बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

देवाला जन्माला घालणारा माणूस


देवाला जन्माला घालणारा माणूस 

देवाला जन्माला घालणारा माणूस मला सापडला तेव्हा मला प्रत्यक्ष देवच सापडल्यासारखे झाले ! मी समाधिस्त असताना, माणसाला जेव्हा भाषा बोलता येऊ लागली त्या काळात भ्रमण करीत होतो . त्या काळात माणूस भाषासंपन्न झाला होता . तो आपले विचार दुसऱ्याला समजावून सांगू लागला होता . एकाचे विचार इतर काहीजण ऐकू लागले होते. त्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडू लागला होता. 


ते एक जंगल होते ....

भ्रमण करताना मला असेच काहीसे चित्र दिसले. मी मानवी स्वभावाला अनुसरून तिथला रस्ता धरला . ते एक जंगल होते . मी पाहिले , एक जण चार माणसांना काही तरी सांगत होता . ते शब्द ऐकू येत असले तरी ती त्या काळची भाषा मला कळत नव्हती .मी विज्ञान युगातला असल्याने भाषायंत्र सुरु करताच मला माझ्या भाषेत सारे कळू लागले .

असंख्यांची जंत्री करण्यापेक्षा एकच बरा..


तो त्यांचा म्होरक्या होता. तो म्हणत होता , " मित्रांनो , हे विश्व फार मोठे आहे . ते कुणी निर्माण केले हे कुणालाच कळलेले नाही . खरे तर अनेकांचा हातभार ह्या निर्मितीला लागला असणार . पण एकाचा वा अनेकांचाही शोध घेणे आपल्याला जमणारे नाही . पुन्हा याचे क्रेडीट घेण्यावरून सुंदोपसुंदी होईल ती वेगळीच ! यातून एक मार्ग आहे . तो म्हणजे , असंख्यांची जंत्री करण्यापेक्षा हे विश्व कुणा एकानेच निर्मिले असे जाहीर करावे असे मला वाटते . "

झाकली मूठ सव्वा लाखाची...


यावर चौघांनी माना डोलावल्या . म्होरक्या पुढे सांगू लागला , " असेही आहे की तो एक कोण आहे , कुठे आहे , कसा दिसतो हे प्रश्न विचारले गेले तर आपल्याला त्यांची उत्तरेही देता येणार नाहीत . यापेक्षा तो अदृश्य आहे असे सांगितल्याने हे सर्व प्रश्न आपोआपच संपुष्टात येतील ! ज्यांना शोध घ्यायचा असेल ते आयुष्यभर शोध घेत राहूदेत ! आपल्यापुरता हा प्रश्न आता कायमचा संपला आहे. हे विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे , तो सर्वशक्तिमान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो अदृश्य आहे , एवढेच आपण सांगायचे आहे . झाकली मूठ सव्वा लाखाची असते , एवढेच लक्षात ठेवा ! काय ? "

यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला दूर निघून गेले . माझ्या रेंजच्या बाहेर असल्याने मला त्यांचे पुढील बोलणे ऐकू आले नाही. पण एक कळले की तो माणूस मानव जातीतला महावस्ताद असला पाहिजे ! माणूस अदृष्याला घाबरतो , अदृष्याच्या नावावर काहीही खपवता येते आणि ते सर्व माना डोलवून मान्य करतात , हे त्याने पक्के जाणले होते .

मी पुन्हा आपल्या काळात आलो . बाहेर पहिले तर तसाच एक माणूस चार माणसांना काही तरी सांगत होता . नीट कान देवून ऐकले आणि मी उडालोच ! हा माणूस स्वत:ला त्या चौघांचा पुढारी म्हणवून घेत होता . हा तर त्या जुन्या काळातल्या महावस्ताद माणसाचाही बाप निघाला होता ! तो त्यांना सांगत होता : " दोस्त हो , परमेश्वर मीच आहे ! तेव्हा माझ्या छत्राखाली या . जे येणार नाहीत ते माझे असणार नाहीत आणि जे माझे असणार नाहीत त्यांचे अस्तित्व सन 2015 नंतर राहणार नाही ! काय ? चला , लागा कामाला ! "

अंधभक्तीची सुरूवात !


गंमत म्हणजे याही " काय ? " वर अनुयायांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ते माना हलवीत त्यांना सापडलेल्या परमेश्वराचा प्रसार करायला निघून गेले ! मित्र हो , ती अंधभक्तीची सुरूवात होती ! 
..............

26.08.2020

वरील लेख 2015 मध्ये लिहिला होता. त्या लेखाशी सुसंगत लेख तंत्रशिक्षण समन्वय या व्हाॅटसअप ग्रूपवर सापडला , तो वाचकांसाठी इथे देत आहे. 

मी तुझा का भक्त होऊ सांग देवा ?
-
ज्ञानेश वाकुडकर 
•••
देव ही संकल्पना ज्या कुणाच्या मनात सर्वात आधी आली असेल, त्याच्या मनात भीती असावी, कुतूहल असावं की कृतज्ञता.. हे नक्की सांगता येणार नाही. पण जेव्हा एखादं फुल उमलताना पाहिलं तेव्हा त्याला देव आठवला असेल का ? एखादा महापूर, एखादं वादळ, निसर्गाचं रौद्र रूप किंवा एखादा भूकंप पाहून त्याला वाटलं असेल का, की ह्या साऱ्याच्या मागे एक अज्ञात शक्ती आहे ? ह्या साऱ्या घटना आपण कंट्रोल करू शकत नाही, म्हणजेच कुणीतरी मोठी शक्ती तिच्या मर्जीनुसार हे सारं घडवून आणते ? हे लक्षात आल्यावर माणसाला वाटलं असेल का, की आपण कुणाच्या तरी हातातील खेळणं आहोत ? अचानक आभाळातून वीज पडते आणि ज्यावर पडते त्याचा बघता बघता कोळसा होऊन जातो, हे बघून त्याला वाटलं असेल का की वर आकाशात कुणीतरी बसलं आहे आणि तीच शक्ती आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे. त्याचा कोप झाला की आग लागू शकते, महापूर येवू शकतो, भूकंप होऊ शकतो ? आणि मग त्याला काहीतरी नाव द्यायचं म्हणून त्यानं देव म्हटलं असेल का ? गॉड म्हटलं असेल का किंवा अल्ला म्हटलं असेल का ? पण पहिला शब्द कोणताही असो, तो निश्चितच निसर्गाला उद्देशून होता या बद्दल शंका नाही !
-
मात्र काळ पुढं सरकत गेला. माणूस अनुभवातून शिकत गेला. त्याबरोबर काही हुशार लोकांना निसर्ग चक्राची कल्पना यायला लागली. त्यातल्याच काही धूर्त लोकांनी मग इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी, आपल्या वर्चस्वासाठी आणि नंतर शोषणासाठी देव या संकल्पनेला जन्म दिला ! आपल्या सोयीनुसार वापरणं सुरू केलं ! पण मुळात देव असो, गॉड असो की अल्ला असो, ही संकल्पना निश्चितच निसर्गासाठी होती ! त्यात काही चूक होती असंही नाही. नंतर मात्र त्यात बदमाशी घुसली. भेसळ झाली. अंधश्रद्धा आली. भुतप्रेत आले. जादुटोणा आला. चमत्कार आले..! एकदा देव आला म्हणजे त्याचा विरोधी पक्षही आला. खरं तर, जग म्हणजे सजीवाच्या जन्मापासून आजपर्यंत अखंड चालू असलेलं अफलातून महानाट्य आहे. माणसानं त्यात विशेष रंगत आणली एवढंच ! असंख्य हिरो, असंख्य व्हिलन, असंख्य पात्र आणि असंख्य नाट्यमय घडामोडी !
-
निसर्ग व्यवहाराचा आधार घेवून देव ही संकल्पना आधी वेगळी काढण्यात आली ! सर्वात आधी देव आणि निसर्गाची फारकत करण्यात आली ! त्याचे नियम, कायदे, कथा माणसांनीच तयार केले ! त्या अर्थानं माणूस हाच देवाचा बाप आहे ! देवानं माणूस निर्माण केला नाही ! माणसानच देव निर्माण केला ! स्वतः माणूस हा निसर्गाची अद्वितीय निर्मिती आहे !  
-
देव आला म्हणजे, मग त्याचा आणि पर्यायानं आपला दरारा कायम राहावा यासाठी धर्म निर्माण केला गेला. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक अशी आमिषं आणि भीती निर्माण केली गेली. अर्थात त्यातले जे लोक सभ्य होते, त्यांनी धर्माचा सकारात्मक वापर केला, जे स्वार्थी होते, कपटी होते, त्यांनी दुरुपयोग केला. धर्म असो की कोणतीही व्यवस्था, त्यात ह्या दोन्ही प्रवृत्ती प्रत्येक काळात कमी अधिक प्रमाणात असतातच ! अगदी अलीकडचीच गोष्ट पाहिली तर ज्यावेळी गरिबापासून श्रीमंतापर्यंत सारा देश एकजूट होऊन इंग्रजांच्या विरोधात लढत होता, त्याचवेळी काही लोक मात्र इंग्रजांची दलाली करत होते. मालगुजारी, वतनदारी मिळविण्यासाठी सारी नीतिमत्ता गुंडाळून बसले होते. देशाशी गद्दारी करत होते ! धर्म हा त्याला अपवाद असू शकत नाही.
-
स्वतःच्या जगण्यातला आनंद शोधतांना आणि इतरांच्या जगण्यात मिठाचा खडा न घालता, साखर घालण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच धर्म..! 
-
देवाचं अस्तित्व मानणारे आणि न मानणारे असे दोन वर्ग जगात आहेत. संतांनी सुद्धा देव आहे म्हणत म्हणत देव नाकारण्याचाच प्रयत्न त्यांच्या साहित्यातून केला आहे. खरा देव माणूस आणि स्वतःमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे.  पण धूर्त लोकांनी प्रत्येक प्रवाह गढूळ करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. संत, महापुरुषांच्या शिकवणी मध्ये अनेक गोष्टी मुद्दाम घुसवल्या गेल्यात. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात जर एवढ्या खोट्या गोष्टी पसरवल्या जाऊ शकतात, मग तेव्हा तर रानच मोकळं होतं. महात्मा फुल्यांनी सुद्धा देव नाकारताना निर्मिक हा शब्द वापरला. अर्थातच तो निसर्गाला उद्देशून आहे, यात संशय नाही. मला स्वतःला 'उपरवाला' हा शब्द झकास वाटतो. कारण तो दोघांनाही चालू शकतो.
-
अर्थात, निसर्ग हाच आपला सर्वांचा जन्मदाता आहे. तोच सर्वांचा बाप आहे. तोच सर्वशक्तिमान आहे. निसर्गाच्या एका तडाख्यात सारं सारं उध्वस्त होऊ शकते, यात संशय नाही. पण म्हणून त्या भीतीनं मुंगीनं वारूळ बांधूच नये का ? चिमणीनं घरटं आणि माणसानं घर बांधूच नये का ? 

मला मूर्तीमधला देव मान्य नाही. मला व्यक्तिपूजा असो की मूर्तिपूजा मुळीच मान्य नाही. मी कुणाचाही भक्त नाही. होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! मात्र दोस्ती ही माझ्यासाठी सर्वोत्तम आनंददायी गोष्ट आहे ! दोस्ती एकदुसऱ्याला समजून घ्यायला शिकवते ! सहअस्तित्व मान्य करायला शिकवते !  

मला दोस्ती करायचीच झाली, तर निसर्गाशी करीन ! किंवा निसर्गासारखा नितळपणा जिथं जिथं दिसेल तिथं माझ्या मैत्रीला जागा असेल ! खऱ्या अर्थानं निसर्ग हाच माझा देव आहे ! तोच माझा अन्नदाता आहे ! तोच मला तारणारा आहे.. तोच मला मारणाराही आहे ! त्याशिवाय दुसरा कोणताही देव अस्तित्वात नाही, याची मला खात्री आहे. तसा माझा ठाम विश्वास आहे. देव असलाच तर तो माणसात आहे. माणसाच्या सेवेत आहे. करूणेत आहे ! शुद्ध आचरणात आहे ! कुठल्याही पोथीत नाही, पुराणात नाही, पुस्तकात नाही. मंदिरात नाही, मशिदीत नाही, चर्च मध्ये नाही, गुरूद्वारा मध्ये नाही ! कुठल्याही प्रार्थनेत नाही. तो फक्त आणि फक्त आपल्या आचरणात आहे ! प्रार्थना वेगळी आणि आचरण वेगळे, समतेशी विसंगत असेल, कपटी असेल, मनात द्वेष असेल, तर साऱ्या प्रार्थना, साऱ्या प्रतिज्ञा निरर्थक आहेत ! बकवास आहेत !

मी तुझा का भक्त होऊ सांग देवा
वाटले तर छान पैकी दोस्त होऊ !

तूर्तास एवढंच..
-
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
-
( #टीप - माझे सर्व लेख, कविता कुणालाही सोशल मीडिया, प्रिंट मीडिया किंवा अन्यत्र सामाजिक उद्देशाने वापरण्यासाठी, कॉपी करण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी, पाठविण्यासाठी माझी वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. हीच परवानगी समजावी. धन्यवाद. )
-
संपर्क - 9822278988 /  9325589603 /  8055502228 / 9004397917 / 9545025189

...........

#अंधभक्ती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: