सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

कशासाठी पांडुरंगा

कशासाठी पांडुरंगा


कशासाठी पांडुरंगा तुझे गुण गाऊ ?

कशासाठी पंढरीला तुझ्या सांग येऊ ... || धृ ०||



आता कुठे आहे ज्ञाना, आता कुठे नामा ?

पाहतो रे जो तो आता, येतो कोण कामा !

माझ्यातला नि:स्वार्थी भाव कुठे ठेऊ ... || ०१ ||



आता कोणाला कोणाची राहिली न भीती !

आहे कुठे न्याय आता ? आहे कुठे नीती ? 

पाप हेच पुण्य होता... पुण्य कुठे नेऊ ... || ०२ ||



आता तुझी चंद्रभागा आटोनिया गेली

पायाखालची तुझ्या वीट कोरडी झाली

भक्तीचा ओलावा मी सांग कुणा देऊ ... || ०३ ||




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०९.२०२१

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

Birthday Celebration

 आम्ही इथे वाढदिवस साजरे करतो


वाढदिवस साधारणपणे आपण घरात किंवा अन्य बंदिस्त जागेत साजरे करतो. काही जण म्हणतात की वाढदिवस कशाला साजरे करायचे ? वाढदिवस म्हणजे खरं तर उलटी गणती सुरू असते. आयुष्यातले एक एक वर्षं किंवा दिवस कमी होत असतांनाच त्याला वाढदिवस तरी कसा म्हणता ? असा काहींचा प्रश्न असतो. तर काही जणांना आनंदासाठी काही ना काही निमित्त लागत असते. त्यांच्यासाठी तर वाढदिवस ही पर्वणीच ! काही जण मात्र इतरांचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि तेही वैशिष्ट्यपूर्ण जागेत ! निसर्गसंपन्न वातावरणात, मोकळ्या हवेत ! 



आमच्या गावातही अशी उत्साही तरूण मुलं आहेत ज्यांनी एका शेडचा उपयोग वाढदिवस साजरा करण्यासाठी केला आहे ! या मुलांच्या कलात्मक बुध्दीला नक्कीच दाद द्यावी लागेल !   


हे वाढदिवस सर्वच स्नेही मंडळींचे साजरे केले जातात. विशेष म्हणजे वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरे करूनही कुठेही गडबड गोंगाट नसतो. खऱ्या अर्थाने हे तरूण असूनही अत्यंत विवेकाने व आनंदाला कुठलेच गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने साजरे केले जातात ! म्हणूनच या मुलांचं खूप कौतुक करावं वाटतं. केवळ त्यांच्यासाठीच हा पोस्टप्रपंच !