बुधवार, २४ जून, २०२०

Gazalmanthan to corona


मागे - पुढे

24.06.2020 

     दि. 12.06.2020 ला इथे लिहिलं होतं . म्हटलं बारा दिवसांनी जरा मागे-पुढे पहावे. तसे हल्ली काही ना काही घडतेच आहे. शिवाय कोणी ना कोणी तरी बोलायला येतेच. त्यामुळे माझे ब्लाॅगलेखन थोडेसे थंडावलेच आहे.  गेले काही दिवस पाऊसही जोरदार पडतोय. हल्ली रात्रीचाही कहर करतोय. वयानुसार झोप कमी झाली असली तरी पावसामुळे थोडी अधिक झोप मिळते. डासही जरा कमी त्रास देतात. दि. 22.06.2020 रोजी श्री. अमेय धोपटकरने पावसाळी कवितांची लाईव्ह मैफील रत्नागिरीत मस्तच जमवली.  तिचा आनंद अनेकांनी घेतला. ही मैफिल फेसबूकवर व अमेय धोपटकर या यूटयूब  चँनेलवर उपलब्ध आहे. परवा ही मैफील तर काल या मैफिलीबद्दल शुभम कदमशी बोलतांना आपलाही एक मुशायरा व्हावा व आपला म्हणजे गझलकारांचा व्हॉट्सॲप ग्रूप करावा , अशी ईच्छा त्याने व्यक्त केली. माझ्या हे बरेच दिवस मनात होतेच. मी परवाच मैफिलीतल्या गझलप्रेमी कवयित्री सौ. अमृता नरसाळे यांच्याशी नेमके असेच बोललो होतो. मला या  योगायोगाचे मोठे आश्चर्य वाटले ! शुभमशी बोलता बोलता मी इतर गझलकारांशी संपर्क करीत होतो. उत्तम नियोजक , सूत्रसंचालक व विश्लेषक तसेच गझलप्रेमी मित्र विनय परांजपेसह गझलकार श्री. विजयानंद जोशी , सौ. वसुंधरा जाधव , शुभम कदम , या  सर्वांनी असा ग्रूप करावा असेच सांगितले. मी लगेच ग्रूप बनवला. रात्री 10.57 मिनिटांनी हा ग्रूप अस्तित्वात आला व लगेच त्यावर प्रारंभीचे विचारमंथनही सुरू झाले.  सर्वांनी ग्रूपसाठी नांवे सुचवली होती. त्यापैकी गझलमंथन हे श्री. विजयानंद जोशी यांनी सुचवलेले नांव निश्चित झाले. असं करता करता साडेअकरा वाजले तसा मी मोबाईल दूर ठेवून झोपी गेलो. हा तर सकाळी सहा वाजता जाग आलीच. मागच्या दारी जाऊन पाणी व्यवस्था व्यवस्थित केली.  काल उर्मिच्या घराचा स्लॅब झाला. बाकी सत्त्या, संत्या आणि कंपनीचे नेहमीप्रमाणे सुरूच आहे. लंबूवहिनी आता बरीच कमी झाली असली तरी दिवसातून किमान एकदा तरी आमच्या घरी पायधूळ झाडतेच !

          तिकडे पुढे म्हणजे फार पुढे राजकारण फारच पुढे जाते आहे. नेपाळसारखे राष्ट्र ज्याचे डोळयांवर अट्टाहासाची पट्टी लावलेले काही भारतीय लोक हिंदू राष्ट्र , हिंदू राष्ट्र म्हणून 
कौतुक करत होते, त्यानेच भारताविरूध्द डोळे वटारायला सुरूवात केली आहे. चीन तर सायबर हल्लेही म्हणे चढवू लागला आहे आणि आपण सीमेवर घुसखोरी झाली , झाली नाही , याचे राजकारण करण्यात मश्गुल आहोत. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करायचा का , की फक्त पाकीस्तानविरूध्दच वापरायचा , हाही प्रश्न पुढे येऊ शकतो ब्बा ! कोरोना तर आता सोबतीलाच असल्यासारखी परिस्थिती आहे.  आजकाल मागे पुढे हे असे चालले आहे ....



( क्रमश: )
...........











     








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: