सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

The man who brought first rikshaw in Ratnagiri

 31 जानेवारी - 


कोकणात पर्यायाने रत्नागिरी शहरात पहिली पॅसेंजर रिक्षा आणणारे विष्णू लक्ष्मण गोगटे यांचा वाढदिवस / जयंती - 


जन्म -  31 जानेवारी, 1937 .
मृत्यू - 17 डिसेंबर, 2020 .


विष्णू यांचा जन्म 31 जानेवारी, 1937 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे व माध्यमिक  शालेय शिक्षण रत्नागिरी येथे झाले. फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथून 1956 साली ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांचे रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे ल. V. Gogate & Sons नावाने दुकान होते.  घरच्या व्यवसायात सन 1956 ते 1970 या काळात जात असत.  


त्याकाळची रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक

त्याकाळी रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक बैलांची सारवट, सायकल किंवा टॅक्सी मधून होत असे. 1970 च्या सुमारास वाघधरे  यांच्या गलबतातून त्यांना कालिकत येथे जाण्याची संधी मिळाली होती. कालिकत हे शहर रत्नागिरी शहरासारखेच. त्या परिसरात त्यावेळी रिक्षा व्यवसाय सुरू झाला होता. तिथूनच त्यांना त्यांच्या मनात असलेला रिक्षा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली  व त्यांनी पॅसेंजर ऑटो रिक्षा परमिट असलेली आणण्याचे ठरवले. 


रिक्षा परमिट मिळवण्यासाठी

त्यांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु परमिट मिळवण्यासाठी त्यांना 2 - वर्षे सतत पाठपुरावा करावा लागला होता. याकामी राजाभाऊ लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 


शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान

बजाज कंपनीची रिक्षा बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन त्यांनी आणली होती. रत्नागिरी शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान त्यांचाच. " वैशाली "हे त्यांच्या रिक्षाचे नाव. 7 फेब्रुवारी, 1972 रोजी लोकनेते शामराव पेजे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांनी रिक्षा व्यवसायाला प्रारंभ केला. शंकरराव पटवर्धन हे त्यांचे पहिले प्रवासी होत. 

रिक्षा व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. सन 1998 पर्यंत ते रिक्षा व्यवसायात कार्यरत होते. रत्नागिरी रिक्षा संघटनेचे अनेक वर्षे ते पदाधिकारी होते.


25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल सत्कार

त्यानंतर तिलक नगर परिसरात गोगटे कम्युनिकेशन अँड जनरल स्टोअर्स नावाने काही वर्षे व्यवसाय केला होता. सन 2012 सालच्या मे महिन्यात 25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती व सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने तत्कालिन मा. जिल्हा न्यायाधीश विजय मुन्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शालेय जीवनात पोहण्याची त्यांना विशेष आवड होती. याव्यतिरिक्त बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो -खो , कबड्डी इत्यादि मैदानी खेळातही त्यांचा सहभाग असायचा. 


उत्तम बॅडमिंटनपटू

रिक्षा व्यवसाय होताच असे असले तरी ते उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होते. बरीच वर्षे ते बॅडमिंटन स्वतः जरी खेळत होते तरीही ते कोच म्हणूनही प्रसिद्ध होते. रत्नागिरी शहरातील अनेक बॅडमिंटनपटू त्यांनी तयार केले. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता व अनेक बक्षीसेही मिळवली होती.  

रत्नागिरी बॅडमिंटनमध्ये रत्नागिरीतील आणखीन एक बॅडमिंटनपटू कै. डॉ. मु. न. पानवलकर यांच्यासोबत बॅडमिंटन डबल्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. रत्नागिरी शहरातील ही बॅडमिंटनमधली अभेद्य जोडी मानली जात होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर 45 वर्षांवरील वयोगटातील डबल्सचे उपविजेतेपद या जोडीने मिळवले होते. 

याव्यतिरिक्त अहमदनगर व  पुणे येथे सन 1982, 1984,1987,1992,1997 मध्ये खेळल्या गेलेल्या ओल्ड मॉंक्स व्हेट्रन बॅडमिंटन स्पर्धेत पाच वेळा ही जोडी विजयी ठरली होती.

1 ऑगस्ट, 2019 रोजी सर्वंकष विद्यामंदीरच्या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन गोगटे- पानवलकर या जोडीच्या हस्ते झाले होते. 


17 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली. 


अशा या विविधांगी  व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन . 


माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

History in Konkan Railway

  *कोकण रेल्वे मार्गांवर आज धावली पहिली विजेवरील दिवा - रत्नागिरी पॅसेंजर* 


*रत्नागिरीच्या सुपुत्रांनी केले पहिल्या गाडीचे सारथ्य!* 


 *रत्नागिरी-* कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी काल गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला.


*पहिल्या गाडीचे सारथ्य यांनी केले*


*लोको पायलट- शैलेश पवार

सहाय्यक लोको पायलट- सचिन पाडळकर

गार्ड -प्रणय तांबे.


गेल्या वर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या.


*कोकण रेल्वे मार्गावर प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु*


कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला.


गेल्यावर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. रात्री पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर येणार आहे.


विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. 

विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दरम्यान दिवा ते रत्नागिरी धावणारी गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.

काल गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे विद्युत इंजिनसह धावली. पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रात्री रत्नागिरी स्थानकावर येणार आहे. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. 

यावेळी रेल्वे युनियनचे विलास खेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला. गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दरम्यान दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक इंजिनसह धावणार आहे.

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

बाल्याची अटक एक कथा

 बाल्याची अटक टलली !

https://youtu.be/FUDRqrLC7zc


आमी सातवीत व्हतो तवाची गोष्ट. आमच्या वर्गात तीन तीनदा नापास झालीली दांडगी पोरं व्हती. त्यातला बाल्या माझा मैतर झालीला व्हता. त्या दिवशी बगा , शाला सुरू झाली. वर्गबी भरला. आमी समदे सावरूनबी बसलो.‌ पन गुरूजींचा पत्ताच नव्हता. असं कधी झालीलं नव्हतं . गुरूजी एकदम वक्तशीर मानूस.‌ त्यातच कधी नव्हं ता बाल्या जरा टेंशनमधी दिसत व्हता. मी बाल्याला इचारनार एवढयात गुरूजीच आत आलं. पण त्यांच्यासंगं हेडगुर्जी पण आलं. हेड गुरुजीं जाम चिडलीलं दिसत होतं.‌ आमास्नी काय समजंना.‌ आमी समदे उभे राहिलीलं. तेवढ्यात, हेडगुर्जी म्हनालं, " बाळ्या सोडून सगळे बसा. " उभा राहिलील्या बाल्याकडं बघून हेडगुर्जी गरजलं. " बाळया काल संध्याकाळी गुरुजींना काय बोललास ? पन बाल्या काय बोलंना. तसं हेडगुर्जीच बोललं. काय रे गाढवा, काय बोललास तू गुरूजींना ? तुला कोणाला काय बोलायचं ते कळतं का ? ते कुठल्या पदावर, तू कुठल्या पातळीवर ! पदाचा मानबीन कळतो की नाही तुला ? " बाल्या कायबी बोलंना हयं बघून हेडगुर्जींनी बाल्याच्या एक मुस्काटात ठेवून दिली ! आमी समदे गपगार झालीलं. पन बाल्या आपला उभाच. थोडासा गाल चोलया लागलीला इतकंच .‌ हेडगुर्जी पुन्हा गराजले. " निगरगट्टा, तुला अक्कल आहे का काही ? याच्यापुढे जर मोठ्या माणसाला असलं काही बोललास तर याद राख. पोलीसातच देतो तुला ! अटक झाली म्हणजे समजेल तुला ! " असं म्हनून मोठं गुर्जी त्यांच्या खोलीत गेलं.‌ इतक्यातच एकदम पोलीस गाडीचा सायरन वाजला. तं बाल्यानं सुंबाल्या केला. त्याला वाटलं पोलीस शालेकडंच येतायत. तं बाल्या धावत जो निंघाला ता एकदमच लेडीज मुतारीत जाऊन लपला ! मैदानात पोरी लगोरी खेलत व्हत्या. त्यांनी ध. रा. जवलकर बाईना सांगलं. त्यांनी बाल्याला हाका मारल्या. तसा बाल्या बोलला मी येतो बाहयर, पन मला जवल धरा. मला पोलीसांची जाम भीती वाटते बाईनु. इकडं काही पोरींना घाई झालीली व्हती. त्या बाईंना करंगळ्या झालाय लागलील्या. भयंकर अटीतटीचा प्रसंग व्हता तो.‌ बाईंचा इलाज चालंना, बाल्या बाहयर निघंना. शेवटी बाल्याची अट बाईंनी मान्य केली तसा बाल्या बाहयर आला आनि जवळकर बाईंना त्यानं घट्ट मिठीच मारली. समदया पोरी किंचालल्या आणि हेड गुरुजींचं लक्ष खिडकीतनं बाहयर गेलं. त्यांना बाल्याची भीती दिसलीच नाही. दिसलं तं भलतंच ! झालं, गुरुजींनी फोन फिरवला. पोलीस गाडी गावातच व्हती. दुसऱ्या मिनिटाला पोलीस आलं. त्यांनी बघला तो बाल्या थरथर कापया लागलीला. भीतीपायी त्यांनं जवलकर बाईंना आणखीनच जवल केलीलं ! बाईंना मिठीतनं सुटता येईना. शेवटी पोलीसांनी त्यांना सोडीवलं आणि सगल्यांना हेडगुर्जींच्या खोलीत नेलंनी .‌तिथं समद्यांच्या जबान्या झाल्या. जबानीतनं पोलीसांना सगला परकार कलला. ते हसू लागलं आनि बाल्याची अटक टलली ! हयं पोर आपल्याला टराकतं हय बघून पोलीस खुशीत निघून गेलं. पोलीस गेलं. शाला सुटली. आमी समदं बाहयर पडलो.‌ त्या समद्यात बाल्या गुरूजींना काय अपमानास्पद बोलला व्हता तं आम्हा पोरांपैकी कुनालाच कललं नाय. मी बाल्याला इचारलं तं ता म्होरलाच बोलून गेला. काय तं म्हने मी काय असा तसा वाटलो काय त्यांना ! समाजतात काय सौताला ? मला अटक करया यांचं बापजादं याया हवंत ! संध्याकाल होयत आली व्हती. घराकडं जावन मला कोंबडी झाकयाची व्हती. मी आपला गप व्हवून घरचा रस्ता धरला. 

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

कशासाठी पांडुरंगा

कशासाठी पांडुरंगा


कशासाठी पांडुरंगा तुझे गुण गाऊ ?

कशासाठी पंढरीला तुझ्या सांग येऊ ... || धृ ०||



आता कुठे आहे ज्ञाना, आता कुठे नामा ?

पाहतो रे जो तो आता, येतो कोण कामा !

माझ्यातला नि:स्वार्थी भाव कुठे ठेऊ ... || ०१ ||



आता कोणाला कोणाची राहिली न भीती !

आहे कुठे न्याय आता ? आहे कुठे नीती ? 

पाप हेच पुण्य होता... पुण्य कुठे नेऊ ... || ०२ ||



आता तुझी चंद्रभागा आटोनिया गेली

पायाखालची तुझ्या वीट कोरडी झाली

भक्तीचा ओलावा मी सांग कुणा देऊ ... || ०३ ||




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०९.२०२१

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

Birthday Celebration

 आम्ही इथे वाढदिवस साजरे करतो


वाढदिवस साधारणपणे आपण घरात किंवा अन्य बंदिस्त जागेत साजरे करतो. काही जण म्हणतात की वाढदिवस कशाला साजरे करायचे ? वाढदिवस म्हणजे खरं तर उलटी गणती सुरू असते. आयुष्यातले एक एक वर्षं किंवा दिवस कमी होत असतांनाच त्याला वाढदिवस तरी कसा म्हणता ? असा काहींचा प्रश्न असतो. तर काही जणांना आनंदासाठी काही ना काही निमित्त लागत असते. त्यांच्यासाठी तर वाढदिवस ही पर्वणीच ! काही जण मात्र इतरांचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि तेही वैशिष्ट्यपूर्ण जागेत ! निसर्गसंपन्न वातावरणात, मोकळ्या हवेत ! 



आमच्या गावातही अशी उत्साही तरूण मुलं आहेत ज्यांनी एका शेडचा उपयोग वाढदिवस साजरा करण्यासाठी केला आहे ! या मुलांच्या कलात्मक बुध्दीला नक्कीच दाद द्यावी लागेल !   


हे वाढदिवस सर्वच स्नेही मंडळींचे साजरे केले जातात. विशेष म्हणजे वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरे करूनही कुठेही गडबड गोंगाट नसतो. खऱ्या अर्थाने हे तरूण असूनही अत्यंत विवेकाने व आनंदाला कुठलेच गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने वाढदिवस साजरे केले जातात ! म्हणूनच या मुलांचं खूप कौतुक करावं वाटतं. केवळ त्यांच्यासाठीच हा पोस्टप्रपंच ! 

....................

गालबोट लागलेच ! 

काही काळापूर्वी वरीलप्रमाणे पोस्टप्रपंच केला खरा ; पण परिस्थिती सतत बदलत असते. चांगल्याला दृष्ट लागली म्हणा किंवा कायम तीच स्थिती रहात नाही म्हणा...पण काही तरी घडल्याने हे वाढदिवस साजरे होणे वर्षभरानंतर बंद झाले. कुठे तरी माशी शिंकली खरी ! काहींना आसपास चांगले घडतेय याचेच दु:खं असते . अशा कोणी तरी मोडता घातला असावा किंवा तरूणाईचाच पाय घसरला असावा. काही असो , वाढदिवस साजरे होणे बंद झाले हे नक्की. शेवटी गालबोट लागलेच ! 

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

अठरा ऑगस्ट

 नवा व्हिडिओ : अठरा ऑगस्ट 

यूट्युब वर Devidas Patil Creation नावाचे माझे चॅनेल आहे. 


YouTube Channel DEVIDAS PATIL


त्यामध्ये  आयुष्याकडे बघतांना ही play list आहे.

Aayushyakade baghtana playlist in youtube channel DevidasPatil


त्यामध्ये मी दि. १८.०८.२०२१ रोजी " अठरा ऑगस्ट " हा नवा व्हिडिओ अपलोड केला आहे . ( 👆 नावात व्हिडिओची लिंक दिली आहे).

The newest part of the playlist Aayushyakade baghtana


दर वर्षी अठरा ऑगस्ट आला की ती मला हटकून आठवते बघा ! सुशिक्षित बेरोजगारीचे ते दिवस होते.  एकदा मी रत्नागिरीच्या जेलरोडवरून समाजकल्याण आॅफीसात नोकरीच्या चौकशीसाठी जात होतो. पोलीस परेड ग्राऊंडच्या बाजूला, रस्त्याच्या कडेला मी तिला प्रथम पाठमोरी पाहिलं . जरा पुढे गेल्यावर तिचा थोडासा चेहरा मला दिसला. ती नळावर पाणी भरण्यापूर्वी तांब्याचा एक हंडा घासत होती. एवढी सुंदर तरुणी रस्त्याच्या कडेला भांडी घासतेय, पाणी भरतेय, हे बघून मला खरं तर कसंतरीच वाटलं होतं. मी  पुढे गेलो खरा पण मला ते सगळं आठवत राहिलं . 


The subject of a new video


काही दिवसांनी मला रत्नागिरीच्या एका आॅफीसात नोकरी लागली. मी हजर व्हायला गेलो , तर तीच तरूणी तिथे काम करतांना दिसली. ओळख झाल्यावर मी तिला तो प्रसंग ऐकवला, तेव्हा ती पोलीस हवालदाराची मुलगी असून पोलीस लाईनीत राहते असं तिनं मला सांगितलं.

Emotions do this.


 पुढे काही वर्षांनी तिचे वडील रिटायर झाले. त्याकाळी पेन्शन फार नव्हतीच. तिचे लहान भाऊ शिकत होते. प्रामुख्याने तिच्या पगारावरच आता घर चालत होतं. पुढेही काही वर्षे ते तसंच चालत राहिलं. सर्वांचे प्रश्न तिने सोडवले, पण तिचा प्रश्न कोणीच सोडवू शकला नाही. ती सुंदर आणि कमावती असल्याने तिच्याही उच्च अपेक्षा तिला नडत गेल्या असाव्यात .


When the family response is zero


 वय वाढत गेले . लग्नं होणे कठीण होत गेले तशी ती खचू लागली. निराशेच्या आहारी गेली. ज्या कुटुंबासाठी तिने तन, मन व धनही इतकी वर्षे अर्पण केले, ते कुटुंब तिच्यासाठी दुर्दैवाने काहीच करू शकले नाही, हे तिला फार लागलं असावं. 

The state of sorrow in one's life


तिला लग्न करायचं होतं, संसार करायचा होता. तिला कुणाचं तरी प्रेम हवं होतं. पण अखेरपर्यंत ती प्रेमाची भुकेलीच राहिली . तिला उभारी द्यायला, तिच्या स्वप्नातला तो देखणा, श्रीमंत व कर्तबगार राजकुमारही घोड्यावरून आला नाही. 

Dangerous Chakravyuv of life


साहजिकच, ती सतत आजारी पडू लागली. आता ती आजारांनाही कंटाळली होती. अखेर एके दिवशी आजारी अवस्थेतच तिचं देहावसान झालं. एक अत्यंत सुंदर कळी उमलायच्या आतच  जिवाला मुकली. समाजातलं एक कटू सत्य पुन्हा एकदा जिंकलं. जीवनावरचं एक प्रेम हरलं ते याच अठरा ऑगस्टला !



शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

सुरेश भट पुन्हा एकदा

 

फेसबूकवरून साभार 



परीस...


       सुरेश भटांच्या कवितांचे पुस्तक हातात आहे .

"सुरेश भट ह्यांची निवडक कविता -१९४६ ते १९९६" ....संपादन आणि प्रस्तावना केली आहे  "शिरीष पै " ह्यांनी .

पुस्तक काय हातात पडले, नव्हे.. खजिनाच मिळाला!  एक एक कविता... एक एक भावगीत ....एक एक गझल... हृदयात उतरते! 

      प्रथम तर शिरीष पै यांची प्रस्तावना ही कितीतरी सुंदर! खरेतर हे सर्व लोक खूप आदरास पात्र. साहित्याला जणू त्यांनी आपले जीवन वाहून घेतलेले .

     "सुरेश भट ह्यांची निवडक कविता" या पुस्तकातील सर्व कविता शिरीष पै यांनी सुरेश भटांच्या अनेक काव्य संग्रहातून निवडून एकत्र संपादित केल्या आहेत व प्रस्तावनाही लिहिली आहे. 

प्रस्तावना ही इतकी अभ्यासपूर्ण आणि सखोल आहे की पुनः पुनः  वाचत रहाविशी  वाटते .सुरेश भटांच्या विषयी  व त्यांच्या कवितांची पूर्ण ओळख  प्रस्तावनेत आपल्याला होते.         

        "रुपगंधा" हा सुरेश भटांचा पहिला काव्यसंग्रह. १९६१ साली प्रसिद्ध झाला ."रंग माझा वेगळा" हा दुसरा काव्यसंग्रह.( १९७०) "एल्गार" हा तिसरा काव्यसंग्रह. "झंजावात" हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह. 

       या चारही काव्यसंग्रहातून उत्कृष्ट कवितांची निवड करून शिरीष पै यांनी हे "निवडक कविता" पुस्तक संपादित केले आहे. सुरेश भटांच्या ज्या  काव्यप्रकारा मुळे त्यांच्या प्रतिभेला खरे उत्तेजन आणि प्रेरणा मिळाली आणि त्यांची प्रतिभा संपन्न झाली ...त्या "गझल" या काव्य प्रकाराला त्यांनी आद्य स्थान दिले आहे. 

    आपल्या प्रस्तावनेत शिरीष पै ह्यांनी "गझल"  साठी सुरेश भट  ह्यांनी जे  नियम सांगितले आहेत ते देखील लिखित स्वरूपात दिले आहेत. ते नवोदित गझलकार व नव कवींना खूप उपयुक्त आहेत .आपल्या प्रस्तावनेत शिरीष पै ह्या  "गझले "विषयी सुरेश भटांनी आपल्या "एल्गार" या काव्यसंग्रहातील प्रस्तावनेत व्यक्त केलेले विचार आपल्याला सांगतात. 

        सुरेश भट म्हणतात, "गझले विषयी " एक महत्त्वाची गोष्ट ही की केवळ "रचनाकौशल्य" म्हणजे गझल नव्हे!  नुसते तंत्र समजले आणि ते वृत्त (बहर )यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (रदीफ) इत्यादी राखून तंतोतंत अमलात आणले तरी ...अखेर... ....प्रभावीपणे काहीही सांगता आले नाही  तर तो शेर.. कोसळतो!! शेर रचला जात नाही.. तो कवितेतून ...त्यांच्या जगण्यातून... त्याच्या जीवनातून.. निर्माण व्हावा लागतो! त्याच्या रक्तातून तो वाहत येतो... आणि सामर्थ्यसंपन्न शब्दातून अनुभूतीचा स्फोट होतो!!        

       गझल ही एक जीवनशैली आहे. ते एक तत्त्वज्ञान आहे. मराठी गझलच्या  क्षेत्रात सुरेश भट हे अनभिषिक्त सम्राट होते. "१९४६ ते १९९६ पर्यंत केलेल्या पन्नास वर्षांच्या काव्य लेखनातील निवडक कवितांचा संग्रह म्हणजे "सुरेश भट ह्यांची निवडक कविता१९४६ ते १९९६"! 

  रसिकांनो! आपण आपल्या दैनंदिन आणि व्यावहारिक  जीवनामध्ये एवढे गुंग असतो की ,आपण पुस्तकांकडे वळत नाही! आणि वाचत नाही! महाराष्ट्रात अनेक कवी आणि लेखक होऊन गेले... त्यांच्या अजरामर साहित्यकृती आज ग्रंथालयात उपलब्ध आहेत. जेव्हा ते आपल्या दृष्टीस पडतात.. तेव्हा त्यांची महती कळते! सुरेश भटांची कितीतरी भावगीते आणि गझला आपण ऐकतो. त्या कानात गोड वाटतात .पण ते शब्द ..त्या कविता... त्या भावना... ज्या प्रतिभेने  कवी पानावर उतरवतो ...त्याला तोड नाही! आपण या प्रतिभेच्या पुढे नतमस्तक होतो. सुरेश भट यांच्या अनेक सुंदर गझला तुम्हाला ही माहीत आहेत . या पुस्तकात वाचलेल्या काही गझलांचा ओळी मी तुम्हाला वाचण्यासाठी येथे देत आहे.

    आनंद ....(गझल )

कवी -सुरेश भट.

आसवांना कोणता अधिकार होता ?

घाव जो केलास तो सुकुमार होता!

 चालण्यासाठी उन्हाची वाट होती,

 सांत्वनासाठी तुझा संसार होता!!!!!


मेघ ..(गझल)

 कवी -सुरेश भट.


पुन्हा तेजाब दुःखाचे उरी फेसाळूनि गेले !

पुन्हा ओठांवरी गाणे तुझे घोटाळुनी गेले !

मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हाका ?

मघाशी कोणते डोळे मला ओवाळूनी गेले?

निर्धार ...(गझल) 

कवी -सुरेश भट.

  माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे !

माझीया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे !

चालली माझी शिलेदारी जनांसाठीच माझ्या ,

गीत माझे माझिया हातातली तलवार आहे.!

                अत्यंत सुंदर असे निवडक कवितांचे पुस्तक, प्रत्येकाने वाचावे असे .

दुःख भेटे मला सांत्वनासारखे! गीत भेटे मला यौवनासारखे!

शेवटी शेवटी मी कशाला कण्हू ?हे मनासारखे ! ते मनासारखे!  ....सुरेश भट.                    

                                          

                                          सौ वर्षा दौंड.

                                         14/7/2021.


अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा . 

सोमवार, २६ जुलै, २०२१

मीच मजला पेश केले पाहिजे

 पेश करतो आहे : 

थोडी पार्श्वभूमी वाचा  ( मागील अतिशय छोटीशी पोस्ट )


आता प्रारंभ करूया....

यूट्युब वर Devidas Patil Creation नावाचे माझे चॅनेल आहे. 



त्यामध्ये Dehsongs ही play list आहे.


या play listमध्ये काही वर्षांपूर्वी, मी जे व्हिडीओज अपलोड केले होते त्यांपैकी " मीच मजला पेश केले पाहिजे " हा एक व्हिडिओ ! 




या पानासाठी मी हाच व्हिडिओ पहिला निवडण्यामागे खास कारण आहे बघा ! ही माझीच एक मराठी गझल आहे. व्हिडिओमध्ये ही मराठी गझल मी पेश केली होती. हा पेश शब्द माझ्यादृष्टीने फार महत्वाचा आहे . हा शब्द शिर्षकामध्ये आला आहे आणि शिवाय पहिल्या शेरामध्येही आला आहे . याबद्दल मी पुढे बोलणारच आहे . मराठी गझल ही सुरेश भटांनी खऱ्या अर्थाने सुरू केली, जोपासली व वाढवली.  याच गझलचा आता महावृक्ष झालेला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. रत्नागिरीत मराठी गझल अजीज हसन मुकरी व देवीदास हरिश्चंद्र पाटील यांनी सर्वप्रथम सन १९८४-८५ च्या दरम्याने सुरू केली. आमचा मार्ग सुकर केला तो अलिकडेच दुर्दैवाने निधन पावलेले माझे मित्र मधूसूदन नानिवडेकर यांनी. आम्हांला सुरेश भटसाहेबांचं मार्गदर्शन व प्रेम लाभलं, हे आमचं भाग्यच ! मराठी गझल दोन दोन ओळींच्या पाच शेरांची किंवा अधिक शेरांची असलेली रचना असते.  यामध्ये प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो किंवा एकाच विषयावरचे सर्व शेर असतात . मराठी गझल बाबत अधिक माहिती अशी शिका मराठी गझल या लेखात आहे.‌  माझी ही गझल पहिल्या प्रकारातली आहे. यामध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र आहे, स्वतंत्र विषयावरचा आहे. 

 आता आपण प्रत्येक शेराचा आशय पाहू.

पहिला शेर असा आहे : 

मीच मजला पेश केले पाहिजे

जगाच्या दारात नेले पाहिजे


खरे तर हा शेर मला दुनियेच्या आलेल्या अनुभवातून सुचलेला आहे !  तुमच्याकडे कलागुण असून उपयोगाचे नसते ते जगाला " कळायला ' लावावे ' लागतात ". स्वतःचे बाजारीकरण म्हणजेच मार्केटिंग करावे लागते . दुनिया तुम्हाला शोधत येणार नाही तर तुम्हाला तिच्या दारात जावे लागेल. उशिरा का होईना, मी सद्या हेच चालू केले आहे. याचं कारण असं आहे की मला पस्तीस वर्षांपूर्वीच माझे ( आणि माझ्याप्रमाणेच रत्नागिरीतील आद्य गझलकार असलेल्या अजिज हसन मुकरीचेही !! ) भवितव्य कळाले होते. सन १९८६ मध्ये लिहिलेल्या माझ्या सुप्रसिद्ध" तीर " नावाच्या गझलचा चौथा शेर आजही याची साक्ष आहे. शेरच पहा ना आणि मग सांगा कमेंट्स व्दारे. शेर असा आहे : 


कसोटी लागली तेव्हा निघालो मी खरे नाणे

तरीही मीच बाजारी कुठेही चाललो नाही 

कारण ? तेच ! मी स्वतःला जगाच्या दारात नेले नाही. मी स्वतःला जगापुढे " पेश " केले नाही. राग मानू नका, पण मी इतक्या वर्षांनी हेच करू लागलो आहे. दुर्दैव, दुसरं काय !!!


काही असो आपण पुढचा शेर पाहू : 


गुरू बनायचे असेल जर कधी

आधीच शोधले चेले पाहिजे


पूर्वी गुरु एवढे सामर्थ्यवान असायचे की त्यांची ख्याती सर्वदूर पसरायची.‌ चेलेच त्यांचा शोध घ्यायचे. आता स्वयंघोषित गुरू असतात .‌ आता गुरु बनण्यासाठी आधी नियोजन करावे लागते . म्हणजे गुरु बनायचं असेल तर आधी आपले काही चेले तयार करावे लागतात . गुरू म्हणून तुमची जोरदार प्रसिद्धी करू शकतील असे चेले आधी शोधायचे असतात , आणि मग तुमचा गुरु पदाचा मार्ग सुकर होतो. असा याचा अर्थ आहे .


यानंतरचा शेर  : 


जगायचे सुखी आयुष्य पुढे तर

रोजचेच आता मेले पाहिजे


हा शेरही तितकासा सरळ नाही . म्हणजे जीवनात एवढी दगदग भरलेली असते , भविष्यकाळ सुखाचा करण्यासाठी वर्तमानात रोजच्याच मरण यातना भोगाव्या लागतात असा याचा सरळ अर्थ आहे . पण ही खरे तर उद्विग्नता आहे , व्यथा आणि वेदनांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नसल्याने आलेली उपरोधिक असहाय्यता ‌आहे !


आता पुढचा शेर पाहू : 


त्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी

सोबती, बाटल्या, पेले पाहिजे


हाही शेर तसं म्हटलं तर उपरोधिकच आहे.  म्हणजे सुख व्यक्तीनिहाय असू शकते. काहींना दारू पिण्यामध्येही सुख असतं. त्यातही मग एकट्याने पिणं आणि मित्रांसह पिणं हे प्रकार आहेतच.‌ दुसऱ्या  प्रकारात सुख वाटत असल्यास असलं " भौतिक सुख " मिळवण्यासाठी सोबती, चाकणा , बाटली आणि पेले हवेतच !     


आता शेवटचा शेर.


अहंकार नष्ट व्हावा यासाठी

षड:रिपू वाहून गेले पाहिजे


हा शेवटचा शेर अगदी आध्यात्मिक आहे बरं का ! आध्यात्मिक असूनही त्याचा अर्थ अगदी सरळ आहे ! मोह, माया , मत्सरादि षड:रिपू वाहून गेले की मनातील अहंकारही नष्ट होईल व मन निर्मळ होईल , असा याचा सरळ अर्थ आहे. अर्थात सध्याच्या जगात हे असलं काही निर्मळ वगैरे होणे कठीणच आहे म्हणा ! पण आपण इथे अर्थापुरतेच मर्यादित राहू. 


लवकरच दुसऱ्या व्हिडिओ बद्दल नवीन पोस्ट घेऊन येतोय.‌ तोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट्स अवश्य द्या !


मराठी गझलबद्दलचा अशी शिकावी मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .

... देवीदास हरिश्चंद्र पाटील 

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

About my videos

 रसिकहो, 

तुमच्या आवडत्या ओन्ली देवीदास या ब्लॉगवर About My Videos या नावाचे आणखी एक सुंदर पान जोडीत आहे ! माझे यू ट्यूब वरील व अन्य व्हिडिओज, त्यावरचे भाष्य, तुमच्यासारख्या रसिकांच्या आलेल्या प्रतिक्रिया व अन्य तपशिल यांनी हे सुंदर पान सजलेलं असेल. या पानाला आपला खूप सुंदर प्रतिसाद लाभेल, याची खात्री आहे ! आपल्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट पहात आहे !!

धन्यवाद !

काळजी घ्या. आपण, आपले कुटुंब व आपली मित्रमंडळी सुरक्षित रहा.