शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

दोन मराठी गझला

      सत्य 


रोखलेली आसवें मोकळी कर !

काळजाशी तू मला एकदा धर !


कोणते हे अंतरी दु:खं आहे ?

कोंडलेले हुंदके बोलु दे तर !


मेघ हृदयी थांबले का कळेना...

सांग हृदयी थांबली का बरे सर...


हया उन्हाला रोजचे सोसशी तू 

काय बोलू ; सावली भाजते जर !


कोणते हे सत्य जे झाकशी तू ?

हा कशाला चेहरा चेह-यावर ?



.... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील


..............................................


        दरी 


मला आता जरा शंका तुझी आली खरी आहे

सुखा तू थांब दाराशी ; व्यथा माझ्या घरी आहे !


कधीपासून ते मीही स्वत:शी बोललो नाही

तुला जे सांगतो आहे मनाच्या मंदिरी आहे !


तुला आता हवी आहे कथा माझ्या जवानीची

तुलाही वाटते आहे ... तिथे काही तरी आहे ... !


तुझ्यावर शेर एखादा मला आता करू दे ना...

मला तू सांग आता जे तुझ्याही अंतरी आहे !


कितीसे खोल जावे मी ... कितीसे खोल जावे तू ...

कळेना खोल प्रेमाची कितीशी ही दरी आहे !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .