सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

रक्ताच्या नात्यापलिकडचे नाते

खालची आई  !


               खरं तर ती माझी कुणीच नव्हती आणि तरीही ती माझी सारे काही होती ! माझं बालपण तिच्याच छायेत अधिक गेलं ! ती माझ्या आजीची मैत्रीण , आजीच्याच वयाची .पण मी तिला कधीपासून खालची आई म्हणू लागलो ते आठवत नाही ! आमचे घर तिच्या घरापेक्षा जरा उंचावरच होते . पाय-या उतरून खाली गेले की तिच्या अंगणात जायचो . त्यामुळेच मी तिला कधीतरी खालची आई म्हणू लागलो ! ती माझी संरक्षक भिंतच होती ! बालपणी मला काही बोलायची वा त्रास द्यायची कोणाची टाप नव्हती  ! हे अगदी मी चांगला मोठा झाल्यावर , म्हणजे मी चौवीस वर्षाचा होईपर्यंत चालू होते. त्याच वर्षी तिचे निधन झाले . सन 1984 मध्ये . अखेरच्या क्षणापर्यंत ती माझे संरक्षण करीत राहिली ! आजही मी आणि माझे कुटुंब तिच्याच छत्रछायेखाली सुरक्षित आहोत ! ही वस्तु:स्थिती आहे की सन 1984 ते आजतागायत आम्ही सुरक्षित आहोत ! मला आठवत नाही , म्हणजे मी तेव्हा खूपच लहान असणार , पण लोक सांगतात की ती चणेही आधी स्वत: चावून , बारीक करून मला भरवायची ! अगदी आख्यायिका वाटावी अशी ही सत्य घटना अनेकांनी पाहिली होती व मी मोठा झाल्यावर मला आवर्जून सांगितलीही होती ! ती माझी इतकी काळजी का घेत होती , हे मला कधीच समजू शकले नाही ! मी तिचा नातेवाईकही नव्हतो . पण तिचे नि माझे काही वेगळेच रुणानुबंध होते , हे अनेक घटनांनी सिध्द केले आहे ! 

तिचे किस्से 
                 मी अगदी लहान असतांना आशाआते मला घेऊन पाय-यांवरून खालच्या आईच्या अंगणात गडगडत गेली . सुदैवाने मला लागले नाही . आयुष्यातल्या त्या पहिल्यावहिल्या अपघातातून मी सहीसलामत वाचलो होतो ! पण खालच्या आईचे काळीज हलले होते . त्या दिवशी तिने आशाआतेला इतके धू धू धूतले की पुढे कित्यक महिने आशाआते तिच्यासमोर जायला धजत नव्हती ! अर्थात , मला हे कळण्याचे माझे तेव्हा  वय नव्हते . पण पुढे अनेकदा हा किस्सा सांगितला गेला . केवळ माझ्याच बाबतीत नव्हे ; तर गावातल्या अनेकांच्या बाबतीत तिचे किस्से आजही ऐकायला मिळतात . ती होतीच तशी ! अनेकांना तिने ऐन अडचणीच्या वेळेला मदत केलेली होती . कोणताही सण असो , तिने कधी एकटीने साजरा केला नव्हता ! प्रत्येक सणाला तिच्याकडे बायका जमायच्या . तिचे नातेवाईकही यायचे . पण ती स्वत: स्वयंपाक करून सगळ्यांना आवर्जून वाढायची !   तिच्या हाताला चवही सुंदर होती . तिचे एक मात्र होते , तिने केलेला प्रत्येक पदार्थ पहिल्यांदा ती मला खाऊ घालायची ! मग ती पुरी असो , पुरणपोळी असाे ! ती कोंबडीचे मटणही खूप मस्त करायची. गंमत म्हणजे , ती काळीज स्वत: होऊन माझ्या ताटात वाढायची ! मला आवडायचे म्हणून , मटणात ती आवर्जून बटाटे घालायची ! मीही ते आवडीने खायचो . पहिला पदार्थ मला देण्यात , तिची नातवंडं , पतवंडं तिथे असली तरीही कधी खंड पडला नाही ! हे असं का होतं , हे मला कधीच समजलं नाही ! तिला विचारण्याची कुणाची हिंमत झाला नाही . माझीसुध्दा ! खूप काही लिहायचं आहे . लवकरच अशा अनेक आठवणी मी सविस्तर लिहिणार आहे .... 

...............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: