बुधवार, १७ मार्च, २०२१

Palas

 पळसाला पाने तीनच 


            ती लग्नं होऊन सासरी आली … बावरलेली … स्वतःचे सर्व काही सोडून सासरी आली …. मनात धाकधूक होतीच... नवीन परिस्थिती... नवीन माणसं … नवीन नाती ... सगळंच तिला नवीन होतं . ते घर ... हे घर … गैरसमजातून बेघर व्हायची तर वेळ येणार नाही ना ? ती जरा साशंकच होती . तिचंही बरोबर होतं . तिच्या काही मैत्रिणींचेही असं झालं होतं . 


            अनेक ठिकाणी असं होतं . अशावेळी जी मुलगी आपल्या कुटुंबाचा नवा सदस्य झाली आहे तिला समजून घेताना सासर कमी पडतं . बावरलेल्या , गोंधळलेल्या अवस्थेमुळे काही चुकलं तर तिला सांभाळून घेणे , समजावून सांगणे सासरच्यांना कठीण जाते . गंमत अशी आहे की बायकाच बायकांना जास्त छळतात.  काही नातीच गैरसमज निर्माण करणारी आहेत . सासू सून आणि नणंद भावजय ही दोन नाती म्हणजे तर कळसच ! गैरसमज आणि भांडण हे यांचे खास मित्र ! त्यातही जाणीवपूर्वक पसरवलेले गैरसमज आणि मुद्दाम उकरून काढलेली भांडणे हे तर खडाजंगीतले चौकार-षटकार ! निमित्ते तर पाचवीलाच पुजलेली ! निमित्ते तयार करण्यात या जोड्यांचा हात , ज्याने ह्यांना निर्माण केलं असं म्हणतात तो खुद्द परमेश्वरही धरू शकणार नाही ! कांगावखोरपणा हा यांचा सर्वोत्तम जन्मजात आदर्श गूण ! कुरघोडी करणे त्यांच्या हातचा मळच ! कळ काढण्यात ह्या हुशार !  अपवादात्मक परिस्थितीत सन्माननीय अपवाद ठरण्याचा विक्रमही ह्याच करू जाणोत ! स्त्रियांना स्त्रियांच इतक्या का छळतात हे एवढं रामायण होऊनही सांगणे कठीण आहे ! राम जाणे ! बाकी काय !


             हजारो वर्षे झाली तरी स्त्रीच्या नशिबीचा प्रामुख्याने स्त्रीकडून केलेला सासुरवास काही टळत नाही ! स्त्रीला देवता समजणारी आपली उच्च संस्कृती स्त्रीची प्रत्यक्षात कशी पूजा करते ते पाहण्याजोगे आहे ! हतबल पुरूष द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेसारखे माना खाली घालून आजही गप्प बसतात !  आजच्या तथाकथित स्त्री स्वातंत्र्य युगातही हे कमी झालेले नाही हे विशेष !  घरोघरी त्याच चुली, बोलत नाही तीच बरी ही म्हण यामुळेच इतकी वर्षे टिकून आहे. विषय आलाच आहे म्हणून सांगतो . दुसरीही एक म्हण अशीच टिकून आहे . ती आहे पळसाशी संबंधित . वसंत ऋतूत पळस बहरतो . पळस आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पळस त्वचारोग नाहीस करतो असं म्हणतात . लाल केशरी व किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पळस  लक्ष वेधून घेतो. पळस माझं लक्ष वेधून घेतो तो आणखी एका सामाजिक कारणासाठी. बेल आणि  निर्गुंडी यांनाही पळसाप्रमाणे तीनच पाने असतात.  पण पळसाला पाने तीनच ही म्हण पळसालाच का चिकटली हा प्रश्न मला पडतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे घरोघरीच्या चुली आपला गुण काही केल्या सोडत नाहीत. आपला गूण न सोडण्याची ही प्रवृत्ती मला पळसाला पाने तीनच या म्हणीच्या जवळची वाटते . काहीही केले तरी पळसाला पाने तीनच येणार ! अखेर,  अनेक नववधूंचे रडवेलले चेहरे आणि त्यांचा सासुरवास मला टोचत राहतो . मनात एक बेचैनी भरून राहते.



…. देवीदास हरिश्चंद्र पाटील, रत्नागिरी.