शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

ऐन दिवाळीत पाऊस

 पणत्यांवर पाणी ...


ऐन दिवाळीत पाऊस पडतो आहे. भक्तीभावाने लावलेल्या पणत्यांवर पाणी पडते आहे. बहुतेक पाऊस पडू दे , बहुतेक पाऊस पडू दे च्या प्रार्थना जास्त झाल्या असाव्यात. माणसाने बाकी काय केले ते बोलायचे नाही. कित्येक वर्षे रस्त्यांची कामे रखडत सुरू आहेत. हजारो किलोमीटर दूतर्फा असलेल्या झाडांच्या कत्तलीबद्दल बोलायचे नाही. माणसाने काय केले याबद्दल माणसानेच  ब्र देखील काढायचा नाही. आयाराम गयारामगिरीबद्दल बोलायचे नाही. भ्रष्टाचार हा मुद्दा तर आता गेल्यातच जमा आहे. 


कालच लक्ष्मी पूजन झाले. लक्ष्मीसाठी काहीही करावे लागते. करतात. पण त्याबद्दल बोलायचे नसते. लक्ष्मीचा कोप होतो अशा कहाण्या आधीच पेरलेल्या आहेत. वाट्टेल ते केले , भ्रष्टाचार केला तरी चालते , त्याने लक्ष्मीच प्रसन्न होणार. किती चांगले आहे ना ! उपासतपास करून, साधना करून लक्ष्मी प्रसन्न होते ही भावना आहे. दुसऱ्यांना गंडवून, भ्रष्टाचार करून लक्ष्मी प्रसन्न होते हा शुध्द व्यवहार आहे. जग व्यवहाराने चालते. तुमच्या भावनांचे मतांमध्ये रूपांतर केले जाते त्याला व्यवहार म्हणतात. कथांच्या आणि स्लोगन्सच्या माध्यमातून तुम्हांला भावनिक बनवले आहेच. उल्लू बनवले की नाही तुम्हांला ? या उक्तीमध्ये प्रचंड व्यवहार असतो. हा व्यवहार जे साधतात त्यांच्याकडे लक्ष्मी येते. बाकीचे संध्याकाळचे दरवाजे उघडून आयुष्यभर वाटच बघत बसतात . वर म्हणत बसतात, दिवाळीत पाऊस कसा , दिवाळीत पाऊस कसा  ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

०२.११.२०२४. सकाळी ०६.३०

ते अनारसे वेगळे होते !

 ते अनारसे वेगळे होते ! 


दिवाळी म्हटली की फराळ आला. फराळ म्हटले की अनारसेही आलेच. आता ते दुकानात कधीही मिळतात. पण आमच्या लहानपणी ते दिवाळीतच केले जायचे. मला ते खूप प्रिय झाले होते. घरच्यापेक्षा सुगंधाकाकूच्या हातचेच अनारसे मला जास्त आवडू लागले होते. सुगंधाकाकू म्हणजे सीताराम गुरव काकांची पत्नी.‌ आमच्या देऊळवाडीत त्यांचे घर शेवटी तर पहिले घर आमचे होते. मधली पंचवीस तीस घरे ओलांडून ती माऊली माझ्यासाठी दिवाळीच्या सकाळीच अगदी नुकतेच केलेले अनारसे घेऊन न चुकता यायची ! तिच्या हातचे पहिले अनारसे खाण्याचे भाग्य अनेक वर्षे मलाच मिळायचे !


तिचा माझ्यावर खूप जीव होता. त्यालाही वेगळेच कारण होते.  तिचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. ती गाईम्हैशी खरेदी करायला स्वतः जायची. एकदा ती अशीच निघाली होती तेव्हा जाण्यापूर्वी आमच्याकडे थांबली होती. आमचे घर वाटेवरच होते. तिच्या काय मनात आले कोण जाणे , तिने अचानक मला विचारले की म्हैस आणायला जाते आहे, जाऊ का ? मी हो म्हणालो तशी ती उठली आणि येते म्हणून म्हैस खरेदीला निघून गेली. त्या दिवशी तिने खरोखरच एक म्हैस खरेदी करून तिच्या घरी आणली. त्या म्हैशीने तिला खरी बरकत दिली. दुधाचा धंदा वाढला. काकू तिला लक्ष्मी म्हणू लागली आणि ही लक्ष्मी तिला माझ्या शब्दांमुळे मिळाली हे ती सगळ्यांना सांगू लागली. इतकेच नाही तर पुढे ती कोणत्याही कामाला निघाली की मला विचारायला यायची. अशा अशा कामाला जातेय, ते काम होईल की नाही ते सांग म्हणायची. मीही सहजपणे बरेचदा हो म्हणायचो. कामही व्हायचे. 


एके दिवशी मी तिला जाऊ नको म्हणालो . पण तिचे घरात काही तरी बिनसले असावे. ती इरेसच पेटून आली होती. मी नको म्हटल्यावर ती पेचात सापडली खरी. पण अखेर ती गेलीच. तिकडून आली ती माझ्याकडेच ! ती म्हणाली मी तुझे ऐकले नाही , हट्टास पेटले आणि व्यवहार करायला गेले. पण तो फिसकटलाच. यापुढे तू जा म्हणालास तरच जाईन. नाही तर जाणारच नाही. हे काय चालले होते ते कळण्याचे माझे वय नव्हते. मी तेव्हा अवघा चारपाच वर्षांचा होतो. पण हे प्रसंग ज्या चुलत आजीच्या समोर बरेचदा होत होते, तीही मला तिच्या नातवाची मुंबईहून मनीऑर्डर कधी येईल ते विचारू लागली. इथेही बरेचदा मी सांगेन तेव्हा मनीऑर्डर यायची ! हे माझ्या आकलनापलिकडचे होते. पुढे थोडा मोठा झाल्यावर मी जगाच्या व्यवहाराच्या दरीत ढकलला गेलो आणि माझे ते खरे होणारे शब्दही त्या दरीत हरवले ! 


सुगंधा काकूचा जीव‌ माझ्यावर असल्याने ती दर दिवाळीत मला आवडणारे अनारसे घेऊन यायची. तिच्या हातच्या अनारशांची चव वेगळीच होती. काही वर्षांनी काकू अपघाताने गेली पण तिच्या त्या अनारशांची चव आजही जिभेवर आहे. काकू गेल्यानंतर मी अनारसे खाणे सोडले. त्या काळी लोक दिवाळीला एकमेकांकडे फराळाला जायचे. आज कोणी जात नाही. पन्नास साठ वर्षांत केवढा बदल झाला माणसांत ! ती माणसे राहिली नाहीत, राहिल्या त्या त्यांच्या आठवणी... सुगंधाकाकूच्या हातच्या चविष्ट अनारशांसारख्या ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

०१.११.२०२४ सकाळी ०६.१५