शरदाचे चांदणे....
नवलाई पावणाई मंदिर, जाकीमिऱ्या येथे श्रावण नाम सप्ताह २०२४ निमित्त देऊळवाडी महिला मंडळातर्फे भजन सादर झाले. त्यावेळी सौ. सुजाता देवीदास पाटील यांनी सुरेल आवाजात म्हटलेले शब्दांचे चांदणे हे गीत प्रत्यक्ष ऐका....
ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
शरदाचे चांदणे....
नवलाई पावणाई मंदिर, जाकीमिऱ्या येथे श्रावण नाम सप्ताह २०२४ निमित्त देऊळवाडी महिला मंडळातर्फे भजन सादर झाले. त्यावेळी सौ. सुजाता देवीदास पाटील यांनी सुरेल आवाजात म्हटलेले शब्दांचे चांदणे हे गीत प्रत्यक्ष ऐका....
आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !
परवा निवेंडीवाडीच्या शाळेत वह्या वाटप करण्यासाठी गेलो होतो. सौ. निरजा शेट्येला तिच्या घरून गाडीत घेतलं. ती ग्रामपंचायत सदस्य आहे. निवेंडीवाडीची शाळा तिनेच सुचवली होती. तिने तिथली अधिक माहिती असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्या सौ. भरणकर यांनाही वाटेत सोबत घेतलं. त्या असल्याने प्रवास योग्य रस्त्यावरून झाला. पाऊस सुरूच होता. वाट बिकट होती. निरजाचा भाऊ निलेश पेडणेकर गाडी चालवत होता. त्याने गाडी सफाईने चालवली. शाळेच्या थोडं पुढे गाडी पार्क करावी लागली. आम्ही चौघेही पाऊस थांबण्याची वाट पहात बसलो. दहा मिनिटे वाट पाहूनही पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसेना. माझी एकमेव छत्री कारमध्ये होती. तिचा आधार घेऊन एकाने शाळेत जावे , मग कोणी जावे , वह्या आणि छत्री एकाच वेळी कसे धरायचे आणि वह्या न भिजवता शाळेत कसे पोचायचे यावर पुढची पाच मिनिटे चर्चा करून झाल्या. आता काय करायचं याच प्रश्नावर चर्चेची गाडी पुन्हा थांबली. आम्ही उगाचच अडकून पडल्यासारखे झालो होतो. उगाचच टेंशन वाढले होते. ते तिघे समस्येवर चर्चा करत होते आणि मी सोल्यूशनवर विचार करत होतो. मला उत्तरही सुचले. मी निरजाला म्हणालो, शाळेत फोन कर आणि मुलांना छत्र्या घेऊन पाठवायला सांग. झाले, तिच्याकडे मुख्याद्यापकांचा नंबर असल्याने, त्यानुसार तिने फोन केला आणि चार मिनिटातच चार मुलं छत्र्या घेऊन गाडीजवळ आली. आम्ही आणि वह्याही शाळेत सुखरूप गेलो ! थोडक्यात, परिस्थिती आपण कशी घेतो हे फार महत्वाचे असते.
अशाच घटना अनेकदा आयुष्यात घडतात. ही घटना तर किरकोळ होती, पण त्यावर चर्चा किती मिनिटे झाली ! मनाचा गोंधळ किती उडाला ! घटनेची सुरूवात हा घटनेचा सुरूवातीचा बिंदू . पण हा एकच बिंदू रहात नाही. या एका घटनेतून पुढे अनेक घटना घडू लागतात. हेच तुमचे कालचक्र असते. जीवन असते. अशा अनेक घटनांचे बिंदू पुढे सरकत राहतात. याच बिंदूंची एक रेषा बनते. कोणत्याही घटनेच्या सुरूवातीपासून निघालेली ही रेषा पुढे पुढे होत जाणाऱ्या घटनांना घेऊन पुढे सरकत राहते. तेव्हा आपण सावध झाले पाहिजे. ही रेषा कुठपर्यंत जाईल , तिची दिशा काय असेल याचा विचार सर्वसामान्य माणूस करत नाही. असं काही असतं हेच मुळी त्याच्या गावी नसतं. आपण काही घडलं की हबकून जातो. आपला गोंधळ उडतो. आपण विचार आणि विश्लेषण करत नाही. शक्याशक्यता पडताळून पहात नाही. आपण जे जीवन जगतो किंवा आपल्या वाटेला जे काही जीवन म्हणून येतं , त्या सर्व शक्यता असतात. त्या आधीपासूनच अस्तित्वात असतात. आपण त्यांना कुठे तरी भेटतो. नकळत सामोरे जातो. कोणत्या तरी अक्षांश रेखांशांवर ही भेट होते ! जे काही घडायला सुरूवात झाली आहे त्यात हे पण घडू शकते , घडेल ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही ! आपण अक्षांश रेखांशही काल्पनिक समजतो. पण इथे काहीच काल्पनिक नाही. ते अगोदरपासूनच अस्तित्वात असते म्हणून तर त्याचा विचार मानवी मेंदूत येतो. काही काळाने सत्य समोर येते पण तितका काळ खोटे असतेच ! काही काळ का होईना ; खोट्याचेही अस्तित्व असतेच ! थोडक्यात , शक्यतांचं अस्तित्व आधीपासूनच अस्तित्वात असतं. याचाच उपयोग करून काही जण प्रकरणांचा छडा लावतात ! आपण आपल्या आयुष्यात नवीन घटना घडायला सुरूवात झाली की ती चांगली असेल तर आनंदून जातो आणि वाईट असेल तर गोंधळून जातो. समस्यांमुळे तर आपण खचून जातो . स्वतःला स्थिर न करता अधिकच अस्थिर करतो . आपल्याला काही समजेनासं होतं. छोट्याश्या समस्येला आपण पार शनीच्या पीडेपर्यंत भिडवतो ! आपलं असं होणं हे अगदी स्वाभाविक असतं. हे असं का होतं ? एक तर मागील पिढ्यांनी वारंवर भीतीचे संस्कार केलेले असतात आणि दुसरे असे की आपलीही चूक होते ! आपण एखादी घटना कशी घेतो यावरच खरे तर तिच्या आपल्यावरील होणाऱ्या मनोकायिक परिणामांची तीव्रता व व्याप्ती अवलंबून असते. साधीच घटना घ्या. केळ्याच्या सालीवरून आपण घसरून पडलो तर आपणही हसतो की चार लोक आपल्याला हसले म्हणून आपल्या मनाला ते खूपच लागते ? खरं तर ही क्षणिक घटना असते. पण मनाला लावून घेतले तर त्या क्षणिक घटनेतूनही अगदी मारामारीचे प्रसंगही जन्म घेतात. थोडक्यात, आपण परिस्थितीच्या किती आहारी जातो , भावनेच्या भरात कसे अविचाराने वागतो , कसा विवेक हरवून बसतो , हे इथे लक्षात येते. इथे आपण हसत हसत उठून पुढे चालत गेलो असतो तर ते हसणारे लोक कधीच मागे पडले असते आणि आपल्यालाही त्या घटनेचा लगेचच विसर पडला असता. प्रकरण हातघाईवर येऊन राडा झाला नसता. शनीच्या पीडेचा तर मनास विचारही शिवला नसता ! थोडक्यात , आपण परिस्थितीच्या दडपणाखाली येतो. परिस्थितीचा समतोलपणे विचार करत नाही . बरेचदा, परिस्थिती चुकीच्या पध्दतीने घेतल्यामुळे आपण दुष्टचक्रात सापडतो. स्वतःवरचा विश्वास हरवून वेगळ्याच मार्गाला लागतो . हे बदलता येतं . फक्त त्यासाठी आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे असते.
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
काळजी घ्या मित्रांनो !
तुमचे आजार तुम्हीच निर्माण करता असं मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही आणि बसला तरी तुम्ही मान्य करणार नाही ! स्वतःवर कोण घेतो ! अनेकांची आजारपणं अनुभवली. स्वतः चौसष्ट वर्षात अनेक आजारपणातून गेलो ! सगळ्या आजारांची एक कार्यपध्दती असते. बरेचदा आजार कसल्या तरी माध्यमातून येतात. आधी व्हायरल आजार होतो आणि मग त्याची चर्चा व्हायरल होते. कोरोनाचे हेच झाले ! चर्चेनेच दहशत पसरली आणि अनेक लोक धक्क्यानेच गेले ! त्यांना तो आजार झालेलाच नव्हता ! किंबहुना ते निरोगी होते ! शोले सिनेमातला गब्बर सिंगचा, " जो डरेगा वो मरेगा " हा डायलॉग ते विसरले ! त्यांनी त्यांचा नसलेला आजार स्वतःच निर्माण केला आणि ते प्राणास मुकले ! त्यांची वेळच आली हे समाधान आम्ही करुन घेतले !
मी माझा खूप जुना अनुभव सांगतो ! कॉलेजला असताना मी दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाने आजारी पडायचो. खरं तर ते वय लव्हेरियाने आजारी पडायचं होतं , पण ते आपल्या नशिबातच नव्हतं ( असं आपलं समाधान करून घ्यायचं ! दुसरं तरी काय करणार , नाही का ! ) मी पावसाळ्यातच आजारी पडायचो याचं कारण उघड होतं ! मी पावसात भिजल्यानेच मला थंडी भरून ताप यायचा. मी का भिजायचो तर मी कॉलेजकुमार होतो ! कॉलेजकुमार कसा रस्त्याने बेडरपणे पाऊस झेलत झेलत चालला पाहिजे ! छत्री धरुन कॉलेजकुमार रस्त्याने चालला आहे हे चित्र बावळट दिसतं ! काय विचित्र कल्पना होत्या तेव्हा ! रेनकोट मध्ये आपण चंद्रावरचा माणूस नाही तर ससा दिसणार असं वाटायचं ! ती तारूण्याची मस्ती होती आणि सिनेमातल्या हिरोंचा पगडा होता ! म्हणूनच माझा पावसाशी झगडा होता ! त्यामुळे मी पावसाला भीक न घालता गोगटे कॉलेज ते बसस्थानक असा टेचात भिजत जायचो ! हे तीन चार दिवस झाले की पुढील किमान पंधरा दिवसांसाठी तरी मी अंथरूणात पडायचो ! आता मला सांगा माझा दरवर्षीचा हा आजार काय पावसाने निर्माण केला होता !
माझ्यासहीत अनेकांचे आजार अभ्यासले तेव्हा एक गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतांना आढळली ! काही आजार सुरू होण्याच्या आधी त्याचा विचार त्यांच्या मनात यायचा ! हे मी स्वतः माझ्याच काही आजारपणात अनुभवलं आहे ! असा विचार मनात आला म्हणून तो आजार मला झाला की पुढे जे होणार आहे त्याची लिंक कुठून तरी मनाला मिळाली ? मी आजारी पडणार हे मनाने आधीच ताडले होते की मनात आजाराचा विषय आल्यामुळे त्या धसक्यानेच मी आजारी पडायचो ? याच गोष्टी इतरांच्याही बाबतीत घडतांना मी पाहिले होते व म्हणूनच या निष्कर्षापर्यंत मी आलो ! माझा आणखी एक अनुभव असा की, आजाराची कसलीही कल्पना नसतांना मी काही दिवस जास्त वेळा बिस्कीटे खाऊ लागतो आणि विशेषतः बिस्कीटे खातांना माझ्या तोंडातील लाळ सुटण्याचे प्रमाण वाढते ! त्यानंतर मला कसले ना कसले आजारपण येते किंवा दुखापत होऊन तरी मी आजारी पडतो ! आता मी सावध झाल्याने जास्त खाणे आणि लाळ प्रकरण सुरू झाले की मी जास्त खाणेच बंद करतो आणि शक्यतो दुखापत होणार नाही ही काळजी घेतो ! असे अनुभव व विचार अनेकांना आलेले असतील म्हणूनच या मुद्द्यांवर अधिक चर्चा होणे गरजेचे आहे.
एक नक्की, कोणताही आजार ही एक विचित्र परिस्थिती असते ! अशा वेळी माणूस दडपणाखाली येतो व अधिक आजारी पडतो. एक पक्के लक्षात ठेवा : दडपण झुगारू शकलात तर परिस्थितीच्या वर रहाल ! अन्यथा, तुम्ही स्वतःला स्वतःच परिस्थितीच्या खाली न्याल ! म्हणजे आजारी पडून बेड रेस्ट आणि औषधे घेत रहाल ! सद्या पावसाळा आहे. २६ जुलैही जवळ येतोय. काळजी घ्या मित्रांनो !
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१५.०७.२०२४ सकाळी ०६.००
चाला ... चालत रहा...
चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण...पाय हे माणसाच्या उमेदीवर उभे असतात. टेंशनने माणूस खचला की तो पायातच मोडतो. त्याला चालत जा म्हणणे सोपे आहे, पण आधार देणे, उभे करणे कठीण आहे. हे टेंशन फार घातक असतं.
आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांच्या नावाचा एक संदेश व्हॉट्स अॅपवर वाचनात आला. त्यात ते म्हणतात :
" *वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*
*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !! ....* चाला.▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते▪️.... *३६५ दिवस चाला*▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.... " असं त्यांनी खूप लिहिलंय. कळकळीने लिहिलंय.
🚶🏻♀️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♀️🚶🏻♀️
खूप छान संदेश आहे. पण एवढे पुरेसे नाही. म्हणूनच मी सुरूवातीला म्हटलंय : चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण... हा पण आज फार महत्वाचा आहे. खरंच, जीवनातील वाढत्या व्यापांमुळे जीवनात अनेक संकटे येतात. अनेक धक्के बसतात. हे सगळंच पचवून बसणं एवढं सोपं नसतं. त्यांचा परिणाम शरीरावर होतोच ! माणूस मनाने खचतो आणि तो खचला की पहिले पाय खचतात. पायातली शक्तीच निघून जाते. कोरोना काळानंतर तर अनेक माणसे लंगडतानाच दिसतात. पाण्यातच खचलेली दिसतात. काही जण याचा बूस्टर डोसशीही संबंध जोडतात, पण त्याबाबत अधिकृत तपशिल हाती आलेला नाही. काय असेल ते असो , पण मन खचल्याने पायातली ताकत जाते, हे खरे !
आपल्या आसपास अशी खचलेल्या मनाची, लंगडणाऱ्या पायांची लटपटती माणसं दिसतात. तेव्हा एक विचार स्पर्शून जातो. ही माणसे कोणत्या धक्क्याने खचली असतील ? त्यापूर्वी तर ती धडधाकटपणे सहज चालत असतील. मग त्यानंतर काय झाले असेल त्यांच्या आयुष्यात ? खचलेली ती माणसे पुन्हा उभारी धरावीत म्हणून काय करता येईल ? ईश्वरानं त्यांना उभं करण्याचं सामर्थ्य मला दिलं तर त्यांना उभं करण्याची माझी इच्छा नक्कीच आहे !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०५.०७.२०२४ सकाळी ०६.००
गेली तीन वर्षे आम्ही दोघे बंधू शाळांमध्ये जमेल तेवढं मोफत वह्या वाटप करतो. मी वाटप व्यवस्था बघतो. वाटप करतांना एक गोष्ट लक्षात आली. काही मुलांनाच मोफत वह्या नको असतात. कदाचित , त्यांचा या सगळ्या सामाजिक कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकेल. कदाचित, त्यांच्या पालकांना ते आवडत नसावे. घरात या विषयावर बोलणे होत असावे. पालक श्रीमंत असोत वा गरीब असोत. ते स्वाभिमानी असू शकतात. त्यांना कोणाची मदत घेणे आवडत नसावे. ते त्यांच्या पाल्यांना वह्या विकत घेऊन देण्यास सक्षम असतील. साहजिकच, त्यांच्या मुलांनाही काही मोफत घेणे आवडत नसावे. संस्कार असू शकतात. अशी मुलं वर्गातही घरच्या संस्कारांना अनुसरून मोफत वह्या घेण्यास नकार देतात यात गैर काहीच नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. मात्र, त्याचा परिणाम इतर विशेषतः गरीब मुलांवरही होऊ शकतो. गरज असूनही मदत ही भीक समजून विचार होऊ लागला तर प्रश्न उभा राहतोच.
मग हा प्रश्नं मुलांचा स्वाभिमान न दुखावता कसा सोडवता येईल याबाबत विचार सुरू केला. कारण , काहींचे ठीकच होते. ते वह्या विकत घेऊ शकत होते किंवा परवडत नसतांनाही विकत घेऊन स्वाभिमान जपू शकत होते. काही अपवादही असतात, तसेच समजायचे. म्हटलं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊदे. तेही चुकत नसतील. आपणही चुकायचं नाही. आपण आपल्या मार्गाने जाऊ, पण मोफत वह्या वाटप करुच. विशेषत: ग्रामीण भागात याची फार मोठी आवश्यकता असल्याचे गेल्या तीन वर्षांत आढळून आले होते. पण आवश्यकता असूनही काही पालकांचा म्हणा, मुलांचा म्हणा, स्वाभिमान आडवा येत होता. नजरेसमोर गरजू दिसत होते. या मानसिकतेतून गरजूंना बाहेर कसे काढायचे ? गरजूंमध्ये अशा चुकीच्या प्रकारे स्वाभिमानाची साथ पसरली तर ते समाजहीताच्या दृष्टीने योग्य होणार नव्हते. माझी तगमग, अस्वस्थता वाढत चालली होती. काही तरी करणे भाग होते. कारण या वर्षीच्या वह्या वाटपाला सुरूवात करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती. शाळा पंधरा जूनला सुरू होणार होत्या.
अखेर , १४ जून उजाडला ! संस्कारवाली एक विद्यार्थीनीं घरासमोरच्या रस्त्याने जातांना दिसली आणि उत्तर सापडले ! मी तिला लगेच हाक मारून बोलावले. ती आलीही. मी उद्यापासून वह्या वाटप करणार आहे हे तिला सांगतानाच हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे, असं सांगितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती म्हणाली, " काका, उद्यापासून कशाला ? मला आजच, आताच द्या की वह्या ! " मी तिथेच यंदाच्या मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ केला ! आता मी ज्या शाळेत जातो तिथे आवर्जून ' हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे ' हे वाक्य ऐकवतो ! मुलं हसून वह्या स्वीकारतात. मुलं चांगली असतात. निर्मळ मनाची असतात. त्यांना फक्त योग्य प्रकारे संस्कारांकडे वळवावं लागतं , हा अनुभव आणि हे उत्तरही २०२४ च्या वह्या वाटपात सापडले !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
राजकीय लावणी
खोके नि पेट्या मिळवा
राया तुम्ही संपत्ती कमवा || धृ ० || राया तुम्ही...
सत्ताधारी असो वा परका
तुम्ही गळाभेट घ्या बरं का ...
काढा फोटो, सोबत मिरवा... || ०१ || राया तुम्ही...
बघू नका रंग हिरवा
करू नका हट्ट भगवा
स्वार्थाचे चित्र रंगवा ... || ०२ || राया तुम्ही...
बघा कोण किती देतो
कोण सोबतीने नेतो
हवी तेव्हा टोपी फिरवा... || ०३ || राया तुम्ही...
बसून खातील पिढ्या सात
पडणार नाही कसली ददात
बंगले नि माड्या बनवा... || ०४ || राया तुम्ही...
सोडा शामळूपणा आता
तुम्ही बाईकने का हो जाता ?
चार चाकी गाड्या उडवा.... || ०५ || राया तुम्ही...
....देवीदास हरिश्चंद्र पाटील
०४.०७.२०२४ सकाळी०९.१०
आकाशवाणी रत्नागिरीवर कवीवर्य सुरेश भटांचे शिष्य व रत्नागिरीमध्ये मराठी गझल प्रथमतः सुरू केली त्या देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून अलिकडेच प्रसारित झाली होती. ती वरीलप्रमाणे व्हिडीओ स्वरूपात यू ट्यूबवर दि. ०१.०७.२०२४ रोजी अपलोड करण्यात आली आहे. रसिक त्यांचा आनंद घेत आहेत.
#interview
#AIR
आदरणीय सुरेश भट यांचं आणि माझं नातं काय आहे हे नाही सांगता येणार. काही गोष्टी नात्यापल्याड असतात. बंधनांच्या धाग्यापल्याड जातात. मी असं का म्हणतो तर भटसाहेब कधी कधी असं लिहून गेलेत ना की ते कधी कधी अगदी माझ्या आयुष्याला तंतोतंत लागू होतं. बाकीचं मी नंतर कधी तरी सांगतो.
आताची घटनाच बघा ना. सकाळ झाली. मी सूर्यदर्शन घेऊन आलो. अंगण नीट झाडून झाले. आता घरातला कचरा काढायचा. मी तो रोजच काढतो. मराठी शाळेतली गुरुजींनी लावलेली शिस्त आहे ती ! हाती धरून झाडू ...हे तेव्हा पासून कानांवर पडलेले आणि अंतरात गेलेले बोल आहेत. तेव्हा ही स्वच्छतेची नाटके नाहीत. आपल्याला तोच तोच कचरा जागच्या जागीच ढकलून आपले काही फोटो काढून घ्यायचे नाहीत आणि कुठे छापून पण आणायचे नाहीत. आपल्याला कुठे महात्मा बनायचंय ! आपण पडलो सामान्य माणूस. त्यातही सेवानिवृत्त . सेवानिवृत्तीलाही साडेपाच वर्षे झालेली ! आपण आपलं अंगण , आपलं घर लख्खं करावं आणि त्या आनंदात डुंबावं. अर्थात, अंगण साफ झालं आता घरात येऊन झाडू लागतो तर मी पुढे जातो पण कचरा मागे उरतोच ! मग मी पुन्हा मागे येतो आणि पुन्हा तो कचरा पुढे घेऊन जातो. हे मात्र होतं. तेवढंच मागे पुढे होतं. आता जड व्यायाम जमत नाही तर हा हलका व्यायाम आपसूक होतो. असे नाही तसे हात पाय हलतात, कमर हलते ! मागे पुढे , खाली वर होतंय. बरं वाटतं. फक्त तेवढा कचरा ऐकत नाही. किती काढला तरी सौ. कुठल्यातरी कोपऱ्यातले नाही तर छतावरचे खुसपट दाखवतेच ! कचऱ्याचं हे रोजचंच असं आहे. मी किती काढला तरी काढायचा राहून जातोच. जातो तर जातो... सौ. च्या नजरेत येतो, खुपतो आणि ती मला दाखवूनही देते... कचऱ्याची आणि माझीही जागा ! आता इतकं सगळं झाल्यानंतर मला दररोज सुरेश भटांचे ते जणू काही माझ्यासाठीच लिहिलेले शब्द न आठवले तरच नवल ! कुठले म्हणता ? सांगतो. नाही तरी हे खूप लांबलंय. मुक्त कवितेसारखं. तर सुरेश भट लिहून गेले आहेत :
तर तो केर मागे राहतोच ! हे आठवत मी रोजच केर काढत असतो. गुरुची आठवण वेगळी काढावीच लागत नाही ! नशीब असते एकेकाचे राव !!
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२४.०६.२०२४