शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?

हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?


निकालोत्तर धूमश्चक्री 


गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यात निवडणूक निकालोत्तर धूमश्चक्री चालू आहे . युती म्हणून निवडणूक लढून आणि जिंकूनही दोन मोठे पक्ष मोठा भाऊ छोटा भाऊच्या भाऊबंदकीत अडकले आहेत . यापैकी सर्वात मोठ्या पक्षाने सरकार स्थापनेत पुढाकार घेणे किंवा युतीधर्म म्हणून संपूर्ण युतीनेच पुढाकार घेवून सहजशक्य असलेले सरकार स्थापन करणे अपेक्षित होते .  निकालानंतर दहा दिवस उलटत आले तरी राज्यासमोरचे लोकांचे प्रश्न बाजूला ठेवण्याईतपत कोणते अडथळे आहेत , हे कोणीही जाहीर करीत नाहीत . मी येणार , मी येणारच्या अतीउत्साही आरोळयाही केव्हाच हवेत विरल्या आहेत . अजूनही कोणी वाघ बनतो आहे तर कोणी वनरक्षक बनतो आहे . हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ? कोण गाजराची शेती करतो आहे तर कोण राष्ट्रपती राजवटीचे भीतीयुक्त गाजर दाखवतो आहे . एकूण शिवरायांच्या या महाराष्ट्रात रयतेला राज्यकारभाराच्या पध्दतीचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे ! ही लढाई खरी आहे की लुटूपुटूची आहे , हेही जनतेला कळत नाहीय. निवडणूकीपूर्वी मोठमोठी भाषणे करून जनतेकडे मते मागायची आणि निवडून आल्यानंतर आपसात भांडत बसायचे , हे अनाकलनीय आहे . राजकीय अपरिपक्वतेचीच ही निशाणी आहे . राज्य ही गोष्ट गंभीरपणे घ्यायची असते . कोलांट्या  माकडउडयांसाठी कुणाला दिलेले मोकळे मैदान म्हणजे राज्य नव्हे . राज्यकारभार गंभीरपणे आणि खंबीरपणे करावयाची बाब आहे . त्यासाठी स्थिर सरकार देणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे . वैयक्तिक किंवा पक्षाच्या हीत वा अहंकारापेक्षा राज्य किंवा राष्ट्र नेहमीच मोठे असले पाहिजे .

उशीर होऊ शकतो , पण... 

सरकार स्थापनेला उशीर होऊ शकतो . पण त्याबाबतीतल्या हालचालींचे संकेत तरी लोकांना दिसले पाहिजेत. काही वेळा म्हणे ज्योतिषाला विचारून सत्ता स्थापनेचा मुहुर्त जाहीर केला जातो . पण इथे ठोस तारीख जाहीरच होत नाही . दहा दिवसात दोन पक्षात याबाबत कोणतीही चर्चाच होवू नये , हे संयुक्तिक नाही. दिवाळी असली तर तीही राज्याच्या सर्वात महत्वाच्या कामांसमोर किती दिवस करायची , हाही प्रश्न उरतोच. अती झाले की दिवाळीचाही शिमगा व्हायला वेळ लागत नाही . लोकांनी पारदर्शक वागावे ही अपेक्षा करतांना सरकारनेही तितकेच पारदर्शक असणेही महत्वाचे असते . पारदर्शक राज्यकारभार ही नंतरची गोष्ट झाली . राज्यकारभाराला शुभारंभ नक्की कधी होणार , हे तरी लोकांना वेळेवर कळले पाहिजे . नुसती मतदानाची लोकांना घाई करायला सांगून उपयोग नाही . त्यांनी केलेल्या मतदानाचा योग्य आदर राज्यकर्त्यांकडून झालाच पाहिजे . थोडक्यात , लोकांना अधिकृतपणे माहिती कळलीच पाहिजे . सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी चालविलेली एक यंत्रणा आहे . हया यंत्रणेने निवडून आल्यानंतर लोकांना अंधारात ठेवणे योग्य नाही .


लोकशाहीचे भान 

काही गोष्टी अशा असतात की तुमच्याही नकळत त्या तुमच्याविरूध्द आपोआप साचत असतात. सत्तेच्या धुंदीत वा अती कर्तव्यकठोर झाल्याने तुम्ही त्या केल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाहीत .  तुमची वेळ भरली की त्या तुमच्यासमोर उभ्या राहतात. या देशात लोकशाही आहे , याचे भान सतत ठेवावे लागते . ज्यांनी या देशाचा पाया रचला त्यांना पुढे तुम्ही काय करणार याची कल्पना होती . त्यांनी तुमच्या सगळया चावटपणावर आधीच इलाज करून ठेवला आहे आणि त्याची प्रचिती तुमचा फाजीलपणा वाढला की तुमच्या फाजील आत्मविश्वासाला      जाणा-या तडयातून तुम्हांला येतेच येते . लोकशाही ही कुणाला भीती दाखवून किंवा सतत गाजर दाखवून फार काळ करता येत नाही. ईतिहास नाकारला तर तोच बोकांडी बसतो ! मग सगळे सुरळीत होत असतांना अश्वमेधाचा वारूही रोखला जातो . कमावलेली किंवा नशिबाने लाभलेली ईज्जत पार धुळीस मिळते ! फाजील तोंड आणि फाजील आत्मविश्वास तोंडघशीच पाडतात !


सरकार स्थापन होणे आवश्यक आहे 


आता ही गेलेली ईज्जत मिळवायची झाली तर त्यासाठीही एकच मार्ग आहे . निमूटपणे लोकांना जाहीर सत्य निवेदन करून मुकाटपणे ,  आता अबकी बार वगैरे कुचकामी ठरलेल्या घोषणा न देता , कोणी तरी सरकार स्थापन करणे , म्हणजे लोकांचे काम शत प्रतिशत होईल . तेच होणे आवश्यक आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: