बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

जरासा पाऊस पडला अन्....

 जरासा पाऊस पडला अन्....

#पाऊसप्रेमी




पुन्हा भरून येण्यासाठी...

 पुन्हा भरून येण्यासाठी... 

#आभाळ 



काळ्याशार मेघांचा थवा....

 

काळ्याशार मेघांचा थवा....

#पाऊस



मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

वादळ

 येत्या ४८ तासात वादळ येऊ घातलाय...विश्रांती घेऊ लागलेला पाऊस अचानक वादळी बनून परत फिरतोय. #नवरात्र तोंडावर आहे. परवा ०३ तारीखलाच. इकडे आकाशात विजा चमकतायत..... आणि पावसाच्या कल्पनेने शहारलेला वेडि प्रेमवीर कवी काय म्हणतोय ? पहा तर....खालील व्हिडीओत ...




गुलाबाचे मनोगत

 बागेत आज एक गुलाब फुलले होते. सहज त्यांच्याजवळ गेलो तर ते म्हणाले ....




काही आक्षेप आहेत

आजपासून बोलके काव्य हे नवे पान जोडत आहे . हे बोलके काव्य आहे व्हिडीओ स्वरूपात. हल्ली रील्स म्हणतो आपण त्यांना. 

यातले पहिले बोलके काव्य तुमच्यासाठी सादर करतोय‌.‌

" काही आक्षेप आहेत " 



शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

आमची दहीहंडी

 आमची दहीहंडी


श्रीकृष्णाने दहीहंडी सुरू केली तेव्हा बाळगोपाळांच्या मनात शिंक्यावरच्या हंडीतले दही, दूध , लोणीच होते.  श्रीकृष्णाचे खेळ श्रीकृष्णाला माहीत होते . पण  सोबत्यांचे तसे नव्हते. त्यांच्या मनात फक्त आणि फक्त दही , दूध, लोणीच पक्के ठसले होते.‌ युग बदलले. माणसे बदलली. पण स्वभाव बदलले नाहीत. तेव्हा एकच श्रीकृष्ण होता. कोणी कितीही लिहून ठेवले तरी तो पुन्हा आला नाही. येणारही नाही. कारण त्याच्या सोबत्यातूनच पुढे अनेक श्रीकृष्ण निर्माण झाले.‌ ते त्याला येऊच देणार नाहीत. एवढे तंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या गूप्त प्रयोगशाळांमधून विकसित केले आहे. कोरोनाच्या वेळी प्रयोगशाळा काय करू शकते याच्या बातम्या आपण पाहिल्याच आहेत.‌ 


तेव्हा एकटाच श्रीकृष्ण एकाच वेळी सर्वत्र दिसायचा . आता एकाच वेळी अनेक श्रीकृष्ण अनेक ठिकाणी अनेक उद्योग करतांना दिसतात. आज एकूण लोकसंख्येच्या मानाने ते मोजकेच आहेत.‌ उद्या ते वाढतील .आज ते कमी संख्येने एकत्र आले आहेत. जगभर एकत्र आले आहेत. उद्या ते अधिक संख्येने एकत्र येतील. ते उद्याचे जगावर राज्य करणारे नवे हुकूमशहा असतील. वसाहतवाद संपला नाही मित्रांनो. ते जगाच्या नव्या एमायडीश्या करतील.‌ नवा वसाहतवाद आणतील.‌


एकूण काय तर तो परमात्मा श्रीकृष्ण अवघे विश्व व्यापून वर दशांगुळे उरलाच आहे.‌ पण तरीही बदल होतो आहे. त्याला नकोसा बदल होतो आहे.  एक गोष्ट तशीच आहे.‌ आजही अनेक श्रीकृष्ण आणि त्यांचे पेंदे दही, दूध , लोण्यावर लक्ष ठेवून आहेत.‌ शिंके हा प्रकार बदलला तरी दही, दूध , लोण्यांनी भरलेले हंडे आहेतच .‌ काळ विरजण लावतोच आहे. माणूस त्याच्याभोवती फेर धरतो आहे.‌ अनेक श्रीकृष्णांना आणि त्यांच्या साथीदारांना हवा तसाच नाचतो आहे.‌ आजचे अनेक श्रीकृष्ण आणि त्यांचे अनेक  साथीदार आमचेच दही, दूध, लोणी आमच्याच घरातून चोरून आपल्याच सोबत्यांना आधी देत आहेत. उरलेसुरले काही तुकडे आमच्या तोंडावर फेकत आहेत. आम्ही लाचारीने ते चघळत आहोत.  ते सोबती हेच आहेत ज्यांना कोणतीही गरीबांसाठीची योजना आधी कळते आणि त्याचा ते गैरफायदा घेतात.‌  आम्ही आनंदाने त्यांच्याच भोवती फेर धरुन बेहोशपणे नाचत आहोत. सगळ्यात खालच्या थरावर माना खाली घालून वर वर कोण चढत चालले आहेत हे बघण्याचे टाळत आमची दहीहंडी आपण मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत ! 



....देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२७.०८.२०२४ 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

कायम ठणठणीत !

कायम ठणठणीत !

तुम्ही एक पाहिलंय का , ज्यांना आजार होतात, त्यांनाच आजार होतात. काही माणसं कशी कायम निरोगी, कायम ठणठणीत असतात ! अजूनही काही लोक दवाखान्याची पायरी चढत नाहीत ! काही म्हणा काही माणसं जन्मापासूनच धडधाकट असतात. आमच्या शेजारची एक आजी ( माझी आजी नव्हे ! ) तिच्या पतीच्या निरोगीपणाबद्दल गौरवोद्गार काढायची :   म्हणायची, " ह्यांचा पिंडच दगडाचा ! " आणि मग हळू आवाजात पुटपुटायची , " दगडावर डोकं आपटण्यात अर्थ नाही ! " अनुभवाचे बोल होते ते !😀😀 ते आजोबा होतेच तसे दगडासारखे ! सत्तरीतही एकदम ठणठणीत ! आणखी एक काका होते. तेही असेच कायम निरोगी ! त्यांना एकमेव वाईट खोड होती ती दारू पिण्याची ! ते आजोबा आपले निर्व्यसनी होते, पण हे काका पक्के दारूडे होते. म्हणजे ते सगळा डे दारूनेच साजरा करायचे. तेही सत्तर वर्षेच जगले. पण अखेरपर्यंत कधीही आजारी पडले नाहीत ! आम्ही पोरं तेव्हा लहान होतो. मोठी माणसं बोलायची ते कानावर पडायचं.एवढी पितो पण कधी आजारी पडत नाही. बहुतेक दारूमुळे ते अधिक मस्तवाल, बेडर, बेछूट, निडर बनले असावेत, म्हणूनच त्यांना आजारसुध्दा घाबरत असावेत , असं काहीसं मोठी माणसं म्हणायची . असेल का हो तसं ? दुसरीकडे दारूने पोखरलेली, रस्त्यात पडलेली काही पाप्यांची पितरेही आम्ही बघत होतोच की ! मग ते का असे रोगी होतात , हा प्रश्न तेव्हा पडायचा. तोच आजही पडतो !

मला तर वाटते की ती शेजारची आजी बरोबर बोलायची. येणारा प्रत्येक जण स्वतःचा पिंडच घेऊन जन्माला येतो. तुम्हांला सांगतो, कोरोनाच्या काळात सरकारी दवाखान्यात प्रेतं बाहेर काढायला आमचा एक असाच एकदम ठणठणीत मित्र जायचा. बिनधास्त जायचा ! समाजसेवा करायला म्हणून जायचा. कोरोनाच्या कहराच्या काळात महिना दोन महिने तो जात होता. प्रेते बाहेर काढून देत होता . विशेष म्हणजे तो मास्कही वापरत नव्हता ! हे कळलं तेव्हा काळजीच्या सुरात काही मित्रांनी असं करू नकोस , मास्क वापरच, असं त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो एवढंच म्हणाला, " अरे तुम्ही घरात बसून सल्ला देताय. तिकडे येऊन बघा. माणूसकी हरत चाललीय. प्रेतांची विल्हेवाट लावायला कोणीच पुढे येत नाही. उद्या ही प्रेते सडली तर ती दुर्गंधी तुमच्या घरापर्यंत येईल. तेव्हा तुमच्या मास्कचाही उपयोग होणार नाही. मग तुम्हीही मरणारच. घरात बसलात म्हणून तो तुम्हांला सोडील या भ्रमात राहू नका. त्याला भिडावेच लागेल.  आज ना उद्या मरायचेच आहे. कोणाच्या तरी उपयोगी पडून तरी मरू या. " त्याचं ते म्हणणं खबरदारीच्या ( आणि मित्रांच्याही ! ) पलिकडचं होतं... पण निधड्या छातीच्या माणूसकीचं होतं ! आजही तो एकदम ठणठणीत दिसतो आहे ! तोही ठणठणीत पिंड घेऊनच जन्माला आला आहे ! पटलं ना मी काय म्हणतो ते !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०७.०७.२०२४ सकाळी ११.००

....................

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

ही उपेक्षा का ?

 ही उपेक्षा का ? 


संगीतकार राम कदमांवरची किरण माने यांची पोस्ट अलिकडे फेसबूकवर वाचनात आली. तिची लिंक अशी आहे :

https://www.facebook.com/share/dycaxtaCZ3F1zNFY/?mibextid=oFDknk. 


राम कदमांसारखा मराठीतील एक संगीतकार आजच्या एका मराठी तरूणाला माहीत नसणे आणि कदमांची त्यांच्या हयातीत उपेक्षा होणे, या दोन गोष्टी किरण मानेंच्या मनाला फार लागल्या. त्याबाबत त्यांनी कदमांच्या प्रेमापोटी व आत्यंतिक तळमळीने लिहिले आहे. कोणी असे कोणाबद्दल कळकळीने लिहिते तेव्हा त्याला फार महत्व असते. त्यामागे एक युग असते.‌ त्या माणसाची साधना असते. जसे इथे संगीतकार राम कदमांनी निर्माण केलेले त्यांचे युग आणि त्यांची कलासाधना मानेंच्या समोर आहे. 


प्रश्न फक्त राम कदमांचा नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील  त्यांच्यासारख्याच अनेक विभुतींच्या नशिबी अवहेलना, फसवणूक , उपेक्षा अशा वाईट गोष्टी का आल्या हा आहे ! त्यांचे चुकले, दैवाचे चुकले, देवाचे चुकले, त्यांच्या आसपासच्या मोठ्या मोठ्या माणसांचे चुकले की त्यांच्या असंख्य सर्वसामान्य चाहत्यांचे चुकले ? देवाच्या निर्मितीचे माणूस केवढे कौतुक करतो ! पण माणूस सुंदर निर्मिती करतो त्याचे पुरेसे कौतुक माणसेच का करत नाहीत ? ती निर्मिती करण्यामागचे त्याचे अथक प्रयत्न लोकांना दिसत नाहीत , लोक फार तर मागाहून काही वेळा चुकचुकतात , तेवढ्यापुरते शाब्दिक पुळके दाखवून मोकळे होतात, पण त्याच कलावंताच्या कलेचा पुरेपूर आस्वाद घेऊन , काही जण तर फायदा उपटून मोकळे झालेले असतात. पण त्या माणसावर अन्याय होतो आहे हे लक्षात येताच आपण त्या गावचेच नाही असे दाखवतात. साधी ओळखही दाखवत नाहीत. समोरून आलात तर काटकोनात वळून पळ काढतात. कटतात. टाळता आले नाही तर थातूरमातूर बोलून कटवतात तरी ! याचसाठी केला का अट्टाहास असे त्या माणसाला वाटते ! ही उपेक्षा का हा प्रश्नं अनुत्तरीतच राहतो. किमान हे असे का होत असते यावर तरी चर्चा होणे हा या लेखाचा किमान उद्देश आहे . 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२०.०८.२०२४ 


शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह २०२४



मित्र हो, सोमवार दि. ०५ ते सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत माझ्या शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह सुरू होता. मी माझ्या फेसबूक प्रोफाईलवर व यू ट्यूब चॅनेल देवीदास पाटील क्रियेशनवर त्याचे थोडे व्हिडीओ पोस्ट केले होते. अजूनही काही व्हिडीओ आहेत जे येत्या काही दिवसांत पोस्ट करीनच.  आमच्या जाकीमिऱ्याप्रमाणेच भाटीमिऱ्यातील दत्तमंदिर व सडामिऱ्या भागातील नवलाई पावणाई मंदिरातील नाम सप्ताहही वरील नमूद कालावधीत संपन्न झाला. कोंकणात असे एक्का वा नाम सप्ताह अनेक ठिकाणी संपन्न होतात. ही इथली संस्कृती आहे.

आमचा मिऱ्या गाव तीन बाजुंनी पाण्याने वेढलेला आहे. शहराकडून येणारा एकमेव मुख्य रस्ता व त्यालाच फुटलेले उपरस्ते तसेच समुद्रसपाटीपासून चढत्या क्रमाने असलेले गावाचे भाटीमिऱ्या, जाकीमिऱ्या, आनंदनगर , सडामिऱ्या व पुन्हा उतारावरून समुद्रसपाटीला असणारे मिऱ्याबंदर हे भौगोलिक अर्धगोलाकार भाग . बंधारा एका बाजुने आहे. मध्ये मिऱ्या डोंगर उभा आहे. पण त्यानंतर उघडा समुद्र किनारा आहे , समुद्र खाडी स्वरूपात आत घुसलेल्या आहे. तिथूनही समुद्राचे पाणी घुसून हाहाकार उडू शकतो.

अशा भूभागातील लोकांना देवाचाच आधार वाटतो. त्याला अनुसरून, भाटीमिऱ्यात दोन , जाकीमिऱ्यात एक अशी तीन दत्तमंदिरे , जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे एक व हनुमंताची दोन मंदिरे, माझ्या हयातीत बांधलेली गणपतीची दोन मंदिरे व सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर ही इथली मंदिरे आहेत. खरे तर सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर हे प्रथम निर्माण केले गेले. पण नंतर वाढत्या लोकसंख्येमुळे  विविध सांस्कृतिक उपक्रमांना मंदिरातील जागा अपुरी पडू लागली.  जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे मंदिर कधी बांधले गेले तो उल्लेख त्याच्या सध्याच्या कमानीवर आढळतो. अर्थात, भूतकाळात कधी काय झाले यावर जाणूनबुजून वाद निर्माण करण्यापेक्षा आणि दाणे टाकून कोंबडया झुंजवण्यापेक्षाही , शंभर वर्षांहूनही अधिक काळाचा हा वारसा नामसप्ताहासारख्या उपक्रमांतून जुन्या व नव्या पिढीकडून पुढे आनंदाने आणि एकोप्याने चालवला जात आहे , हेच अधिक महत्वाचे व अभिमानाचे आहे ! हा सोहळा मानवी जीवनाच्या आनंदाचा भाग बनावा, हीच परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील. 
१३.०८.२०२४
........................

मी कालच्या पोस्टमध्ये दाणे टाकणारांचा व ते टिपण्यासाठी भांडणे करणाऱ्यांचा ओझरता उल्लेख केला होता.‌ संस्कृतीवर जाणकार भाष्य करतात. ते मी ऐकतो. चांगले भाष्य करतात. पण होते काय काही भाष्यकार इकडे प्रभावी बोलतात पण तिकडे दाणे टाकून कोंबड्या झुंजवतात. खरे तर चूक त्यांची नसतेच ! चूक त्यांचे दाणे टिपणाऱ्या आणि डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपसातच भांडणाऱ्या कोंबड्यांचीच असते ! भांडणे लावणे ही ज्यांची विकृती असते ते भांडणे लावून मजा घेतच बसणार ! त्याबद्दल त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या नादाला न लागणे केव्हाही श्रेष्ठच ! दाणे टाकणारे आणि ते दाणे टिपून आपसात भांडणारे हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत.

खरे तर संस्कृती ही जीवनाच्या उपक्रमांमधून बनते. या उपक्रमांशी व पर्यायाने संस्कृतीशी धर्माला जोडण्यात आले. माणूस अगोदरचा,  संस्कृती नंतरची आणि धर्म तर खूपच मागाहून आला आहे. पण तोच कानामागून येऊन तिखट झाला आहे. कारण मध्यंतरीच्या काळात तो सत्तेशी पर्यायाने राजकारणाशी जोडला गेला. राजकारण हे सत्तेतून आले असले तरी राजकारणी आपल्यातूनच येतात हे विसरता येत नाही ! तेव्हा लोकशाहीत अंतिम बोट कुणाकडे वळते आहे ते पहा.

मूळात माणसांच्या विविध संस्कृती विविध ठिकाणी अस्तित्वात होत्या. आजही आहेत. मग त्यांना धर्म ही संकल्पना कशासाठी जोडला गेली ? संस्कृतीत जसे सुष्ट लोक असतात तसेच दुष्टही असतात. वर दाणे टाकणारे आणि झुंजणारे या दोन्हींचा उल्लेख आलाच आहे. खरे तर चांगल्या वाईट ह्या दोन्ही प्रवृत्ती विश्व चालण्यासाठी आवश्यकच आहेत. तेव्हा त्यांचे स्वागतच आहे . एक तर समाजाला शिस्त लावण्यासाठी धर्म ही संकल्पना आली आणि वाईटांना निदान भीती वाटावी व ती कमी पडू लागली म्हणून पुढे देव ही संकल्पनाही धर्मांशी जोडली गेली. पण वाईट लोक देवाधर्माला विकून खाणारे निघतात आणि चांगले लोक सांस्कृतिक उपक्रम नित्य नेमाने व भक्तीभावाने करतात ! मानवी संस्कृतीचे हे दोन घटक अव्याहतपणे सुरू राहणार हे नक्की !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील.
१४.०८.२०२४

............