सोमवार, १४ जून, २०२१

मी सुंदर स्वप्नांचे

 मी सुंदर स्वप्नांचे


मी सुंदर स्वप्नांचे इमले बांधत असतो

वाळुवर पाण्याने चित्रे रेखत असतो



आयुष्य पुढे मागे सरकत बिरकत असते

माझ्याच हिशेबाने पण मी चालत असतो



होईल मनाजोगे... होईल कधी काळी...

मी आत असा माझ्या मज समजावत असतो



गावात कधी गेलो की आग्रह होतो अन्

मी पिंपळपारावर गोष्टी सांगत असतो 



हे दु:खं मला बघते बिलगून बसायाला

हटकून असा त्याला मीही टाळत असतो



संदर्भ जुने काही जातात पुन्हा लागुन

एकेक क्षणामधुनी मी मज शोधत असतो



ते फूल वहीमधले अजुनी छळते आहे

मी याद तुझी माझी अजुनी काढत असतो


हा बंद तुझा आता बाजार जगा झाला

घरट्यात स्वतःच्या मी आता हिंडत असतो


... देवीदास हरिश्चंद्र पाटील   


टीप  : मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: