रविवार, ९ जून, २०२४

ओळखीच्या खुणा

ओळखीच्या खुणा 

काव्यसंग्रह


 ओळखीच्या खुणा हा अविनाश फणसेकर सरांचा काव्यसंग्रह. आज मी ह्या काव्यसंग्रहातील काही कवितांवरच लिहिणार आहे. खरे तर, त्यात मला सापडलेल्या रत्नागिरीच्या मराठी गझलच्या ओळखीच्या पाऊलखुणांबद्दल मी इथे लिहिणार आहे. सर गणिताचे प्राध्यापक होते पण त्यांचे मन कवींचे होते. कलंदर कवींचे होते.‌ त्यांचा हा काव्यसंग्रह रत्नागिरीच्या कीर पब्लिकेशनने मार्च २०१४ मध्ये प्रकाशित केला . दुर्दैवाने सर तेव्हा हयात नव्हते.‌ दहा वर्षांनी या काव्यसंग्रहाची आठवण व्हायचे कारण म्हणजे या काव्यसंग्रहातील आदरणीय प्र. ल. मयेकर यांचे भावनोत्कट मनोगत . त्यात ते म्हणतात , " ...त्यांच्या प्रतिभेमध्ये आसमंत उजळून किंवा जाळूनही टाकण्याची शक्ती नक्कीच होती. पण त्यांनी स्वतःच तो अग्नी गिळून टाकला होता. कुठून आणली या माणसाने ही संतांची करूणा ? फणसेकर सर आपल्यासोबत या प्रश्नाचं उत्तरही घेऊन गेलेले आहेत..." 


माझा दावा नाही पण...

प्र. लं. सारख्या थोर व्यक्तीला जे उत्तर सापडले नाही ते मला सापडले असा मी दावा करणे हास्यास्पद आहे व तो मी करीतही नाही. पण मला प्र. लं. च्या त्या प्रश्नांतील संतांची करूणा या शब्दांनी फणसेकर सरांच्या कवितेकडे अधिक ओढलं हे मात्र खरं !  फणसेकर सरांचा मला काही वर्षेच सहवास लाभला. ते विव्दान प्राध्यापक , नाटककार व कलंदर कवी. तर मी नुकताच काव्यमैफिलींमध्ये दिसू लागलेला.  सुरूवातीला तर त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीतीच वाटायची. पण तरीही माझा स्नेह त्यांच्याशी जुळला यात त्यांचाच वाटा फार मोठा होता. सन १९८५-९० चा तो काळ होता. रत्नागिरीत साहित्यिक कार्यक्रम फार दुर्मिळ असायचे. पण स्मिताताई राजवाडे , विनय परांजपे यासारखी सतत धडपडणारी माणसे किमान छोटेखानी कवी संमेलन तरी अधूनमधून घडवायचीच. मी त्यांच्यासोबतच असायचो . बरेचदा फणसेकर सर व्यासपीठावर असायचे. तिथूनच ते सांगायचेत , " देवीदास, आज तुझी गझल झालीच पाहिजे " . कधी कधी तर हक्काने माझ्या पाठीवर थाप मारून ते तसं सांगायचेत.  खरं तर सरांचा पिंड गझलकाराचा होता. त्यांची कलंदरी गझलियतशी मिळतीजुळती होती. पण चुकूनही कधी मी गझल लिहितो किंवा मी माझी गझल सादर करतो असं ते म्हणाले नाहीत. उलट माझ्यासारख्या यत्किंचित कवीला ते गझल सादर करायला आवडीने सांगायचे. 

अशा या थोर मनाच्या माणसाच्या काळजात कुठेतरी खोल गझल होती. मला वाटतं, प्र. लं. सर म्हणाले ती संतांची करुणा पेलण्याचं सामर्थ्य फणसेकर सरांना गझलेनेच दिलं असावं. ' तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही ' हे शब्द सुरेश भटांनी किती खात्रीने लिहिले असतील ! सुरेश भटांना हे सामर्थ्य गझलनेच दिलं असावं आणि त्याच पध्दतीने संतांची करुणा पेलण्याचं सामर्थ्य फणसेकर सरांना गझलेनेच दिलं असावं. कारण, संकट काळात मन मजबूत करण्याचं सामर्थ्य गझलमध्ये आहे, हे जीवन संघर्षात मी अनेकदा अनुभवले आहे, अगदी आजही, हा लेख लिहीत असतांनाही अनुभवतो आहे. 

फणसेकर सरांची कविता समजून घेण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व जाणणंही  आवश्यक आहे. मराठी गझल ही वृत्तात लिहिली जाते. पण फणसेकर सर कलंदरी वृत्तीचे. स्वच्छंद कवी. पण गझलची वृत्ती भिनलेले कवी. आदरणीय सुरेश भट ज्याला गझलची वृत्ती म्हणतात ती फणसेकर सरांकडे ठासून भरलेली होती. गझलेचा भाव, आवेश आणि आवेगही त्यांच्या रचना व सादरीकरणातही भरपूर असायचा. ते मोकळेढाकळे असल्याने वृत्तांच्या खटपटीत ते अडकले नसावेत. पण त्यांनी गझलच्या ढंगाने जाणाऱ्या कविताच नव्हे तर गीतेही लिहिली आहेत, याचा पुरावा म्हणून या काव्यसंग्रहाकडे पाहता येते ! 

या संग्रहातल्या पहिल्याच गीतात मला त्यांच्यातला गझलकार दिसला ! या गीताच्या पहिल्या दोन ओळीत गझलेतले यमक, अंत्ययमक डोकावते. आपण प्रत्यक्षच पाहुया : 

मी स्वप्नात पाहिलेले कुणी एक गाव होते 

आठवूनी आठवेना काय त्याचे नाव होते

यानंतरच्या कडव्यांच्या शेवटच्या ओळींही याच धर्तीवर लिहिलेल्या आहेत. पहा,

कुठे पहारे भासले चोरापरी ते, अंतरीचे साव होते

रस्त्यात भेटणारे रंक तेथील राव होते

भक्ताच्या चेहऱ्यावर देवतांचे भाव होते ...


अशीच गझलमयता ' नाहीच योग आता ' या गीतात व यापुढील काही गीतातही आढळते. काही कविताही गझलसदृष्य आहेत.  ' हासू ‌नकोस आता ' ही तर गझलच्या खूप जवळ जाणारी कविता. हिचे शिर्षकही गझलेच्याच ढंगाने जाणारे. तुमचे हजार सूर्य हीसुध्दा गझलचीच वृत्ती दाखवणारी. सूर एकदाच अपुले , मीही कुणीतरी आहे, बदनाम हा जगी या , नशेची खुमारी , खुद्द गजल या नावाच्या दोन रचना, कधी भेटलीस तर, जिंकुनी मैफिल गेली, आता नशेत आहे, चंद्र माझ्या मनीचा, त्यानंतर कागदाच्या या फुलांना , एका मुशाफिराला, दोस्तांनो, यांची शिर्षकेच नव्हेत तर यातल्या सर्व ओळी पाहिल्या की सर किती गझलमय झाले होते याची कल्पना येते. सरांनी गझलबद्दल तेव्हा चर्चा केली असती तर नक्कीच चित्र वेगळे दिसले असते. पण तो योग कधी आलाच नाही.‌ मीही नुकताच गझलसदृष्यतेतून बाहेर पडलो असल्याने गझलबाबत काही सांगावे या कुवतीचा नव्हतो . ते माझ्या साध्याशा गझलांवरही प्रेम का करत होते, मला गझल सादर करायचा आग्रह का करत होते, ते स्वतःच्या गझलचं प्रतिबिंब तर माझ्या गझलांमध्ये पहात नव्हते इ.  प्रश्नांचे उत्तर म्हणजे त्यांच्याच हृदयात खोल बसून राहिलेली गझल होय !  होय, याच गझलने त्यांना संतांची करुणा पेलण्याचे सामर्थ्य दिले असावे असे आज हटकून वाटते ! 

तुम्हांला याबद्दल काय वाटते ते नक्की कळवा, ही विनंती.‌


....देवीदास हरिश्चंद्र पाटील.‌



 

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

देविदास खूप छान प्रकटीकरण.....कैलासवासी फणसेकर सर गझलकार होते हे मला तुझ्या प्रकटीकरनातून उमगले..मी त्यांना लेखक नाटककार म्हणून ओळखत होतो.... सरांच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल तुझे मनस्वी आभार,🙏