how are you ?
Please stay at home, stay safe.
Keep your family safe too !
Here are some updates of this blog for you.
ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
how are you ?
Please stay at home, stay safe.
Keep your family safe too !
Here are some updates of this blog for you.
मी सुंदर स्वप्नांचे
मी सुंदर स्वप्नांचे इमले बांधत असतो
वाळुवर पाण्याने चित्रे रेखत असतो
आयुष्य पुढे मागे सरकत बिरकत असते
माझ्याच हिशेबाने पण मी चालत असतो
होईल मनाजोगे... होईल कधी काळी...
मी आत असा माझ्या मज समजावत असतो
गावात कधी गेलो की आग्रह होतो अन्
मी पिंपळपारावर गोष्टी सांगत असतो
हे दु:खं मला बघते बिलगून बसायाला
हटकून असा त्याला मीही टाळत असतो
संदर्भ जुने काही जातात पुन्हा लागुन
एकेक क्षणामधुनी मी मज शोधत असतो
ते फूल वहीमधले अजुनी छळते आहे
मी याद तुझी माझी अजुनी काढत असतो
हा बंद तुझा आता बाजार जगा झाला
घरट्यात स्वतःच्या मी आता हिंडत असतो
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
टीप : मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .
आज तिचा ७४ वा वर्धापन दिन.
त्यानिमित्त एस्.टी. शी संबंधित
सर्वांचेच अभिनंदन !
आमच्या जाकीमिऱ्या गावात पहिली
एस्. टी. बस सन १९६९ मध्ये आली.
अगदी बालपणी. तेव्हा ती निळ्या,
हिरव्या आणि पांढऱ्या रंगात
होती. पुढे त्यात पिवळा रंग मिसळला.
कधीतरी लाल रंगही आला. त्यांने
बरीच वर्षे राज्य केलं. त्याचा मनावर
एक पगडा बसलेला आहे. अगदी " ये
लाल रंग कब मुझे छोडेगा " या जुन्या
हिंदी गाण्याची आठवण यावी इतका.
लाल डब्बा म्हणूनच एस. टी. फेमस झाली.
मग खाजगी गाड्यांच्या स्पर्धेमुळे एस. टी.ही चकचकीत झाली. रंगीतसंगीत झाली. आधुनिक झाली.
काही झाले तरी एक गोष्ट मात्र कायम राहिली. दिवस रात्र थकण्याची पर्वा न करता अखंड प्रवास आणि आपुलकी !एस. टी. ची प्रवाश्यांबद्दलची आपुलकी ! हजारो किलोमीटर, हजारो माणसे...!
पहिली बस धावली ती बेडफोर्ड कंपनीची ३० आसनक्षमतेची होती.
शिवाजीनगर कार्पोरेट जवळ बसचा
शेवटचा थांबा होता. खाजगी
वाहतूकीच्या व्यवसायावर
परिणाम होईल या भीतीने हल्ला होईल
म्हणून माळीवाडा वेशीपासून
पुण्यापर्यंत ही बस पोलीस बंदोबस्तात
नेण्यात आल्याची माहिती मिळते.
याप्रकारे, सुरुवातीपासूनच खाजगी
वाहतूक, कच्चे रस्ते, अपुरी
साधनसामग्री आणि इतर अनेक
घटकांचे अडथळे पार करणारी आपली
एस. टी. आजही अथक धावते आहे.
अगदी रेल्वे आली तरी एस. टी.
माणसे आणि बोज्यांची ने आण
करतेच आहे.
डबघाईला आली आली असं म्हणता
म्हणता पुन्हा पुन्हा उभारी धरते आहे.
ऊर्जितावस्थेला येते आहे. संघर्ष सतत
चालूच असणारी ही महाराष्ट्राची
माऊली आहे. तिच्या प्रत्येक
कर्मचाऱ्यावर आणि प्रवाशावर विश्वास
ठेवून , बहुजन हिताय बहुजन सुखाय
या ब्रीदपूर्ततेसाठी ती सतत धावत
आहे.
चांगले वाईट सगळीकडेच असते.
कच्चे दुवे सगळीकडेच असतात. एस्.
टी. मध्येही आहेत, पण म्हणून ती काही वावगी ठरत नाही. ७४ वर्षे करोडो प्रवाशांची अखंड सेवा करणारी एस. टी. म्हणूनच आपल्याला आपली वाटते.
महाराष्ट्रात पहिली एस्. टी.
अहमदनगर - पुणे मार्गावर ज्यांनी
नेली ते चालक श्री. लक्ष्मण केवटे व
वाहक श्री. किसन राऊत यांच्यासह
आजपर्यंतचे सर्व चालक व
वाहक म्हणूनच आम्हांला आपले
वाटतात. इतकेच नव्हे तर एस्. टी. ला सतत तंदुरूस्त व उत्साही ठेवणारे
महाराष्ट्रातले आजपर्यंतचे सर्व
मेकॅनिक्स, कार्यशाळा, भांडार ,
कार्यालय यातील सर्व श्रेणीतील सर्व
अधिकारी व कर्मचारी आपले वाटतात.
यांच्याच जिवावर एस्. टी. अहोरात्र
धावते आहे. एस्. टी. ह्या
जीवनरेखेची निर्मिती करणारे
महाराष्ट्रातले सर्व संबंधित आम्हांला
आमचे सगेसोयरे वाटतात.
महाराष्ट्राच्या ज्या मंत्र्यांनी , प्रशासकीय
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एस्.
टी.साठी मनापासून योगदान दिले आहे
तेही सर्व आपलेच वाटतात . हा केवळ
लाल डबा नाही, केवळ पत्रा नाही,
एस् . टी. ही सजीव धावती
गोष्ट आहे. प्रवाशांप्रती तिचा
समर्पित सेवाभाव अत्युच्च श्रेणीचा
आहे. जी आपुलकी एस् . टी . ने
चौऱ्याहत्तर वर्षे जपली आहे ती
यापुढेही ती जपत राहील यात
तीळमात्र शंका नाही. प्रवाशीही
एस्. टी. त्यांना जी आपुलकी
देत आली आहे तशीच आपुलकी
एस्.टी.ला देतील आणि महाराष्ट्राच्या
ह्या वाहतूक जीवनरेखेशी सातत्याने
ॠणानुबंध वाढवतील, जपतील, अशी
खात्री बाळगतो आणि आपल्या
एस्.टी.ला मानाचा मुजरा
करून इथेच थांबतो !
#मानाचा_मुजरा
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वेबसाईट
https://msrtc.maharashtra.gov.in/
Maharashtra State Transport Corporation.
कोरोनाच्या ऐन भरातली ही डॉ . श्रीकृष्ण जोशी यांच्यासारख्या मातब्बर लेखकाकडून साकारलेली कथा. तिच्यात काळजाला भिडणारं असं काही तरी नक्कीच आहे ! आपल्या ' मागे पुढे ' या पानासाठी बरेच दिवसांनी पोस्ट करीत आहे. अवश्य वाचा. व अभिप्राय द्या ....
*🌹इम्युनिटी अनलिमिटेड 🌹*
*- डॉ . श्रीकृष्ण जोशी*
तिनं कटिंगचा ग्लास त्याच्यासमोर आदळला .
" हा चहा सातव्यांदा आणलाय , आता नाही म्हणालास तर..."
" सातव्यांदा ? मग माझ्या कसं लक्षात नाही आलं ? मग अगोदरच्या चहाचं काय झालं ?"
" आम्ही प्यालो ."
सगळे एका सुरात ओरडले .
" हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव . मोन्या , तुला आज नकला करून दाखवायच्या आहेत नाना नानी पार्क मध्ये , पण तिथल्या व्हीलचेअर वरच्या आजोबांचा हात हातात घे . त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही , याची काळजी घे . जगन , तू जिथं जाणार आहेस ,त्या अपार्टमेंटमध्ये चार जण पॉझिटिव्ह आहेत , त्या चारही जणांचे जेवणाचे डबे , त्यातलं अन्न गरम असेपर्यंत नेऊन दे . विन्या , त्या टीपॉय वर सामोसे , वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या आहेत , सगळ्या ऍम्ब्युलन्स मधल्या ड्रायव्हर्सना आणि स्मशान ड्युटी लागलेल्या सगळ्यांना दे आणि स्मशानात काम करणाऱ्या दादांना पण दे .कुणीही भुकेला राहता कामा नये . आता कोण राहिलं ? इरा , तुला दिलेल्या एरियातील हॉस्पिटलच्या बाहेर कुणी भांबावलेले , राहण्याची सोय नसलेले असे कुणी असतील तर त्यांची विचारपूस करून व्यवस्था कर , काही अडचण आली तर कॉल कर . नरेश तुझे पोलीस तुझी वाट पाहत असतील , त्यांना जेवणाचे पॅक नेऊन दे ."
" आणि तू काय करणार ? किमान तो चहा तरी पी ." आभा म्हणाली.
त्यानं चहा संपवला .
" - आणि कुठे कसं जायचं , आवश्यक ते फोननंबर्स अशी सगळी माहिती त्या टेबलावरच्या रजिस्टर मध्ये आहे . आणि हो , प्रत्येकाच्या नावाचं एक एक पाकीट ठेवलंय , त्यात खर्चासाठी लागणारी रक्कम आहे .ती कम्पलसरी घ्यायची आहे ."
" पण तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ."
" मी ? "
तो गप्प झाला .
त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं .
त्यानं ते वाहू दिलं .
" सॉरी वेदांत , आभानं असं विचारायला नको होतं , मी तिला सांगतो , ती नवखी आहे , उत्साहाच्या भरात विचारून गेली ."
जगननं त्याच्या खांद्यावर हात ठेवला .
" आम्हाला माहित्येय तू कुठे जाणार आहेस . "
" ए चला रे , उशीर नको व्हायला ."
- सगळे निघाले .
आभा दारातून परत आली .
" सॉरी , माझं चुकलं "
" इट्स ओके , चलता है , "
त्यानं डोळे पुसत आंगठा उंचावला .
ती बाहेर गेली .
त्यानं मोबाईल हाती घेतला . आणि व्हॉटसअपवर मेसेज टाइप करू लागला ...
" मित्रांनो , आभार नाही मानत मी तुमचे , पण कृतज्ञता व्यक्त करतो . तुम्ही आहात म्हणून इम्युनिटी अनलिमिटेड ला अर्थ आहे . थँक्स !"
मेसेज फॉरवर्ड करून तो उठला .
पुन्हा बसला .
समोर भिंतीवर आजीआजोबांचं छायाचित्र होतं .
त्यानं मनोमन नमस्कार केला .
आणि हृदयात कळ उठावी , तसा आभाचा प्रश्न मनात कल्लोळ माजवून गेला .
" तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ..."
काय सांगायचं ?
लहानपणी आईवडील गेल्यावर आजीआजोबांनी वाढवलं ते सांगायचं ?
की आजीआजोबांचा , दोघांचाही कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यावर बेड्स मिळाले नाहीत , ऑक्सिजन मिळाला नाही , ते सांगायचं ?
की ज्यावेळी ते तडफडत होते तेव्हा आपण मदत करू शकलो नाही हे सांगायचं ?
की खूप पैसे जवळ असूनही शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलायला , विचारपूस करायला आपल्याला जमलं नाही , शासकीय व्यवस्थेनं ते करू दिलं नाही , हे सांगायचं ?
की अंत्यदर्शनाऐवजी दोघांची डेथ सर्टिफिकेट्स तेव्हढी मिळाली , हे सांगायचं ?
-- विचार करकरून त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता .
आजीआजोबांना कुठं अग्नी दिला असेल ते माहीत नसल्यानं त्यानं स्मशानात अंदाजानं एका जागेसमोर उभं राहून हात जोडले .
आणि जड पायानं परत फिरला .
थ्री बेडरूम किचनची मोठाली जागा त्याच्या अंगावर आली .
तो मटकन खाली बसला .
आजीआजोबांच्या छायाचित्राकडे बघताना त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं .
शेवटच्या दिवसात आजी आजोबांना काय वाटलं असेल ?
त्यांची विचारपूस कुणी केली असेल का ?
कुणी बोललं असेल का त्यांच्याशी ?
त्यांना वेळेवर जेवण मिळालं असेल का ?
तडफडत असताना माझ्या आठवणीनं हळवे झाले असतील का ?
आपण तरी ऑफिस टूर साठी जायलाच हवं होतं का ?
त्या सात आठ दिवसात सगळ्या भावविश्वात एवढी उलथापालथ ...?
सगळं चुकलंच म्हणायचं आपल्या कडून .
तो मनानं विदीर्ण झाला . खचला .
पुढच्या आठदहा दिवसात तो वेड्यासारखा फिरत होता .
हॉस्पिटल्स .
स्मशानं.
ऍम्ब्युलन्स च्या जागा .
डॉक्टर्स , नर्सेस , सगळे कर्मचारी , पोलीस ...
सगळ्यांना भेटत होता ...
सगळ्यांचं एकच म्हणणं .
सगळ्यांनी इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे .
अन्न चांगलं हवं .
हवा शुद्ध हवी .
औषधं मुबलक हवीत .
शरीरापेक्षा मनानं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे .
आणि सर्वांनी संवाद वाढवला पाहिजे .
- ऍम्ब्युलन्स च्या एका ड्रायव्हरनं एकच वाक्य ऐकवलं .
तो म्हणाला ,
" विचारपूस करणारा कुणी असला की आम्हा सगळ्यांना बळ मिळतं . आणि माणूस कितीही आजारी असला तरी तो बरा होऊ शकतो ."
तो चक्रावला .
त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला .
तो तसाच घरी आला .
आणि त्याच्या डोक्यात अफलातून कल्पना आली .
त्याक्षणी त्यानं नोकरीचा राजीनामा पाठवून दिला , मेलनं .
आणि नव्या उपक्रमाची सुरुवात केली , *इम्युनिटी अनलिमिटेड* , या नावानं .
पुढच्या काही दिवसात तो पुन्हा सगळीकडे हिंडत राहिला .
आपल्यासारखे अनाथ झालेले शोधत राहिला .
त्यांच्या मनात तो उतरू लागला .
एकाचे दोन , दोनाचे सहा व्हायला वेळ लागला नाही .
काय करायचं ते स्पष्ट होतं .
पैशांचा प्रश्नच नव्हता त्याला .
संवाद साधायचा .
विचारपूस करायची .
कसलीही अभिलाषा न ठेवता , इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जेजे करता येईल ते करायचं .
आजी आजोबांना हीच श्रद्धांजली !
त्याला हवा तसा ग्रुप मिळाला आणि अल्पावधीत रिझल्ट्स मिळायलाही लागले .
दिवसेंदिवस ग्रुपमध्ये वाढ होत होती आणि अनेक ठिकाणाहून वाट पाहिली जात होती .
- तो उठला .
आभाच्या प्रश्नानं उठलेलं वादळ शमलं होतं .
त्यानं बॅग उचलली .
त्या बागेत असंख्य खेळणी , वैविध्यपूर्ण खाऊ , गोष्टीची पुस्तकं आणि बरंच काही होतं .
अगदी लहान वयात आईवडिलांचं छत्र हरपलेली अनेक बाळं , त्याची वाट पाहत होती .
डोळे पुसून , आजी आजोबांच्या छायाचित्राला नमस्कार करून तो बाहेर पडला ...
*- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी*
९४२३८७५८०६
-----------
कथा आवडली तर नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .
आणि हो ,
आपल्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अभिप्रायाची सुद्धा वाट पहात आहे .
कोंडमारा
बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे
कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे
फिकाफिकासा ... उदासवाणा... मलूल आहे असा बिचारा...
अजून चाफा अबोल आहे... अजूनही दु:खं आत आहे
खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली
तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे
जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे
तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे
तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे
पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी
रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !
अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे ...?
अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?
मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !
मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे ...
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
टीप :
मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .
ग्रूपवरील उत्तम लेखनास नियोजित पीडीएफ फौंडेशनच्या पेजवर मानाचे स्थान दिले जाईल. याशिवायही लेखकांना अन्य काही प्रकारे प्रोत्साहन दिले जाईल .
आपल्याला कुणाच्याही भावना न दुखावता लेखनातून जनजागृती करावयाची आहे.
आपल्याला कोणतेही आंदोलन करायचे नाही. कसलाही पाठपुरावा करायचा नाही. कोणतीही प्रकरणे हाताळायची नाहीत.
समयोचित व समतोल दृष्टीने केलेले जनजागृतीवरील कसदार , उत्तम व मोजके आॅन लाईन लेखन ग्रूपवर अपेक्षित आहे. आपल्या वाचकांसाठी हेही खूप असेल.
......................................
ग्रूपवरील विषय :
१. कोरोनासंदर्भात अनेक माध्यमांकडून सतत माहिती दिली जात आहे. माहितीची विपुलता मोठ्या प्रमाणावर झाली की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत राहतो. कोरोनाबाबत असे होत आहे का व असल्यास त्यावर काय उपाययोजना करता येईल ? यावर भाष्य करा.
२. कोरोनाचा कहर सुरू आहे. या काळात काय काय मदत करता येईल ?
३. आपली ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपरिषद / महानगर पालिका याबाबत आपणांस काय माहिती आहे ?
४.फसवणूक ही ऑन लाईन आणि ऑफ लाईनही असते. निवडणुकीत ऑन लाईन आणि ऑफ लाईनही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे ही मतदारांची फसवणूक ठरू शकते का ? चर्चा तर होणारच. (०५.०५.२०२१)
५. कोरोनामय मानसिकता (कोरोनाची भीती , कोरोना फोबिया) तयार होत आहे का ?
(०७.०५.२०२१)
६. कुटुंबातल्या कुटुंबात कोणत्या प्रकारची फसवणूक होते ?
(०७.०५.२०२१)
.........................................................
दंतकथा पसरवणे हे आपले जुनेच काम आहे. दंतकथा मार्फत कोणाला तरी महात्मा बनवलं किंवा कसली तरी भीती समाजमनावर घातली की पिढयांपिढयांची सोय झालीच म्हणून समजा. खूप डोकं चालवलं बघा काहींनी !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
.............
माझे आॅफीसला उशिरा जाणे...
एके दिवशी मला आॅफीसला जायला उशिरा झाला. बाॅस जाम उखडला. दहा मिनिटे तो ताडताड तोंडसुख घेत होता. मी शांतपणे उभा होतो. मला माहीत होते मिस. राधिका अजून आली नव्हती व ती येण्याची वेळ झाली होती. तेवढ्यात तिच्या हाय हिल्सचा टाॅक टाॅक आवाज व्हरांड्यात आलाच. मी बाॅसला बोललो , सर राधिका आताच येतेय. तोपर्यंत ती लचकत मुरडत , पर्स हेलकावीत आमच्यासमोर येऊन उभी राहिलीही ! वर मधाळ हसत ती गुड मॉर्निंगही म्हणाली ! त्याचक्षणी मघाशी दहा मिनिटे मला ताडताड बोलणारा बाॅस माझ्याकडे न बघता यू टर्न घेऊन त्याच्या केबीनमध्ये अंतर्धान पावला ! विषय कट !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१०.०३.२०२१
............
भाईकाकांची रीतच न्यारी
अंधश्रद्धेला पडले लय भारी !
आमचे भाईकाका एकदम कडक माणूस. फक्त विमलाकाकींपुढे ते थोडेफार नरम पडायचे. काकींनी एकदा श्रध्दापूर्वक एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. काकांनी नाईलाज होऊन परवानगी दिली खरी. पण त्यांच्या मनात काही तरी घोळत होतं. वेळ रात्रीची होती. कार्यक्रम सुरू झाला. काकींनी चुलीत जाळ केला. धुपारटयात निखारे घेतले. त्यात धूप टाकला. धुपारटयासह त्या आत आल्या. सर्वत्र धूप पसरला. त्यासरशी काही एक महिला घुमू लागली. तिच्या अंगात आले होते. थोड्याच वेळात आणखी महिला घुमूडोलू लागल्या. भाईकाका शांत चित्ताने पहात होते. ते चुलीकडे गेले. एका भांड्यात दोन तीन निखारे घेतले. झाकण लावून ते आत आले. तोपर्यंत घुमते जोरावर आले होते. जास्त घुमणाऱ्या बाईने विचारा काय विचारायचे आहे ते, असं म्हणताच काकांनी तू कोण आहेस, असं विचारलं. ती म्हणाली मी देव आहे. काका म्हणाले, सांग माझ्या हातात काय आहे ? तिने डोळे किरकिरे करून डबा म्हणून सांगितले. लोकांनी हात जोडले. डब्यात काय आहे, या प्रश्नावर ती अधिकच घुमू लागली. आरडाओरडा करू लागली. भाईकाका म्हणाले , सांग लवकर. ती काही सांगेना. भाईकाकांनी तिला हात पुढे करायला सांगितले. म्हणाले, देवा, तूच बघ काय आहे ते, असं म्हणत त्यांनी पटकन झाकण काढून निखारे देवाच्या हातात ओतले. देवाचे घुमते तिथेच थांबले आणि देव खरोखरचा आरडाओरडा करू लागला. काकींनी बर्नाॅल आणले आणि लावले. तोपर्यंत एकीमेकींचं बघून जोरजोरात घुमणाऱ्या आणि किंचाळणाऱ्या सर्व महिला तिथून गायब झालेल्या होत्या. भाईकाका शांतपणे सारं बघत बसले होते. त्यांच्या मनात घोळणारं हसू आता त्यांच्या गालावर पसरलं होतं.
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०३.०३.२०२१
.....................
देवाला जन्माला घालणारा माणूस
देवाला जन्माला घालणारा माणूस मला सापडला ! तो चार अनुयायांना म्हणत होता , " मित्रांनो , हे विश्व कुणी निर्माण केले हे कुणालाच कळलेले नाही . अनेकांचा हातभार ह्या निर्मितीला लागला असणार . पण एकाचा वा अनेकांचाही शोध घेणे जमणारे नाही . असंख्यांची जंत्री करण्यापेक्षा हे विश्व कुणा एकानेच निर्मिले असे जाहीर करावे असे मला वाटते . "
यावर त्या चौघांनी सवयीनुसार माना डोलावल्या . यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला दूर निघून गेले . आपण हात जोडले, माथे टेकले आणि भक्तीत दंग झालो !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०३.०३.२०२१
.....................
झाकली मूठ सव्वा लाखाची !
देवाला जन्माला घालणारा तो म्होरक्या पुढे सांगू लागला , " असेही आहे की तो एक कोण आहे , कुठे आहे , कसा दिसतो हे प्रश्न विचारले गेले तर आपल्याला त्यांची उत्तरेही देत येणार नाहीत . यापेक्षा तो अदृश आहे असे सांगितल्याने हे सर्व प्रश्न आपोआपच संपुष्टात येतील ! ज्यांना शोध घ्यायचा असेल ते आयुष्यभर शोध घेत राहूदेत ! आपल्यापुरता हा प्रश्न आता कायमचा संपला आहे. हे विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे , तो सर्वशक्तिमान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो अदृश्य आहे , एवढेच आपण सांगायचे आहे . झाकली मूठ सव्वा लाखाची असते , एवढेच लक्षात ठेवा ! काय ? "
यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला पुन्हा एकदा दूर निघून गेले .
................
एक माणूस स्वत:ला चौघांचा पुढारी म्हणवून घेत होता . तो त्यांना सांगत होता : " दोस्त हो , परमेश्वर मीच आहे ! तेव्हा माझ्या छत्राखाली या . जे येणार नाहीत ते माझे असणार नाहीत आणि जे माझे असणार नाहीत त्यांचे अस्तित्व सन 2021 नंतर राहणार नाही ! काय ? चला , लागा कामाला ! "
गम्मत म्हणजे याही " काय ? " वर अनुयायांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ते माना हलवीत त्यांना सापडलेल्या परमेश्वराचा प्रसार करायला निघून गेले. ही बातमी आधुनिक मिडियाने पकडली आणि टीआरपी वाढवण्यासाठी दर तासांनी ब्रेकिंग न्यूजची सीडी लावून दिली !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०३.०३.२०२१
..............
करणारे आणि ( ओरड ) करणारे
सभेत जोरदार धूम:चक्री झाली. नेहमीचेच आरोप प्रत्यारोप झाले. सेक्स रॅकेट, बलात्कार हेच विषय होते. अखेर गुन्हेगारांना शासन केले जाईल या ग्वाहीवर ओरडणारे शांत झाले. त्यांना माहीत होते की जास्त ताणलं तर त्यांचीही लफडी वर आणली जातील. परवाच एकाने काॅमेंट केली होती. सेक्स रॅकेटबद्दल पण लिहा. खरं तर हे काही प्रथमच घडलेलं नाही. काही वर्षांपूर्वी शहरातल्या नामांकित शाळेच्या सहावी सातवीतल्या मुलांचं सेक्स रॅकेट गाजलं होतं. त्यावेळी करणारे आणि ओरड करणारेही वेगळे होते. त्यावेळी काॅमेंट करणारा कितवीत होता कोण जाणे ! आज करणारे आणि ओरड करणारे यांच्या केवळ जागा बदलल्या आहेत. सर्वोच्च अतीसभ्य संस्कृतीचे विकार तेच राहिले आहेत. जागा बदलून, सोयीनुसार आरडाओरडा करून उपयोग नाही. हे सर्व का होतं याचा विचार करून त्यावर उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. एकमेकांचे विरोधक बनण्यापेक्षा गुन्हेगारीवर एकत्रित काम झाले तर उत्तम.
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०४.०३.२०२१
............................
माणूस हतबल झाला की त्याला काही सुचत नाही. तो सैरावैरा धावू लागतो. बुडत्याला काडीचाही आधार मिळत नाही. दररोज संकटांमागून संकटे येतात. अशा वेळी बहुतेक अखेरची आशा म्हणूनही तो भगत, बुवा , बाबा यांच्याकडे वळत असावा. नाईलाजाने अंधश्रद्ध होण्यावाचून त्याला पर्यायही रहात नसावा. याबाबत माणूसकीने पावले उचलली पाहिजेत.
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०६.०३.२०२१
............................
आपल्या मुलाचा विवाह करून देणे ही आई-वडिलांची प्रामाणिक ईच्छा असते. पण सगळयांच्याच जीवनात हे घडत नाही. काहींच्या मुलांची लग्नेच होत नाहीत. काही मुलेच स्वतंत्र निर्णय घेतात. काही आई वडिलांचेच मत वेगळे पडते ! काहीही असले तरी एक आंतरिक प्रामाणिक तळमळ पूर्ण होत नाही. त्या आई-वडिलांना व मुलांनाही काय वाटत असेल ! आयुष्यभर ते ह्या दु:खातून बाहेर पडू शकत नाहीत, हे त्यांचे दुर्दैव आहे ! यातून सर्वमान्य, सर्वांना आनंद देईल असा मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. वस्तु:स्थितीदर्शक व वास्तव विश्लेषण करून किमान उचित निर्णय घेणे आवश्यक आहे.
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०७.०३.२०२१
............................
काळाने खिंडीत गाठले आहे. काळ बेरकी गोलंदाज आहे. तो फिरकी टाकत नाही ; तर माझी फिरकी घेतो आहे. कालपरवापर्यंत मी त्याचा प्रत्येक चेंडू छान टोलवत आलो. सरळ , साधे जगत आलो. त्या लबाडाच्या हातून सतत निसटत आलो. तेल लावलेला ( किमान दुसऱ्या क्रमांकाचा तरी ) पैलवान ठरत आलो ! याचा राग त्यांने मनात ठेवला होता. आता ऐन साठीत त्यांने पाठीत घातलेल्या दणक्याने कात्रीत सापडलो आहे. रोजच कोंडमारा होतो आहे. मनावर घेऊ नका मित्रांनो. कधी तरी मी चिडेन आणि काळालाही भिडेन ! कारण अनेकदा,
माझ्यात बांधल्या मी पक्क्या अजिंक्य भिंती !
माझी मला दिली मी सारी इथे उभारी !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
०९.०३.२०२१
............................
मन लागो रे लागो रे...
एका ठिकाणी महिलांचे भजन सुरू होते . मन लागो रे लागो रे...भजन सम्राज्ञी लागो रे लागो रे , हे लागोरे लागोरे असे जोडून तल्लीन होऊन गात होती. शेजारीच भांडण सुरू होते. एक म्हातारी कुणा तरी बाईला म्हणत होती , लागोरा रांडू... विषय कट !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१६.०३.२०२१
............................
कोमावारसाहेबांनी मला गायकवाड साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटायला या असा निरोप द्यायला सांगितला. आॅफीस सुटण्याच्या वेळेलाच मी तिथे गेलो. दरवाजा बाहेरच बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते : फक्त सुपरिटेंडेंटनाच भेटून आपले म्हणणे सांगा. मी साहेबांना ओळखत नव्हतो. दबकत दबकत मी सुपरिटेंडेंटसमोर उभा राहिलो. टेबलावरची नेमप्लेट न बघताच मी बावळटपणाने इथे गायकवाड साहेब कोण ? असे विचारले. ते म्हणाले, " मीच. काय काम आहे ? " मी नेहमीच्या आवाजात कोमावारसाहेबांनी आपल्याला भेटायला बोलावलंय , असं सांगितलं. ते म्हणाले , " बसा, बसा , बसा. हळू बोला. " बसल्यावर मी पुन्हा आॅफीस सुटल्यावर बोलावलंय, असं सांगितलं. ते थोडे थांबले आणि माझ्याकडे बघत म्हणाले, " चेहऱ्यावरून तुम्ही कवी वाटता." मी उडालोच. त्यांनी अचूक कसे काय ओळखले हा प्रश्नं मला पडला. ते पुढे म्हणाले, " तुम्ही जा आणि त्यांना येतो म्हणून सांगा. आणि हो, असे निरोप हळूच सांगा. तुम्ही भाबडे आहात म्हणून सांगतो. " पुढेही या दुनियेचे व्यवहार कळायला मला खूप वर्षे लागली, हे सांगायला नकोच ! विषय कट !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१९.०३.२०२१
............................
तुमच्याकडे कसं आहे ?
कुटुंबात तीन माणसे. तो, ती आणि मुलगा. तो मोबाईल मध्ये मग्नं. ती एकाच वेळी मोबाईल आणि टीव्हीमध्ये मग्नं. मुलगा मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये मग्नं. जुनी माणसं उगाच म्हणायची, " घरात माणसं असली तरच घराला घरपण असतं " . आता माणूस घरातल्या घरात जवळ असूनही दूरपण असतं ! विषय एवढाच ! बाकी तुमच्याकडे कसं आहे ?
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
२२.०३.२०२१
............................
बबन एवढंच म्हणाला, बंड्याने अजून वाडीचा ग्रूप बनवला नाहीय. बबनची बायको लगेच म्हणाली, तुम्ही त्या टीव्हीवाल्याला आणि गिझरवाल्याला किती दिवस फोन करताय ! बबन गप्प !
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
२६.०३.२०२१
...........................
शाळेत जायच्या आधीच आई मला शिकवायची . बबन कमळ बघ, हे मी छप्पन्न वर्षांपूर्वी वाचलेलं आणि लिहिलेल़ही पहिलं वाक्यं. काही कालची पोरं मी आजच कमळ बघतोय या समजूतीत आहेत म्हणून सांगितलं इतकंच 😁😁😁😁😄😄😀😀
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
२९.०३.२०२१
...........................
बागूलबुवा
लहानपणी अनेकांना त्यांच्या आज्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भीती घातली असेल. ते आता आजी-आजोबा झाले तरीही आज्ज्यांऐवजी मनावर भीती घालणारी यंत्रणा कार्यरत आहेच. अनेक गोष्टींचा बागूलबुवा आजही उभा केला जातो आहेच. समाजमाध्यमांचा यासाठी मोठ्या धूर्तपणे उपयोग केला जात आहे. एकूण काय , आपण कोणत्याही काळात दहशतीखालीच रहायचे. कोणाला ना कोणाला तरी घाबरूनच रहायचे. कुणी चुकून मुक्त जगा म्हटलंच तर तेही दबक्या आवाजात म्हणायचं. अनावश्यक भीती जनमानसावर घालणाऱ्यांचं काय करायचं हा प्रश्नंही कुठेतरी दबला जात असावा, असं वाटतं !
...........................
१९.०४.२०२१ :
परवा एकाचा फोन आला. म्हणाला, तो मेसेज वाच. त्याचा मेसेज एका मंत्राच्या उच्चारणामुळे होणाऱ्या फायद्यांचा होता. मी म्हटले, वाचला. तो खूष झाला. चार दिवसांनी मी त्याला एक मेसेज पाठवला. चांगले वागण्याचे फायदे. मी पण फोन केला. म्हटले वाचलास का ? तर म्हणे , " अरे कुठचा वाचतोय ! बघितलाच नाहीय. सकाळपासून घरात भांडणं, शेजाऱ्यांशी पण भांडणं चाललीयत नुसती. " मी विषय सोडून दिला.
...........................
जास्त बोलण्यामुळे सिम्पेथिटेक नससंस्थेवर परिणाम होतो. एक तास बोलण्यामुळे पाच तास शारीरिक कामासाठी लागणारे रक्त व स्नायूंची शक्ती खर्च होते. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे हे ताणास निमंत्रण देण्यासारखे असते.
...........................
२०.०४.२०२१
युगे युगे मी संभ्रमी !
कुछ तो गडबड हैं दया...दया दरवाजा तोड दो...दया...दरवाजा तोड दो....
या डायलाॅगची उगाचच आठवण येते...खरंच उगाचच असेल का हो ? दरवाज्याच्या आत खरेच कोरोना असेल का ? की काही नवीनच वाढून ठेवलंय तिथे ? रात्रीस खेळ चाले सुरू आहे. रघू सांगतोय, " तो आसा, तो बघताहा ! " खरेच तो आहे ? बघतो आहे ? घेणार आहे का जबाबदारी ? यापूर्वी तीन चार वा जास्त वेळाही असले भयावह आजार आणि संकटे जगावर कोसळलीयत राव ! सगळ्यांचा शेवट असाच... काय वाढून ठेवलंय पुढे , हा प्रश्नं प्रत्येक वेळीच उपस्थित झाला आहे. आजही ओठांवर येतोय. राजकारण करणारे राजकारणच करीत आहेत. लढणाऱ्यांचा अभिमन्यू होत चाललाय. प्रत्येक वेळी हे असेच का होत आहे ? सत्य नक्की काय आहे ? की मी आपला युगे युगे संभ्रमीच ?
...........................
काही माणसे इकडचं तिकडे करण्यासाठीच फिरतात. दुसऱ्याकडे जायचे, तिसऱ्याचा साळसूदपणे विषय काढायचा. दुसरा काय बोलतो ते कानांत साठवायचे आणि तिसऱ्या चौथ्याकडे जाऊन आपले चार शब्द त्यात घालून आग लावून द्यायची. हेच यांचे छुपे उद्योग. काहींची प्यादी म्हणूनही ही मंडळी काम करतात. काही लोक तुमच्याशी गोड राहतात, पण तुमच्या मागे अशा प्यादयांचा वापर करून तुम्हांला उपद्रव देतात. तुम्हीच जर हलक्या कानाचे असाल आणि सहज हुकसवले जाऊ शकत असाल तर मग प्यादी आणि त्यांच्यामागे लपलेले उपद्रवी यांच्या हातात आयते कोलीत देता. माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर ते जाळीतच सुटणार. आग लागली. विषय संपला.
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
२७.०४.२०२१
............................
माझ्या यू ट्यूब चॅनेल : देवीदास पाटील (https://youtube.com/c/DevidasPatiljm )
या यू ट्यूब चॅनेल वरील काॅमेंटस
![]() |
पळसाला पाने तीनच
ती लग्नं होऊन सासरी आली … बावरलेली … स्वतःचे सर्व काही सोडून सासरी आली …. मनात धाकधूक होतीच... नवीन परिस्थिती... नवीन माणसं … नवीन नाती ... सगळंच तिला नवीन होतं . ते घर ... हे घर … गैरसमजातून बेघर व्हायची तर वेळ येणार नाही ना ? ती जरा साशंकच होती . तिचंही बरोबर होतं . तिच्या काही मैत्रिणींचेही असं झालं होतं .
अनेक ठिकाणी असं होतं . अशावेळी जी मुलगी आपल्या कुटुंबाचा नवी सदस्य झाली आहे तिला समजून घेताना सासर कमी पडतं . बावरलेल्या , गोंधळलेल्या अवस्थेमुळे काही चुकलं तर तिला सांभाळून घेणे , समजावून सांगणे सासरच्यांना कठीण जाते . गंमत अशी आहे की बायकाच बायकांना जास्त छळतात. काही नातीच गैरसमज निर्माण करणारी आहेत . सासू सून आणि नणंद भावजय ही दोन नाती म्हणजे तर कळसच ! गैरसमज आणि भांडण हे यांचे खास मित्र ! त्यातही जाणीवपूर्वक पसरवलेले गैरसमज आणि मुद्दाम उकरून काढलेली भांडणे हे तर खडाजंगीतले चौकार-षटकार ! निमित्ते तर पाचवीलाच पुजलेली ! निमित्ते तयार करण्यात या जोड्यांचा हात , ज्याने ह्यांना निर्माण केलं असं म्हणतात तो खुद्द परमेश्वरही धरू शकणार नाही ! कांगावखोरपणा हा यांचा सर्वोत्तम जन्मजात आदर्श गूण ! कुरघोडी करणे त्यांच्या हातचा मळच ! कळ काढण्यात ह्या हुशार ! अपवादात्मक परिस्थितीत सन्माननीय अपवाद ठरण्याचा विक्रमही ह्याच करू जाणोत ! स्त्रियांना स्त्रियांच इतक्या का छळतात हे एवढं रामायण होऊनही सांगणे कठीण आहे ! राम जाणे ! बाकी काय !
हजारो वर्षे झाली तरी स्त्रीच्या नशिबीचा प्रामुख्याने स्त्रीकडून केलेला सासुरवास काही टळत नाही ! स्त्रीला देवता समजणारी आपली उच्च संस्कृती स्त्रीची प्रत्यक्षात कशी पूजा करते ते पाहण्याजोगे आहे ! हतबल पुरूष द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेसारखे माना खाली घालून आजही गप्प बसतात ! आजच्या तथाकथित स्त्री स्वातंत्र्य युगातही हे कमी झालेले नाही हे विशेष ! घरोघरी त्याच चुली, बोलत नाही तीच बरी ही म्हण यामुळेच इतकी वर्षे टिकून आहे. विषय आलाच आहे म्हणून सांगतो . दुसरीही एक म्हण अशीच टिकून आहे . ती आहे पळसाशी संबंधित . वसंत ऋतूत पळस बहरतो . पळस आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पळस त्वचारोग नाहीस करतो असं म्हणतात . लाल केशरी व किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पळस लक्ष वेधून घेतो. पळस माझं लक्ष वेधून घेतो तो आणखी एका सामाजिक कारणासाठी. बेल आणि निर्गुंडी यांनाही पळसाप्रमाणे तीनच पाने असतात. पण पळसाला पाने तीनच ही म्हण पळसालाच का चिकटली हा प्रश्न मला पडतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे घरोघरीच्या चुली आपला गुण काही केल्या सोडत नाहीत. आपला गूण न सोडण्याची ही प्रवृत्ती मला पळसाला पाने तीनच या म्हणीच्या जवळची वाटते . काहीही केले तरी पळसाला पाने तीनच येणार ! अखेर, अनेक नववधूंचे रडवेलले चेहरे आणि त्यांचा सासुरवास मला टोचत राहतो . मनात एक बेचैनी भरून राहते.
…. देवीदास हरिश्चंद्र पाटील, रत्नागिरी.