द्या.*

∆ *ज्यांच्या घरात लहान मुले व ६० वर्षावरील व्यक्ती आहेत यांनी विशेष काळजी घ्यावीच.*

∆ *अती व फाजील आत्मविश्वास बाळगू नका.*

∆ *'कसला कोरोना होतोय' अशी बेजबाबदार भाषा अलीकडे दिसू लागली आहे. अशा लोकांना आवरा, त्यांना टाळा किंवा समजवा.*

∆ *हात देणे अलिंगन देणे. गळ्यात पडुन रडणे, लहान मुलांचा पापा घेणे देणे बंद करा.* 

∆ *जिथे गोतावळा तेथे रमतो कोरोना.*

∆ *जर कुणी अकारण आपल्या घरी येणे जाणे करत असेल तर प्रेमाने महत्व समजून सांगा.*

∆ *भिडस्तपणा अंगाशी येण्याचीच शक्यता जास्त आहे.*

∆ *कमी सदस्य असलेली घरे सुरक्षित आहेत.*


∆ *वरील सर्व कठीण आहे पण सर्वांसाठी ते आवश्यक आहे.*


∆ *पोलिसांनी, डाॅक्टरांनी, नर्सेसनी आपले जीवन धोक्यात घालून आपणास वाचवले आहे, वाचवत आहेत तेंव्हा आपण स्वत:हून आपली काळजी घ्या.*

∆ *प्रतिकार शक्ती वाढेल असेच अन्न सेवन करा. जीभेचे चोचले थांबवा*

∆ *जगाल तरच जगवाल** लढा


*किमान सहा महिने हे पाळाच.*


🔴


...........................................

मंगळवार, ७ जुलै, २०२०

A question about life



07.07.2020 

     दि. 24.06.2020  नंतर इथे लिहीलंच नाही. याचा अर्थ इतके दिवस मागे-पुढे काही घडलंच नाही असं नाही. तसं ते घडतच राहतं . सृष्टीच्या प्रारंभापासूनच घटनाचक्र फिरते आहे. खरे तर त्यापूर्वीपासूनच ते फिरत असावे.  सृष्टीचा जन्म हीसुध्दा त्या घटनाचक्रातली घटना आहे. अधिक माहितीसाठी  घटनाक्रमाबाबत मी लिहिलेल्या इंग्रजी लेखाच्या हया लिंकला टच करा. अशीच एक घटना होती 28 वर्षापूर्वी घडलेली. तारीख 07-07 च होती. वार वेगळा होता. पण ती घटना माझ्या वैवाहिक जीवनात पुढे घडणा-या सर्व घटनांची जन्मदात्री होती. तर 07-07 रोजी मी माझ्या तत्कालीन भावी पत्नीला बघायला गेलो होतो , जी हे लिहीत असतांना आताही माझ्या शेजारी तिच्या मोबाईलमध्ये तिचे अस्वस्थ मन रमवण्याची कसरत करते आहे. याचे कारण मार्च 2020 पासून आम्ही दोघेही आमच्या मुलाच्या काळजीने हैराण आहोत. आमचा मुलगा पुण्यात नोकरीला आहे. तो तिथे फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. होळी पौर्णिमेला आम्ही गावी आलो होतो व गुढी पाडव्यानंतर लगेच पुण्याला जाणार होतो. तितक्यात कोरोनाचा प्रकोप झाला . तोे तिकडे अडकला आणि आम्ही इकडे ! त्याच्या काळजीने आम्हांला काही सुचेनासे झाले आहे.  तर आज 07-07. त्यामुळे सकाळीच हिच्या वहिनीचा मला मेसेज आला. 
    [7/7, 10:34] Vibha 1: Chaha, nashta zala?
[7/7, 10:35] Vibha 1: Aaj kay special breakfast?
        काय सांगणार होतो ? सांगितलं जे घडतंय....
कालपासून हिची मन:स्थिती ठीक नाही. त्यातच काल रात्री सव्वा बाराच्या दरम्याने हिला भयंकर स्वप्नं पडलं. काही तरी भयंकर घडतंय हे बघून ही स्वप्नातच मुलाला हाका मारून उठवत होती . हाका मारतामारता तिची बोबडीच वळते आणि जीभ दाताखाली मिळते . ती झोपेतच उ उ करायला लागली म्हणून मी तिला उठवलं. तर ही घाबरलेली. मी पाणी दिलं ते पिऊन ती थोडी भानावर आली.  म्हणाली मला कोणाच्या तरी मानेवर दोरीचा निळा वळ दिसला स्वप्नात. त्यानंतर  आज सकाळी सात वा. मेघाचा फोन आला. आम्ही ज्यांच्या विहीरीवरून पाणी आणतो त्या समोरच्या घरातल्या मुलाने मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली ! म्हणजे तिकडे ते घडत असतांनाच बहुधा हिला हेे स्वप्नं पडत असावं. तो वकील होता. रत्नागिरीत बायको व मुलीसह रहात होता.  केवळ 34 वर्षांचा ! आम्हांला मुलासारखाच ! फार धक्का बसला. आता आमची दोघांचीही मन:स्थिती बिघडली आहे. पाऊसही सकाळपासूच धुव्वाधार कोसळतोय. अशा पावसात तिकडे जाताही येत नाहीय. आम्ही दोघंच घरात आहोत. एकमेकांना खचलो आहोत हे दाखवण्याचे टाळून धीर देत आहोत. 

              परवाच आमच्या मागच्या बाजुच्या दोन घरे सोडून तिस-या घरातली वनिता पायरीवरून तिच्या दारात पडली. तिचा डावा हात प्लँस्टरमध्ये आहे. गेल्या वर्षी ती बसला लटकत फरफटत गेली होती. नशिबाने वाचली.   तिच्या अलिकडच्या व आमच्या अगदी मागच्या घरातील संत्याचा भाऊ संज्याची तब्ब्येतही तितकीशी चांगली दिसत नाहीय. परवा कलू आते आमच्याकडे राहून गेली. संध्याकाळी आली आणि दुस-या दिवशी सकाळी चहा नाश्ता खाऊन ती आपल्या घरी गेली. संध्याकाळ झाली की एवढं मोठं घर आम्हां दोन म्हाता-या माणसांना कसं खायला येत असेल , ते कलू आतेला जाणवलं . कलू आतेने निग्रहाने लग्नं केलेलं नाहीय. ही स्टोरी कधी तरी नंतर सांगेन. तिची हकीगत आता सांगण्याच्या मन:स्थितीतही मी नाहीय. एवढं खरं की कधी कधी वाटतं की आयुष्य ही आपणच आपली घातलेली एक समजूत तर नसावी ना ? 


( क्रमश: )
...........

रविवार, २८ जून, २०२०

More on Corona virus in Ratnagiri


रत्नागिरी जिल्हयात कोरोनाचा प्रसार होत आहे.  आज दि. 28.06.2020 रोजी जिल्हा माहिती कार्यालयाने रत्नागिरीतील कोरोनाबाबत प्रसिध्द केलेली माहिती :

  06 पॉझिटिव्हसह एकूण 560
एका महिला रुग्णाचा मृत्यू
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 28–जिल्ह्यात गेल्या 24 तासात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले यामुळे एकूण पॉझिटिव्ह रु्ग्णांची संख्या 560 झाली आहे.  कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण, रत्नागिरी  येथून 04 व कोव्हीड केअर सेंटर कोकण कृषि विद्यापीठ दापोली 3  रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर घरडा 03 रुग्ण अशा 10 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या  रुग्णांची संख्या 430 झाली आहे.
    चिपळूण येथील 54 वर्षे वयाच्या महिला रुग्णाचा कोव्हीडने मृत्यू झाला.  त्यामुळे मृत्यूंची संख्या 25 झाली आहे.  मरण पावलेली सदर महिला 19 जून रोजी मुंबई येथून बेशुध्द स्थितीत दवाखान्यात दाखल करण्यात आली होती.  20 जून रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिलेस मधुमहे आणि मोठ्या प्रमाणावर किडनी इन्फेक्शन होते. दाखल झाल्यापासून सदर महिला बेशुध्दावस्थेतच होती तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार होती व ती व्हेंटिलेटरवर होती. 
                काल सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 06 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
1) साळवी स्टॉप ता.रत्नागिरी 
२) मु.पो.कोंडगे ता. लांजा
3) मु.पो. देवरुख ता. संगमेश्वर
४) गुहागर नाका ता.चिपळूण
५)  मु.पो. पन्हळे ता. लांजा
६) कामथे ता. चिपळूण
                सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 111  आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.
                सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह - 560
बरे झालेले  - 430
मृत्यू  - 25
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह - 110 + 1
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
            जिल्ह्यात सध्या 48 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये   01, संगमेश्वर तालुक्यात 1,  दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 8 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 6 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी -  34, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी -  1,  उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 3, , कोव्हीड केअर सेंटर पेढांबे-1,  उपजिल्हा रुग्णालय कळबणी - 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा लवेल-03,  कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली - 15 असे एकूण 58 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.  
 होम क्वारंटाईन 
          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 20 हजार 05 इतकी आहे.
 आत्तापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह
            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 9 हजार 142 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 8 हजार 854 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 560 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 8 हजार 262 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये अजून 288 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.  
    होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
    सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे.  ही माहिती 27 जून 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.  यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो.  पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.

..........
आता स्थानिकांना लागण होत असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी. भयभीत न होता , अफवा न पसरवता व अफवांना बळी न पडता, शासनाच्या खबरदारीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे . घरी रहावे, स्वस्थ रहावे !

बुधवार, २४ जून, २०२०

Gazalmanthan to corona


मागे - पुढे

24.06.2020 

     दि. 12.06.2020 ला इथे लिहिलं होतं . म्हटलं बारा दिवसांनी जरा मागे-पुढे पहावे. तसे हल्ली काही ना काही घडतेच आहे. शिवाय कोणी ना कोणी तरी बोलायला येतेच. त्यामुळे माझे ब्लाॅगलेखन थोडेसे थंडावलेच आहे.  गेले काही दिवस पाऊसही जोरदार पडतोय. हल्ली रात्रीचाही कहर करतोय. वयानुसार झोप कमी झाली असली तरी पावसामुळे थोडी अधिक झोप मिळते. डासही जरा कमी त्रास देतात. दि. 22.06.2020 रोजी श्री. अमेय धोपटकरने पावसाळी कवितांची लाईव्ह मैफील रत्नागिरीत मस्तच जमवली.  तिचा आनंद अनेकांनी घेतला. ही मैफिल फेसबूकवर व अमेय धोपटकर या यूटयूब  चँनेलवर उपलब्ध आहे. परवा ही मैफील तर काल या मैफिलीबद्दल शुभम कदमशी बोलतांना आपलाही एक मुशायरा व्हावा व आपला म्हणजे गझलकारांचा व्हॉट्सॲप ग्रूप करावा , अशी ईच्छा त्याने व्यक्त केली. माझ्या हे बरेच दिवस मनात होतेच. मी परवाच मैफिलीतल्या गझलप्रेमी कवयित्री सौ. अमृता नरसाळे यांच्याशी नेमके असेच बोललो होतो. मला या  योगायोगाचे मोठे आश्चर्य वाटले ! शुभमशी बोलता बोलता मी इतर गझलकारांशी संपर्क करीत होतो. उत्तम नियोजक , सूत्रसंचालक व विश्लेषक तसेच गझलप्रेमी मित्र विनय परांजपेसह गझलकार श्री. विजयानंद जोशी , सौ. वसुंधरा जाधव , शुभम कदम , या  सर्वांनी असा ग्रूप करावा असेच सांगितले. मी लगेच ग्रूप बनवला. रात्री 10.57 मिनिटांनी हा ग्रूप अस्तित्वात आला व लगेच त्यावर प्रारंभीचे विचारमंथनही सुरू झाले.  सर्वांनी ग्रूपसाठी नांवे सुचवली होती. त्यापैकी गझलमंथन हे श्री. विजयानंद जोशी यांनी सुचवलेले नांव निश्चित झाले. असं करता करता साडेअकरा वाजले तसा मी मोबाईल दूर ठेवून झोपी गेलो. हा तर सकाळी सहा वाजता जाग आलीच. मागच्या दारी जाऊन पाणी व्यवस्था व्यवस्थित केली.  काल उर्मिच्या घराचा स्लॅब झाला. बाकी सत्त्या, संत्या आणि कंपनीचे नेहमीप्रमाणे सुरूच आहे. लंबूवहिनी आता बरीच कमी झाली असली तरी दिवसातून किमान एकदा तरी आमच्या घरी पायधूळ झाडतेच !

          तिकडे पुढे म्हणजे फार पुढे राजकारण फारच पुढे जाते आहे. नेपाळसारखे राष्ट्र ज्याचे डोळयांवर अट्टाहासाची पट्टी लावलेले काही भारतीय लोक हिंदू राष्ट्र , हिंदू राष्ट्र म्हणून 
कौतुक करत होते, त्यानेच भारताविरूध्द डोळे वटारायला सुरूवात केली आहे. चीन तर सायबर हल्लेही म्हणे चढवू लागला आहे आणि आपण सीमेवर घुसखोरी झाली , झाली नाही , याचे राजकारण करण्यात मश्गुल आहोत. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करायचा का , की फक्त पाकीस्तानविरूध्दच वापरायचा , हाही प्रश्न पुढे येऊ शकतो ब्बा ! कोरोना तर आता सोबतीलाच असल्यासारखी परिस्थिती आहे.  आजकाल मागे पुढे हे असे चालले आहे ....



( क्रमश: )
...........











     








शनिवार, १३ जून, २०२०

Bheda bhed amangal


मागे - पुढे

12.06.2020

भेदाभेद अमंगळ.....

     परवा आठ तारीखलाच लिहिलं होतं इथे हे असे चालले आहे. तीन तारीखला निसर्ग वादळ झालं . तेव्हापासून पाऊस दमदार हजेरी लावतोय. हल्ली तर संध्याकाळी सहा ते दहा जोरदार बरसतोय. इतका की कोणाला फोनही करता येत नाहीय , म्हणून सकाळी भावाला फोन केला तर तो गडबडलाच !  म्हटलं , सहज केलाय फोन . खुशालीसाठी. तेव्हा कुठे तो सावरला. हल्ली पाणी नऊ वाजता येतं. पण सत्त्या उर्मिच्या घराच्या बांधकामावर लक्ष ठेवायला आठ वाजल्यापासूनच हजर असतो. तशी कामावरची येणारी माणसं वेळेवर येतात. बंदू पाण्याची वाट बघत चुळबूळत असतो . हल्ली विसू विरळ झालाय तरी विकास वेळ आणि फेरी चुकवत नाही. हे सगळं मागच्या दारी गेलं की दिसतं, तसंच ते आजही दिसलं.  आज माझ्या भाचीला -  मीनलला मेसेज  केला. आज माझ्या स्वप्नात तिचे वडील  (ज्यांना आम्ही सारे भाऊ म्हणतो ) आले होते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून मी बेचैन होतो. चहा घेतांना मी सौ. लाही सांगितलं. काल रात्री भाऊ माझ्या स्वप्नात आले होते. ते जयस्तंभाकडून राजीवडयात त्यांच्या मूळ घरी चालले होते व मी स्टेट बँकेकडून जयस्तंभाच्या दिशेने चाललो होतो. वेळ सकाळची असावी.  संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. एकही गाडी रस्त्यावर नव्हती. स्टेट बँकेसमोर आमची भेट होते. भाईंबद्दल ( त्यांचे अलिकडेच निधन पावलेले थोरले बंधू ) आमचे थोडे बोलणे झाले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. इथे स्वप्नं संपले व मी जागा झालो.   मीनलने माझा मेसेेज वाचून लगेच रिप्लाय दिला तो असा : सध्या भाऊंची तब्येत थोडी खराब होती आता बरे आहेत . म्हणजे स्वप्नं खरं होतं तर.  मीनल व तिचे वडील तर सिंधुदुर्ग जिल्हयात स्थायिक झाले आहेत.  पण स्वप्नात भाऊ मला रत्नागिरीत निर्मनुष्य रस्त्यावर भेटतात , त्या निर्मनुष्य रस्त्याचा अर्थ काय ?  जयस्तंभ परिसर का दिसला ? निर्मनुष्य रस्त्याचा कोरोनाशी काही संबंध असेल का ? काय घडत आहे ? काय घडणार आहे ? तिकडे 15 जूनपासून लॉक डाऊन पुन्हा सुरू होणार अशा अफवा सोशल मिडियावर उठू लागल्याने मुख्यमंत्र्यांना ट्वीट करून असे काही होणार नाही असे सांगावे लागले. मंत्रीमंडळातल्या तीन मंत्र्यांना कोरोना झाल्याची बातमी आहे. कोरोना भेद करीत नाही. भेदाभेद अमंगळ हे सांगतांना संतांना भविष्यातील कोरोनाची माहिती होती म्हणून तर त्यांनी तो इशारा दिला नव्हता ना ? हे संत नक्की कोण होते आणि त्यांना होणारी अनुभूती नक्की काय होती , याचा वस्तूनिष्ठ अभ्यास झाला पाहिजे. नुसतं ते संस्कृती , संस्कृती म्हणून भावनिक बोंबलण्यात अर्थ नाही . तिकडे नेपाळही आपल्यावर गुरगुरू लागला आहे. बिहार सीमेवर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केलाय. इकडे रत्नागिरीत नवीन परिक्षण लॅब सुरूसुध्दा झालीय. आता अहवालही लवकर येतील. कालपर्यंत तरी चारशेचा आकडा पार झालेला नाहीय. वेग थोडा मंदावलाय . तेवढाच दिलासा. बातम्या येतच राहतील. नाहीच आल्या कुठून तरी लंबू वहिनी तरी कुठून तरी घेऊन येईल , असा विचार मनात येतो न तोच साक्षात लंबूवहिनी बातमी घेऊन आलीच ! गेले वर्षभर माहेरी जाऊन बसलेली  नरेशची थोरली सून आणि तिचे माहेरचे नातेवाईक बँकेत दागिने सोडवायला आले होते ! ती केवळ आम्हांला सांगून थांबली नाही तर नरेशच्या घरी जाऊनही तिने ही बातमी सांगितली. तिकडे बापलेकात फोनाफोनी झाली ! इकडे लंबू वहिनी खूष ! आजकाल मागे पुढे हे असे चालले आहे ....



( क्रमश: )
...........











   








मंगळवार, ९ जून, २०२०

He ase chalale aahe



  • मागे - पुढे

    हे   असे  चालले   आहे

08.06.2020 

     बरेच दिवस मागे-पुढे काही घडत असतांनाही इथे काही लिहिलेच नाही. ( वाटलेच नाही. पाच लॉक डाऊन पचवलेयत. त्यांनी नेमकं काय साधलं ते सांगणे कठीणच आहे.   लॉक डाऊनमध्येच लोक धावत सुटतात. सूट दिली तर घरात बसतात ! आता तर  लॉक डाऊनमध्येच अनलॉक सुरू झाले आहे. काहीही करा, लोक त्यांना करायचे ते करतातच ! मुंबईकर तर याबाबतीत आघाडीवर आहेत. आता कोरोनासोबतच जगायची तयारी केली जाऊ लागली आहे. जयपूरमध्ये एका कंपनीने स्पर्शविरहीत आँफीस तयार केले आहे. इकडे मुंबईकरांनी बेस्टमध्ये चढण्यासाठी अभूतपूर्व उत्साह दाखवला तो त्यांच्या अंगभूत सवयीमुळेच ! जाऊ दे, शेवटी त्यांनाच जीवनाशी लढायचे आहे . इकडे रत्नागिरीतही लोक लढत आहेतच ! आता चारशेच्या दिशेने प्रवास सुरू आहे. उद्या नवीन तपासणी लँबचे उदघाटन आहे. रिपोर्टस् इथेच मिळू लागले की हा आकडा वाढलेला दिसण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत बरेच पूल आहेत आणि त्या प्रत्येक पुलाखालून शहकाटशहाचे बरेच राजकीय पाणी याबाबत  वाहून गेले आहे. पाण्यावरून आठवले.

निसर्ग चक्रीवादळाची छायाचित्रे व व्हिडीओज :











02 जूनच्या उत्तररात्री म्हणजे 03 जून 2020 च्या पहाटे 03 वाजता ' निसर्ग ' चक्रीवादळ आमच्या भागात घुसले. जवळपास 100 च्या वेगाने वाहणारा वारा आणि धो धो पडणारा पाऊस ! त्यातच 04.30 ला वीज गेली ! घरावरचे पत्रे आता उडतायत की मग या अवस्थेत सकाळ झाली. सकाळीही वादळपाऊस जोरातच होते. उत्तर दिशेची बाग तर पिळवटून निघत होती. हे अकरा साडेअकरापर्यंत सुरू होते. अधूनमधून वारा व पावसाचा वेग कमी होत होता. पण मध्येच वाढतही होता , तेव्हा धडकी भरवत होता. झाडे चक्राकार गतीने फिरत होेती. नशीब एकही मोठी फांदी मोडली नाही. शंभर वर्षाच्या झाडांनी वादळाचा यशस्वी सामना केला हे विशेष ! यातल्या काही झाडांच्या फांद्या आमच्या घरावर पडू शकत होत्या.... दुपारपासून यात खूपच फरक पडत गेला आणि जरा हायसे वाटले . त्या रात्री आम्ही भावाला फोन करून त्याच्या घरात झोपतोय म्हणून सांगितले. त्याचे घर स्लँबचे आहे. तो म्हणाला खुशाल झोपा. पुढचेही काही दिवस तिकडेच झोपा. वादळ पुन्हा येऊ शकते. मी म्हटले नको रे बाबा आता वादळबिदळ ! मुंबईकडून वादळ त्वरेने पुण्याच्या दिशेने सरकल्याने भाऊ मुंबईत निर्धास्त झोपू शकत होता. आम्ही तिकडे झोपलो पण झोप लागलीच नाही. ती रात्रही आम्ही जागूनच काढली. दुस-या दिवशी स. 11.30 वाजता वीज आली. तेव्हा प्रथम मोबाईल्स चार्जिंगला लावले !

                आज सकाळी मागच्या बाजूला गेलो तर उर्मिच्या घराचा प्लँन बदललेला दिसला. भटजींनी साग्रसंगीत पूजा करून दिल्यानंतर विधीवत बसवलेला दरवाजा त्यांनी काढला आहे. त्याच्यापुढे आता हाँलची आखणी करून नवीन दरवाजा बसवण्यात येणार आहे. घर हे असं असतं. ते मनासारखं होईपर्यंत आपण पार मेटाकुटीस येतो ! माझ्याही घराचा पार खेळखंडोबा झाला आहे. पत्रे किती काळ टिकतील हा प्रश्नच आहे पण घर अवाढव्य आहे आणि त्यात माणसे फक्त दोनच आहोत ! आज काँट्रँक्टर मुल्लाला बोलवलं होतं. तो आलाही. चर्चा झालीही. पण माळा करायचा की डायरेक्ट स्लँब टाकायचा हा प्रश्न काही सुटला नाहीच ! काही तरी लवकरच करायला हवे आहे , हे मात्र निश्चित ! मी मुल्लाला या किंवा फार तर पुढच्या वर्षी काही तरी एक करू असं सांगितलंय. 

                  लॉक डाऊनच्या काळात मला भयानक स्वप्नें पडली . तोच क्रम आता अनलॉकच्या काळातही सुरू आहे. स्वप्नांत जी माणसे दिसतात ती काही चांगली आणि काही चांगल्याचीही दिसत नाहीत ! सर्वसाधारणपणे त्यांना डाव म्हणतात ! मी अशा अनेक डावांना आजपर्यंत खाऊन बसलो आहे !  एक तर सलग दोन तीन तासही झोप मिळत नाही. झोप उर्फ चुटका लागतो तोच स्वप्नं चटका देते. त्यात सौ.ला दर दिवशी नाही तर दर रात्री काही ना काही तरी होतच असते. दोघांनाही दिवसा वा रात्री स्वास्थ नाही.  हे असे चालले आहे .



( क्रमश: )
...........









     








शुक्रवार, २९ मे, २०२०

Sleepless night


मागे - पुढे

28.05.2020

       पुन्हा काही सांगायचे तर पुन्हा एकदा चार सहा दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि दि . 18.05.2020 पासूनचा 4 थाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे. तो पुढे वाढेल न वाढेल.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात अनेक चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. कालपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 195 झाली होती ती आज सकाळीच 196 झाली आहे. 05 वा मृत्यूही झाल्याची बातमी  आहे. माझे मित्र श्री. राजन किल्लेकर आणि श्री. अलिमियाँ काझी हे विविध बातम्या मला मेसेंजरवर व व्हॉट्सॲपवर नियमितपणे पाठवीत असतात. त्यांच्यामुळे गावात राहूनही शहरातल्याच नव्हे तर जिल्ह्यातल्याही ब्रेकींग न्यूज मला घरबसल्या मिळतात. मी त्यांच्या हया सहकार्याबद्दल त्यांचा ऋणी आहे.  ब्रेकींग न्यूजपेक्षाही झंझावाती असतात त्या लंबूवहिनीच्या भयंकर बातम्या ! खरंच, मेरा महान भारत सुशिक्षित झाला आहे का ? असा प्रश्न पडावा , असे लंबूवहिनीचा दुषित दृष्टीकोण पाहून वाटते. पासष्टीतली ही बाई योग्य अयोग्य ओळखू शकत नाही. ती पुस्तकी शिक्षण नसेल शिकली पण आयुष्याचे , माणूसकीचे  उघडे पुस्तक वाचू शकली नाही. अर्थात , काही उच्चशिक्षितांनाही हे जमलेले नाही , हेही कितकेच खरे आहे ! कोरोनाकडे अजूनही ते पक्षीय दृष्टीकोनातूनच बघत आहेत , हे या महान देशाचे दुर्दैव आहे ! 

           ..... तर इकडे म्हणजे मागच्या पुढच्या दारी सांगायच्या  आधी कालच्या रात्रीबद्दल थोडेसे. काल रात्री आम्हां दोघांनाही भयंकर स्वप्नांच्या मालिकांना सामोरे जावे लागले. तिला देवाघरी गेलेल्या तिच्या आईवरून स्वप्नें पडत होती तर मला वेगवेगळीच स्वप्ने पडत होती ! ती घाबरून उठली की मी तिला धीर दयायचो आणि जरा कुठे डोळा लागतोय नाही तोच मी स्वप्नं पडून जागा व्हायचो ! पुन्हा मला पडलेले स्वप्नं तिला सांगायचीही सोय नव्हती ! ती डबल घाबरली असती ! या काही स्वप्नातले एक विचित्र स्वप्नं तुमच्यासाठी नमूद करतो. माझ्या बायकोला प्लीज सांगू नका ! तीन ते सव्वातीनच्या दरम्याने पडलेले हे स्वप्न पहा. त्यात मी रत्नागिरीच्या जयस्तंभाजवळ रस्त्यात उभा असतो. मी पुण्याला मुलाकडे जाण्यासाठी रात्री नऊ वाजता तिथे वाहन बघत असतो. तिथे बसथांब्याच्या अलिकडे एक सतरा सीटर प्रवासी बस लागलेली होती. मी तिच्या मागील बाजुने आत जाऊन शेवटच्या सीटवर बसतो. तेवढयात आबा त्या गाडीत येऊन माझ्या पुढच्या सीटवर बसतो. मी त्याला कुठे जातोयस विचारल्यावर तो म्हणाला , इथे जवळच, गयाळवाडीला . मी गाडीत पाहतो तर गाडी पूर्ण भरलेली असते. पुढच्याच क्षणी ती सुटते आणि दोन मिनिटातच सिव्हील हाँस्पीटलजवळ थांबते. एक धिप्पाड तरूणी उठते आणि तीन चार पुष्पगुच्छ घेऊन खिडकीजवळ उभी राहते . मागून काही जण येतात त्यांना ती ते देते आणि परत जाग्यावर येऊन बसते. ती चक्क नवरी असते. माझा लक्ष तिच्या टोपी घातलेल्या नव-याकडे जाते. आता कुठे माझ्या लक्षात येते की ही गाडी लग्नाची आहे. ही त्यांच्या लहरीप्रमाणे जाणार आणि आपण पुण्याला कधी पोहचणार देव जाणे , इथेच उतरून घरी जावे आणि उद्या परत प्रयत्न करावा असे मला प्रकर्षाने वाटते. मी उतरायला बघतो इतक्यात मला जाग येते ! यानंतरही पावणेपाचच्या दरम्याने आणखी एक विचित्र स्वप्नं पडले पण ते आता आठवत नाही.

                 संध्याकाळी पाचच्या दरम्याने डोंबिवलीतून विलासचा फोन आला. गावात आलो तर चालेल काय ? मी म्हटले ये आणि चौदा दिवस होम क्वारंटाईन रहा. घर तर तुझेच आहे. प्रवासाची परवानगी आणि प्रवासात चेक नाक्यावर गाडया तुंबतात तेव्हा बाधीत होण्याचा धोका यांचाही विचार कर असे मी त्याला सांगितले. फोन ठेवला आणि शिल्लक पाणी बघायला गेलो. ते कमी असल्याने दोनच झाडे शिंपली आणि गप्प बसलो. आज पाणी आलेले नाही, पण उद्या येणार म्हटल्यावर टाकी थोडी रिकामी करून ठेवली. रात्री उशिरा आणखी 12 रूग्ण वाढून जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्या 208 झाल्याचा संदेश आलाच. विचारांनी आम्हांला झोपच येईना. आता आम्ही साठीत आलोत. सहनशीलता आणि ताकतही कमी झाली आहे. इकडे आणि सासरवाडीतही दोन्ही कुटुंबात वडीलधारे असे आम्हीच आहोत ! सासूबाई गेल्यानंतर तर आम्हांला सख्खे वडीलधारे असे आता कोणीच उरले नाही. मनावर ताण येतो. आताही तेच झाले. रात्री सव्वा बारा वाजता मुलाला फोन लावला तर त्याची कंपनीबरोबरची मिटींग नुकतीच संपली होती. याच्यानंतर तो आंघोळ करणार , मग जेवणार आणि नंतर झोपणार ! उन्हाळयामुळे तो दोनदा आंघोळ करतो. त्याच्याशी आम्ही बोललो . तरी झोप येईना. शेवटी दोघांनीही ब-याच रात्रीनंतर आपापले मोबाईल उचलले आणि दोन वाजेपर्यंत त्यातच होतो.  माझे एक उत्तर क्वोरावर नऊ हजार सहाशे वेळा पाहिले गेल्याचे  वाचले. रात्री दोन वाजता मी क्वोरावर एका प्रश्नाला उत्तर दिले आणि पाठ लादीला टेकली.  रात्री तीन नंतर बहुधा डोळा लागला असावा. 
           
( क्रमश: )
...........











   








शनिवार, २३ मे, २०२०

Living with corona



मागे - पुढे

22.05.2020

        पुन्हा एकदा चार दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि आज दि  18.05.2020 पासूनचा चौथाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात आजपासून म्हणजेच 18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात सुमारे पंधरा हजार चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. कालपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 126 झाली होती ती आज 135 झाली आहे. 04 था मृत्यूही झाल्याची बातमी काल रात्री उशिरा कळली आहे. माझे मित्र श्री. राजन किल्लेकर हे विविध वर्तमानपत्रातील बातम्या मला मेसेंजरवर नियमितपणे पाठवीत असतात. चाकरमान्यांची आवक वाढतीच राहणार आहे. आता इकडेही कोरोनासवे जगावे लागणार हे उघड झाले आहे.

           ..... तर इकडे म्हणजे मागच्या पुढच्या दारी सांगायचे तर गेले दोन तीन दिवस सकाळी सहा वाजता उठलो की मी पुढच्या दारात तासभर फिरत राहतो. गरम्यामुळे लादीवर झोपतो. दोन पंख्यांची हवा लागत असते. नाही म्हटले तरी कोणी म्हटले नाही तरी आपला आपल्याला वात होतोच !😀😀😀😀😀 सकाळचे कोवळे ऊन्ह हळूहळू येऊ लागले की कसे बरे वाटते. माझ्या घराच्या पुढील दारातून आणि खिडक्यांमधूनही मस्त कोवळे ऊन्ह येत असते.  मी अगदी घरात बसून हे ऊन्ह अंगावर घेऊ शकतो आणि घेतोही !


 हो एक सांगायचे राहिलेच. मला काही विचित्र स्वप्नं पूर्वीपासूनच पडतात. सगळयांचेच अर्थ लगेच लागतातच असे नाही . काहींचे तर कधीच लागलेले नाहीत ! पण ही सर्वच स्वप्ने विचित्रच असतात व काही काळ मला तणावाखाली ठेवतात , हे मात्र खरं ! गेले सलग तीन दिवस अशी भयानक स्वप्ने पडत आहेत. परवा स्वप्नात , बाथरूममध्ये मी आंघोळ करत असतांना माझी नजर बाथरूमच्या खिडकीकडे जाते तर खिडकीच्या काचांऐवजी भिंतच दिसते आणि त्या भिंतींच्या पाच भोकांमधून पाच लहान बालकांची डोकी मानेपर्यंत आत आलेली. सुरूवातीला ती भूतेच वाटली पण नंतर माणसे असल्याचं लक्षात आलं. त्यांच्या डोळ्यांतले सेक्स अाॅर्गन्सबद्दलचे आव्हान मला स्पष्ट जाणवते. मी म्हणतो , थांबा , तुम्हांला बघायचेच आहे ना, मी दाखवतोच  ! असे म्हणून मी माझी अंडरपँट खाली सरकवू लागतो आणि तेवढयात मी स्वप्नामधून जागा झालो ! तेव्हा पहाटेचे पावणेतीन वाजले होते.  परवा पाच मुंडकी दिसली तर काल तीन जण  ( जे स्मशान कार्यात नेहमी पुढे असतात ! ) दिसले . आठवडा बाजारात मी येतो तर गांधी काँलनीला रस्त्यावर एका ट्रँवल्स बसच्या समोर पपू, दीपक आणि बंदू तिघेही एकत्र उभे ! खरे तर मला पुन्हा एकदा पाच गोष्टी दिसल्या. ते तिघे, ती बस आणि मी ! आज मात्र एकटी स्नेहा आमच्या अंगणात येऊन बोलतांना स्वप्नात दिसली ! अर्थात, अर्थ लागलेला नाही. पण विचारांना चालना मात्र मिळते आहे. ऊन्हं घेता घेता मी हाच विचार करतो आहे. सात वाजले की मी तुळशीची पाने खुडून काढा शिजत टाकतो. अर्ध्या तासाने तो चांगला उकळला की सौ. ला उठवतो. तिच्यावर गोळीचा अंमल असतोच. पण त्यातूनही ती एकदा उठली की सडसडीतपणे व पटापटा सगळे आवरते. हे तिचे वैशिष्ट्यच आहे ! चहा पिऊन झाली तोच बंदूची हाक आली. आज साडेआठ वाजता नळाला पाणी आले होते. आज कुठे जायचे नव्हतेच.  लॉक डाऊन सुरू झाल्यापासून काल पहिल्यांदाच मितेशच्या बाईकवरून शहरात जाऊन दोन तास फिरून आलो. शहर रिते ओस पडल्यासारखे वाटले ! तुरळक रहदारी दिसली तीच काय ती शहराच्या जिवंतपणाची खूण !


( क्रमश: )
...........











   








बुधवार, २० मे, २०२०

Amphan coming


मागे - पुढे

18.05.2020

        चार पाच दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि आज दि  18.05.2020 पासूनचा चौथाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात आजपासून म्हणजेच 18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात सुमारे पंधरा हजार चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. इथेही राजकारण आहेच. राजकीय पक्ष हीच गेल्या काही वर्षात अनेकांची जात झालेली आहे. हया पक्षाची माणसे त्या पक्षाविरूध्द ओरडणार आणि त्या पक्षाची माणसे हया पक्षाविरूध्द ओरडणार, सगळेच काही ना काही राजकारण करणार , हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. आयटी सेलचे महात्म्य बघून सगळयांचेच आयटी सेल आता जागे होऊ लागले आहेत . काही शिकूनही अडाणी आणि काही अडाणी असून उपद्व्यापी ! तर सांगायचं म्हणजे सकाळपासून नेहमीचे कार्यक्रम यथासांग पार पडले. सकाळी बीनाने पुन्हा डाॅक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला. तिला काही गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्याश्या वाटतात. काय करायचे ? मिलेश तिला डाॅक्टरकडे घेऊन गेला. आम्ही दुपारी जेवत असतांना बीना डाॅक्टर काय म्हणाले ते सांगायलाही आली. ती लगेच गेलीही. नंतर आली नाही. तर चहा घेऊन बीनाच्या आईबरोबर ही आनंदनगरला कुणाचे तरी घर बघायला गेली. मी अंगणात फिरत होतो. फिरता फिरता एक पोलीस व्हँन खालच्या बाजुच्या शाळेजवळ येऊन थांबली. बघता बघता तिच्या भोवती माणसे गोळा होऊ लागली. नंतर कळले की घरेलू कामगारतर्फे घरेलू महिला कामगारना मदत म्हणून अन्नधान्य देत होते. काहींना याची आगावू कल्पना दिली गेल्याने काहींनी आधीच नंबर लावले आणि त्या गेल्याही धान्य घेऊन घरी. लंबूवहिनीला कशी कोणजाणे पण ही खबर उशिरा मिळाली. ती धावत गेली , तिथे जाऊन तिचे नावच त्या यादीत नसल्याचे सांगण्यात आले. तिने बोंबलायला सुरूवात केली पण कोणीच तिच्या बाजुने बोलायला तयार नव्हते.  ती एकचीच बोंबलतेय हे तिच्या लक्षात आले असावे. ती एकदम नरमलेली दिसली . ती तशीच आमच्याकडे येवून मला म्हणाली हया राजकारण्यांबरोबर काय लागणार ! आता बोला ! काही लबाड राजकीय नेतेच सोयीनुसार यू टर्न घेतात असे नाही, तर लंबूवहिनीसारखी दारिद्र्य रेषेखालची सामान्य माणसेही यू टर्न घेऊ शकतात ! साठा संपल्याने गाडी निघून गेली. काही महिला कुरकुरत थोडा वेळ तिथेच घोटाळल्या आणि उद्या गाडी येईल या आशेवर घरी परतल्या. मी हे सारं अंगणातून बघत होतो. अजून आपल्या देशात समतोल वाटप व्यवस्थेचे नीट नियोजन होत नाही, अंमलबजावणी तर फारच दूरची गोष्ट आहे ! आणि इकडे आपण बुलेट ट्रेनच्या वेगाने जागतिक महासत्ता बनण्याच्या वल्गनेचे ढोल बडवत असतो ! जागतिक सोडा , ही आगतिक महासत्ता झाली आहे.


       मी हा आगतिकपणा सोडून मागे गेलो. म्हणजे घराच्या मागच्या बाजुला गेलो. आज पाण्याचा शिल्लक साठा कमी आहे. त्यामुळे आज आमची दोनच झाडे शिंपून घेतली.  तेवढयानेही मन प्रसन्न झाले. निसर्ग आजही आपल्याला प्रामाणिकपणाने देत असतो. पण आपण आजही लांडीलबाडीने राजकारण करून आपलीच वाट लाऊन घेत आहोत. मग कोरोना येईल नाही तर काय ? मग अम्फान सुपर चक्रीवादळ येईल नाही तर काय ?


( क्रमश: )
...........











   








गुरुवार, १४ मे, २०२०

Chakarmani


मागे - पुढे

13.05.2020

        गेले काही दिवस काही लिहिलंच नाही. काळाचा अंदाज घेतो आहे. आताही अंदाज घेतघेतच लिहितो आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे.   दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  ( आणि आता आगामी चौथाही मनात ) धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे.  कालच मापंप्रनी नेहमीप्रमाणे रात्री 08 वाजता भाषण केले आहे. आत्मनिर्भरतेचा महान मंत्र त्यांनी दिला आहे. अर्थात , तुमचे तुम्ही बघा. निवडणूक आली की मी तुमच्याकडे बघतो. केवळ पंप्रच नाही तर कोणत्याच पक्षाचे लोक दिसायला पाहिजे तितके कुठे दिसत नाहीत. निवडणूक आली की प्रचार करायला बाहेर पडा, मतदान करायला बाहेर पडा , शंभर टक्के मतदान करा, असा प्रेमळ दम भरणारे ते लोकशाहीचे कार्यकर्ते आता जीवनमरणाच्या वेळी घरात बसा म्हणून सांगायलाही कुठे फिरकत नाहीत, असं आता लोकच म्हणू लागलेयत  ! म्हणजे, लोक फक्त निवडणुकीपुरतेच महत्वाचे असतात का ? असा प्रश्न खुद्द लोकांनाच पडू लागला आहे ! लॉक डाऊन वाढणार हे तर आता अपरिहार्यच झाले आहे. याबाबत 18 तारीखला तपशील जाहीर होणार आहे ! पुन्हा एकदा दोन्ही गटातल्या गैरशिस्त लोकांना आयत्या वेळचा गोंधळ घालायची संधी तर कोणी देत नाहीय ना ? काही गोष्टी वाटतात तितक्या सहज घडत नसतात.  देशात केवळ गोंधळ सुरू आहे. माणसे हैराण झाली आहेत . माणसांच्या या हवालदिल होण्याने देशात कोण कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत राहणार नाही व देश अराजकतेकडे वाटचाल करू लागेल ! अनेक ठिकाणी प्रशासन हताश होत आहे. काही ठिकाणी तर प्रशासनावर कुठून दबाव तर येत नाही ना, अशी शंका येण्याइतपत प्रशासन हतबलता व्यक्त करू लागले आहे. एकीकडे कोरोनाची होणारी लागण आणि न ऐकणारे लोक या कात्रीत प्रशासन सापडले आहे. न ऐकणा-या लोकांमागे काही बोलावते धनी ( मास्टरमाईंडस् ) असावेत की काय अशी शंका येण्याइतपत परिस्थितीचे केले जाणारे राजकारण बोट दाखवते आहे ! हजारो लोक उपाशी पोटी शहरे सोडून गावांकडे पायी चालत निघाले आहेत आणि आपण अजूनही त्यांच्याबद्दल चकार शब्द न काढता, आपलीच पाठ थोपटून स्वदेशीचे नारे भलत्याच वेळी देत आहोत की काय ? असे वाटत आहे. एकूण कशाचे काही तारतम्य उरलेले दिसत नाही. अवतारही ढेपाळत आहेत ! सतत परदेश वा-या करणा-यांकडून स्वदेशी हा शब्द ऐकतांना जरा कसेसेच वाटते, नाही का ? थोडक्यात , विमाने आणि रस्ते यातले अंतर उघड होत चालले आहे. हया लॉक डाऊनला नेमका काय अर्थ आहे ? माणसे इकडून तिकडे येत जात आहेतच , आणली आणि पोचवलीही जात आहेत. त्याच्याही बातम्याच केल्या जात आहेत ! काही जण योगींचे गुणगान गाता गाता योगींनी आपल्याच माणसांना घ्यायला नकार दिला या व्हिडीयोने विव्हळ झाले आहेत ! या पार्श्वभूमीवर काही लोक महाराष्ट्राला अधिक पसंती देत आहेत. कोरोनाने आधीच्याच दोन गटातली दरी वाढवली आहे. हे लोक देशभक्तीचे केवढे नारे देतात ! सोयीनुसार आम्ही सारे भारतीय (!) म्हणतात ! विसंगती तुला सलाम !

                 इकडे आमच्या मागील दारी सकाळी पाणी वेळेवर आले, ही कडक उन्हाळ्याच्या दिवसातली समाधानाची बाब ! बाकी तसे सगळे चालूच असते. घटना आणि लोकसुध्दा ! नाना येऊन मुलाची चौकशी करून गेला. गंमत म्हणजे त्याने तासाभरात मोदींबद्दल चकार शब्दही काढला नाही ! योगींचा उल्लेखही केवळ एकदाच केला ! मला हे खरोखरच आश्चर्यकारक वाटले. पण मी त्याला काहीच विचारले नाही. हे नेतेवगैरे खूप दूरचे आहेत. नेत्यांपेक्षा आमची नाती अधिक जवळची व पिढीजात आहेत. हे नेते येतील आणि जातील. त्यांच्यामुळे आपल्यात दुरावा निर्माण होण्याएवढे आपणच त्यांना मोठे करणे चूक आहे ! राजकारण हे राजकारणापुरतेच ! त्याची योग्यता तेवढीच आणि आपणही ती तेवढीच ठेवली पाहिजे. हे आता कोरोनाने पुन्हा एकदा शिकवले आहे. उद्या पाणी येणार नाही, असे संज्याने सांगितले. खरे तर पाणी न येण्याचे वार सोमवार आणि शुक्रवार आहेत. पण दुरूस्तीसाठी बदल करण्यात आला आहे. त्याला आपण सहकार्य केले पाहिजे. उद्या पाणी नाही म्हणजे आज झाडांना पाणी देता येणार नाही. संध्याकाळचे सहा वाजून गेले आहेत. मी अंगणात फिरतो आहे. वरच्या बाजुला कठडयाजवळ एक पांढरी लुकडी गाय येऊन उभी राहिली आहे. अशा गायी दररोज इथे येऊन उभ्या राहतात. मग आम्ही त्यांना चपाती, भात , भाकरी खायला देतो. यापैकी काहीच शिल्लक नसेल तर बिस्कीटेही खायला देतो. काही गायी हलता हलत नाहीत. काही मात्र जे मिळेल ते खातात आणखी निघून जातात. काही गायी तर थोडी वाट बघून आज काही मिळणार नाही हे समजतात व निघूनही जातात . हया गायीची परिक्षा घ्यायची म्हणून मी काहीच हालचाल केली नाही. गंमत म्हणजे ही गाय हुशार असावी. हा काही देणार नाही असे ओळखून ती लगेच निघालीही. मला कसेसेच झाले. कोरोनाचे दिवस आहेत. तिला काही मिळालेही नसेल. ती उपाशी असेल. मी विचार करीपर्यंत ती दहापंधरा फुटांवर गेली पण ! मी तिला हाका मारताच मात्र  ती माझ्याकडे यायला लागली. मी धावतच घरातून बिस्कीटे आणली . तोपर्यंत ती कठडयावर मान पुढे करून उभी राहिलीही. मी तिला बिस्कीटे दिली . ती तिने पटकन खाल्ली. मी तिला आता जा म्हटले तशी थोडया वेळाने ती गेलीही. आता वयाच्या साठीत पूर्वीसारखे धाऊन जमत नाही. पायरी चुकली तर अंगणात कपाळमोक्ष तर ठरलेलाच ! आता अंगण कोरी लादी असते ; प्रेमळ सारवलेली जमीन नसते !  म्हणून जपूनच धावलो होतो . दिवाबत्ती, प्रार्थनेची वेळ आहे. ते झाल्यावर बातम्या लावल्या तर आमच्या जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 74 झालेली . टीव्ही बंद केला. येणा-या चाकरमान्यांचा प्रश्न सारी रात्रभर आवासून बघत होता !


( क्रमश: )
...........











   








शनिवार, ९ मे, २०२०

Lord Krishna enters


मागे - पुढे

08.05.2020

         पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे.   दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे. तर काल रात्री झोप नीट लागलीच नाही. साडेअकरा वाजता सौ.ला तहान लागली म्हणून उठलो. तिला पाणी आणून दिले आणि मोबाईल घेऊन कोरावर गेलो. कोरावर एक अधिसूचना आहे. माझी माहिती कोरावर दहा हजार लोकांनी पाहिली आणि माझे एक उत्तर एक हजार लोकांच्या ज्ञानभांडारात कोराने सामाविष्ट केल्याचीही दुसरी अधिसूचना होती. हे काही तरी ब-यापैकी होत आहे. लेखनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. कोरावर एका सुप्रसिध्द ब्लाॅगरचे एक उत्तर वाचता वाचता मला माझ्या ब्लाॅगसाठी एक वेगळीच कल्पना बारा वाजून दोन मिनिटांनी सुचली. ती आता इथे सांगत नाही. कारण त्यावर अजून खूप विचार व्हायचा आहे. शिवाय ती कल्पना dehdays या माझ्या इंग्रजी ब्लाॅगसाठी अधिक उपयुक्त आहे. पहिला लेख तयार झाला की तुम्हांला या ब्लाॅगवरही कळवतोच. ती लेखांची मालिका असेल , त्याचे एक स्वतंत्र पानही dehdays या माझ्या इंग्रजी ब्लाॅगवर असेल व ही लेखमालिका आपल्यापैकी अनेकांना स्वत:च्या आयुष्याशी पडताळून बघण्याच्या मोहात पाडणारी असेल, एवढे नक्की. अर्थात , लवकरच ही मालिका आणि पान इथेही (मराठीत) सुरू करीन . तुम्हांला कळवीनच.  दरम्याने कोरोनाचा हैदोस सुरू आहेच. मुलाकडे पुण्याला जायचे अजून तरी शक्य होत नाहीय. 17 मे ला लॉक डाऊन उठेल न उठेल. काय करायचे हेच कळेनासे झाले आहे. सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजता जाग आली पण आज नळाला पाणी येणार नसल्याने व रात्री झोप नीट न लागल्याने झोपलो तो पावणेआठ वाजता उठलो. सूर्य त्याची किरणे खिडकीतून पाठवून मला कधीपासून जागा करण्याचा प्रयत्न करीत होता कोण जाणे ! हल्ली कोरोना लॉक डाऊनपासून व उकाडयामुळे बरेचदा झोप नीट लागतच नाही. त्यामुळे दिवसाचे शेडयूल बरेचदा बदलत चालले आहे. काही गोष्टी वेळेवर करणे तब्बेतीसाठी अत्यावश्यक असते, पण तेच होत नाहीय. असे किती दिवस चालणार आहे कोण जाणे ! नाश्ता झाल्यानंतर सौ. बीनाकडे जाऊन आली. तिचे चित्त ठीक नाही. गोळयांच्या अर्धवट ग्लानीत ती काही तरी बडबडत होती. ती हयातून कधी बाहेर येणार तेच कळत नाही. वाईट वाटते. तिकडे मागच्या दारी उर्मिच्या घराचे लॉक डाऊनमुळे बंद पडलेले बांधकाम गेल्या चार दिवसापासून सुरू झाले आहे. सत्त्या त्यावर लक्ष ठेवून आहे. त्यातच आमचा जिल्हा रेड झोनमध्ये जातोय. आज एकूण रूग्णसंख्या 18 झाली आहे.

          दुपारी वामकुक्षीच्यावेळी डोळयांवर एक हॉस्पिटल दिसले. रूम खूप मोठी आहे. मी मध्यावर उभा आहे.  हॉस्पिटलमध्ये पेशंटस् , स्टाफ आहेत. स्टाफची कामे सुरू आहेत. माझ्या समोरच्या भिंतीला टेकून उजवीकडील काॅटवर झोपलेला एक उभटगोल चेह-याचा चाळीसपंचेचाळीशीतील मध्यमगौरवर्णीय पुरूष माझ्याकडे बघून हसतोय. त्याला बहुतेक डिस्चार्ज मिळणार असल्याचा भाव त्याच्या चेह-यावर आहे. अचानक त्याच्या शेजारी स्वामी समर्थ येवून काॅटवर बसतात. तेही माझ्याकडे बघून हसतात. त्यांच्या हातात जपमाळ असते. त्या हातानेच ते पुढे निर्देश करतात. मी तिकडे बघतो तर चक्क श्रीकृष्ण डाॅक्टरचा अॅप्रन घालून , स्टेथोस्कोप  लावून, सलाईन स्टँड नीट लावत असतो ! त्याने काही तरी निश्चय केलेला त्याच्या ठाम चेह-यावर दिसत होता.  अगदी तरूण वयातला हा श्रीकृष्ण आहे व तो आता कोरोनाच्या लढाईत डाॅक्टर बनून स्वत:च उतरतो आहे, असे मी मनात म्हणत असतानाच माझी लिंक तुटली. आता परमेश्वरच लढायला उतरला तर कोरोनावरचा विजय फार दूर नाही. संध्याकाळी पाच वाजता उर्मिला धावती भेट देवून गेली. थोडा काळ लंबूवहिनीही येऊन तिचे सुकवण घेऊन गेली. आज दिवसभरात ती दोनदा येऊन गेली. बीनाही संध्याकाळी दोनदा येऊन गेली. उद्या ती डाॅक्टरकडे जाणार आहे. त्यांना सांगायचे मुद्दे तिला लिहून द्यायचे आहेत. ते डाॅक्टर माझेही मित्र आहेत. मी व्यक्तिश: त्यांना व्हॉट्सॲपवर बीनाकडे अधिक लक्ष देण्याबाबत विनंती करावी का हा प्रश्न आहे. बीनाची आई आली तर विचारून बघू. सद्या सात वाजले आहेत. दिवाबत्ती करूया. दोन्ही घरातील दिवाबत्ती झाली. जगतकल्याणाची प्रार्थना झाली. सिरियल बघून झाली. बीनाच्या आजारपणाचे मुद्दे लिहून झाले.  तोवर जेवणाची वेळ झाली. आज उकडया तांदळाची पेज प्यायची. मग पेज प्यायला बसलो तेवढ्यात बीनाची आई आली. पेज लवकर संपवून तिला मुद्दे वाचून दाखवले. बीनाला लवकरात लवकर यातून बाहेर काढले पाहिजे म्हणून सांगितले. डाॅक्टरांना विषयही काढला तर तीच म्हणाली की तुम्ही त्यांच्याशी फोनवर तिच्या आजाराच्या मूळ कारणाबद्दल बोला. मी म्हटलं मी त्यांना थोडया वेळाने व्हॉट्सॲपवर मेसेज करतो. तो तयार केला व सौ. कडून नीट वाचून घेतला. तिने दोन बदल सुचवले ते केले आणि सव्वा दहा वाजता डाॅक्टरांना मेसेज केलाही. आता रात्री 11.23 ला धन्यवाद देणारा त्यांचा संदेश आला आहे. चला निदान अंथरूणावर तरी पडूया....


( क्रमश: )
...........











   








गुरुवार, ७ मे, २०२०

Think twice


मागे - पुढे

07.05.2020

          दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे, एवढेच खूप झाले ! गेले तीन दिवस वैतागून इथे तरी काहीच लिहिले नाही. काय लिहायचे ? सगळे तेच तर सुरू आहे. जागतिक महासत्तेचा विनोद करणारी माणसे स्वयंशिस्त पाळतील ही अपेक्षा तरी कशी करायची ! संचारबंदीतच माणसे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुक्तपणे रस्त्यावर विनाकारण वावरत असतील तर ती हे जाणूनबुजून करतात असेच म्हणावे लागते. अतिशय उच्चवगैरे संस्कृतीचा टेंभा मिरवून फायदा नसतो, तर ती आचरणात दिसावी लागते. ईतिहासाची पुण्याई ही खरे तर पूर्वीच्या खरोखरच्या महान माणसांची कमाई असते. आपले दिवे लावणारे कर्तृत्व पाहता , त्या कमाईवर आपला वर्तमान फार काळ तग धरू शकत नाही. अर्थात आपल्याला आपल्या वर्तनानाची पर्वा नाही तिथे भविष्याबद्दल न बोललेलेच बरे ! बेशिस्त मेंढरांचे कळप सांभाळत तरी किती बसणार ! ही मेंढरे बेशिस्त असली तरी एका बाबतीत हुशार आहेत. ती गनिमी काव्याने कळप सोडून अवैधरित्या स्वत:चीच वाहतूक करीत आहेत वा करून घेत आहेत. सुरूवातीला कसे आहात तिथेच थांबा, सर्व व्यवस्था करण्यात येत आहे , असे आवाहन हया मेंढरांना करण्यात येत होते. पण तरीही ही मेंढरे कधी पायी तर कधी अधिकचे पैसे देऊन वाहनाने गावाकडे पळत सुटली. आता त्यांना गांव आठवला. गावात जाऊन काय पराक्रम गाजवणार , तर गावाला कोरोना महामारीची अभूतपूर्व भेट देणार ! हे थांबायला हवे होते , पण बुलेट ट्रेनच्या तयार करण्यात आलेल्या हवेच्या गतीने चालूच राहिले. कधी मालगाडी तर कधी आंबा वा जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीच्या ट्रकने ! शेवटी अधिकृतपणे रेल्वेगाडया सोडून रवानगी करावी लागली. काय झाले त्या आवाहनांचे ? सारा देश माझ्यासोबत हे दाखवण्याची संधी काळाने कोणालाच मिळू दिली नाही ! जेव्हा गोष्ट दाखवण्यावर जाते तेव्हा काळ असेच करतो. लोक खरोखरच तुमच्यासोबत तेव्हाच असतात जेव्हा तुम्ही लोकांसोबत खरोखरच असता ! नीतीमत्तेने असता ! वंदनीय महात्म्यांना बाजूला सारून त्यांची जागा घेणे एवढे सोपे नाही. लोकांनीच त्यांना महात्मा बनवलेले असते. शब्दांतली खरी कळकळ आणि मतांची आकडेेमोड करण्यामागची तळमळ यातला फरक बेशिस्त लोकही चांगलाच ओळखतात. थोडक्यात , आवाहनांचा फारसा उपयोग न होण्यामागची ही पोटतिडकीने केलेली कारणमीमांसा. ती चुकूही शकते. म्हणूनच म्हणतो , की काय लिहिणार सद्यस्थितीत ! आता कोरोनामुक्त म्हटले गेलेले व अभिमानाने अभिनंदन करून मोकळे झालेले कोंकणचे सिंधूदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे पुन्हा कोरोनायुक्त झाले आहेत. म्हणून मुक्त मुक्त असे हजारदा बोंबलू नका , तुम्हीच युक्त होता ! हा ताजा ईतिहास आहे ! लोकांचे जीव जात असतांना जो उतावीळ राजकीय कोरोना सुरू आहे तो निंदनीयच आहे व त्याबद्दल बोललेच पाहिजे. ती लोकांचीच जबाबदारी आहे. शेवटी लोकांच्याच भावनांशी आणि जीवनाशी खेळले जाते. काही मूठभरांचे नुकसान टाळण्यापायी लाखोंचे नुकसान करणे चूक आहे. हे कोरोना महामारीच्या काळात तर पाळले गेलेच पाहिजे. अर्थव्यवस्था रस्त्यात कशी  कोलमडते ते दारू दुकाने उघडल्यानंतर केवळ काही तासातच दिसले ! माझ्या दोन फेसबूक पोस्ट पहा 


  प्यायला अधीर झालेले लोक सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा वाजवणार हे आपल्याला आधीच कळत नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल ! इतकेच नव्हे तर लोक दारूसाठी किंवा दारू पिऊन धुमाकूळ करीत आहेत. कांदीवलीत दारूडयाने चक्क महिवेवर व दुकानदारावरच हल्ला केल्याची बातमी जय महाराष्ट्र चँनेलवर दाखवत आहेत. टाळया ते थाळया ते दिवे हया प्रवासाला फार काळ लोटलेला नाही. आपले निर्णय आणि आपल्या आवाहनांचे असे का होते याचा ( जर विचार केला जाणार असेल तर ) विचार करावा लागेल ! आवाहनांचे परिणाम माहीत असल्याने कोणती आवाहने करायची याचे तारतम्य बाळगावेच लागेल. आता चाकरमांनी लपूनछपून येऊन कोंकण कोरोनाबाधित करीत आहेत. ते अधिकृतपणे आणले गेले तर इथली अवस्था काय होईल हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची गरज नाही. प्रशासनातही आता कोरोना शिरू लागला आहे. अधिका-याचा कोरोनामुळे जीव गेल्याची बातमी सुरू आहे.  आपण पोलीसांवरचा भार वाढवून त्यांना अधिकच कमकुवत करीत चाललो आहोत. लोकांपुढे पोलीस हताश झाले तर अराजक होईल. पोलीसही माणसेच आहेत. त्यांनाही कुटुंब आहे , जे डोळ्यांत प्राण आणून त्यांची वाट बघत असते . त्यांनाही गांव आहे. पोलीसांचे अधिक हाल होणे म्हणजे आपलेच संकटमोचक आपण हरवून बसणे होय. पोलीस हतबल झाले तर प्रशासनावरही त्याचा परिणाम होईल. प्रशासन हैराण झाले तर लोक सैराट होतील. अपप्रवृत्ती डोके क्षणात वर काढतील आणि मग मारामा-या , खून , लुटालूट , दंगली, दरोडे, बलात्कार हे ओघाने येईलच.

         कोरोनाबाबत अनेक भाकिते वर्तवली जात आहेत. लसीबाबत संभ्रम आहेच. एक मात्र खरे आहे की, कोरोना चीनने जगाला दिला असे ट्रंफतात्यांनी म्हटले तरी अमेरिकेनेच तो चीनमघ्ये नेला असावा असा खुद्द अमेरिकन लोकांत संभ्रम आहे म्हणा वा निर्माण केला गेला आहे !  म्हणूनच अजूनही जग याबाबतीत ठोस बोलतांनाही दिसत नाही. जग बोलणार नाही तिथे बोलणारे आणि आपल्याकडचे चीनच्या बहिष्काराच्या बाता मारणारे ( चीनचेच ! ) मूग गिळून गप आहेत. अधूनमधून ते सोयीनुसार आणि सवयीनुसार फेसबूकवर उसळी मारतीलच. 😀😀😀😀 आपण वाचून करमणूक करून घेऊया !

             आज सकाळी मित्रवर्य जादूगार मनोहर  भाटकर यांनी दत्ता डावजेकरांच्या संग्राह्य आठवणींचा सुंदर संदेश  पाठविला आहे. त्याची फेसबूक पोस्ट टाकली आहे. तिची लिंक इथे पहा दत्ता डावजेकरांच्या आठवणी. काल  रात्री दोन पंखे लावून झोपलो. त्यामुळे जराशी झोप तरी मिळाली. सकाळी सहा वाजता उठलो , थोडया हालचाली केल्या आणि पावणेसातला उठूया म्हणून झोपलो तो सात वाजता धडपडत उठलो. मागच्या दारी जाऊन पाहिले तर नळाला पाणी चालू होते. लगेच भांडी नेली. पुरेसे पाणी मिळाले आणि पाणी गेले ! सुटलो. नाही तर विहिरीवरून पाणी आणावे लागले असते. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून विहिरीवर गेलोच नाहीय ! या गडबडीत बंदू कुठे दिसला नाही. मला उशीर झाला असल्याने मीही लक्ष दिले नाही. काही वेळाने आंघोेळ करून सहजच मागचा दरवाजा उघडला तर बंदूकडे पाण्याचा टँकर आलेला. तसा तो अधूनमधून येतोच पण गडबड झाली होती. बंदू आणि कंपनी काल रात्रभर गरम्यामुळे झोपलेली नसल्याने सकाळी पाणी आले तेव्हा उठलीच नव्हती ! हे बंदूनेच सांगितले.  तरीच सकाळी बंदू कुठे पाणी भरतांना दिसला नव्हता.  मी समजलो होतो की तो पाणी भरून झोपला असावा. उद्या शुक्रवार म्हणजे पाणी येणार नाही. पाणी प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे.
   


( क्रमश: )
...........

........................ ........ 











   








सोमवार, ४ मे, २०२०

Radha krishna राधा कृष्ण


मागे - पुढे

03.05.2020

          आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चाळीसावा दिवस. आजपर्यंतचा लॉक डाऊन उद्यापासून 17 मे पर्यंत वाढवलेला आहे.       काल रात्री उकाडयामुळे बेडवरून बरोबर 12 वा. 12 मि. नी लादीवर झोपायला आलो. डोळे मिटून पडलो होतो. पुढच्या दोन तीन मिनिटातच डोळे मिटलेले असतांना मला देवळाच्या पुढच्या दारातील भाग दिसू लागला.  ( फोटो पहा )
Pimple tree
Navalai Pavnai Temple Area
पिंपळाच्या उजवीकडेपर्यंत नजर गेली आणि अचानक मी नजर डावीकडे वळवली. पिंपळाच्या डाव्या बाजुला असलेल्या कठडयापर्यंत पोचलेल्या लालमातकट रेघा असलेल्या घाग-यातल्या दोन गवळणी चक्क कठडयाची चि-याची भिंत भेदून सहजगत्या शेजारच्या  प-यात उतरल्या . ती चि-याची भिंत सांधतांना मी पाहिली ! वरच्या थरातले अखेरचे टोकाचे सिमेंट जागेवर बसतांना मला दिसले ! एवढीच हालचाल  चि-याच्या वरच्या भागात झाली. बाकी एक चिराही पडला नव्हता ! लगेच दुसरे आश्चर्य नजरेस पडले ते म्हणजे क्षणापूर्वी कठडयापेक्षाही उंच दिसलेल्या त्या दोन्ही गवळणी प-यात उतरताच बुटक्या दिसत होत्या. त्यातली एक अधिक उंच होती.  हातात माठ घेऊन त्या प-यात काही तरी करीत होत्या. त्या पुढे काय करणार हे बघण्याच्या आतच माझी लिंक तुटली . मी सौ. ला हे सांगितलं आणि जाऊन बघुया का विचारलं तर घरातच तिची भीतीने गाळण उडाली.  ती म्हणाली, आता साडेबारा होत आलेयत. आता कुठे बाहेर जाता ? झोपा गुपचूप ! मी एकटा जातो म्हटलं तर मलाही जाऊ देईना. तसा मी रात्रीअपरात्री कितीही वाजता बाहेर येऊन आसपास बघत असतो. एकदा सिंधुदूर्गात मी एका दहा बारा वर्षाच्या भगत मुलाबरोबर रात्रभर स्मशानात रहायला तयार झालो होतो , पण त्याचे आईवडीलच काही तरी कारणे सांगून टाळू लागले आणि माझे नातेवाईकही जास्त हुशारी दाखऊ नका म्हणू लागले ! त्या मुलाच्या डोळयात चरकल्याचा भाव मला स्पष्ट दिसत होता. गरीबी माणसांना कोणत्या पंथाला आणते या विचाराने मीही मग माझा विचार सोडून दिला. मला खरंच त्या कुटुंबाची दया आली. खूप वाईट वाटले. पोटाच्या खळगीसाठी लहान मुलांचाही वापर करणारी अशी किती कुटुंब आसपास असतील या विचाराने मी अस्वस्थ झालो. मी निघतांना शंभर रूपये त्या मुलाच्या हातावर ठेवले आणि अभ्यास करून खूप मोठा हो म्हणून सांगून बाहेर पडलो. त्या मुलाच्या डोळयात सुटका आणि आश्चर्य यांचा विचित्र संगम झाला होता. तर मी काल रात्री बाहेर जाऊन बघितले नाही. देवळाच्या दारातल्या त्या पिंपळामध्ये श्रीकृष्णाचे अस्तित्व आहे हे मला काही वर्षापूर्वी सिंधूदुर्गातच पडलेल्या एका स्वप्नात दिसले होते.  त्या दोन गवळणींचा वावर त्यामुळे स्वाभाविकच ठरत होता. ते स्वप्नं मी काही वर्षापूर्वी सावंतवाडीत एका रात्री झोपलेलो असतांना पडले होते.  माझ्या घरासमोरच्या तुळशीचा पुढील भागात श्रीमहाविष्णूची ( माझ्यासाठी श्रीकृष्णाची ) मूर्ती आहे. त्यात त्याच्या उजव्या हाताचा पंजा थोडा पुढे येऊन आशीर्वाद देतो आहे. ( फोटो पहा) .
तर मला स्वप्नात ती मूर्ती जिवंत झालेली दिसू लागली व श्रीकृष्णाची ताकत कमी पडत असल्याचे जाणवले. श्रीकृष्णाचा आशीर्वाद देणारा तो हात वाढून खालच्या बाजुच्या देवळाच्या दारातील पिंपळात उभ्या असलेल्या सुकुमार तरूण श्रीकृष्णाच्याच दिशेने सरकत होता. तेवढयात पिंपळातल्या घननीळ श्रीकृष्णानेही त्याचा एक हात पुढे करून काही वेळ तुळशीतल्या श्रीकृष्णाला हस्तांदोलनाव्दारे शक्ती पुरवली . दोघेही हसले आणि ते दोन्ही हात लहान लहान होत पूर्ववत झाले ! तुळशीतली मूर्ती पूर्ववत होऊन अधिक ठळक दिसू लागली. तिकडे पिंपळातला श्रीकृष्ण पिंपळात लुप्त झाला आणि माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या घराच्या अंगणात  नसून सासरवाडीला अंथरूणात झोपलो आहे , हे समजायला मला काही वेळ लागला होता ! तुळशीतला हाच श्रीकृष्ण मला नोकरीत आलेल्या संकटाच्या वेळी उपयोगी पडला होता. मीच कृतघ्न निघालो. त्याची मनासारखी पूजा करू शकलो नाही . समोर असूनही त्याला ओळखू शकलो नाही. आता त्याच्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

           आज लंबूवहिनी उगवली. बीना आणि तिची आई येऊन गेली. राजूची बायको व मुलगीही येऊन गेली. माणसे येतात म्हणून बरे वाटते. संध्याकाळ होऊन गेली आहे. मुलाने त्याचे भाडे घरमालकाच्या खात्यात आजच अाॅनलाईन भरले आहे. जेवणाची वेळ आली की कसे तरीच होऊन जाते. तो आणि त्याच्यासारखी परक्या शहरात एकटे राहणारी व जेवण बनवता न येणारी मुलं काय करून खात असतील, या विचाराने जेवणही जात नाहीय. झोप तर कधीच उडाली आहे !


( क्रमश: )
...........

रविवार, ३ मे, २०२०

Nothing to say more अधिक सांगण्यासारखे काही नाही


मागे - पुढे

02.05.2020

         आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकोणचाळीसावा दिवस.  सकाळपासून फारसे मागच्या वा पुढच्या दारावर विशेष असे काही घडलेच नाही.   चिपळूण व संगमेश्वर येथे मिळून दोन कोरोनाबाधित रूग्ण मिळाल्याची बातमी आली आहे. संपूर्ण दिवसांत लंबूवहिनी कुठे झळकली नाही , हेच आजच्या दिवसाचे विशेष ! तिकडे चीन अमेरिका जोरात सुरू आहे. भारतासारखे देश मध्येच लटकत राहणार हे उघड आहे. धड चीनचा बहिष्कारही करता येत नाही आणि अमेरिकेच्या पुरस्काराचा मोहही सोडवत नाही. अमेरिका जे करायचे ते करतेच आहे. ते पक्के व्यापारी लोक . आपल्याला सोयीनुसार वापरायलाच बघणार. आम्ही त्यांच्याकडून आमच्याबद्दल  साधारणसे का होईना पण दोन शब्द आमच्याच कानावर कधी पडतात त्यासाठी तोंड उघडे करून बघत बसलेलो असतो ! प्रजासत्ताक लोकशाही देशाची मान आपण किती ताठ ठेवतो आहोत ! इकडे महाराष्ट्रात उतावळा नवरा आणि नाच्या कंपनी व-हाड लिमिटेड आपल्याच गळयात माळ पडणार या कल्पनेने कोरोनात लोकांचे जीव जात असतांनाही सतत मोहरलेले असतात ! मुंबईचे आयएफसी गुजरातला हलवून मुंबईला अनेक वर्षे तरी फारसा फरक पडणार नाही. मुंबई ही काही एक दोन वर्षात उभे राहिलेले ठिकाण नव्हे ! त्यामागे अनेकांचे कष्ट , प्रामाणिकपणा , नीतीमत्ता , कल्पकता व हुशारी हे गूण आहेत. हा पाया भक्कम आहे. बालीश प्रयत्नांनी तडा जाण्याएवढा तो नक्कीच कमकुवत नाही !
बाकी कोरोनाचा प्रसार होतोच आहे. बरे होणा-यांचेही प्रमाण ब-यापैकी आहे. तिन्ही सेनादलांकडून कोरोना वॉरीयर्सवर पुष्पवृष्टी केली जात आहे. तिकडे नाशिकहून परप्रांतीयांना ट्रेनने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे. आता इतर ठिकाणांहूनही हेच होणार आहे. पुण्यात  तहसिलदार कार्यालयात प्रवासासाठी परवाने मिळणार असा संभ्रम पसरल्याने लोकांनी तोबा गर्दी केली आहे. वास्तविक पुढील सूचना मिळण्यासाठी लोकांकडून फक्त त्यांचे ईमेल अॅड्रेस तेही अाॅनलाईनच मागविण्यात आले होते.  एकूणच लॉक डाऊनबाबत लोक प्रचंड संभ्रमात पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा त्रासही प्रचंड वाढतो आहे. लोकांसाठी काही करायला जा , ते त्यांना करायचे तेच करतात ! थाळया वाजवायला सांगितले की ड्रम वाजवतात. फटाके वाजवतात. कोणत्या वेळी काय करावे हेच त्यांना कळत नाही असे झाले आहे. हे लोक भारताला जागतिक महासत्ता बनवण्यात महान योगदान देणार आहेत म्हणे ! तेही बुलेट ट्रेनच्या ( काल्पनिक ) वेगाने !
            बाकी सकाळ , दुपार क्रमाने पार पडली आहे. आता संध्याकाळ झाली आहे. ही खालच्या अंगणात ईव्हीनिंग वॉक करतेय. मी पाण्याचा साठा पाहून झाडे शिंपू की नको या विचारात पडलो आहे. अखेर मागच्या अंगणातली दोन झाडे शिंपली. खालच्या बाजूची झाडे शिंपण्याएवढे पाणी शिल्लकच नव्हते. आज लंबूवहिनी अजून खाली आलेली नाही. रस्त्याने दुकानात जाणा-या चिंग्याला सौ.ने बिस्कीट पुडे व दूध आणायला पैसे दिले . रात्र झाली. आज दूध बिस्कीटे खाऊन पोटाला आराम दिला . रात्री अकरा वाजता लादीवर पहूडलो.

( क्रमश: )
...........

शनिवार, २ मे, २०२०

The missing clue हरवलेला दुवा


मागे - पुढे

01.05.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग अडतीसावा दिवस. 01 मे. महाराष्ट्र दिन + कामगार दिन. त्याच्या पूर्वरात्रीला अर्धी रात्र झोपच आली नाही. आधीच गरम्यामुळे झोप येत नव्हती.  त्यात रात्री 11.15 ला मेसेंजरवर झोप उडवणारा मेसेज आला. तो असा :

 🔴 *रत्नागिरी खबरदार ब्रेकिंग न्यूज : मुंबई ते आंध्रप्रदेश व्हाया रत्नागिरी गाडीतून जाणारा एकजण आढळला कोरोना पॉझिटिव्ह*

➡️ *रत्नागिरी :* पाईपच्या गाडीतून रत्नागिरी ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या तीन इसमांना मलकापूर चेक नाक्यावर पकडले असता त्यातील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर इसमाला शाहुवाडी पोलिसांनी मलकापूर चेक पोस्टवर २६ एप्रिल रोजी पकडले आहे. हा इसम मुंबईतून रत्नागिरीत आणि रत्नागिरीतून कोल्हापूरकडे जात होता अशी माहिती मिळत आहे. रत्नागिरी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस या इसमाच्या प्रवासाची साखळी शोधत आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रत्नागिरी खबरदारला दिली आहे. रत्नागिरीतील एका नामांकित कंपनीत हा ट्रक आला होता व या ट्रक मधून या इसमाने प्रवास केला आहे अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

*रत्नागिरी खबरदार*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
www.ratnagirikhabardar.com
10:30 PM 30/Apr/2020

              तिकडे कोरोना मुक्त म्हटला गेलेला सिंधुदूर्ग जिल्हा असाच पुन्हा कुणा बाहेरून आलेल्या कोरोनाग्रस्तामुळे धास्तावला आहे. आता मलकापूरात सापडलेला माणूस रत्नागिरीत कुणाकुणाला भेटून गेला आहे , काय माहीत ! पुन्हा एकदा पोलीसांना साखळी शोधायचे काम करीत बसावे लागणार. लोकांनाच शिस्त नसेल तर पोलीस तरी कुणाकुणाच्या मागून धावणार !  यानंतर तर परदेशातून माणसे आणली जाणार आणि पुण्यामुंबईतून चाकरमानी कोंकणात आणण्यात येणार , यावरही चर्चा सुरू आहेत. हा जर विचार असेल तर पुण्यामुंबईत ज्यांच्या मुलांना नोकरीधंदयामुळे एकटे राहणे आजही अपरिहार्य झाले आहे , त्यांच्या मदतीला  किमान त्यांच्या आईवडिलांना कोंकणातूनही पुण्यामुंबईला जायचे असल्यास जाता यावे , अशी त्यांची अपेक्षा असणारच आहे. याही विचाराचा विचार शासनाला करावा लागेल असे दिसते.  असो. तर शेवटी रात्री एक वाजता पलंगावरून खाली नुसत्या लादीवर जाऊन झोपलो. तेव्हा कुठे दोनच्या दरम्याने जरा झोप लागली . सकाळी नळाला पाणी येणार नसल्याने सहा वाजता जाग येऊनही पुन्हा झोपलो तो पावणेआठला उठलो. अकरा वाजता उदू येऊन गेला. बाकी कुणीही आलेले नाही. दुपारी दोन वाजता जेवलो . जेवताजेवता मला मिनाक्षीच्या माहेरच्या घराकडे जाणारा रस्ता दिसू लागला. विशेषत: तो पूल आणि त्यापलीकडील भाग दिसला आणि माझी लिंक तुटली. ब-याच दिवसांनी मला हा अनुभव आला. मी लगेच सौ. ला मिनाक्षी संदर्भात एक दोन प्रश्न विचारले. लिंकबाबत काहीच सांगितले नाही. जेवल्यानंतर शतपावली झाली. वामकुक्षी  करता करता झोपच लागली ! पाच वाजता मुलाचा फोन आला तो घेतांनाच पुढच्या दरवाजावर जोरातच थापा ऐकायला आल्या तसा मी धडपडत उठलो. एवढी कोणाला अर्जन्सी आहे म्हणून शर्ट न घालताच दरवाजा उघडला तर बाहेर मराठवाडीतल्या दोघीजणी !  त्यांना बसायला सांगून सौ. ला उठवलं. सौ.ला त्यांनी बीनाच्या आईला बोलवायला सांगितले. मला जेवतानाची माझी लिंक व मीनाक्षीची मी सौ.कडे केलेली चौकशी आठवली. आतापर्यंत पार हिमालयातल्यावगैरे दूरच्या गोष्टी डोळयावर दिसत होत्या, आता तर जवळच्याच गोष्टी दिसतायत आणि त्याची प्रचितीही अवघ्या तीन तासातच येत आहे ! हे गूढ काय आहे ? काही गोष्टी मला उघडया डोळयांनी का दिसतात ? त्या कोण दाखवतंय आणि का ? कळत नाही !  बीनाची आई आली आहे. त्यामुळे  त्यांची चर्चा सुरू झाली आहे. मी आतल्या खोलीत बसून ऐकतो आहे.  प्रकरण गळयाशी आलेले आहे असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. मीनाक्षीने उसने पैसे घेतले आणि त्यानंतर काही कारणांनी ती जी माहेरी जाऊन बसली ती वर्ष होत आले तरी सासरी येतच नाहीय. फोनही उचलत नाही.  बीनाच्या आईने त्या कर्ज प्रकरणात मीनाक्षीची जबाबदारी घेतल्याने ती अडचणीत आली आहे. मीनाक्षीचा नवरा पैसे देतो देतो एवढेच सांगतो आहे. थोडे थोडेही देत नाहीय. त्यामुळे त्याचा विश्वास हया बायकांना नाहीय. शेवटी तुम्ही दोन दिवसांत पैसे द्या नाही तर वाईटपणा येईल , असे बीनाच्या आईला निक्षून सांगून त्या दोघीही गेल्या.  आता सात वाजले आहेत. हिने बातम्या लावल्या होत्या पण फोन आल्याने ती बीनाकडे गेली आहे तोपर्यंत मी चँनेल बदलले. बीबीसीवर इंग्लंडमधल्या चीनच्या अँम्बँसीडरची मुलाखत चालू आहे. ते महाशय प्रत्येक आरोप नाकारत आहेत. सत्य अजूनही जगापासून दूर आहे. राहवत नाही अशावेळी हटकून कविता जन्म घेते. वाचा माझी ताजी कविता इथल्याइथे....

ज्याला त्याला आपापल्या देशात आपापली खुर्ची टिकवायची आहे  !
सत्ताचक्रात अडकलेल्यांची तडफड बघवत नाही !
कोरोनाचा कोणताच धागा कोणाशीच कोणी जुळवत नाही !
कोरोनापूर्व वर्षभर झालेल्या मान्यवरांच्या सगळयाच गळाभेटी पारदर्शक असतील काय ?
राजकीय व्यापारीकरणाची महत्वाकांक्षा जागतिक महासत्तेचे गाजर दाखवून काय साधत होती बरे ?
करोडो माणसांचे कोरोनामागचे असलेच जर खुनी तर ते मूठभर असतील काय ?
चीन अमेरिकेकडे आणि अमेरिका चीनकडे बोट दाखवीत राहीलही ,
कदाचित चीनला शिक्षा होईलही पण त्यानंतर घडलेल्या मानवी हत्याकांडात जगाचा इटली होऊन गेला आहे , हे सत्य राहीलच !
विमानातून आयात केलेल्या कोरोनामुळे मधल्यामध्ये आपलाच इटली होतांनाही आपण भांडत राहू आपल्यातच,
कुणाच्या तरी राजकीय महत्वाकांक्षांना खतपाणी घालीत ,
डोळयांवर भक्तीची आणि गुलामीची पट्टी लाऊन !

                   बघा कवितेतून काही दुवा मिळतो का ? नाही तरी  बातम्या सुरू आहेतच ...भारतात केंद्र सरकारने 03 मे रोजी संपत असलेला लॉक डाऊन 04 मे ते 17 मे 20  पर्यंत वाढवला आहे. झोननिहाय शहरांची विभागणी झाली आहे. बातम्या सुरू आहेत. बातम्याच सुरू राहणार आहेत. जगाचा अंत झालाच तर त्याची शेवटची ब्रेकींग न्यूज कोण सांगणार आहे आणि कोण ऐकणार आहे ?

( क्रमश: )
...........






   








शुक्रवार, १ मे, २०२०

न लिहिण्याचा दिवस

मागे - पुढे

30.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सदतीसावा दिवस.

          क्षमा करा , पण कोेरोना व्हायरस जगभरात घेत असलेले बळी आणि त्यासह भारतीय सिनेजगतातील

      निखळतो हा एकेक तारा 
     सोसते पृथ्वी रोज धक्के !

..... या विषण्ण अवस्थेतील पार्श्वभूमीवरही होत असलेले घाणेरडे राजकारण   ....
यामुळे आज काही लिहिवतच नाहीय.....


( क्रमश: )
...........







   








गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

Corona virus capturing minds

मागे - पुढे

29.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग छत्तीसावा दिवस.  पिंपळपानाचा काढा उकळत ठेवला आणि पावणेसातला नेहमीच्या वेळेवर पाणी बघायला मागच्या दारी आलो. पाणी आलेले नाही.  तिकडे बंदू वाट बघतोय आणि  इकडे मी. अखेर सात वाजता पाणी आले. मी सौ. ला उठवले आणि पाणी भरायला आलो. पाणी भरून झाले तसा पुढे हाँलमध्ये येवून आत येणारी सूर्यकिरणे अंगावर घेत बसलो. साडेसातपर्यंत सूर्यप्रकाश बरा होता. पण मग आकाशात ढग जमू लागले. चहा पिऊन होईपर्यंत बारीक बारीक पाऊस पडू लागला ! लहानपणी या पहिल्या पावसाचे किती अप्रूप असायचे ! तेव्हा ऋतूचक्र कसे नियमित असायचे.  पण आता  कोणताही ऋतू कधीही सुरू होतो. अवेळी पाऊस येतो तरी किती वेळा ? निसर्गा , तुझे आता फारसे अप्रूप राहिले नाही, कदाचित माझी पिढी आता साठीत आली म्हणूनही असेल कदाचित ! याच साठीतल्या आणि पन्नाशीतल्या काही बायका डोंगरावर सकाळच चिकनपार्टी करायला चालल्या आहेत ! तिकडे खाली मासेबाजारात गर्दी झाली आहे . आज बुधवार आहे. वार कोणताही असो, महामारी असो वा पाऊस असो , माणसे जिथे जायची तिथे जातातच आणि करायचे ते करतातच ! गंमत म्हणजे माझ्या या शब्दांशी सौ. चिकनपार्टीला निघता निघता सहमती दर्शवत होती ! स्नेहाचे फोन येत होते. पाऊस नुसताच जरासा  रिमझिमला आणि गेला . ही बाहेर पडली तेव्हा सूर्य आशेची किरणे पुन्हा दाखऊ लागला होता. पावणेनऊ वाजता पुन्हा सूर्यकिरणे गायब झालीत तेव्हा मी मागच्या दारी आलो. बंदूच्या घरात नुकताच सत्त्या स्थानापन्न होऊन घाम पुसत बसला आहे. आजकी बात सुरू झाली आहे. हळूहळू बंदूमंडळातील इतर सभासद येतील. पुढच्या दारी आलो तर गेट उघडून लंबूवहिनी अलगद गच्चीवर सुकवण घालायला जाते आहे. मीही अलगदपणे दरवाजा लावला . म्हणजे मांजर जर डोळे पिऊन दूध पीत असेल व तिला वाटत असेल की आपल्याला कोणी पहात नाही , तर राहू दे ना तिला तिच्या भ्रमात ! सुकवण घालून झाले तशी लंबूवहिनी गेट उघडून मांजराच्या आल्या पावलांनी जाते आहे. आज काही बातमी नसावी ! त्यात ही घरात नाही ती बातमी तिला आधीच लागलेली आहे ! माणसे चँप्टर का असतात ? ती साधीसरळ का वागत नाहीत ?

       आंघोळीनंतर श्रीपाद श्रीवल्लभांवरील पुस्तकातली आरती म्हणून बाहेर आलो तोच ज्येष्ट गझलकार मित्र वा. न. सरदेसाईंचा फोन आला. सद्या ते भांडूपमध्येच आहेत. त्यांचा मुलगा प्रमोद हाच त्यांची प्रसिध्दी करत असतो ! आजकाल हे फारच दुर्मिळ आहे ! मला प्रमोदचे खूप अप्रूप वाटले. माझ्याही मुलाचा मी काय लिहितो इकडे बारीक लक्ष असतो , पण प्रमोद त्याही पलीकडे आहे. वडिलांच्या कविता, गझलावगैरे तोच प्रसारीत करीत असतो ! हा फोन झाला आणि दुसरा फोन आला. अननोन नंबरवरून . पण ती मुलगी विचारत मात्र होती की , '' पाटील सर , संकूलची चावी तुमच्याकडे आहे ना ? '' बोलणारी माणसं कोण बोलतंय हे न सांगताच सरळ बोलत सुटतात. मी संभ्रमात ! मी नाही म्हणालो आणि कोण बोल...म्हणतोय तोपर्यंत फोनच कट केला गेला ! तिला हवा होता तो मीच पाटील सर होतो की आणखी कुणी पाटील सरांना तिने माझ्याच नंबरवर फोन केला होता ? बरं सौ.कडे कोणी चावी दिल्याचंही ती बोललेली नाही ! दिवस असा पुढे सरकतो आहे. सौ. तिकडे साळकायामाळकायांसोबत हड्डी  तोडत असणार. मी इकडे लिहीतोय ! वागवली परिसरातले काही फोटो पहा .
 
 
 

 जाधव  मॅडमच्या गझलची आठवण झाली आहे. त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या गझलला व्हॉट्सॲपवरच थोडे लाईनवर आणतो आहे. नवी पिढी हुशार आहे. फारसा हात फिरवावा लागत नाही. लवकर पीकअप करतात. जाधव  मॅडम महाविद्यालयीन शिक्षिका असल्याने खूप बिझी असतात.  त्यांना गझलसंर्भात फोनवर चर्चा करणे वेळेअभावी शक्य नव्हते. म्हटले चला, आपण त्यांच्या मनाने त्यांची गझल समजून घेऊ आणि आवश्यक असेल तरच बदल करू. तेही थेट व्हॉट्सॲपवरच !  आवश्यक तो बदल करून गझल व्हॉट्सॲपवरच पाठवून दिली आहे ! मलाही हा नवा प्रयोग आहे. कागदावर मांडून वेळ घालवण्यापेक्षा थेट मोबाईलवर काँपीपेस्ट करून बदल करणे बरे वाटले ! जाधव  मॅडमचा आलेला प्रतिसाद पाहता मला हे ब-यापैकी जमेल असे दिसते आहे.  नव्या पिढीकडून अशा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गझल संपल्यानंतर सव्वा वाजता एकटाच जेवलो.  नंतर शतपावली तर दोन तास झाली ! वामकुक्षी काही जमलीच नाही. मोबाईलवरच होतो. टीव्ही मात्र लावला नाही. तेवढीच शांतता ! फेसबुकवर अभिनेता इमरान खान  गेल्याच्या पोस्टस् आल्यायत. एक कसलेला उमदा अभिनेता चटका लावून गेला.  भावपूर्ण श्रध्दांजली.

        चार वाजता पुन्हा आकाश भरून आले. हयावेळी खूपच . दहापंधरा मिनिटातच वारा आणि पाऊसही सुरू झाला. तो पंधरावीस मिनिटं पडला. पावसामुळे सौ. पार्टी डोंगरावरच अडकली होती. सव्वा पाच वाजता ती घरी आली. सहा वाजता लाईट गेली ती पावणेआठ वाजता आली. सौ. ने टीव्ही लावला आहे. केंद्राने प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नसल्याचे म्हटले असले तरी लीलावती रूग्णालयातील कोरोनाबाधितावर त्याव्दारेच यशस्वी उपचार झाले , अशी बातमी सुरू आहे. धारावीत 24 कोरोना फायटर्स स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहेत . याला खरी छाती म्हणतात, खरी हिंमत म्हणतात !  सर्वत्र कोरोनाचा विषय आहे. सर्वात वाईट म्हणजे काही थिल्लर बिनडोक अर्धवटराव याही स्थितीत राजकारण करत आहेत ! याहून वाईट म्हणजे त्यांच्याकडे आपली अक्कल गहाण टाकलेली शेंबडी पोरे फेसबूकवर राजकारण करत आहेत ! शिकूनही अडाणी असलेली काही कच्ची मडकी एकमेकांना अंधभक्त आणि गुलाम म्हणू लागली आहेत , यावरून यांना देश आणि देशभक्ती किती कळते, यांची पोच किती , हे कळते. कोरोनाने अनेकांच्या डोक्यावर परिणाम केलेला दिसत आहे. आपण झोपायला गेलेले बरे, कारण आपली साठी सुरू आहे ! बुध्दी नाठी होऊन उपयोग नाही !  झोपायला जाता जाता व्हॉट्सॲप पाहिले तर अमेय धोपटकरांचा मेसेज आलेला. त्यांनी कविता क्वारंटाईन या पेजवर माझा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याची लिंक येथे देत आहे. कविता क्वारंटाईनमध्ये गझल
( क्रमश: )
...........