सोमवार, २६ जुलै, २०२१

मीच मजला पेश केले पाहिजे

 पेश करतो आहे : 

थोडी पार्श्वभूमी वाचा  ( मागील अतिशय छोटीशी पोस्ट )


आता प्रारंभ करूया....

यूट्युब वर Devidas Patil नावाचे माझे चॅनेल आहे. 



त्यामध्ये Dehsongs ही play list आहे.


या play listमध्ये काही वर्षांपूर्वी, मी जे व्हिडीओज अपलोड केले होते त्यांपैकी " मीच मजला पेश केले पाहिजे " हा एक व्हिडिओ ! 




About My Videos या पानासाठी मी हाच व्हिडिओ पहिला निवडण्यामागे खास कारण आहे बघा ! ही माझीच एक मराठी गझल आहे. व्हिडिओमध्ये ही मराठी गझल मी पेश केली होती. हा पेश शब्द माझ्यादृष्टीने फार महत्वाचा आहे . हा शब्द शिर्षकामध्ये आला आहे आणि शिवाय पहिल्या शेरामध्येही आला आहे . याबद्दल मी पुढे बोलणारच आहे . मराठी गझल ही सुरेश भटांनी खऱ्या अर्थाने सुरू केली, जोपासली व वाढवली.  याच गझलचा आता महावृक्ष झालेला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. रत्नागिरीत मराठी गझल अजीज हसन मुकरी व देवीदास हरिश्चंद्र पाटील यांनी सर्वप्रथम सन १९८४-८५ च्या दरम्याने सुरू केली. आमचा मार्ग सुकर केला तो अलिकडेच दुर्दैवाने निधन पावलेले माझे मित्र मधूसूदन नानिवडेकर यांनी. आम्हांला सुरेश भटसाहेबांचं मार्गदर्शन व प्रेम लाभलं, हे आमचं भाग्यच ! मराठी गझल दोन दोन ओळींच्या पाच शेरांची किंवा अधिक शेरांची असलेली रचना असते.  यामध्ये प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो किंवा एकाच विषयावरचे सर्व शेर असतात . मराठी गझल बाबत अधिक माहिती अशी शिका मराठी गझल या लेखात आहे.‌  माझी ही गझल पहिल्या प्रकारातली आहे. यामध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र आहे, स्वतंत्र विषयावरचा आहे. 

 आता आपण प्रत्येक शेराचा आशय पाहू.

पहिला शेर असा आहे : 

मीच मजला पेश केले पाहिजे

जगाच्या दारात नेले पाहिजे


खरे तर हा शेर मला दुनियेच्या आलेल्या अनुभवातून सुचलेला आहे !  तुमच्याकडे कलागुण असून उपयोगाचे नसते ते जगाला " कळायला ' लावावे ' लागतात ". स्वतःचे बाजारीकरण म्हणजेच मार्केटिंग करावे लागते . दुनिया तुम्हाला शोधत येणार नाही तर तुम्हाला तिच्या दारात जावे लागेल. उशिरा का होईना, मी सद्या हेच चालू केले आहे. याचं कारण असं आहे की मला पस्तीस वर्षांपूर्वीच माझे ( आणि माझ्याप्रमाणेच रत्नागिरीतील आद्य गझलकार असलेल्या अजिज हसन मुकरीचेही !! ) भवितव्य कळाले होते. सन १९८६ मध्ये लिहिलेल्या माझ्या सुप्रसिद्ध" तीर " नावाच्या गझलचा चौथा शेर आजही याची साक्ष आहे. शेरच पहा ना आणि मग सांगा कमेंट्स व्दारे. शेर असा आहे : 


कसोटी लागली तेव्हा निघालो मी खरे नाणे

तरीही मीच बाजारी कुठेही चाललो नाही 


कारण ? तेच ! मी स्वतःला जगाच्या दारात नेले नाही. मी स्वतःला जगापुढे " पेश " केले नाही. राग मानू नका, पण मी इतक्या वर्षांनी हेच करू लागलो आहे. दुर्दैव, दुसरं काय !!!


काही असो आपण पुढचा शेर पाहू : 


गुरू बनायचे असेल जर कधी

आधीच शोधले चेले पाहिजे


पूर्वी गुरु एवढे सामर्थ्यवान असायचे की त्यांची ख्याती सर्वदूर पसरायची.‌ चेलेच त्यांचा शोध घ्यायचे. आता स्वयंघोषित गुरू असतात .‌ आता गुरु बनण्यासाठी आधी नियोजन करावे लागते . म्हणजे गुरु बनायचं असेल तर आधी आपले काही चेले तयार करावे लागतात . गुरू म्हणून तुमची जोरदार प्रसिद्धी करू शकतील असे चेले आधी शोधायचे असतात , आणि मग तुमचा गुरु पदाचा मार्ग सुकर होतो. असा याचा अर्थ आहे .


यानंतरचा शेर  : 


जगायचे सुखी आयुष्य पुढे तर

रोजचेच आता मेले पाहिजे


हा शेरही तितकासा सरळ नाही . म्हणजे जीवनात एवढी दगदग भरलेली असते , भविष्यकाळ सुखाचा करण्यासाठी वर्तमानात रोजच्याच मरण यातना भोगाव्या लागतात असा याचा सरळ अर्थ आहे . पण ही खरे तर उद्विग्नता आहे , व्यथा आणि वेदनांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नसल्याने आलेली उपरोधिक असहाय्यता ‌आहे !


आता पुढचा शेर पाहू : 


त्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी

सोबती, बाटल्या, पेले पाहिजे


हाही शेर तसं म्हटलं तर उपरोधिकच आहे.  म्हणजे सुख व्यक्तीनिहाय असू शकते. काहींना दारू पिण्यामध्येही सुख असतं. त्यातही मग एकट्याने पिणं आणि मित्रांसह पिणं हे प्रकार आहेतच.‌ दुसऱ्या  प्रकारात सुख वाटत असल्यास असलं " भौतिक सुख " मिळवण्यासाठी सोबती, चाकणा , बाटली आणि पेले हवेतच !     


आता शेवटचा शेर.


अहंकार नष्ट व्हावा यासाठी

षड:रिपू वाहून गेले पाहिजे


हा शेवटचा शेर अगदी आध्यात्मिक आहे बरं का ! आध्यात्मिक असूनही त्याचा अर्थ अगदी सरळ आहे ! मोह, माया , मत्सरादि षड:रिपू वाहून गेले की मनातील अहंकारही नष्ट होईल व मन निर्मळ होईल , असा याचा सरळ अर्थ आहे. अर्थात सध्याच्या जगात हे असलं काही निर्मळ वगैरे होणे कठीणच आहे म्हणा ! पण आपण इथे अर्थापुरतेच मर्यादित राहू. 


लवकरच दुसऱ्या व्हिडिओ बद्दल नवीन पोस्ट घेऊन येतोय.‌ तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट्स अवश्य द्या !


मराठी गझलबद्दलचा अशी शिकावी मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .

... देवीदास हरिश्चंद्र पाटील 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: