बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

ही उपेक्षा का ?

 ही उपेक्षा का ? 


संगीतकार राम कदमांवरची किरण माने यांची पोस्ट अलिकडे फेसबूकवर वाचनात आली. तिची लिंक अशी आहे :

https://www.facebook.com/share/dycaxtaCZ3F1zNFY/?mibextid=oFDknk. 


राम कदमांसारखा मराठीतील एक संगीतकार आजच्या एका मराठी तरूणाला माहीत नसणे आणि कदमांची त्यांच्या हयातीत उपेक्षा होणे, या दोन गोष्टी किरण मानेंच्या मनाला फार लागल्या. त्याबाबत त्यांनी कदमांच्या प्रेमापोटी व आत्यंतिक तळमळीने लिहिले आहे. कोणी असे कोणाबद्दल कळकळीने लिहिते तेव्हा त्याला फार महत्व असते. त्यामागे एक युग असते.‌ त्या माणसाची साधना असते. जसे इथे संगीतकार राम कदमांनी निर्माण केलेले त्यांचे युग आणि त्यांची कलासाधना मानेंच्या समोर आहे. 


प्रश्न फक्त राम कदमांचा नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील  त्यांच्यासारख्याच अनेक विभुतींच्या नशिबी अवहेलना, फसवणूक , उपेक्षा अशा वाईट गोष्टी का आल्या हा आहे ! त्यांचे चुकले, दैवाचे चुकले, देवाचे चुकले, त्यांच्या आसपासच्या मोठ्या मोठ्या माणसांचे चुकले की त्यांच्या असंख्य सर्वसामान्य चाहत्यांचे चुकले ? देवाच्या निर्मितीचे माणूस केवढे कौतुक करतो ! पण माणूस सुंदर निर्मिती करतो त्याचे पुरेसे कौतुक माणसेच का करत नाहीत ? ती निर्मिती करण्यामागचे त्याचे अथक प्रयत्न लोकांना दिसत नाहीत , लोक फार तर मागाहून काही वेळा चुकचुकतात , तेवढ्यापुरते शाब्दिक पुळके दाखवून मोकळे होतात, पण त्याच कलावंताच्या कलेचा पुरेपूर आस्वाद घेऊन , काही जण तर फायदा उपटून मोकळे झालेले असतात. पण त्या माणसावर अन्याय होतो आहे हे लक्षात येताच आपण त्या गावचेच नाही असे दाखवतात. साधी ओळखही दाखवत नाहीत. समोरून आलात तर काटकोनात वळून पळ काढतात. कटतात. टाळता आले नाही तर थातूरमातूर बोलून कटवतात तरी ! याचसाठी केला का अट्टाहास असे त्या माणसाला वाटते ! ही उपेक्षा का हा प्रश्नं अनुत्तरीतच राहतो. किमान हे असे का होत असते यावर तरी चर्चा होणे हा या लेखाचा किमान उद्देश आहे . 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२०.०८.२०२४ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: