मंगळवार, १६ जुलै, २०२४

उद्याचा विचार

 

उद्याचा विचार


हो, कितीही झालं तरी काल , काल रहातच नाही. नाही म्हणजे कितीही कालमध्ये म्हणजे भूतकाळात रमलात तरी वर्तमानात यावंच लागतं ! दुनिया व्यवहारांवर चालते राव ! स्वप्नरंजनात फार काळ राहता येत नाही. मनात मांडे खात राहिले तर आपलीच लाथ मडक्यावर बसते , मडकेही फुटते आणि स्वप्नंही तुटते ! हाती धुपाटणे येते. आपण अब की बार कशाच्या पार जाऊन पोचतो ते कळतच नाही. स्वप्ने पाहणे वेगळे आणि काहीच कृती न करता ती नुसतीच पहात बसणे वेगळे ! भानावर यावेच लागते. जसा आजचा विचार पडतो तसाच उद्याचाही विचार पडतोच. अर्थात जो विचारी असतो त्यालाच विचार पडतो म्हणा. बरोबर ना ? तुम्ही पण हाच विचार करताय ना ? विचारी आहात ! करणारच. दुसरा कसला विचार नाही पडलाय मला. उद्या लेखनासाठी कुठला विषय सुचतोय , हाच एकमेव विचार पडलाय मला ! मारून मुटकून आपण लिहीत नाही. तुम्हांला काय वाटलं ? नाही म्हणजे, तुम्हांला वेगळं वाटणं अगदी स्वाभाविकच आहे ! कारण, अनेक विचार पडतात माणसाला ! काय काय व्याप आणि उपदव्याप करावे लागतात ते ज्याचे त्यालाच माहिती ! बरोबर ना ? भोग असतात ते ! भोगायलाच लागतात ! त्याशिवाय पुढे जाताच येत नाही.

भीष्म पितामहांचा एक संदर्भ

ह्या भोगांवरून आठवलं. परवाच एक व्हिडीओ तोही व्हाॅटस अॅपवर पाहण्यात आला. त्यात भीष्म पितामहांचा एक संदर्भ देण्यात आला होता. त्यांना शरपंजरी मरण येणार ते पूर्वजन्मातील घटनेमुळे येणार असं श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. तेही मागच्या ५२ व्या वर्षातील घटनेमुळे. भीष्मांना एवढे पूर्वजन्म पाहण्याची शक्ती होती. आपल्याला याच जन्मातील कालचं आज आठवत नाही. ५२ पूर्वजन्म कुठले आठवणार ! ते न आठवो, पण एक प्रश्नं मात्र इथे पडतोच. तो म्हणजे भीष्मांच्या आयुष्यात ती घटना कोणी निर्माण केली ? तो सरडा त्यांच्या नेमका वाटेत कोणी आणला आणि बाणाच्या टोकाने त्याला उडवायची सणक भीष्मांना त्या पूर्वजन्मात आली कशी ? असा विचार त्यांच्या मनात आला कसा ? बरं, आला आणि त्यांनी तो सरडा बाणाच्याच टोकाने का उडवला ? उडवलाच का ? त्याला त्याच्या वाटेनं जाऊ का नाही दिलं ? तोही निवडुंगावर जाऊन पडलाच कसा ? तिथे नेमकं निवडुंगच कसं उगवून राहिलं होतं ? हे नियोजन इतक्या कल्पकतेने आणि अचूकपणे कोणी केलं असावं ? ही त्या मास्टरमाईंडची नैतिकवगैरे जबाबदारी नाही का ? हा कोण कट टू कट मास्टरमाईंड आहे ? कुणाला सापडला तर सांगा. तोवर उद्या कोणत्या विषयावर लिहावे याचे मी चिंतन करतो. तोपर्यंत आजचा लेख तर तयार झाला ! हेही नसे थोडके ! आता उद्याचा विचार...


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

पुढच्या वर्गात गेल्याबद्दल बक्षिस

 मोफत वह्या वाटप

गेली तीन वर्षे आम्ही दोघे बंधू शाळांमध्ये जमेल तेवढं  मोफत वह्या वाटप करतो. मी वाटप व्यवस्था बघतो.  वाटप करतांना एक गोष्ट लक्षात आली. काही मुलांनाच मोफत वह्या नको असतात. कदाचित , त्यांचा या सगळ्या सामाजिक कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकेल. कदाचित, त्यांच्या पालकांना ते आवडत नसावे. घरात या विषयावर बोलणे होत असावे. पालक श्रीमंत असोत वा गरीब असोत. ते स्वाभिमानी असू शकतात. त्यांना कोणाची मदत घेणे आवडत नसावे. ते त्यांच्या पाल्यांना वह्या विकत घेऊन देण्यास सक्षम असतील. साहजिकच,  त्यांच्या मुलांनाही काही मोफत घेणे आवडत नसावे. संस्कार असू शकतात. अशी मुलं वर्गातही घरच्या संस्कारांना अनुसरून मोफत वह्या घेण्यास नकार देतात यात गैर काहीच नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. मात्र, त्याचा परिणाम इतर विशेषतः गरीब मुलांवरही होऊ शकतो. गरज असूनही मदत ही भीक समजून विचार होऊ लागला तर प्रश्न उभा राहतोच.

In the school with students

मग हा प्रश्नं मुलांचा स्वाभिमान न दुखावता कसा सोडवता येईल याबाबत विचार सुरू केला. कारण , काहींचे ठीकच होते. ते वह्या विकत घेऊ शकत होते किंवा परवडत नसतांनाही विकत घेऊन स्वाभिमान जपू शकत होते. काही अपवादही असतात, तसेच समजायचे. म्हटलं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊदे.‌ तेही चुकत नसतील. आपणही चुकायचं नाही. आपण आपल्या मार्गाने जाऊ, पण मोफत वह्या वाटप करुच. विशेषत: ग्रामीण भागात याची फार मोठी आवश्यकता असल्याचे गेल्या तीन वर्षांत आढळून आले होते. पण आवश्यकता असूनही काही पालकांचा म्हणा, मुलांचा म्हणा, स्वाभिमान आडवा येत होता. नजरेसमोर गरजू दिसत होते. या मानसिकतेतून गरजूंना बाहेर कसे काढायचे ? गरजूंमध्ये अशा चुकीच्या प्रकारे स्वाभिमानाची साथ पसरली तर ते समाजहीताच्या दृष्टीने योग्य होणार नव्हते.  माझी तगमग, अस्वस्थता वाढत चालली होती.  काही तरी करणे भाग होते. कारण या वर्षीच्या वह्या वाटपाला सुरूवात करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती. शाळा पंधरा जूनला सुरू होणार होत्या.

अखेर , १४ जून उजाडला ! संस्कारवाली एक विद्यार्थीनीं घरासमोरच्या रस्त्याने जातांना दिसली आणि उत्तर सापडले ! मी तिला लगेच हाक मारून बोलावले. ती आलीही. मी उद्यापासून वह्या वाटप करणार आहे हे तिला सांगतानाच हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे, असं सांगितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती म्हणाली, " काका, उद्यापासून कशाला ? मला आजच, आताच द्या की वह्या ! " मी तिथेच यंदाच्या मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ केला ! आता मी ज्या शाळेत जातो तिथे आवर्जून ' हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे ' हे वाक्य ऐकवतो ! मुलं हसून वह्या स्वीकारतात. मुलं चांगली असतात. निर्मळ मनाची असतात. त्यांना फक्त योग्य प्रकारे संस्कारांकडे वळवावं लागतं , हा अनुभव आणि हे उत्तरही २०२४ च्या वह्या वाटपात सापडले !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

गुरुवार, ४ जुलै, २०२४

खोके नि पेट्या मिळवा

 राजकीय लावणी


खोके नि पेट्या मिळवा 

राया तुम्ही संपत्ती कमवा  || धृ ० ||  राया तुम्ही...


सत्ताधारी असो वा परका

तुम्ही गळाभेट घ्या बरं का ...

काढा फोटो, सोबत मिरवा...   || ०१ || राया तुम्ही...


बघू नका रंग हिरवा 

करू नका हट्ट भगवा

स्वार्थाचे चित्र रंगवा ...           || ०२ || राया तुम्ही...


बघा कोण किती देतो

कोण सोबतीने नेतो

हवी तेव्हा टोपी फिरवा...        || ०३ ||  राया तुम्ही...


बसून खातील पिढ्या सात

पडणार नाही कसली ददात

बंगले नि माड्या बनवा...        || ०४ || राया तुम्ही...


सोडा शामळूपणा आता

तुम्ही बाईकने का हो जाता ?

चार चाकी गाड्या उडवा....     || ०५ || राया तुम्ही...


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

०४.०७.२०२४ सकाळी०९.१०

सोमवार, १ जुलै, २०२४

गझलकार देवीदास पाटील यांची मुलाखत प्रक्षेपित

 गझलसम्राट सुरेश भटांचे शिष्य मराठी गझलकार देवीदास पाटील यांची रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून मुलाखत प्रक्षेपित 

मुलाखतीचा व्हिडीओ पहा : 


आकाशवाणी रत्नागिरीवर कवीवर्य सुरेश भटांचे शिष्य व रत्नागिरीमध्ये मराठी गझल प्रथमतः सुरू केली त्या देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून अलिकडेच प्रसारित झाली होती. ती वरीलप्रमाणे  व्हिडीओ स्वरूपात यू ट्यूबवर दि. ०१.०७.२०२४ रोजी अपलोड करण्यात आली आहे. रसिक त्यांचा आनंद घेत आहेत. 

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र

#interview

#AIR