बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

ही उपेक्षा का ?

 ही उपेक्षा का ? 


संगीतकार राम कदमांवरची किरण माने यांची पोस्ट अलिकडे फेसबूकवर वाचनात आली. तिची लिंक अशी आहे :

https://www.facebook.com/share/dycaxtaCZ3F1zNFY/?mibextid=oFDknk. 


राम कदमांसारखा मराठीतील एक संगीतकार आजच्या एका मराठी तरूणाला माहीत नसणे आणि कदमांची त्यांच्या हयातीत उपेक्षा होणे, या दोन गोष्टी किरण मानेंच्या मनाला फार लागल्या. त्याबाबत त्यांनी कदमांच्या प्रेमापोटी व आत्यंतिक तळमळीने लिहिले आहे. कोणी असे कोणाबद्दल कळकळीने लिहिते तेव्हा त्याला फार महत्व असते. त्यामागे एक युग असते.‌ त्या माणसाची साधना असते. जसे इथे संगीतकार राम कदमांनी निर्माण केलेले त्यांचे युग आणि त्यांची कलासाधना मानेंच्या समोर आहे. 


प्रश्न फक्त राम कदमांचा नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील  त्यांच्यासारख्याच अनेक विभुतींच्या नशिबी अवहेलना, फसवणूक , उपेक्षा अशा वाईट गोष्टी का आल्या हा आहे ! त्यांचे चुकले, दैवाचे चुकले, देवाचे चुकले, त्यांच्या आसपासच्या मोठ्या मोठ्या माणसांचे चुकले की त्यांच्या असंख्य सर्वसामान्य चाहत्यांचे चुकले ? देवाच्या निर्मितीचे माणूस केवढे कौतुक करतो ! पण माणूस सुंदर निर्मिती करतो त्याचे पुरेसे कौतुक माणसेच का करत नाहीत ? ती निर्मिती करण्यामागचे त्याचे अथक प्रयत्न लोकांना दिसत नाहीत , लोक फार तर मागाहून काही वेळा चुकचुकतात , तेवढ्यापुरते शाब्दिक पुळके दाखवून मोकळे होतात, पण त्याच कलावंताच्या कलेचा पुरेपूर आस्वाद घेऊन , काही जण तर फायदा उपटून मोकळे झालेले असतात. पण त्या माणसावर अन्याय होतो आहे हे लक्षात येताच आपण त्या गावचेच नाही असे दाखवतात. साधी ओळखही दाखवत नाहीत. समोरून आलात तर काटकोनात वळून पळ काढतात. कटतात. टाळता आले नाही तर थातूरमातूर बोलून कटवतात तरी ! याचसाठी केला का अट्टाहास असे त्या माणसाला वाटते ! ही उपेक्षा का हा प्रश्नं अनुत्तरीतच राहतो. किमान हे असे का होत असते यावर तरी चर्चा होणे हा या लेखाचा किमान उद्देश आहे . 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२०.०८.२०२४ 


शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह २०२४



मित्र हो, सोमवार दि. ०५ ते सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत माझ्या शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह सुरू होता. मी माझ्या फेसबूक प्रोफाईलवर व यू ट्यूब चॅनेल देवीदास पाटील क्रियेशनवर त्याचे थोडे व्हिडीओ पोस्ट केले होते. अजूनही काही व्हिडीओ आहेत जे येत्या काही दिवसांत पोस्ट करीनच.  आमच्या जाकीमिऱ्याप्रमाणेच भाटीमिऱ्यातील दत्तमंदिर व सडामिऱ्या भागातील नवलाई पावणाई मंदिरातील नाम सप्ताहही वरील नमूद कालावधीत संपन्न झाला. कोंकणात असे एक्का वा नाम सप्ताह अनेक ठिकाणी संपन्न होतात. ही इथली संस्कृती आहे.

आमचा मिऱ्या गाव तीन बाजुंनी पाण्याने वेढलेला आहे. शहराकडून येणारा एकमेव मुख्य रस्ता व त्यालाच फुटलेले उपरस्ते तसेच समुद्रसपाटीपासून चढत्या क्रमाने असलेले गावाचे भाटीमिऱ्या, जाकीमिऱ्या, आनंदनगर , सडामिऱ्या व पुन्हा उतारावरून समुद्रसपाटीला असणारे मिऱ्याबंदर हे भौगोलिक अर्धगोलाकार भाग . बंधारा एका बाजुने आहे. मध्ये मिऱ्या डोंगर उभा आहे. पण त्यानंतर उघडा समुद्र किनारा आहे , समुद्र खाडी स्वरूपात आत घुसलेल्या आहे. तिथूनही समुद्राचे पाणी घुसून हाहाकार उडू शकतो.

अशा भूभागातील लोकांना देवाचाच आधार वाटतो. त्याला अनुसरून, भाटीमिऱ्यात दोन , जाकीमिऱ्यात एक अशी तीन दत्तमंदिरे , जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे एक व हनुमंताची दोन मंदिरे, माझ्या हयातीत बांधलेली गणपतीची दोन मंदिरे व सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर ही इथली मंदिरे आहेत. खरे तर सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर हे प्रथम निर्माण केले गेले. पण नंतर वाढत्या लोकसंख्येमुळे  विविध सांस्कृतिक उपक्रमांना मंदिरातील जागा अपुरी पडू लागली.  जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे मंदिर कधी बांधले गेले तो उल्लेख त्याच्या सध्याच्या कमानीवर आढळतो. अर्थात, भूतकाळात कधी काय झाले यावर जाणूनबुजून वाद निर्माण करण्यापेक्षा आणि दाणे टाकून कोंबडया झुंजवण्यापेक्षाही , शंभर वर्षांहूनही अधिक काळाचा हा वारसा नामसप्ताहासारख्या उपक्रमांतून जुन्या व नव्या पिढीकडून पुढे आनंदाने आणि एकोप्याने चालवला जात आहे , हेच अधिक महत्वाचे व अभिमानाचे आहे ! हा सोहळा मानवी जीवनाच्या आनंदाचा भाग बनावा, हीच परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील. 
१३.०८.२०२४
........................

मी कालच्या पोस्टमध्ये दाणे टाकणारांचा व ते टिपण्यासाठी भांडणे करणाऱ्यांचा ओझरता उल्लेख केला होता.‌ संस्कृतीवर जाणकार भाष्य करतात. ते मी ऐकतो. चांगले भाष्य करतात. पण होते काय काही भाष्यकार इकडे प्रभावी बोलतात पण तिकडे दाणे टाकून कोंबड्या झुंजवतात. खरे तर चूक त्यांची नसतेच ! चूक त्यांचे दाणे टिपणाऱ्या आणि डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपसातच भांडणाऱ्या कोंबड्यांचीच असते ! भांडणे लावणे ही ज्यांची विकृती असते ते भांडणे लावून मजा घेतच बसणार ! त्याबद्दल त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या नादाला न लागणे केव्हाही श्रेष्ठच ! दाणे टाकणारे आणि ते दाणे टिपून आपसात भांडणारे हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत.

खरे तर संस्कृती ही जीवनाच्या उपक्रमांमधून बनते. या उपक्रमांशी व पर्यायाने संस्कृतीशी धर्माला जोडण्यात आले. माणूस अगोदरचा,  संस्कृती नंतरची आणि धर्म तर खूपच मागाहून आला आहे. पण तोच कानामागून येऊन तिखट झाला आहे. कारण मध्यंतरीच्या काळात तो सत्तेशी पर्यायाने राजकारणाशी जोडला गेला. राजकारण हे सत्तेतून आले असले तरी राजकारणी आपल्यातूनच येतात हे विसरता येत नाही ! तेव्हा लोकशाहीत अंतिम बोट कुणाकडे वळते आहे ते पहा.

मूळात माणसांच्या विविध संस्कृती विविध ठिकाणी अस्तित्वात होत्या. आजही आहेत. मग त्यांना धर्म ही संकल्पना कशासाठी जोडला गेली ? संस्कृतीत जसे सुष्ट लोक असतात तसेच दुष्टही असतात. वर दाणे टाकणारे आणि झुंजणारे या दोन्हींचा उल्लेख आलाच आहे. खरे तर चांगल्या वाईट ह्या दोन्ही प्रवृत्ती विश्व चालण्यासाठी आवश्यकच आहेत. तेव्हा त्यांचे स्वागतच आहे . एक तर समाजाला शिस्त लावण्यासाठी धर्म ही संकल्पना आली आणि वाईटांना निदान भीती वाटावी व ती कमी पडू लागली म्हणून पुढे देव ही संकल्पनाही धर्मांशी जोडली गेली. पण वाईट लोक देवाधर्माला विकून खाणारे निघतात आणि चांगले लोक सांस्कृतिक उपक्रम नित्य नेमाने व भक्तीभावाने करतात ! मानवी संस्कृतीचे हे दोन घटक अव्याहतपणे सुरू राहणार हे नक्की !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील.
१४.०८.२०२४

............

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

शरदाचे चांदणे....

 शरदाचे चांदणे....

नवलाई पावणाई मंदिर, जाकीमिऱ्या येथे श्रावण नाम सप्ताह २०२४ निमित्त देऊळवाडी महिला मंडळातर्फे भजन सादर झाले. त्यावेळी सौ. सुजाता देवीदास पाटील यांनी सुरेल आवाजात म्हटलेले शब्दांचे चांदणे हे गीत प्रत्यक्ष ऐका....



गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !

 आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !

परवा निवेंडीवाडीच्या शाळेत वह्या वाटप करण्यासाठी गेलो होतो. सौ. निरजा शेट्येला तिच्या घरून‌ गाडीत घेतलं. ती ग्रामपंचायत सदस्य आहे. निवेंडीवाडीची शाळा तिनेच सुचवली होती. तिने तिथली अधिक माहिती असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्या सौ. भरणकर यांनाही वाटेत सोबत घेतलं.‌ त्या असल्याने प्रवास योग्य रस्त्यावरून झाला. पाऊस सुरूच होता. वाट बिकट होती. निरजाचा भाऊ निलेश‌ पेडणेकर गाडी चालवत होता. त्याने गाडी सफाईने चालवली. शाळेच्या थोडं पुढे गाडी पार्क करावी लागली. आम्ही चौघेही पाऊस थांबण्याची वाट पहात बसलो.‌ दहा मिनिटे वाट पाहूनही पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसेना. माझी एकमेव छत्री कारमध्ये होती. तिचा आधार घेऊन एकाने शाळेत जावे , मग कोणी जावे , वह्या आणि छत्री एकाच वेळी कसे धरायचे आणि वह्या न भिजवता शाळेत कसे पोचायचे यावर पुढची पाच मिनिटे चर्चा करून झाल्या. आता काय करायचं याच प्रश्नावर चर्चेची गाडी पुन्हा थांबली. आम्ही उगाचच अडकून पडल्यासारखे झालो होतो. उगाचच टेंशन वाढले होते.  ते तिघे समस्येवर चर्चा करत होते आणि मी सोल्यूशनवर विचार करत होतो. मला उत्तरही सुचले. मी निरजाला म्हणालो, शाळेत फोन कर आणि मुलांना छत्र्या घेऊन पाठवायला सांग. झाले, तिच्याकडे मुख्याद्यापकांचा नंबर असल्याने, त्यानुसार तिने फोन केला आणि चार मिनिटातच चार मुलं छत्र्या घेऊन गाडीजवळ आली.  आम्ही आणि वह्याही शाळेत सुखरूप गेलो ! थोडक्यात, परिस्थिती आपण कशी घेतो हे फार महत्वाचे असते.

अशाच घटना अनेकदा आयुष्यात घडतात. ही घटना तर किरकोळ होती, पण त्यावर चर्चा किती मिनिटे  झाली ! मनाचा गोंधळ किती उडाला ! घटनेची सुरूवात हा घटनेचा सुरूवातीचा बिंदू . पण हा एकच बिंदू रहात नाही. या एका घटनेतून पुढे अनेक घटना घडू लागतात. हेच तुमचे कालचक्र असते. जीवन असते. अशा अनेक घटनांचे बिंदू पुढे सरकत राहतात. याच बिंदूंची एक रेषा बनते. कोणत्याही घटनेच्या सुरूवातीपासून निघालेली ही रेषा पुढे पुढे होत जाणाऱ्या घटनांना घेऊन पुढे सरकत राहते. तेव्हा आपण सावध झाले पाहिजे. ही रेषा कुठपर्यंत जाईल , तिची दिशा काय असेल याचा विचार सर्वसामान्य माणूस करत नाही. असं काही असतं हेच मुळी त्याच्या गावी नसतं. आपण काही घडलं की हबकून जातो. आपला गोंधळ उडतो. आपण विचार आणि विश्लेषण करत नाही. शक्याशक्यता पडताळून पहात नाही. आपण जे जीवन जगतो किंवा आपल्या वाटेला जे काही जीवन म्हणून येतं , त्या सर्व शक्यता असतात. त्या आधीपासूनच अस्तित्वात असतात. आपण त्यांना कुठे तरी भेटतो. नकळत सामोरे जातो. कोणत्या तरी अक्षांश रेखांशांवर ही भेट होते ! जे काही घडायला सुरूवात झाली आहे त्यात हे पण घडू शकते , घडेल ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही ! आपण अक्षांश रेखांशही काल्पनिक समजतो. पण इथे काहीच काल्पनिक नाही. ते अगोदरपासूनच अस्तित्वात असते म्हणून तर त्याचा विचार मानवी मेंदूत येतो. काही काळाने सत्य समोर येते पण तितका काळ खोटे असतेच ! काही काळ का होईना ; खोट्याचेही अस्तित्व असतेच ! थोडक्यात , शक्यतांचं अस्तित्व आधीपासूनच अस्तित्वात असतं. याचाच उपयोग करून काही जण प्रकरणांचा छडा लावतात ! आपण आपल्या आयुष्यात नवीन घटना घडायला सुरूवात झाली की ती चांगली असेल तर आनंदून जातो आणि वाईट असेल तर गोंधळून जातो. समस्यांमुळे तर आपण खचून जातो . स्वतःला स्थिर न करता अधिकच अस्थिर करतो . आपल्याला काही समजेनासं होतं. छोट्याश्या समस्येला आपण पार शनीच्या पीडेपर्यंत भिडवतो ! आपलं असं होणं हे अगदी स्वाभाविक असतं. हे असं का होतं ? एक तर मागील पिढ्यांनी वारंवर भीतीचे संस्कार केलेले असतात आणि दुसरे असे की आपलीही चूक होते ! आपण एखादी घटना कशी घेतो यावरच खरे तर तिच्या आपल्यावरील होणाऱ्या मनोकायिक परिणामांची तीव्रता व व्याप्ती अवलंबून असते. साधीच घटना घ्या. केळ्याच्या सालीवरून आपण घसरून पडलो तर आपणही हसतो की चार लोक आपल्याला हसले म्हणून आपल्या मनाला ते खूपच लागते ? खरं तर ही क्षणिक घटना असते. पण मनाला लावून घेतले तर त्या क्षणिक घटनेतूनही अगदी मारामारीचे प्रसंगही जन्म घेतात. थोडक्यात, आपण परिस्थितीच्या किती आहारी जातो , भावनेच्या भरात कसे अविचाराने वागतो , कसा विवेक हरवून बसतो , हे इथे लक्षात येते. इथे आपण हसत हसत उठून पुढे चालत गेलो असतो तर ते हसणारे लोक कधीच मागे पडले असते आणि आपल्यालाही त्या घटनेचा लगेचच विसर पडला असता. प्रकरण हातघाईवर येऊन राडा झाला नसता. शनीच्या पीडेचा तर मनास विचारही  शिवला नसता ! थोडक्यात , आपण परिस्थितीच्या दडपणाखाली येतो. परिस्थितीचा समतोलपणे विचार करत नाही . बरेचदा, परिस्थिती चुकीच्या पध्दतीने घेतल्यामुळे आपण दुष्टचक्रात सापडतो. स्वतःवरचा विश्वास हरवून वेगळ्याच मार्गाला लागतो . हे बदलता येतं . फक्त त्यासाठी आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे असते.


...देवीदास हरिश्चंद्र पाटील