मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

विचित्र स्वप्ने 2

 आज पुन्हा एकदा पडलेल्या विचित्र स्वप्नांना भेटू. कुणाला अशी स्वप्नें पडत असतील तर त्यांना पडलेल्या स्वप्नांशी काही साधर्म्य आहे का, तेही पाहता येईल. कुणाला हया स्वप्नांचा अर्थ अनुभवास आला आहे का ? हेही पाहता येईल.  



फारच विचित्र आणि भयानक असं पहिलंच स्वप्नं सांगतो. 

06.08.2020

 हाँलमध्ये जिथे पूर्वी देवघर होते , त्या ठिकाणी पूर्व पश्चिम असा लाकडाचा माच असतो. मी त्यावर दक्षिणेकडे तोंड करून बसलेला असतो. अचानक मला लाकडात हालचाल जाणवते. मी लाकडांकडे बघतो  तर त्यांचा रंग काळपट हिरवट दिसतो. माझ्या उजव्या पायापासून केवळ सहा इंचावर मला ती हालचाल वाढल्याचे आणि उष्ण हवेची धग मला जाणवू लागते . तो सर्प असल्याचे माझ्या लक्षात येते. अजून तो लाकडांतून वर येऊन मला चावलेला नाहीय. पण तो माझ्या दिशेने सरकतोय आणि मी स्वत:ला पळ , पळ म्हणून सांगतोय. पण मला उठता येत नाहीय , सरकताही येत नाहीय आणि पळताही येत नाहीय. मी त्या लाकडांनाच चिकटून बसलोय ही जीवघेणी जाणीव होत असतांनाच डोळे उघडले. 

......

09.08.2020

आज दोन स्वप्नें पडली. 


पहिल्यात मी माझ्या पूर्वीच्या कार्यालयात दिसतो. दोन खोल्या दिसतात. एकीत दोन तीन प्रोफेसर्स व दुसरीत कार्यालय . प्रोफेसरांच्या समोर मी उभा असतो. एक जण मला एक आदेश टाईप करून तो मला देतो. हे रजिष्ट्रार मँडमना दाखवू नका , असं एक जण मला सांगतो तर दुसरा हसत हसत म्हणतो की दाखवलात तरी तिला काही कळणार नाही ! डोक्यावरून जाईल तिच्या. तो आदेश म्हणजे मला कुठेतरी स्पर्धेत भाग घेण्याबाबत प्राचार्यांनी केलेली शिफारस असते. तो कागद घेऊन मी हसत हसत बाहेर पडतो आणि तेवढयात मला जाग आली. 


दुस-या स्वप्नात आमच्या जुन्या घरात मी आईसमोर बसलेला दिसतो. वेळ दुपारची असते. मी आईला विचारतो की मी जाड दिसतो की बारीक दिसतो ? आई काही तरी उत्तर देणार असते एवढयाच मला जाग येते . 

........

10.08.2020 

म्हणजे 09.08.2020 ची रात्र. वेळ 12.30 ची. पुन्हा एकदा मला आमचे जुने घर दिसते. मी व पत्नी ओटीवर उभे असतो. इतक्यात मागच्या बाजुचा सीन मला दिसू लागतो. सकाळची वेळ असते.  रमेश हा लहान भाऊ कार घेऊन बाहेर जायला निघतो. त्यांच्या अंगणात त्याचा मोठा भाऊ नरेश त्याची वाट बघत थांबलेला असतो. तो रमेशला काही तरी बोलतो ज्याने रमेश चिडतो व नरेशच्या अंगावर धावून जातो. नरेश जणू याचीच वाट बघत असतो. तो चाकू काढतो व रमेशच्या पोटावर वार करतो. त्यांची आई समोरच असते. आता ती पोलीसांना फोन करा म्हणून आमच्याकडे येईल , आपण तिला तूच तक्रार कर म्हणून सांगूया, असे मी पत्नीला सांगतो आणि इतक्यातच मला जाग येते. 

........

12.08.2020

मी शेजारच्या घरात जातो. वेळ रात्रीची असते. मी प्रवेश करतो तोच टेबलावरून एक कुत्रा शेपटी हलवत खाली उतरतो व माझ्या गळयाला आपली मान मायेने घासतो. मी त्याच्या मानेवरून प्रेमाने हात फिरवतो . तितक्यात माझे लक्ष त्याच्या गळयाकडे जाते . गळयात लोखंडी साखळदंड असतोे. त्याचा हूक काढून मी त्याला बंधनातून मोकळा करतो. असे ते स्वप्नं होते. 


       या स्वप्नातून जाग आली तेव्हा रात्रीचे बरोब्बर अडीच वाजले होते. पुण्यावरून आल्याने माझा मुलगा शेजारच्या घरात क्वारंटाईन आहे व तिथून तो एकटाच त्याच्या कंपनीचे वर्क फ्राँम होम करीत असतो. त्या स्वप्नामुळे मला मुलाची काळजी वाटू लागली. मी पत्नीकडे पाहिले तर ती झोपली होती. मी हळूच उठलो व शेजारच्या अंगणात गेलो इतक्यात आमचा दरवाजा अर्धवट उघडी राहिल्याने वा-यामुळे आपटून आवाज येऊ लागला. त्या आवाजाने पत्नी घाबरेल म्हणून मी धावत घरात आलो. एवढयात पत्नीला जागच आली. मग तिला मुलाला पाहुया म्हणून सांगितले. ती दारावर थांबली. मी पाय-या उतरून शेजारी गेलो. लाईटस् चालूच होते. मी खिडकीवर टकटक केली. हाका मारल्या तरी त्याचा प्रतिसाद मिळेना. शेवटी काचेवर मी जोरात थाप मारली त्या आवाजाला मात्र त्याने प्रतिसाद दिला ! त्याचं काम रात्री तीन चार वाजेपर्यंत चालू असते . पण आज दीड वाजताच संपले होते. लाँग आऊट होऊन तो आतल्या रूममध्ये झोपला होता. पण बाहेरच्या रूममध्ये लाईटस् चालूच राहिल्या होत्या. मी मुलाला सांगितले कालच तुझा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. आपल्या घरात झोप चल. तसा तोही आला व मग आम्ही बोलत राहिलो. चार वाजले तसा मुलगा झोप येत नाही,  ए.सी.तच जाऊन असं म्हणून पुन्हा शेजारच्या घरात झोपला !

..........

16.08.2020

गेले दोन दिवस स्वप्नंच पडले नव्हते. आज पडले.  मी नेहमी सकाळी सहाला उठतो. आज जोरदार पावसामुळे मला सहाला जागच आली नाही. मी पावणेसातला उठलो. उठलो तोच स्वप्नातून जागा होत. स्वप्नात , माझी पत्नी व मुलगा मागच्या अंगणात दक्षिण दिशेला तोंड करून उभे होते. मी व चक्क विलासराव देशमुख दोघे नवीन सफेद लेंग्या सद-यात लगतच्याच घराच्या मागच्या अंगणात एक खताची पिशवी पूर्वेकडून पश्चिमेकडे नेतो. पश्चिमेला दक्षिणोत्तर हिरव्या पानांच्या वनस्पतीच्या एक दोन फुटांच्या रोपांची शेती आहे , तिथपर्यंत ती पिशवी आम्ही दोघे ओढत नेतो. मी पत्नी व मुलाकडे बघून काही तरी बोलतो. विलासराव त्यांचे हुकमी हास्य फेकतात आणि इथेच स्वप्नं संपले !

............

25.08.2020

गेला आठवडाभर एक तर स्वप्नें पडली नाहीत वा आठवणीत राहिली नाहीत. हा आठवडा अगदीच खराब गेला आहे. जीवनाने अक्षरश: रडवलं आहे. पत्नी व मुलगा यांचा तणाव एकाच वेळी हैराण करतो आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही झोप नाही. त्यात स्वप्नं कुठलं पडायला आणि पडलं तरी कुठलं आठवायला !

         काल रात्री तणाव थोडा कमी झाला. झोपही बरी लागली. बहुतेक दोन स्वप्नं पडली. दोन्हीही माझ्या माजी सरकारी कार्यालयाशी संबंधित. पण दोन ठिकाणच्या. एक मी मुंबईत रजेवर आहे . मला रत्नागिरीच्या कार्यालयात जाऊन हजर होणे शक्य नाही. तर मुंबईच्या कार्यालयात मला हजर करून घेण्याचा आदेश त्या कार्यालयात संगणकावर लिपिक टाईप करीत असतांना मला दिसतो.  इथे स्वप्नं संपते. 


        दुसरे स्वप्नं रत्नागिरीत मी एका रस्त्यावर चालतो आहे. कार्यालयातील सहकारी श्री. शालिकराम चव्हाण यांच्या घरी मी जात असतो. विशेष म्हणजे ते पूर्वेकडे राहतात , पण मी पश्चिमेकडे जात असतो ! ही उलटी दिशा का तेच समजत नाही.  मी अस्वस्थ मन:स्थितीत आहे. माझे कपडे थोडे अस्ताव्यस्त आहेत. इन केलेले पिवळे शर्ट उजवीकडे पँटमधून थोडेे बाहेर आल्याचे चालता चालता माझ्या लक्षात येते. तेवढयातच अकरा वाजल्याचेही लक्षात येते.  तेव्हा जाणवते की चव्हाण आता ऑफिसला गेले असणार , आता त्यांच्या घरी जाऊन काही उपयोग नाही. त्यांना आधी फोन करूया , असा विचार करतो आणि मला जाग येते. तेव्हा पहाटेचे पाच वाजलेले होते. 

......................

01.09.2020

आज आमच्या जुन्या आँफीसात नार्वेकर बाई तिच्या पूर्वीच्याच खुर्चीत बसलेली आहे. बाजुला विभुते बाई आहे. समोर काटकोनात बादल आहे. मी त्याने दिलेले जीपीएफचे बील तपासत असतो. माझ्या लक्षात येते की, ते बील जीपीएफ बिलाच्या नमुन्याऐवजी आकस्मिक खर्चाच्या बिलांच्या नमुना क्र. 31 मध्ये केलेले आहे . मी बादलला हे सांगायचे ठरवतो , पण त्यापूर्वी जीपीएफ बिलांची फाईल घेऊनच बादलला दाखवावे , असा विचार करतो.  इथेच स्वप्नं संपते ! 


        हे स्वप्नं विचित्र म्हणजे अनेक वर्षे न आलेली नार्वेकर बाई आँफीसात बसून आरामात गप्पा मारतांना दिसते. ती व विभुते त्यांच्याच पूर्वीच्या आस्थापना विभागात तर मी व बादल आमच्याच पूर्वीच्या लेखा विभागात बसलेलो दिसतो.  मी दीड वर्षापूर्वीच रिटायर्ड झालो तरीही मी तिथे कार्यरत व सहकारी बादलला मार्गदर्शन करतांना दिसतो. 


       या स्वप्नाची प्रचिती लगेच आली ! या स्वप्नात संपूर्ण कार्यालयात फक्त चारच माणसे दिसली ! लक्षात घ्या . चार खांदे ! सकाळी 09.15 ला माजी विद्यार्थी व शेजारच्या पेडणेकरांचा जावई निखील शेटये याचा माजी अधिव्याख्याता जयंत शशिकर नांदेडकर यांचे काल रात्री 11.00 वा. निधन झाल्याचा संदेश आला. दुसरा झटका बसला तो माझ्या मेहुण्याचे सासरे वारल्याचा फोन आला तेव्हा. 


           चार खांदे म्हणजे बहुतेक कुणाच्या तरी मरणाच्या बातम्यांचा दिवस दिसतोय ! आतापर्यंत दोन पुरूषांच्या निधनाच्या बातम्या आल्या आहेत. स्वप्नात दोन पुरूष व दोन महिला दिसल्या होत्या. म्हणजे अजून दोन महिलांच्या बातम्या तर येणार नाहीत ना ?


.......................

02.09.2020

काल मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्याने विचित्रच स्वप्नं पडले. आमच्या शेजारी मंदिर आहे . त्याच्या समोरच पिंपळपार आहे. मंदिर परिसर आमच्या अंगणातून स्पष्ट दिसतो. स्वप्नात मी कशाला तरी आमच्या अंगणात येतो. समोर पिंपळाकडे लक्ष जातो. पाहतो तर पिंपळपार ते मंदिराचे कंपाऊंड यादरम्यान आमच्या घराच्या दिशेने असलेल्या कोप-यात मंदिराकडे पाठ करून वीसपंचवीस तरूण दाटीवाटीने पायावर बसलेले होते. ते एकमेकांना डावीउजवीकडे ताकदीने ढकलत होते. सगळेच चिरडले जात होते. गुदमरत होते , पण साखळी तुटत नव्हती. त्यातच माझा मुलगा साधारण उठू पहात होता व त्याची मान थोडी उंच दिसत होती. त्याच्या मानेच्या शिरा टरटरलेल्या एवढया लांबूनही मला दिसल्या. केस पिंजारलेले दिसले. त्यातच मंदिराच्या कोप-यावर आणखी काही मुले हया घाणेरडया प्रकाराला मोठमोठयाने चिअर करत होती. तिकडे त्या मुलांचा जीव जात आला होता तर दहा फुटावरून इकडची मुले मोठमोठयाने हसत होती. त्यांचा सामूहिक आवाज घुमत होता. विचित्र हास्यलहरी निर्माण होत होत्या. हे ऐकून मी मोठयाने ओरडत तिकडे धाव घेतो. मला बघून त्यांचा आवाज अचानक बंदच होतो. ते एकाएकी गायबच होतात. दुसरीकडे एकमेकांना ढकलणारी ती मुलेही त्याच क्षणी गायब होतात. मी मंदिर परिसरात एकटाच उभा असतो , इतक्यात प्रचंड आवाजासह पावसाची सर येते. माझ्यासमोर पिंपळासमोरचा  दक्षिणेच्या कठडयापर्यंतचा मोठा भूभाग धापकन खाली त्याच्यावर काही तरी आपटल्याता आवाज होऊन कलून खचतो ! जमिनीवर कशाचा आघात झाला ते मला कळत नाही. ते भू:स्खलन मी अवाक होऊन बघत राहतो . त्याच वेळी मला जाग आली. मी घडयाळात पाहिले तर दोन वाजत आले होते ! 

...............

05.09.2020

दोन स्वप्ने पडली. एकात मी व आबा शिवलकर मेश्राम साहेबांच्या केबीनमध्ये त्यांच्या टेबलासमोर उभे. पलीकडे साहेबही उभेच असतात. त्यांच्या टेबलावर आमच्या बाजुने दोन वेगवेगळी कागदपत्रे पूर्वपश्चिम खालोखाल ठेवलेली असतात. त्यातील साहेबांच्या बाजुची आबांची कागदपत्रे साहेब बघत असतात. माझी कागदपत्रे त्यांनी पाहिलीत की नंतर पाहणार हे समजत नसते. पण आबांच्या कागदपत्रांपैकी आणखी दोन पेपर्स टेबलवरच असतात. आबा ते हातात घेवून , हे पण साहेबांना दाखवायचे का ? म्हणून मला हळूच विचारतात. मी ते बघतो तर ते आबांचे आधारकार्ड व रेशनकार्ड असते. मी ते दाखवू नका म्हणून सांगतो. त्कडे साहेब उभे राहून आबांची कागदपत्रे पहातच असतात हे मी डोळयांच्या कोप-यातून पाहतो व स्वप्नं तिथेच संपते. 


       दुसरे स्वप्नं मात्र भयानक होते. जयस्तंभावर कलेक्टर ऑफिसच्या आवारात कोविड सेंटर असते. मधला रस्ता ओलांडून समोरील पेट्रोल पंपाच्या आवारात बाकडी असतात. एका बाकडयांवर दोघे तिघे पोलीस तर त्यांच्यासमोरच्या बाकडयावर मी व  माझा चुलत भाऊ नाना भाटकर बसलेलो असतो. ते पोलीस आम्हांला पलीकडे जाऊन कोविड तपासणी करून यायला सांगतात. आम्ही जायला उठतो तर तिथे एका बाजुला माझी पत्नीही बसलेली दिसते. आम्ही दोघे रस्त्यावर येतो पण रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याऐवजी आम्ही आमच्या गावात आलेलो दिसतो. तिथून आम्ही पुन्हा जयस्तंभावर पोलीसांच्यासमोर जसे काही आम्ही पलीकडील कोविड सेंटरमधून तपासणी करून आलो आहोत अशा आविर्भावात जाऊन बसतो. पोलीस काहीच बोलत नाहीत. इथेच मला नेमकी जाग येते. 

..........

10.09.2020 

आज फारच विचित्र स्वप्नं पडले. स्वप्नात फक्त एक भावाबहिणीची जोडी दिसली. दोघांच्या अंगात गुलाबी रंगाचे कपडे होते. बाकी काहीही बोलणे झाले नाही. मी त्यांना बघितले आणि स्वप्नं संपले. 

       या स्वप्नाची प्रचिती संध्याकाळीच आली. त्या दोघांशी अगदी घट्ट संबंध असलेल्या एकाच्या बायकोला कोरोना झाल्याची बातमी स्वप्नातल्या बहिणीनेच फोनवरून माझ्या पत्नीला सांगितली. 

......


     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: