बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

वेळीच सावरले नाही तर

 वेळीच सावरले नाही तर

आपण जोडतो त्याला जोडपे म्हणतो. पती पत्नीचे नाते हे जोडण्यासाठी असते. जोडण्याची कला आणि दृष्टी ज्यांच्या अंगी असते ते सतत एकमेकाला एकमेकांशी जोडत राहतात. प्रसंगी राग गिळतात. कडू घोट गिळतात. पण दुसऱ्याला दुखवत नाहीत.‌ कटुता कटाक्षाने टाळतात.‌ एकमेकांना कायम धरुन राहतात. ते एकमेकांची किंमत जाणतात. ओळखतात. संसाराचे मर्म जाणतात. खरा संसार करतात. एकमेकांसाठी, कुटुंबासाठी जगतात.

काहींचे मात्र याच्या अगदी उलट असते. दोघांचेही अहंकार इतके आडवे येतात की कुटुंबात असूनही ते परस्परांना दोन स्वतंत्र व्यक्ती समजतात. रीतसर धार्मिक विवाह करून , धर्माला , देवादिकांना स्मरून लग्नमंडपात आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेऊन, शेवटी एकेरीवर , लढाई झगड्यांवर येतात. किती केले तरीही देव, धर्म, संस्कार हे सारे कुचकामी ठरतात. नवरा बायकोचे अहंकार डोके वर काढतात. आपण, आपला हे शब्द ती चुकूनही उच्चारत नाहीत. उलट मी, माझे हेच शब्द गोंजारत बसतात. याचा दुष्परिणाम आपल्या मुलांवर होतो आहे हे स्वतःला जाणवूच देत नाहीत. प्रसंगी मुले यांच्याच पावलांवर पाऊल टाकतात व त्यांनाही यांच्याप्रमाणेच कुटुंबापेक्षा स्वतःचेच मुद्दे व जीवन महत्वाचे वाटू लागते. ही मुले बिघडतात. पुन्हा मुलगा तुझ्यामुळे बिघडला असे नवरा पत्नीला म्हणतो तर मुलगी तुमच्यामुळे बिघडली असे तिची आई आपल्या नवऱ्याला म्हणते. मुलगा असो वा मुलगी , पती पत्नी एकमेकांवर मूल दुसऱ्यामुळे बिघडले हाच एकमेव आरोप करतात. यातून दोघेही एकमेकांचा उध्दारच करतात ! एकमेकांना शिवीगाळ करतात. प्रसंगी मारामारी करतात. पत्नी मिळेल ती वस्तू पतीला फेकून मारते.  पती दारू पिऊन पुन्हा पुहा धिंगाणा करतो. हे संसार चक्र असेच अव्याहतपणे चालू राहते. जीव गेलाच तर आपल्याच माणसाचा जाईल हे यांच्या गावीच नसते. पत्नी पतीचा मुलांसमोर अपमान करते. पती मुलांसमोर पत्नीला मारझोड करतो. हे चालूच राहते. मुले कधीच वाईट मार्गाला लागलेली असतात. चांगले जगण्याची कुटुंबाची वेळ कधीच निघून गेलेली असते. ते कुटुंबच उध्वस्त झालेले असते. मित्रांनो, त्यांचे त्यांनीच उध्वस्त करून घेतलेले असते.

असे दिसून येते की, जोडप्यांमध्ये ही भांडणे साधारणतः पन्नाशीच्या आसपास घोंघावतात. तेव्हा मुलेही मोठी होऊन त्यांचे गूण कळलेले असतात. पती पत्नी मधील नवेपण संपत आलेले असते. प्रत्येकाचे एक स्वतंत्र आयुष्य आता सुरू झालेले असते. खरे तर आतून ते हवेसे वाटू लागलेलेच असते.‌ आता मी सुटलो किंवा आता मी सुटले, माझ्या मनाप्रमाणे मी जगायला मोकळा किंवा मोकळी अशी वाक्यं सर्रास बाहेर पडू लागतात.‌ ह्यातल्या आता या शब्दाला विशेष महत्व आहे. कारण आता,  विशेष म्हणजे जीवनाचे वाढते व्याप वा वयाचा परिणाम म्हणून, या वयात पती पत्नीमधील शारिरिक संबंध कमी होऊन , त्यामुळेही त्यांना एकत्र ठेवणारा दुवा कमकुवत होऊ लागलेला असतो. प्रजननक्षमता हाच खरा  मानवाचा नैसर्गिक शक्ती स्त्रोत आहे. तोच कमी झाला तर हार्मोन्समध्ये बदल होऊन काही गोष्टी घडतात. शरिराची, मनाची तगमग, तडफड बुध्दीवरही परिणाम करते. विचारांचा समतोलपणा कमी होतो. चिडचीड होते. जरा काय झालं तर दुसऱ्याची चूक लगेच दिसतेच असे नाही, तर तिच्यावर बोटही ठेवले जाते ! पराचा कावळा होतो. संशयाची परिसीमा होते ! इथेच आग लागते !  सर्वांच्याच बाबतीत हे होईल असे नाही. पण काहींच्या बाबतीत हे होते एवढे नक्की ! वाढणारी भांडणे जोडप्यातले उरलेसुरले आकर्षण वा प्रेमही संपवतात. त्यातून आपुलकी संपते. बारिकसारीक कारणांवरून वाद होत राहतात. लक्षात घ्या मित्रांनो, वेळीच सावरले नाही तर संसार उध्वस्त होतात.

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
३०.०६.२०२४ सकाळी ०७.५०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: