मोबाईल व इंटरनेट हे आताच्या काळाचे महान योग प्रशिक्षक
इंटरनेट सुरू झालं तेव्हा रंगीत संगणकही आम्ही नुकतेच वापरू लागलो होतो. डेस्कटॉप म्हटलं की कसं त्या जमान्यात गेल्यासारखं वाटतं. मला ते दिवस आठवतात. संगणकावर काम करायला खूप मजा यायची. मी पूर्वीही कुठेतरी लिहिलंय की विजय तुरळकर आणि मालवणहून आलेले सुनिल मयेकर हे आमचे ब्लॅक अॅंड व्हाईट ( काळे-गोरे म्हटल्यास उडदामाजी वाटण्याची शक्यता आहे ! ) संगणकाचे मास्टर्स होते. त्यावेळी साहेब या दोघांशिवाय कोणाला संगणकाला हात लावू देत नसत. मी पगारबिलाची रजिस्टर्स लिहून पुढ्यात घेऊन बसायचो. हे दोघे स्ट्रक्चर तयार करायचे आणि मी लिहिलेल्या रकमा पटापट संगणकात फीड करायचे. मी नुसताच बघत बसायचो. मला ते काम करायला हे दोघेही सांगायचे. मनातून आवडत असले तरी संगणकाला हात लावायचा नाही हे साहेबांचे शब्द आठवायचे आणि माझ्या मनातली संगणकाची भीती आणखी वाढायची. पण सहा महिन्यांत ह्या दोघांनी मला संगणकावर काम करायला लावलंच. त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे मी भीत भीत का होईना संगणकाला हात लावला ! तो हात पुढे सेवानिवृत्त होईपर्यंत कायम राहिला. मी पुढे केलेला हात पाहून संगणकानेही हात पुढे केला असावा. पुढे आमची दोस्तीच झाली. संगणकामुळे माझं काम किती तरी कमी झालं. मी तर त्याला गणपतीच समजायचो. माय फ्रेंड गणेशा हे गाणं तेव्हा जन्मालाही आलं नव्हतं तेव्हा आमची घट्ट मैत्री झाली होती ! रंगीत संगणक आणि इंटरनेट आल्यावर तर काय बहारच आली ! तेव्हा आम्ही वरिष्ठांचे डोळे चुकवून कधी कधी इंटरनेटच्या जगात जायचो. गूगल, रेडीफमेल आणि ब्लॉगींगशी ओळख इथेच झाली. तेव्हा सगळं इंग्रजीत असायचं. माझं इंग्रजी चांगलं असल्यामुळे मला या गोष्टी फारशा कठीण गेल्या नाहीत. मात्र तेव्हा इंटरनेटची स्पीड फारच कमी असायची. ऑफीसची कामंही कधी कधी रात्री एक एक वाजेपर्यंत करावी लागायची. या कामातही आम्ही कधी कसूर केलेली नव्हती. उलट ही कामे ऑनलाईन असल्याने आनंदच वाटायचा. याच काळात कधी तरी स्पीडमास्टर भगवान मुकादम भेटला ! मी आणि आमचे काशिनाथ नार्वेकर तर त्याची संगणकाच्या कीबोर्डवर गतीने फिरणारी बोटं पाहून आमच्याच तोंडात बोटं घालायचो ! आमच्यादृष्टीने तो वेगाचा भगवान होता. हसतमुख भगवान बोलतोही गतीने . सद्या तो मित्रवर्य अभिजित हेगशेट्येच्या नवनिर्माण संस्थेत आहे. मध्यंतरी नवनिर्माणमध्ये माझा गझलांचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा तो भेटला होता. त्यानेच रेडीफमेलवर आमची पहिली ईमेल आयडी तयार करून दिली होती. तेव्हा आम्हांला केवढा आनंद झाला होता ! जीमेलचा शोध आम्हांला खूप नंतर लागला !
ऑनलाईन समाज माध्यमे व व्यावसायिक
आता तर फेसबूक, इन्स्टाग्राम ( यातला ग्राम हा शब्द मराठी वाटावा इतका मराठी माणसांच्याही ओळखीचा झालेला आहे ! ) , व्हॉट्स अॅप सारखे केवळ सोशल मिडीयाच नव्हेत तर अॅमेझॉन , फ्लिपकार्ट सारखे अनेक व्यावसायिक ऑनलाईन प्रकारही आता आले आहेत. बरेच जणं आता ऑनलाईन खरेदी करतात ! आता इंटरनेट त्यामानाने अधिक गतीमान झाले आहे. तेव्हा आम्ही शासकीय कामे करतांना भूकतहानही विसरून जायचो. आताही लोक तहानभूक विसरून कामं करतात. पण केवळ तहानभूकच नाही तर आपल्या बाजूला माणसंच आहेत हे विसरून जातात ! माणसाला माणसाची चाहूल लागत नाही. माणसांचा माणसाशी संवादच तुटला आहे. मौनव्रत हे कठीण काम मोबाईल व इंटरनेटने किती सहजपणे सोपं केलं आहे पहा ! ते शिकवायला आता कोण्या योगी महात्म्याची गरज पडत नाही. मोबाईल व इंटरनेट हे आताच्या काळाचे महान योग प्रशिक्षक झाले आहेत. हे गूण ते बोलल्याशिवाय शिकवतात !! पण ते अबोलपणा व न ऐकणे हे दोन दोषही शिकवतात. पुढच्या पिढ्यांना बोलायची व ऐकायची सवय राहिली नाही तर अनेकजण मुके व बहिरे होतील, हे नक्की ! काळजी घ्या मित्रांनो ! जर शरीराचा एखादा भाग दीर्घ काळ वापरलाच नाही तर तो बंद पडतो किंवा गळून पडतो. आपल्या शेपटीसारखाच ! आता तरी कळलं ?
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा