सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

सुरेश भटांची एक विलक्षण आठवण

सुरेश भटांची एक विलक्षण आठवण 


इयत्ता नववीत मी लेखनास सुरवात केली . पुढे आठ दहा वर्षांनी  मराठी गझल भेटली . माझ्या बरोबरीने मराठी गझलला सुरवात करणारा आणि मराठी मातृभाषा नसताना उत्तम मराठी कविता आणि गझल लिहिणारा  अजीज हसन मुकरी भेटला. नजाकतीने लिहिणारा मधुसूदन नानिवडेकर भेटला.  त्याच्यामुळे आणि मराठी गझलच्या ओढीमुळे सुरेश भट भेटले . सर्वोत्तम केतकर , दीपक करंदीकर , म. भा . चव्हाण भेटले. पुढे मराठी गझलला वेगळ्याच उंचीवर नेणारे भीमराव पांचाळे भेटले. सुरेश भट आणि मराठी गझल यामुळे असंख्य गझलकार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भेटले .


सुरेश भटांचा आणि माझा पत्रव्यवहार सलग चार वर्षे सुरु होता. मी तो जपू शकलो नाही . त्यांना मी केवळ एकदाच भेटलो . बहुधा १९८८ मध्ये . पुण्यात . एक आख्खा दिवस मी त्यांच्या बरोबर होतो. त्यावेळी दीपक करंदीकर नीता जोशी आणि पंढरपुरचे एक गझलकारही येवून गेले. भटसाहेब न थकता गझला ऐकवत होते. आम्ही जेवायला  हॉटेलात गेलो तेव्हा वाटेत भटांचा वजनदार हात माझ्या खांद्यावर होता. त्यांना पेलवत रस्ता पार करण्याचे दिव्य मी कसेबसे पार पडले . दुसऱ्या  बाजूने माझ्यासोबत आलेला प्रदीप मुरारी हातिसकर चालत होता. साक्षात सुरेश भटाना  जेवताना आम्ही पहिले . जेवतानाही ते गझलबद्दल बोलत होते.





भट साहेबांचा निरोप घेवून रात्री आठ वाजता मी व हातिसकर पुणे  स्टेशनला पोचलो . आम्हाला रत्नागिरीला यायचे होते . कसे कोण जाणे पाठोपाठ भटसाहेब तिथे आले. आपला वजनदार हात पुन्हा एकदा माझ्या खांदयावर ठेवून मला म्हणाले देवीदास आज माझ्याकडेच थांब . पहाटे मुंबईला निघायचे आहे. मंगेशकरांकडे . लताआशा हृदयनाथही तिथे भेटणार आहेत . ते आग्रह करीत होते . एका दृष्ट्या कवीचा तो आग्रह होता. पण मी थांबू शकलो नाही. मी करंटा निघालो . भटांच्या मनात त्यावेळी काहीतरी होते . मी ते ओळखू शकलो नाही . त्यांचे मन मोडून मी रत्नागिरीला आलो . पण ते मनाने मोठे होते. मला रत्नागिरीला यायचे आहे असे त्यांच्या प्रत्येक पत्रात असायचे . पण अखेरपर्यंत ते येवू शकले नाहीत . त्यावेळी रेल्वे नव्हती  एसटीने त्यांना झेपणारे नव्हते  आणि गाडीने इतक्या दूर आणणे परवडणारे नव्हते . तो योग आलाच नाही . राहिली ती एक विलक्षण आठवण !

.............

टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  

.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: