भयानक घटना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भयानक घटना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !


खरेच सांगतो , ही कपोलकल्पित कहाणी नाही ! माझ्या दुस-या ब्लाॅगवर मी इंग्रजी भाषेत यापूर्वी या  विषयावर लिहिले आहेच . काल म्हणजे 10 जानेवारी 2018 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्याने मी अगदी जागा असतांना आणि पत्नीशी बोलत असतांना माझ्या डोळ्यांसमोर जे दिसले , त्याची प्रचिती दुस-या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता आलेल्या फोनमुळे आली ! हा विषय तसा थोडा विचित्रच आहे . सुरूवातीला तरी मलाच विचित्र वाटला होता ! तसे हे सारेच अविश्वसनीय आहे ! माझाही यावर विश्वास बसला नव्हता ! किमान मला पूर्ण जागेपणी , उघड्या डोळ्यांनी काही घटना घडत असतांना दिसतात ! काही माणसे , काही ठिकाणे बसल्या ठिकाणी दिसतात ! नंतर त्या घटना प्रत्यक्षात जशाच्यातशा किंवा थोड्याफार बदलाने घडतात !  !  अगदी अलिकडच्याच दोन घटना पहा . त्यानंतर 11 जानेवारी 2018 रोजी काय घडले ते सांगतो  !

2017 च्या डिसेंबर महिन्यात मी आजारी पडल्याने मला एका हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते . सकाळची वेळ होती . सलाईन लाऊन नर्स गेली होती . माझी पत्नी माझ्याशी बोलत होती . अशक्तपणामुळे मी डोळे मिटून बोलत होतो . अचानक मला आमच्या स्पेशल रूममध्ये पाद्री , नन आणि काही जण क्रॉस घेऊन आलेले दिसले . माझ्या ऊशाशी त्यांनी क्रॉस ठेवला आणि मी डोळे उघडून पाहिले तर तिथे फक्त माझी पत्नीच होती . मी दरवाजाकडे बघितले तर दरवाजा चक्क बंद होता ! मी पत्नीला ह्या चमत्कारिक  देखाव्याबद्दल सांगितले . तेवढयातच  वरच्या मजल्यावर जाणा-या जिन्यावर दाणदाण असे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले ! पाच मिनिटांनी चक्क प्रार्थनेचे शब्द माझ्या कांनी पडले ! डावीकडच्या खिडकीतून पाहिले तर त्या दिशेने वरच्या मजल्यावरून ते शब्द येत होते . तेव्हा मला मघाचच्या पाद्री , नन , क्रॉसचा अर्थबोध झाला  ! हे तसे लगेचच आलेले प्रत्यंतर ! मात्र ,  दुस-या दिवशी दिसलेल्या घटनेचे प्रत्यंतर दोन तीन दिवसांनी आले !

 ती घटना जबरदस्त आहे आणि जगाच्या चिंतेत भर घालणारी आहे !  त्या दिवशीही मला सलाईन लावलेलेच होते. मी आणि माझी पत्नी बोलत होतो . दुपारची वेळ होती . बोलणं थांबलं . मी क्षणभर डोळे मिटले ...आणि मला जे दिसले ते फार भयानक होते ! माझ्या रूमच्या समोरच्या रूममधून एक जगभरात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी बाहेर पडतांना दिसला ! त्याची पॅसेजमध्ये पडणारी पावले मी पाहिली ! पिवळसर सफेद झब्ब्यातल्या त्याला मी स्पष्ट पाहिले ! अवघ्या काही फुटांवरून चालतांना !  त्याच्या चेह-यावर गूढ स्मित होते ! मला या स्मिताचा अर्थ दोन तीन दिवसांनी तो त्याच्याच देशाच्या नजरकैदेतून सुटल्याची बातमी टीव्हीवर पाहिली , तेव्हा कळला ! माझ्या पत्नीलाही या प्रकाराने धक्काच बसला ! पुढे होणा-या घटना मला आधी अगदी जागेपणीसुध्दा दिसतात , यावर आता तिचाही विश्वास बसू लागला होता !

तर पहिल्या परिच्छेदातली ताजी घटना सांगतो . 10 जानेवारी 2018 ला मी माझ्या एका काकांच्या घरात एका खोलीत उभा दिसलो . वेळ रात्री 08 ते 09 ची असावी .  माझ्यासमोर माझे काका अंथरूणावर बसलेले आणि त्यांचे कुटुंबीय अंथरूणात आडवे झालेले दिसले . मी तिथे गेलो तेव्हा ते आपसात बोलत असावेत . मला एवढेच दिसले की माझे काका माझ्याकडे कटाक्ष टाकीत आहेत . ते खूप बारीक झालेले माझ्या लक्षात आले आणि माझी लिंक तुटली . प्रत्यक्षात माझ्या त्या काकांचे निधन होऊन दोन वर्षे झालेली आहेत . मयत काका जिवंत परंतु अतिशय बारीक  दिसले . असं कसं दिसलं असावं , याबद्दल माझी व पत्नीची चर्चा झाली आणि स्मरणकेंद्रात पडून राहिलेल्या काही घटना अशा अचानक डोळयासमोर तरळतात , असे आम्ही दोघेही म्हणालो . मला पटत नसूनही झोप महत्वाची असल्याने मी चर्चेला पूर्णविराम देऊन झोपी गेलो . पण मला काही तरी खटकत होते . मला भीती वाटत होती . काही तरी होणार , अशी मी मनाशी खूणगाठ बांधली होती . झालेही तसेच . मात्र मी शहरामध्ये माझ्या कामात काहीसा व्यस्त असल्याने मी काहीसा गाफील झालो होतो . पण घडणारे घडलेच होते . दुपारी 03.15 ला मला माझ्या एका शेजा-याचा फोन आला . बातमी वाईट होती . माझ्या मित्राच्या पत्नीचे निधन झाले होते ! काल डोळयासमोर मयत काका जिवंत दिसले होते आणि आज जिवंत वहिनी मयत झाली होती . ती नेमकी त्या काकांच्या मागच्या बाजुच्या लगतच्या घरातलीच ! ती बरीच वर्षे आजारीच होती आणि खूप बारीकही झाली होती ! माझ्या मनात ते काकांचे बारीकपण घोळू लागले आणि सगळी उकल झाली ! मी माझे काम गुंडाळले आणि तडक मित्राचे घर गाठले !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
१३.०१.२०१८

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

कोणीतरी आहे तिथे

                     चाहूल  ...

सारे मजेत चालले होते . कालपर्यंत . तसे आज थोडेसे बिनसले . आपली मनात शंका येते ना ! पुन्हा ग्रह फिरले की काय ? पुन्हा संकटांची सुरूवात ? जरा आपण काही ठीक केले की कुठेतरी बिनसते . असे तरी का व्हावे ? सतत सगळे सुरळीत का चालू नये ? नवे प्रसंग , नवी वाट , नवी लढाई की काय ? आपले मनात येते. बाकी तसे ठीक आहे. फारसे बिघडले नाही . थोडी चाहूल मात्र लागली. पाहूया काय होते ते . . .


निराळा अनुभव 


नाही . वाटले होते तसे आणि तितके काहीच वाईट झाले नाही. उलट परिस्थिती माझ्याच हातात आली ! तसा हा अनुभव मला तरी निराळाच आहे .  अनेक वर्षे झाली . सुखाची साधी चाहूलही लागली नव्हती . आता सुख बरेचसे मला ओळखू लागले आहे. प्रथम आपण स्थिर होणे आवश्यक आहे. ईश्वर तेही करीलच . त्यानेच तर एवढे केले आहे. मी प्रथमच त्याचा मनापासून आभारी आहे. शेवटी त्याच्याशिवाय आपले कोणी नाही . तो तर सर्वांचाच आहे.

तीन महिन्यानंतर :


तीन महिन्यानंतर थोडासा वाईट अनुभव आला . पण प्रसंगावर प्रसंगावधानाने मात करता येते हेही आपण अनुभवले ते त्या ईश्वरामुळेच ! ईश्वर सर्वाना सद्बुद्धी देईलच ! काही वेळा कळत नाही.  खरंच कळत नाही.  आपल्या हातात काहीच नसते,  असे वाटते. आपण फक्त पुढे जात रहायचं . आपले आयुष्य आपले असतेच कुठे  ? म्हणजे आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच ! कोण घडवतो हे सगळे ? दिसत नाही पण कोणी तरी आहे तिथे ! त्यालाच आपण ईश्वर म्हणतो का ?

२० जून , २०२३

ये रे माझ्या मागल्या 

अनेक वर्षांनंतर असे अनुभव येत आहेत की ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच मनात शंका निर्माण होत आहे. शंकाच काय , दोन तीनदा तर खात्रीच होत गेली.... पण पुन्हा आपले ये रे माझ्या मागले होत आहे ! आपण केवढे , विश्व केवढे ! आपल्याला यातले नक्की काय कळते ? हा जो अज्ञानीपणा आपण घेत आहोत ना तो चिकित्सकपणाला आणि संशोधनाला मारक ठरतो आहे . पण आपण तरी काय करणार ? काय ते नक्की होत नाहीय. असलाच परमेश्वर तर त्याने यावे की समोर ! तो असा लपून का बसला आहे ? जीवनात इतकी उलथापालथ होत असतांना तो कुठे झोपून राहिला आहे , हेच कळत नाही. चांगले वागा , वाईट वागा , जीवनात दु:खं आहेच ! शांती करा , नवस बोला, काहीही करा , भोग टळता टळत नाहीत ! अशा वेळी ज्याचा #आधार घ्यायचा तोच बेपत्ता ! त्या अज्ञाताची #KYC कशी करायची ? तो आहे तर संभ्रमात का टाकतो आहे ? की त्यालाही कधी प्रगट व्हायचं हा संभ्रम पडलाय ? त्याचाही ये रे माझ्या मागल्या झालाय ?  आपला मेंदू माणूस म्हणे दहा टक्केच वापरतो. पण मग नव्वद टक्के कुठे लपून राहिलाय ? तो कसा कळणार ? त्याला कुठे शोधायचे ? की नुसतेच म्हणत बसायचे : कोणी तरी आहे तिथे ! खरंच का आहे तो तिथे ? दिसला , भेटला कधी तुम्हांला तर सांगा मला !

#kyc


#kyc_of_god


#kycofunknown


#somebody_is_there


#कोणीतरीआहेतिथे