कोजागिरी पौर्णिमा
आज कोजागिरी पौर्णिमा ! असे म्हणतात की ती को - जागरी पौर्णिमा आहे ! म्हणजे, का जागता , कशासाठी जागता वगैरै वगैरे चौकशांवाली पौर्णिमा. मीही मध्यंतरी तिला को - जागरी पौर्णिमाच म्हणून पाहिले, लिहून पाहिले, पण मला तशी सवय नसल्यामुळे मलाच ते खटकू लागले. झाले आहे काय, की मी राहतो रत्नागिरीत. रत्नागिरीचे रत्नागरी करणे कठीण आहे तसेच ते कोजागिरीचेही कठीण वाटले. परत , कोणाला आवडो न आवडो, जास्त करून न आवडणाऱ्यानीच ते नांव रेटूनरेटून उच्चारल्यामुळे गांधीगिरी या नावाशी आणि कृतीशी आमची हल्ली अधिक ओळख झाली ! त्यामुळे गिरीला गरी म्हणणे कसेसेच वाटते. मासे गरवायला एक गरी लागते हे अरबी समुद्र आमच्यापासून शंभर पावलांवर असल्याने आम्हांला लहानपणापासूनच माहिती आहे. एकूण काय , काय असेल ते शास्त्र अमान्य न करता, व्यवहारात कोजागिरीच बरे वाटते ! संतांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सध्याच्या व्यवहारी जगात त्या वापरणे कठीण होते ! म्हणूनच आता संत फारसे दिसत नाहीत ! दिसतात ते जिवाची कोजागिरी करणारे व नंतर तुरूंगात जाणारे लबाड (संधी)साधू ! असो, तो आता तरी आपला विषय नाही. माझे मित्र श्री. अरविंद धामणे यांनी काल रात्रीच मला आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या आगावू शुभेच्छा पाठवल्या आहेत. त्यांना जागून कोजागिरी पौर्णिमेकडे वळतो.
आज कोजागिरी पौर्णिमा ! लहरी पाऊस काय करतोय ही धाकधूक आहेच ! आता सकाळी सहा वाजता चालतांना तरी दिशा उजळल्या आहेत ! चालताचालताच मी टाईप करतो आहे. ही पोस्ट लिहितांना आणखी एक काळजी वाटते आहे. रात्री काळ्याकुट्ट मेघांसह पाऊस आलाच तर काही तासांसाठी तरी ती कोजागिरी अमावास्या होऊन जायची ! देव करो आणि तसे न व्होवो ! हो, देव हा वर असतो आणि पाऊस वरूनच पडत असल्यामुळे देवाला तो अधिक जवळ असणार अशी माझी भाबडी समजूत आहे. नाही म्हणजे आज संध्याकाळी रत्नागिरीच्या राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी कवी संमेलन आहे ! श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमुर्ती प्रतिष्ठान आयोजित या संमेलनात १०० कवींच्या सहभागाची हमी मित्रवर्य डॉ. दिलीप पाखरेंनी कालच वर्तमानपत्रातून दिली आहे. बहुतेक आज पावसाची शंभरी भरणार व कोजागिरी आनंदाने साजरी होणार ! तिकडे कोजागिरीवरच्या कवितांचा पाऊस पडणार आहे , पावसावरच्या कवितांचा नव्हे ! नाही म्हणजे कवींमध्ये एवढी शक्ती आहे की त्यांनी पावसाच्या कविता सुरू केल्या की खरोखरचा पाऊस कोसळायचा ! कवींचा काय भरोसा ! त्यातच एक कवी म्हणून सालाबादप्रमाणे मीही सहभागी असणार आहे ! मी कोजागिरीवर यंदा एकही कविता केली नाही अशीच सुरूवात असलेली कविता मी सादर करणार आहे. तेव्हा रसिक हो, संध्याकाळी ०४.३० वाजता राम मंदिरात अवश्य या ! वाट पाहतोय !
#kojagiri_pournima
#कोजागिरी_पौर्णिमा
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
१६.१०.२०२४ सकाळी ०६.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा