मंगळवार, २५ मे, २०२१

एक आवडलेली गोष्ट

 कोरोनाच्या ऐन भरातली ही डॉ . श्रीकृष्ण जोशी यांच्यासारख्या मातब्बर लेखकाकडून साकारलेली कथा.‌ तिच्यात काळजाला भिडणारं असं काही तरी नक्कीच आहे ! आपल्या ' मागे पुढे ' या पानासाठी बरेच दिवसांनी पोस्ट करीत आहे. अवश्य वाचा. व अभिप्राय द्या .‌‌‌‌‌...



*🌹इम्युनिटी अनलिमिटेड 🌹*


           *- डॉ . श्रीकृष्ण जोशी*


तिनं कटिंगचा ग्लास त्याच्यासमोर आदळला .

" हा चहा सातव्यांदा आणलाय , आता नाही म्हणालास तर..."

" सातव्यांदा ? मग माझ्या कसं लक्षात नाही आलं ? मग अगोदरच्या चहाचं काय झालं ?"

" आम्ही प्यालो ."

सगळे एका सुरात ओरडले .

" हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव . मोन्या , तुला आज नकला करून दाखवायच्या आहेत नाना नानी पार्क मध्ये , पण तिथल्या व्हीलचेअर वरच्या आजोबांचा हात हातात घे . त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही , याची काळजी घे . जगन , तू जिथं जाणार आहेस ,त्या अपार्टमेंटमध्ये चार जण पॉझिटिव्ह आहेत , त्या चारही जणांचे जेवणाचे डबे , त्यातलं अन्न गरम असेपर्यंत नेऊन दे . विन्या , त्या टीपॉय वर सामोसे , वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या आहेत , सगळ्या ऍम्ब्युलन्स मधल्या ड्रायव्हर्सना आणि स्मशान ड्युटी लागलेल्या सगळ्यांना दे आणि स्मशानात काम करणाऱ्या दादांना पण दे .कुणीही भुकेला राहता कामा नये . आता कोण राहिलं ? इरा , तुला दिलेल्या एरियातील हॉस्पिटलच्या बाहेर कुणी भांबावलेले , राहण्याची सोय नसलेले असे कुणी असतील तर त्यांची विचारपूस करून व्यवस्था कर , काही अडचण आली तर कॉल कर . नरेश तुझे पोलीस तुझी वाट पाहत असतील , त्यांना जेवणाचे पॅक नेऊन दे ."

" आणि तू काय करणार ? किमान तो चहा तरी पी ." आभा म्हणाली.


त्यानं चहा संपवला .


" - आणि कुठे कसं जायचं , आवश्यक ते फोननंबर्स अशी सगळी माहिती त्या टेबलावरच्या रजिस्टर मध्ये आहे . आणि हो , प्रत्येकाच्या नावाचं एक एक पाकीट ठेवलंय , त्यात खर्चासाठी लागणारी रक्कम आहे .ती कम्पलसरी घ्यायची आहे ."

" पण तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ."


" मी ? "


तो गप्प झाला .

त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं .

त्यानं ते वाहू दिलं .

" सॉरी वेदांत , आभानं असं विचारायला नको होतं , मी तिला सांगतो , ती नवखी आहे , उत्साहाच्या भरात विचारून गेली ."

जगननं त्याच्या खांद्यावर हात ठेवला .

" आम्हाला माहित्येय तू कुठे जाणार आहेस . " 

" ए चला रे , उशीर नको व्हायला ."


- सगळे निघाले .

आभा दारातून परत आली .

" सॉरी , माझं चुकलं " 

" इट्स ओके , चलता है , "

त्यानं डोळे पुसत आंगठा उंचावला .

ती बाहेर गेली .


त्यानं मोबाईल हाती घेतला . आणि व्हॉटसअपवर मेसेज टाइप करू लागला ...

" मित्रांनो , आभार नाही मानत मी तुमचे , पण कृतज्ञता व्यक्त करतो . तुम्ही आहात म्हणून इम्युनिटी अनलिमिटेड ला अर्थ आहे . थँक्स !"

मेसेज फॉरवर्ड करून तो उठला .

पुन्हा बसला .

 समोर भिंतीवर आजीआजोबांचं छायाचित्र होतं . 

त्यानं मनोमन नमस्कार केला .

आणि हृदयात कळ उठावी , तसा आभाचा प्रश्न मनात कल्लोळ माजवून गेला .

" तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ..."


काय सांगायचं ?

लहानपणी आईवडील गेल्यावर आजीआजोबांनी वाढवलं ते सांगायचं ?

की आजीआजोबांचा , दोघांचाही कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यावर बेड्स मिळाले नाहीत , ऑक्सिजन मिळाला नाही , ते सांगायचं ?

की ज्यावेळी ते तडफडत होते तेव्हा आपण मदत करू शकलो नाही हे सांगायचं ?

की खूप पैसे जवळ असूनही शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलायला , विचारपूस करायला आपल्याला जमलं नाही , शासकीय व्यवस्थेनं ते करू दिलं नाही , हे सांगायचं ?

की अंत्यदर्शनाऐवजी दोघांची डेथ सर्टिफिकेट्स तेव्हढी मिळाली , हे सांगायचं ?


-- विचार करकरून त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता .


आजीआजोबांना कुठं अग्नी दिला असेल ते माहीत नसल्यानं त्यानं स्मशानात अंदाजानं एका जागेसमोर उभं राहून हात जोडले . 

आणि जड पायानं परत फिरला .


थ्री बेडरूम किचनची मोठाली जागा त्याच्या अंगावर आली .

तो मटकन खाली बसला .


आजीआजोबांच्या छायाचित्राकडे बघताना त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं .


शेवटच्या दिवसात आजी आजोबांना काय वाटलं असेल ? 

त्यांची विचारपूस कुणी केली असेल का ? 

कुणी बोललं असेल का त्यांच्याशी ?

त्यांना वेळेवर जेवण मिळालं असेल का ?

तडफडत असताना माझ्या आठवणीनं हळवे झाले असतील का ?

आपण तरी ऑफिस टूर साठी जायलाच हवं होतं का ?

त्या सात आठ दिवसात सगळ्या भावविश्वात एवढी उलथापालथ ...?


सगळं चुकलंच म्हणायचं आपल्या कडून .


तो मनानं विदीर्ण झाला . खचला . 


पुढच्या आठदहा दिवसात तो वेड्यासारखा फिरत होता . 

हॉस्पिटल्स . 

स्मशानं.

ऍम्ब्युलन्स च्या जागा .

डॉक्टर्स , नर्सेस , सगळे कर्मचारी , पोलीस ...

सगळ्यांना भेटत होता ...


सगळ्यांचं एकच म्हणणं .

सगळ्यांनी इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे .

अन्न चांगलं हवं .

हवा शुद्ध हवी .

औषधं मुबलक हवीत .

शरीरापेक्षा मनानं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे .

आणि सर्वांनी संवाद वाढवला पाहिजे .


- ऍम्ब्युलन्स च्या एका ड्रायव्हरनं एकच वाक्य ऐकवलं .

तो म्हणाला ,

" विचारपूस करणारा कुणी असला की आम्हा सगळ्यांना बळ मिळतं . आणि माणूस कितीही आजारी असला तरी तो बरा होऊ शकतो ."


तो चक्रावला .

त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला .

तो तसाच घरी आला .

आणि त्याच्या डोक्यात अफलातून कल्पना आली .

त्याक्षणी त्यानं नोकरीचा राजीनामा पाठवून दिला , मेलनं .


आणि नव्या उपक्रमाची सुरुवात केली , *इम्युनिटी अनलिमिटेड* , या नावानं .

पुढच्या काही दिवसात तो पुन्हा सगळीकडे हिंडत राहिला .

आपल्यासारखे अनाथ झालेले शोधत राहिला .

त्यांच्या मनात तो उतरू लागला .

एकाचे दोन , दोनाचे सहा व्हायला वेळ लागला नाही .

काय करायचं ते स्पष्ट होतं .

पैशांचा प्रश्नच नव्हता त्याला .


संवाद साधायचा .

विचारपूस करायची .

कसलीही अभिलाषा न ठेवता , इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जेजे करता येईल ते करायचं .


आजी आजोबांना हीच श्रद्धांजली !


त्याला हवा तसा ग्रुप मिळाला आणि अल्पावधीत रिझल्ट्स मिळायलाही लागले .

दिवसेंदिवस ग्रुपमध्ये वाढ होत होती आणि अनेक ठिकाणाहून वाट पाहिली जात होती .


- तो उठला .

आभाच्या प्रश्नानं उठलेलं वादळ शमलं होतं .


त्यानं बॅग उचलली .

त्या बागेत असंख्य खेळणी , वैविध्यपूर्ण खाऊ , गोष्टीची पुस्तकं आणि बरंच काही होतं .


अगदी लहान वयात आईवडिलांचं छत्र हरपलेली अनेक बाळं , त्याची वाट पाहत होती .


डोळे पुसून , आजी आजोबांच्या छायाचित्राला नमस्कार करून तो बाहेर पडला ...


*- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी*

९४२३८७५८०६

-----------

कथा आवडली तर नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .


आणि हो , 

आपल्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अभिप्रायाची सुद्धा वाट पहात आहे .

मराठी गझल

 कोंडमारा


बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे

कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे


फिकाफिकासा ... उदासवाणा... मलूल आहे असा बिचारा...

अजून चाफा अबोल आहे... अजूनही दु:खं आत आहे


खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली 

तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे


 जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे

 तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे


 तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे


पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी 

रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !


अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे ...?

अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?


मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !

मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे ...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  





शुक्रवार, ७ मे, २०२१

नियोजित डीपी फौंडेशन

 


फौंडेशन, पेज व ग्रूपबद्दल थोडेसे : 

          डीपी फौंडेशन हे नियोजित फौंडेशन आहे.‌ त्याचा मूळ उद्देश वैचारिक जनजागृती हा आहे. फौंडेशनच्या नोंदणीबाबतचा निर्णय यथावकाश घेण्यात येईल. मात्र कार्याची महती जाणून ते आधी सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे सद्या ऑफलाईन कार्य करणे कठीण झालेले आहे. मात्र जनजागृतीचे कार्य वैयक्तिक पातळीवर छोट्या स्वरूपात का होईना पण निश्चितपणे सुरू आहे. याला जोड म्हणून जनजागृतीचे कार्य ऑनलाईन सुरू करण्याचा निर्णय डीपी फौंडेशनने घेतला आहे. यासाठीच नियोजित डीपी फौंडेशनचे फेसबूक पेज दि. २९.०४.२०२१ रोजी तयार करण्यात आले आहे. 

        या पेजवर डीपीएफ जनजागृती ग्रूप हा ग्रूप बनवण्यात आला आहे. त्यावर 
दोन प्रश्नांची उत्तरे देऊन मराठीतून लेखन करणारी व्यक्ती अॅडमीनच्या परवानगीने प्रवेश घेऊ शकते. ह्या ग्रूपचा उद्देश अर्थातच ऑनलाईन वैचारिक जनजागृती हा आहे. 

          जनजागृती ही सतत करावी लागणारी प्रक्रिया आहे. सर्वसामान्यांना अनेकदा विविध संभ्रम, अफवा, क्लिष्ट माहिती इ.ना सामोरे जावे लागते. अनेकदा त्यांना गंडे घातले जातात.‌ तांत्रिक व अतांत्रिक अज्ञानाचा गैरफायदा घेतला जाऊन फार मोठी फसवणूक होते.‌ आपलेही फसवणूक करतात, परकेही फसवणूक करतात. कुटुंबात आणि उघड्या जगातही फसवणूक होते. काही वेळा स्वतःच्या अज्ञानामुळे, गैरसमजामुळे , चुकीमुळे वा दुर्दैवामुळेही माणसाची फसवणूक होते .‌ हे टाळण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे !

      आपणांस ग्रूपवर जाॅईन होऊन, दैनंदिन जीवनातील होणाऱ्या फसवणुकीपासून सावध करण्यासाठी लेख , कविता, चुटके, विनोद, स्फूट, चित्रे , आॅडीओ , व्हिडिओ यांचा उपयोग करून विपूल लेखन करता येईल असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फक्त विषय जनजागृतीबाबतच असावा. ग्रूपवर तसे काही विषय अॅडमीन देत असतातच. पण स्वतःला सुचलेले जनजागृतीबाबतचे विषयही लेखक मांडू शकतात.     

         ग्रूपवरील उत्तम लेखनास नियोजित पीडीएफ फौंडेशनच्या पेजवर मानाचे स्थान दिले जाईल. याशिवायही लेखकांना अन्य काही प्रकारे प्रोत्साहन दिले जाईल . 

          आपल्याला कुणाच्याही भावना न दुखावता लेखनातून जनजागृती करावयाची आहे. 

           आपल्याला कोणतेही आंदोलन करायचे नाही. कसलाही पाठपुरावा करायचा नाही. कोणतीही प्रकरणे हाताळायची नाहीत. 

            समयोचित व समतोल दृष्टीने  केलेले जनजागृतीवरील कसदार , उत्तम व मोजके आॅन लाईन लेखन ग्रूपवर अपेक्षित आहे. आपल्या वाचकांसाठी हेही खूप असेल. 

...................................... 

ग्रूपवरील विषय : 

१. कोरोनासंदर्भात अनेक माध्यमांकडून सतत माहिती दिली जात आहे. माहितीची विपुलता मोठ्या प्रमाणावर झाली की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत राहतो. कोरोनाबाबत असे होत आहे का व असल्यास त्यावर काय उपाययोजना करता येईल ? यावर भाष्य करा.

२. कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात काय काय मदत करता येईल ?

३. आपली ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपरिषद / महानगर पालिका याबाबत आपणांस काय माहिती आहे ?

४.फसवणूक ही ऑन लाईन आणि ऑफ लाईनही असते.‌ निवडणुकीत ऑन लाईन आणि ऑफ लाईनही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे ही मतदारांची फसवणूक ठरू शकते का ? चर्चा तर होणारच. (०५.०५.२०२१)

५. कोरोनामय मानसिकता (कोरोनाची भीती , कोरोना फोबिया) तयार होत आहे का ? 

(०७.०५.२०२१)

६. कुटुंबातल्या कुटुंबात कोणत्या प्रकारची फसवणूक होते ? 

(०७.०५.२०२१)


.........................................................