शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

Corona virus plus Saree

मागे - पुढे

16.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग तेवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो.  सकाळी मागच्या पुढच्या दरवाजावर नेहमीच्याच गोष्टी घडत गेल्या. पाणी लावले. पाणी भरले. आठ वाजता सत्त्या जयच्या घराच्या कोरोनामुळे अर्धवट राहिलेल्या बांधकामावर नेहमीप्रमाणे पाणी मारू लागला. नंतर संत्या , सत्तू , बंदू , विशू , विकू यांची रोजची मैफील बंदूच्या दारात सुरू झाली. विशू हा बंदूचा मित्र आहे. तो  विकूच्याच थोडा पुढे राहतो पण उजाडले की सत्त्यासारखाच बंदूकडे येतो. विकू जरा उशिरा येऊन सहभागी होतो. मूळचा आमच्या भागातला विकू गेली काही वर्षे कौटुंबिक विभागणीमुळे दुस-या भागात घर बांधून राहतो . ही एक वेगळी कथा आहे. आमच्याकडे प्रत्येकाची वेगळी अशी खास कथा आहे. कोरोना संपल्यानंतर त्या सर्व कथा आपोआपच मागच्या पुढच्या दारातून व्यक्त होतीलच. आमचा नाश्ता , आंघोळ , देवपूजा , वाचन , मनन, चिंतन संपन्न होऊन दुपार झाली. रोज रोज ते भात आमटी पोळी भाजी जेवायचा कंटाळा आला होता.  त्यामुळे आज नेहमीचे जेवण करू नकोस , काही तरी खीरवगैरे कर , म्हणजे पोटालाही आराम, असे मी हिला सकाळीच बोललो होतो . म्हणून आज तिने शेवयाची खीर केली आहे.  तेच आमचं दुपारचं जेवण.


  1.             आजही कोरोनाचा प्रभाव वाढता आहे. अजूनही काहींचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. भरपूर चिखल ज्यांच्याकडे शिल्लक आहे ते तो उडवत आहेत. फेसबूकवर काही शेंबडी पोरे स्वत:ची अक्कल काहींकडे गहाण टाकून घाणेरडया भाषेत पोस्टस् करत आहेत किंवा अशा पोस्टस् शेअर करीत आहेत , अर्वाच्च्य टीकाटिप्पण्या करीत आहेत. मागच्या पिढीलाही देशप्रेम शिकवणारे आजच्या पिढीतले काही सभ्य संस्कृतीचे आदर्शवीर त्यांच्या आदर्शांकडे पाणी भरीत असल्यासारखे बाललीला करीत समाजमाध्यमांवर लिहिण्याची लायकी नसल्याने ,  दर्जाहीन लेखन करीत आहेत.  कोरोना आपला विळखा क्षणाक्षणाला विळखा घट्ट करतो आहे. वेळ काय, आपण करतो काय , हे ज्यांना कळत नाही ते स्वत:लाच कळते अशा अविर्भावात बोलत आहेत.  तिकडे देशाची अर्थव्यवस्था शुन्याकडे सरकते आहे अशा बातम्या सांगताहेत. म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था ! काहींचे लक्ष काही विषयांवरून वळविण्यासाठी काहींचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. इकडचे आणि तिकडचे आपला तो बाब्या याच न्यायाने एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. त्या वेडयांना आपण सुरक्षित आहोत असेच वाटते आहे.  काहींचा गेल्या काही वर्षापासूनचा उन्माद अजूनही ओसरलेला नाहीय. त्यासाठी चीनमध्ये पुन्हा कोरोना उद्भवतो आहे आणि आपल्याकडे कोरोनामागून सारी आला आहेच . तोही वाढतो आहे.  त्यातच देशात काही ठिकाणी लोक गावी जाण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. यांमागे कटकारस्थाने असल्याचेही संशय व्यक्त होत आहेत. मूळात कोरोनाही एक कट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काही लोक पायी , काही बाईकने , काही कारने लपूनछपून गावी पळत आहेत. काही पकडले जात आहेत . काही लोक जत्रा , साखरपुडे , लग्ने , वाढदिवस गर्दी करूनच साजरे करीत आहेत. काही प्रार्थनास्थळांचा आधार घेत आहेत. काही अडाणी आणि काही सुशिक्षित अडाणी जुन्याच गोष्टींना धरून अडून बसले आहेत. काही स्वार्थी लोक कोणत्याही परिस्थितीत स्वार्थच साधतात. या काळातही नफेखोरी करणारे लोक आहेत.  यासंदर्भात इथे एक कविता देतो :


रंजलागांजला तुकाराम

ज्ञानेश्वरांच्या निर्मळ मनातून आलेल्या
जो जो वांछील ते तो तो लाहो हया उक्तीला प्रथम उचलून
काही लबाडांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवणा-या तुकारामाचा खून केला ...
आणि पुंडलिकाला पुढे करून
विठ्ठलाला विटेतच कायमचे बंदिस्त करून टाकले
तेव्हापासूनच प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हैवान
अधिक मोकाट सुटलेयत...
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लुटालूट करणारे हे संधीसाधू
नफेखोरी करीत राजरोस उजळ माथ्याने फिरत आहेत
ज्ञानेश्वरांना खिशात घालून
आणि
रंजलागांजला तुकाराम
कधीही न सुटू शकणा-या त्यांच्या बेडीतल्या विठ्ठलाचा धावा करतोय
पुन्हा पुन्हा आपलाच खून करून घेत
त्या पापी , बलात्कारी , पापी हातांकडून ..

...देवीदास हरिश्चंद्र पाटील


  1.        दुपार नंतर संध्याकाळ आणि संघ्याकाळ नंतर रात्र ओघाने आलीच. आज काही विशेष झाले नाही. पुढच्या दारी बसायला आज कोणी विशेष आले नाही. काही फोन मात्र या वेळात झाले. दिवाबत्तीनंतर सौ. ने टीव्ही लावला. मी हिला बातम्या बघूच नको , त्यापेक्षा कंटाळवाण्यासुध्दा मालिका बघितल्यास तरी चालतील , असे मी सौ. ला सांगितले. उगाच प्रेशर वाढवून घेण्यात अर्थ नाही. रात्रीही शेवयाची खीर खाल्ली. हल्ली दिवस रात्री कोरोनामुळे तणावच असतो. तणाव कमी होऊन कधी तरी पहाटे झोप लागते.


( क्रमश: )

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

Savali Marathi Gazal

सावली

तू न भेटलास तर मी कुणीच ना इथे !
नांव-गांव कोठले ? ती हमीच ना इथे !

घे मला तुझ्याजवळ... साथ दे तुझी मला ...
पाहिजे मला तशी जिंदगीच ना इथे !

नेहमीच हा तुझा संग लाभु दे मला !
सांग भेटशील तू नेहमीच ना इथे !

आरशात हे तुझे सारखे दिसे हसू
अन् तयार झाकण्या पापणीच ना इथे !

गावही तुझे कसे ... दूर तारकांपरी....!
काय चालले तिथे ? ... बातमीच ना इथे !

काय चांदण्या करू ? काय चंद्रही करू ?
साथ जी हवी तुझी नेमकीच ना इथे !

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

Corona lock down in process

मागे - पुढे

15.04.2020

               आज लॉक डाऊनचा बावीसावा दिवस. काल रात्री आम्ही झोपण्याची जागाच बदलली. बेडरूममधून सरळ हॉलमध्ये झोपायला सुरूवात केली. बेडरूममध्ये पलंगावरच्या गादीमुळेही खूप गरम होत होते. झोपण्यापूर्वी अंगणातल्या लादीवर पाणी मारले जेणेकरून हॉलमध्ये थंडावा मारील. पण तसे वेळेवर झोपूनही सौ.ला झोपच येत नव्हती. मला झोप येऊनही मी झोपू शकत नव्हतो. अखेर रात्री सव्वा वाजता तिने विचारचक्र थांबवण्यासाठी गोळी घेतली.  ती झोपल्यानंतर मी कटाक्षाने जागा राहण्याचे प्रयत्न सोडून झोपेच्या अधीन झालो तेव्हा बहुतेक रात्रीचे अडीच वाजले असावेत. सकाळी सहाला जाग आली तसा मी उठलोच. इथे झोपलो असतो तर पाणी येवून गेल्यानंतरही ब-याच वेळाने उठलो असतो. ते उपयोगाचे नव्हते. पावणेसातला पाणी येईपर्यंत शक्य तेवढी इतर कामे आटोपली. पाणी आल्यावर पाणी भरले. पाणी भरतानाच मला पडलेले स्वप्नं आठवले. अगदी छोटे. मी एस. टी. बस मध्ये उभा असतो. गर्दी असते. बस एका ठिकाणी थांबते आणि माझ्या बाजुच्या सीटवरची सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आजी उठते व बसमधून उतरते. ती चहा घेऊन परत येईल की ती खरोखरच तिच्या मुक्कामावर उतरली हा विचार मनात येत असतांनाच काही असो आपण बसून घ्यावे , असा विचार करून मी  रिकाम्या जागेवर बसतो. इतक्यातच मला जाग आली. त्यानंतर माझे व्यवहार सुरू झाले. आज सौ. लवकर उठणे शक्यच नव्हते.


              आज गुरूवर्य सुरेश भट यांची जयंती.  खरे तर इयत्ता नववीपासूनच मी कविता लिहीत होतो. माझी वाटचाल कवितेकडून गीतकाराकडे होत असतानाच 1984 च्या दिवाळी अंकात मला दादासाहेबांची गझल प्रथम वाचनात आली . त्या एकाच रचनेने मी सुरेश भटांकडे ओढला गेलो.  तेव्हा मराठी गझल हा प्रकारच मी ऐकला नव्हता .  पण त्यानंतर भटांच्या आणि म.भा. चव्हाण , सर्वोत्तम केतकर , दीपक करंदीकर....यांसारख्यांच्या गझलाही वाचनात आल्या. दादासाहेबांचे रंग माझा वेगळा आणि एल्गार हे संग्रह तर मी झपाटल्यासारखे वाचले. त्यातल्या गझलांची लय माझ्या मनावर कोरली गेली. तर पुढे मी ब-यापैकी गझल हा काव्यप्रकार लिहू लागल्यावर ' सावली ' ही गझल खुद्द सुरेश भटांना उद्देशून लिहिली . ती पुढे दैनिक मुंबई रविवार सकाळ मध्ये दि. 28.02.1993 रोजी प्रसिध्द झाली.  त्यावेळी दादासाहेब कधी नागपूरला तर कधी पुण्याला असायचे. त्यावेळी वाहतुकीची साधनेही अपुरी होती. मला त्यांना भेटायची ओढ लागली होती. पण ते शक्य होत नव्हते.  व्याकुळ होऊन मी गझल लिहिली, ती अशी होती :

                  सावली

तू न भेटलास तर मी कुणीच ना इथे !
नांव-गांव कोठले ? ती हमीच ना इथे !

घे मला तुझ्याजवळ... साथ दे तुझी मला ...
पाहिजे मला तशी जिंदगीच ना इथे !

नेहमीच हा तुझा संग लाभु दे मला !
सांग भेटशील तू नेहमीच ना इथे !

आरशात हे तुझे सारखे दिसे हसू
अन् तयार झाकण्या पापणीच ना इथे !

गावही तुझे कसे ... दूर तारकांपरी....!
काय चालले तिथे ? ... बातमीच ना इथे !

काय चांदण्या करू ? काय चंद्रही करू ?
साथ जी हवी तुझी नेमकीच ना इथे !

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !

            खरंच होतं , नागपूर ते रत्नागिरी हे हजार किमी.चं अंतर. एवढया अंतरावरून दादासाहेबांनी रत्नागिरीतल्या जाकीमि-या गावच्या धुळीतलं फूल उचललं ! ते नसते तर मी गझलकार म्हणून कुणीच नसतो. त्या काळातच नव्हे तर त्यानंतरही अनेक वर्षे रत्नागिरीत मराठी गझल लिहिणारे कोणीही नव्हते. ( सुदैवाने, आता आताशी परिस्थिती बदलते आहे ! ) गझलची कसलीही माहिती त्यावेळी रत्नागिरीत कोणी देऊ शकत नव्हते. माझा मित्र अजिज हसन मुकरी फक्त माझ्यासोबत होता. आम्हीच आमचे परीक्षक होतो. समीक्षक होतो. भटसाहेबही कधी नागपूर तर कधी पुणे असे वास्तव्य करायचे. म्हणूनच मी म्हटले होते :

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !

              सुरेश भटांच्या आठवणीतच दुपार झाली. जेवण , वामकुक्षी , लेखन , वाचन यात दुपार जाऊन संध्याकाळ आली. एक एक करता पाच सहाजणी आमच्याकडे जमल्या आणि काही वेळातच कलकलू लागल्या. गंमत म्हणजे वाद दोघीतच होता . पण बाकीच्या त्यात प्रचंड उत्साहाने उतरल्या. बराच वेळ बायांचे धिमशान चालूच होते. अखेर मी दम दिला आणि फक्त दोघीनीच काय ते बोला आणि तेही मोठयाने बोलायचे असेल तर तुमच्या घरी जाऊन बोला. आता पोलीसांची गाडी येण्याची वेळ झालीच आहे. हे सांगताच पाच मिनिटात सगळया सरळ आल्या. सात वाजले तसे आम्ही दिवाबत्तीकडे वळलो. मग त्याही आपापल्या घरी गेल्या. रात्री लवकर झोप लागत नव्हतीच . साडे अकरा वाजता अंथरूणावर पडलो. पण बाराच्या दरम्याने झोप लागली. सौ. ने गोळी घेतली होती. दीड वाजता ती जागी झाली. परत पाच मिनिटात झोपी गेली. पण मला आलेली जाग चालूच राहिली. मला पहाटे कधी तरी झोप लागली.

( क्रमश: )

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

Corona lock down extended

मागे - पुढे

14.04.2020

                  आज लॉक्ड डाऊनचा एकविसावा दिवस. आज भारताच्चे महान सुपूत्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. पस्तीस वर्षापूर्वी याच दिवशी माझी पहिली कविता दै. रत्नभूमी मध्ये छापून आली होती आणि तिचं शिर्षक होतं :     ' राजकारण गेलं चुलीत ! ' मी पुढे कसा झालो ते सांगायला नकोच ! सर्वसामान्यांसाठी सतत लढणा-या नि:स्वार्थी  महात्म्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणा-या लबाडांनी अनेक महात्म्यांच्या नावालाच काळीमा फासला आहे ! कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. या अवस्थेतही काही लोक राजकारण आणि राजकीय टिप्पण्या यातच मश्गूल आहेत. स्वत:चे घर जळायला आले तरी दुस-यांच्या घरात आगी लावणारे गेल्या काही वर्षात वाढलेले आहेत. त्यांच्याकडे लोकांनी आपली  अक्कल गहाण टाकली आहे , हे ओळखण्याइतके ते बेरकी नक्कीच आहेत. इकडे लोक थाळया , टाळया वाजवायला सांगितल्यावर आणि दिवे लावायला सांगितल्यावर गर्दी करून ड्रम आणि फटाके वाजवत आहेत. पाचशे रूपयांसाठी बँकांच्या दारात सोशल डिस्टन्सचे बारा वाजवून गर्दी करत आहेत. कधी खाल्ले नाही तसे भाज्या आणि मासे याकरिता लोक जीव धोक्यात घालून गर्दी करीत आहेत. गेल्या काही वर्षात लोक उद्देशहीन होऊन अधिक भरकटत आहेत. या लोकांना आवाहने करतांना तारतम्य बाळगणेही कठीण झाले आहे. चार लबाडांकडे  अक्कल गहाण टाकल्यावर माणसांची अशी मेंढरे झाली नसती तरच नवल ! सर्वत्र बेभानपणे धावून आपलीच माणसे कोरोनाचा जाहीर प्रसार करीत आहेत. कोरोना मेंदूवर ताबा मिळवतो अशी एक शंका आहे.  काल रात्रीही ब-यापैकी झोपलो. आज एकही स्वप्नं पडले नाही. नेहमीसारखी सहाला जाग आली. मागच्या दारी जाऊन पंपाने पाणी वरच्या टाकीत चढवले. साफसफाई  केली. तोवर पाणी आले ते भरले. आजही झोपेच्या गोळीचा अंमल लांबल्याने सौ. सातनंतरच उठली. आज फारसे कोणी आलेच नाही. आज कोरोना संचारबंदी तीस एप्रिलऐवजी तीन मे पर्यंत वाढवण्यात आली .  दुपारी जेवणापूर्वी मुलाने व्हिडीओ कॉल केला. जरा फ्रेश दिसत होता. सुरूवातीला चांगला बोलला पण काय झाले कुणास ठाऊक , कदाचित संचारबंदी लांबल्याने आमचे पुण्याला जाणे लांबल्याने त्याच्या मनावरचा ताण वाढला असावा. तो घर फिरून दाखवा म्हणाला. घर बघूनही त्याचे मन भरून आले .  बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले. तो रडल्याने आम्हां दोघांनाही रडू आवरले नाही. अखेर त्याला समजावून शांत केला. त्यानंतर थोडे बोलल्यानंतर मग तिघांनाही बरे वाटले. फोन झाल्यानंतर आम्ही जेवलो. जेवणात मन लागतच नव्हते. जेवायचे म्हणून जेवलो.

          दुपारी मी वामकुक्षी केली. संध्याकाळी दोघी तिघी येऊन सौ. शी बोलत बसल्या. मी अंगणात फिरत होतो. मग मी पाणी शिंपायला गेलो आणि दरवाजा बंद करून ही बीनाच्या आईकडे गेली. ती आली तोवर सात वाजले. तिने आमच्या देवाजवळ दिवाबत्ती केली . मी भावाच्या घरात दिवाबत्ती केली. रात्रीही फारसे काही घडले नाही. तसे लवकरच झोपलो.


( क्रमश: )

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

Corona virus lock down continues

मागे - पुढे

13.04.2020

                  आज लॉक्ड डाऊनचा विसावा दिवस. काल रात्री  सौ.ची तब्ब्येत व्यवस्थित असल्याने ब-याच काळाने ब-यापैकी झोपलो. एकदा साडेतीनला उठलो तेव्हा काही मिनिटांपूर्वी स्वप्नं पडल्याचे आठवले . एकदम गणपती विसर्जनाची मिरवणूकच दिसते. तीही दरवर्षी विसर्जन करतात त्या खालच्या बाजूच्या समुद्राच्या दिशेने नव्हे तर उलट दिशेने उत्तरेकडून पूर्व भागातील खाडीच्या दिशेने चाललेली. घरापासून वरच्या दिशेच्या चढावावर उत्तरेकडून पूर्वेला वळणारी. माझा मुलगा डोक्यावर गणपती घेऊन सर्वात शेवटी चालत असतो व मी त्याच्याही मागे चालत वळणापर्यंत पोचलेला असतो. त्याक्षणी मला उजवीकडे आणखी एक रस्ता दिसतो पण त्याने हे लोक जात नाहीयत. त्या रस्त्याच्या वरच्या बाजूला लगतच लाकडी कंपाऊंड घातलेले असते . कोणी तरी मला सांगतो तिकडे जाऊ नका. तिथून खालच्या बाजूचा एरिया सील केलेला आहे. मी मुलाच्या पाठोपाठ चालू लागतो . इथेच स्वप्नं संपते. म्हणजे आमच्या गावातही कोरोना येवून जवळचाच भाग सील करावा लागणार की काय ? सील केलेल्या त्या भागात कोणी कोरोनाग्रस्त तर सापडणार नसेल ना  ? हा कोरोना गणपती विसर्जनापर्यंत लांबणार की काय ? महत्वाचे म्हणजे नेहमीच्या दक्षिण समुद्रात विसर्जन का नाहीय ? तिथे काय होणार आहे ? समुद्राऐवजी खाडीत का विसर्जन करायची वेळ येणार आहे ? समुद्राचे पाणी काही भूभाग तर गिळंकृत करणार नाही ना ? पावसाळयात काही विचित्र घडणार आहे का ? की  गणपतीपर्यंत मुलाची भेट होणार नाहीय ? अनेक प्रश्न  ! तणाव वाढवणारे. काल दुपारी मुलाशी झालेले बोलणे मनात होतेच. एका बाजुला पत्नीचा अती चिंता करण्याचा स्वभाव , कोरोनाचा प्रभाव आणि स्वत:ला फीट राखण्याची साठीतली माझी कसरत ! 

           आज सोमवार . नळाला पाणी येणार नाही.  पण बाकीची कामे होतीच. आज सौ. चक्क नऊ वाजता उठली. पहाटे साडेतीननंतर ती चांगलीच झोपली. झोपेची गोळी तिला चांगलीच लागली. चहा घेऊनही तिच्या डोळयांवर झापडच येत होती. कुठे तरी झेप जाऊन पडण्यापेक्षा झोप म्हणून सांगितलं, तशी ती झोपली.  लंबू वहिनी उन्हात गहू सुकत घालायला आली, तेव्हा ही झोपलेलीच होती. वहिनी मग बाहेरच्या बाहेर गेली . तिने अर्ध्या तासाने उठून आंघोळ , जेवण वगैरे केलं. दरम्यान मुलाला फोन केला. मी बोलून हिला बोलायला दिले.  दोघेही नीट बोलल्याने भांडण मिटले .  मला समाधान वाटले. दुपारी जेवलो. ही वामकुक्षीकडे वळली. आज तिचा उजवा पाय पुन्हा दुखू लागला. मी राईच्या तेलाने रगडले.  बरे वाटताच ही झोपली. एका गझलचा एक शेर बाकी होता.  सकाळपासून मनासारखा जमत नव्हता आणि जमवण्याची मन:स्थितीही नव्हती. आता सगळे ठीक होते . मी गझलकडे नजर टाकली. थोडया वेळाने तो शेर जरा मनासारखा झाला.   
       मी दिले व्यथेस माझ्या धुमारे नवनिर्मितीचे अन्
      अश्रुत मिसळले हास्य मी, हुंदक्यांना हसवण्यासाठी !
 या ब्लाॅगवर संपूर्ण गझल मी पोस्ट केली आहे. तसे याच ब्लाॅगवर माझ्या मराठी गझलांचे पान आहे. तिथेही ती मिळेल. आज आम्ही चहा चार वाजताच घेतला. ही टीव्ही लावून बसली तोच काळी भाभी भेटायला आली. ती बोलत असतांनाच अनमोलची आई आली. आज जरा सावरलेली दिसली. तिने गरम गरम फणसाची भाजी आणली ती मी ओट्यावर नेऊन ठेवली व परत अंगणात फे-या मारू लागलो. त्या तिघीही पायरीवर बसून गप्पा मारू लागल्या. अनमोलच्या आईने काल ठरल्याप्रमाणे दारात ज्यादा असलेली जुनी तुळस नेली. तिच्या तुळशीवर गडगा कोसळल्याने आम्ही तिला ही तुळस न्यायला सांगितले होते.  ती पैसे देत होती ते आम्ही घेतले नाहीत.  टीव्ही लावला तर पुण्यात आणखी 22 ठिकाणे सील करणार अशी बातमी आली. चिंता वाढल्याने मी टीव्ही बंदच केला. 

            गंमत म्हणजे , आज दिवसभरात बीना किंवा तिची आई अजिबात आलेली नाही. रात्री नऊ वाजता सौ. ने फोन करून बोलावल्यावर लंबूवबिनी आली. तिचे दोन्ही नातू मोठया पोरांच्या नादाला लागून देवळाच्या आसपास गप्पा मारत बसतात. त्यामुळे ती चिंतेत आहे. पोलीसांच्या राऊंडमध्ये सापडले तर गरीबाला कोणीच मदत करणार नाही. हे तिचे बोल सत्य आहेत. उच्च वर्तुळातील लोकांना सारे माफ होते , पण गरीबांचा कोणीच वाली नसतो . उच्च संस्कृतीचा टेंभा मिरवणा-यांनी आचरणाच्या नावाने शून्य कमाई केलेली असते. माणसामाणसांत भेदभाव करणारी संस्कृती व्यवहाराच्या विळख्यात काहींनी जखडली आहे. स्वाभाविकपणे तिचे महात्म्य घसरले आहे. उच्च मुल्ये पायदळी तुडवल्यानंतरची ही कोरोना स्थिती आली आहे ती उगाच नव्हे. सौ. ने लंबूवहिनीसाठी राखून ठेवलेले जेवण तिला दिले ते घेऊन ती गेली. हया जेवणाची चव लागल्याने लंबूवहिनीचे नातू काकींसारखे जेवण कर म्हणून तिला सांगू लागले आहेत.

           त्याच वेळी माझे जैतापूरचे मुंबईस्थित सहकार्यशील सन्माननीय मित्र जगदीश आडविरकर यांचा मेसेज आला. तो. असा : CM Fund किंवा PM Fund यात दान देताना आपल्या आजुबाजुला पण जरा बघा की कोणी आपला शेजारी, मित्र किंवा नातेवाईक तर आर्थिक विवंचनेत नाहीये ना ? असेल तर पहिली त्यांना मदत करा कारण त्यांच्या मदतीसाठी कोणी PM अथवा CM येणार नाही तर तुम्हीच त्यांच्या पर्यत पोहोचु शकता. हे तुमचे लोक कदाचित तुमच्याकडे मागायला लाजत असतील किंवा फार स्वाभिमानी असतील तरी कृपया त्यांना मदत करा.

 *बघा फार बरे वाटेल.*

           हा माणुसकीचा संदेश .    त्यांना मी जेवण घेवून जाणा-या लंबूवहिनीकडे बघतच लगेच मेसेज केला : अगदी बरोबर. आम्हीही शक्य ती मदत जवळपासच्या गरीब कुटुुंबांना अगोदर पासूनच करतो आहोत. आज हे फारच गरजेचे झाले आहे व हीच खरी माणूसकी आहे. त्याला त्यांनी चिन्हांकित उत्तर दिले ते असे :  👏💐 .  तोवर दहा वाजायला आले. मी खालच्या घरातले दिवे मालवले व ते घर बंद करून आलो. सौ.ला झोप येऊ लागली होती . मग आम्ही बेडरूमकडे वळलो.

( क्रमश: )

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

Gidhade Marathi Gazal


                           गिधाडे


विजयोन्माद वाढतो पराभूतांना खिजवण्यासाठी
पुढे काळ बदलतो चक्र , विजेत्यांची जिरवण्यासाठी !


काय नेतो सोबत सांग दुनियेचा निरोप घेतांना ?
आयुष्यभर असते धडपड , आयुष्यच हरवण्यासाठी !


युगे युगे हे गूढ कुणाला कळले नाही सृष्टीचे
काहींना मारले जाते, काहींना जगवण्यासाठी  !


मी दिले व्यथेस माझ्या धुमारे नवनिर्मितीचे अन्
अश्रुत मिसळले हास्य मी, हुंदक्यांना हसवण्यासाठी !


प्रेताच्या टाळूवरचे लोणी खातातच केव्हाही ....
जगतात गिधाडे ही फक्त स्मशानात मिरवण्यासाठी !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

Corona locked down nineteenth day

मागे - पुढे

12.04.2020

  1.                   आज लॉक्ड डाऊनचा एकोणीसावा दिवस. काल सौ.ची तब्ब्येत बिघडल्याने घरगुती उपाय करता करता पहाट झाली. तिला चक्कर येत होती. ताकत संपल्यासारखे झाले होते. ती झोपल्यानंतरच पहाटे मी झोपलो. सकाळी सहा वाजता जाग आलीच. आज निग्रहाने उठलोच कारण पाणी लवकर येणार ही आठवण आज मनात होतीच.  पावणेसात वाजता पाणी आले. मीच ते भरले. आज ती उठूच शकत नव्हती. मी तिला उठवलेही नाही. मी कालच्या फेसबूकवरील अभिनंदनांना धन्यवाद देत राहिलो. लाईक्सची नोंद घेत राहिलो. हल्ली व्हॉट्सॲपवर मी अकरा साडेअकराच्या सुमारासच गुड माँर्निंग करायचो ती वेळ ब-याच दिवसांनी सातची केली ! संदेश स्वीकारणा-यांनाही आश्चर्य वाटले असणार . होते असे कधी कधी. 😀😀😀😀 चालायचेच. बरे नसले तरी सौ. झोपून राहण्यातली नाहीच. आठ वाजता ती उठलीच. जरा फ्रेश झाली. आम्ही चहा घेतला. मी आज चहानंतरच परिसर स्वच्छता केली. आता कसे असते की कुठेही जायचे नसते. कोणी पाहुणेही कुठून येणार नसतात. कोरोनाचा प्रभाव आहे. पण काही लोकही जरा आरामदायी वागू लागल्याचे माझ्या पाहण्यात व ऐकण्यातही आले आहे. आमच्या गोव्यात याला सुशेगादपणा म्हणतात ! नऊ वाजले तसा पुन्हा हिला अशक्तपणा जाणवू लागला. मी हिला बेडवर झोपवले . मीठसाखरपाणी करून उठवले व प्यायला लावले. तिला जरा बरे वाटले. मग जरा झोपते म्हणाली. मग तिला झोपू दिलं व मी इतर उद्योगांकडे वळलो. दहा वाजता ही पुन्हा उठली व आंघोळीला गेली. आंघोळीनंतर मात्र तिला खूप बरं वाटलं. मग तिने जेवण करण्यास सुरूवात केली. मी मुलाला फोन केला. आम्ही त्याच्याशी बोललो. उद्यापासून त्याच्या एरियात तीन दिवस बाहेर पडायचे नाहीय. आमच्याकडे अजून काही नवीन बातमी नाही. आमचा वार्ताहरही अजून आलेला नाही. पेपरवाला आला तेव्हा बातम्या वाचायला मिळाल्या. कोरोनाशीच संबंधित बातम्या. 


            दुपारी जेवलो. ही वामकुक्षीकडे वळली.  आज मीही सततच्या जागरणांनी थकलो होतो. पण सौ. ला अशक्तपणामुळे तहानवगैरे लागली किंवा उठण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला तर , या विचारांनी मी जवळच शतपावली करीत होतो. चार वाजायला आले तसा पाठ टेकावी म्हणून मी खाली वाकतच होतो तितक्यात मुलाचा फोन आला.  काल दुपारपासून त्याच्या आईचे व त्याचे भांडण सुरू होते. तो व्यथित होऊन बोलत होता. मी त्याला पाऊण तास समजावत होतो. पण त्याचा होणारा कोंडमारा त्याला सहन होत नव्हता. मी सौ.लाही परोपरीने सांगितले होते की वेळ कसली आहे ते बघ. तो तिथे परक्या ठिकाणी एकाकी आहे. त्याची मानसिक स्थिती खालावली तर त्याची प्रतिकारशक्ती कमी होईल. आज कोरेनाच्याबाबतीत जे सांगितलं जातंय ते प्रतिकार शक्तीचंच महत्व सांगितलं जातंय. आज भांडून उपयोग नाही. तुमचे दोघांत जे काही मुद्दे आहेत ते नंतरही बघता येण्यासारखे आहेत. अपेक्षांचे ओझे सतत बाळगू नये , कुणाच्याही मानेवर सतत ठेवू नये. प्रत्येकाला त्याचे स्वत:चे असे थोडे तरी आकाश हवे असते. मी स्वभावाला मुरड घातली म्हणून तोही घालू शकेल असे नाही. सगळेच आपल्या मनासारखे आणि आपल्याला हवे तेव्हा होत नाही . आयुष्यात खूप धीर धरावा लागतो. धीर धरूनही नेहमीच खीर मिळतेच असेही नाही. त्यालाही आपण तयार असलो पाहिजे. प्रश्नातच अडकून उपयेगाचे नसते तर प्रश्न निर्माण झाल्या क्षणीच आपण उत्तराच्या दिशेने कूच केले पाहिजे. मी मुलालाही हेच सांगितले आणि कोणत्याही परिस्थितीत नाउमेद होऊ नकोस , कारण परिस्थिती नेहमीच बदलत असते.  असे पाऊण तास बोलल्यावर तो निदान वरवर तरी थोडा शांत आला. मग त्यानेच फोन बंद करा , मी आता झोपतो म्हणून सांगितले. तो फोन सुरू असतांनाच लंबूवहिनीने कालवी आणून दिली. मी भांडे घेतले आणि ही नुकतीच झोपली आहे म्हणून सांगितले. ती नंतर येते असे सांगून गेली. मी ये म्हणालो.  कालवीचे भांडे मी फ्रीजमध्ये ठेवले. फोन संपला तोवर पावणे पाच झाले होते. मी जरा पाठ टेकली तर पाच मिनिटांनी सौ. जागी झाली. चहा घेऊया म्हणाली. मी टेकलेल्या पाठीसह उठलो. चहा घेतला. बाहेर येवून पायरीवर बसलो. अजून मुलाचे विचार जात नव्हते. मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. त्याची कधी भेट होणार, तो कसा असेल , या कल्पनेने मन व्याकुळ होत होते. सौ.ही याच विचाराने हैराण झाली आहे. 

           साडेपाच वाजता लंबूवबिनी आली.  मग बीनाची आई आणि धंज्या आले. धंज्या गेला आणि संत्या आला. मी अंगणात फिरत फिरत त्यांच्याशी बोलत राहिलो. अशी माणसे सोबत असतात तेवढा वेळ तरी मनावरचे दडपण जाणवत नाही. उद्या पाणी येणार नसल्याने आज झाडे शिंपायचाही प्रश्न नव्हताच.  बीनाची आई  गेली तरी लंबूवहिनी व संत्या होतेच. सौ.ही गप्पात सामील होती. विषय कोरोना काळात मिळणा-या सवलतींचा होता. आमचे रेशनकार्डच मुळी पांढरे आहे, त्यामुळे आमचा संबंध नव्हताच.  तरी पण ज्यांना गरज आहे त्यांना काही मिळत असेल तर त्यांना आम्ही जरूर माहिती देतो. कोरोनासारख्या परिस्थितीत तेवढीच खारीची का होईना मदत ! संत्याला गावातल्या सेंटरवर फाँर्म भरायला सांगितले आहे. ज्यांना खरोखरच सवलतींचा आधार आवश्यक असतो त्यांना सवलती द्यायला काहीच हरकत नाही. पण ऊठसूट सवलतींचाच पाऊस पाडून माणसाची उद्यमशीलता  , कल्पकता व कष्ट करण्याची प्रवृत्ती नष्ट करणे चूक आहे . ते कोरोनासाठी रेड , आँरेंज , ग्रीन झोन पाडले ना , तसे सवलतींचे पण झोन पाडले तर सवलतींचा गैरफायदा घेणा-या लबाड चोरांना बराचसा पायबंद बसेल. शासन हे बरेचदा पक्षबाधित असते व पक्ष विस्ताराला आवश्यक म्हणून मते मिळवण्यासाठी सवलतींचा बेमालूम वापर करते. यासाठी प्रथम शासन बनले की त्याची पक्षीय नाळ तोडली पाहिजे व लोककल्याणकारी , वास्तव , निरपेक्ष निर्णय शासनाने घेतले पाहिजेत. असो, हे सद्या तरी अवास्तव वाटते आहे ! 😀😀😀😀

              संध्याकाळ संपून रात्र झाली.  आमच्याकडे जमलेली मानवपाखरे त्यांच्या घरटयात गेली. आम्ही जेवण केलं आणि शतपावली करीत होतो कोच लंबूवहिनी आली. काही थोडेफार तिच्यासाठी राखून ठेवलेले हिने तिला दिले. तिने नको नको म्हणतानांही भांडी घासली व ती गेली. मग दहा वाजता सौ. कालच्यासारखंच लवकर झोपूया म्हणाली. काल ती असं बोलली आणि ती रात्र भयंकर गेली. आज तसे काही होऊ दे नको , असे म्हणतच मी पुढचा दरवाजा लावला आणि झोपायला गेलो. 

( क्रमश: )

रविवार, १२ एप्रिल, २०२०

Corona virus becoming dangerous

मागे - पुढे

11.04.2020


  1.                   आज लॉक्ड डाऊनचा अठरावा दिवस. काल रात्रभर झोप लागलीच नाही. सौ.ला तर झोपेची गोळी घेऊन झोप लागली नाही. अखेर सहा वाजता उठलोच. पण काय वाटले कुणास ठाऊक पुन्हा पडलो. नेमका डोळा लागला. काल सत्त्या सकाळी सात वाजता पाणी येईल म्हणून बोलला होता. पण माझ्या डोक्यातच तो विषय सकाळी आला नाही. नशीब बंदिनी वहिनीनी फोन करून पाणी आल्याचे सांगितले. धडपडत उठलो आणि पाणी भरायला मागच्या दारी गेलो. पण पाणी जात आल्याने एक हंडाच पाणी मिळाले. खालच्या अंगणातली टाकी मात्र पूर्ण भरली होती. आज शहरातून उर्मिला आली. ती म्हणाली खाली बाजाराच्या इथे पोलीस चौकी टाकणार आहेत. बरे झाले. मासे खरेदीसाठी शहरातले अनोळखी लोक यायला लागले होते व ही चिंतेची बाब होती. लॉक्ड डाऊनला अजूनही लोक गंभीरपणे घेत नाहीत . कोरोनाचा प्रसार जगभर ज्या झपाटयाने होतो आहे ते पाहता कोरोना स्पर्शाशिवायही होतोय की काय अशी शंका येऊ लागली आहे. जगाने आताच त्यावर मात करायची उचल खाल्ली पाहिजे .  यासाठी आधी लोकांना आपली जबाबदारी कळली पाहिजे. हा विचार डोक्यात होताच. सकाळीच ते कागदावर गझल स्वरूपात उतरले. तीच रचना मी फेसबूकवर पोस्ट केली.  ती अशी 


ते कौलारू घर कुठे दिसते का ते बघ !
गोठयात उभी गाय हंबरते का ते बघ !

उरल्यासुरल्या माणसांचा शोध घे !
मातीत , राखेत कुणी मिळते का ते बघ !

अंतर ठेव , पण कधी अंतर करू नकोस !
कोणासाठी काळीज जळते का ते बघ !

नवे विषाणू येत राहतील , सावध हो !
आयुष्याची किंमत समजते का ते बघ !

मानवाच्या अस्तित्वाचीच ही लढाई !
ही निवडणुक नाही , हे कळते का ते बघ !
   
...देवीदास हरिश्चंद्र पाटील

       आज सकाळी आण्णीन आली. तिच्या नव-याला आण्णा म्हणायचे , म्हणून ती आण्णीन. तिने तिच्या माहेरच्या पुढच्या गावातल्या तीन डाँक्टरांना पोलीसांनी तपासणीला सिव्हीलला नेल्याचे सांगितले. एका डाँक्टरने तर एका रूग्णाला तपासून कोरोनाची शंका आल्याने स्वत:च सिव्हीलला जायला सांगितले आणि आपण मात्र आणखी पेशंटस तपासले. पोलीसांना कळताच त्यांनी तो दवाखाना बंद करून डाँक्टरला सिव्हीलला नेले.  आण्णीनने भाजी चिरून दिली आणि ती गेली. दुपारी जेवायला बसलो . चार घास खातोय तेवढयात कांदयाबटाटयाचा टेंपो आला. खालच्या बाजूला असलेल्या भावाच्या घराशेजारीच मागील भागात जाणारा रस्ता आहे. तो नेमका गेटजवळच थांबला. लंबूवहिनी वासावरच असल्यासारखी धावत आली. तिची केवढी घाई उडालेली.  ती बोंबटत आल्याबरोबर माझी सौ. पण जेवण अर्धवट टाकून  पिशवी व पैसे घेऊन तिकडे गेली. तिकडे ब-याच बायका आणि काही ( हौशी ! ) पुरूषही जमले होते हे कलकलाटावरून कळून येत होते. मी व्यवस्थित जेवलो. हिचे ताट ओटयावर नेऊन झाकून ठेवले. अर्धा तास तरी हा गोंधळ संपणार नव्हता . लॉक्ड डाऊन करा नाही तर आणखी काही करा , लोक करायचे तेच करतात. थाळया वाजवायला सांगितल्या तरी गर्दी करून फटाकेच वाजवतात ! पणत्या लावायच्या वेळीही लोकांनी फटाकेच लावले !  सुधारक आगरकर किती अचूक होते , ते हया लोकांवरून समजते. शेवटी कांदे खरेदी करून ही आली आणि त्यानंतर जेवली. पोत्यातले कांदे कसे आहेत ते पोते सोडल्यानंतरच कळेल ! हिच्या जेवणानंतर ती वामकुक्षीकडे वळणार तोच मुलाचा फोन आला. त्याने खिचडी बनवली होती आणि ती खाता खाता तो बोलत होता. त्यात अर्धा तास गेला. फोन संपतोय नाही ताेच सत्त्याची बायको कंपाऊंडमधल्या दुर्वा काढायला आली. मी झाडे शिंपतो त्या ठिकाणी दुर्वा आल्या आहेत. दुर्वा काढल्यानंतर ती नंतर अर्धापाऊण तास बोलत बसली. कोरोनामुळे तिच्या कमावत्या मुलाचे काम गेले आहे. कुटुंबात कोणीही कमावते नाही. काय करायचे या विचाराने ती हैराण आहे. यंदा मुलाचे लग्नं करायच्या तिच्या विचारांची कोरोनाने पार वाट लावली आहे.  आमच्याबराेबर तिने मन मोकळे केले. ती गेली तोच अनमोलची आई रडत आली ! तिला मन मोकळे करायचे होते आणि सल्लाही हवा होता. प्रत्येकाची एक कथा आहे. प्रत्येकाची एक व्यथा आहे. सख्ख्या मुलाने खोली दे , मी भाडे देतो असे सांगितल्याने तिच्या मनाला फारच लागले होते. खरे तर त्याच्या दोन मुली आता वयात येत आहेत. घर अपुरे पडू लागले आहे. भाडेकरूची खोली रिकामीच होती. त्याने मुलींची पुढे दरमहा येणारी आणि होणारी अडचण समजून खोली मागितली असणार. आई देणार नाही म्हणून कदाचित त्या अनमोल रतनने भाडयाचा उल्लेख केला असावा. तरी तो चुकीचाच होता. हे सौ. च हे हुशारीपूर्ण उत्तर तिला पटले व ती जरा शांत आली. तिला जरा हलके वाटले. ती म्हणाली मलाही नातींसाठी खोली दयावीशी वाटतेच , पण मुलाने हे असे विचारले. काय करू तो सल्ला दया. आम्ही दोघींनीही एकाच वेळी खोली अवश्य दे म्हणून सांगितल्याने तिला बरे वाटले. मनमोकळे झाल्याच्या आनंदात ती निघून गेली. तोपर्यंत साडेपाच वाजले. मग आम्ही चहा पिण्यासाठी किचनमध्ये गेलो तोच लंबूवहिनी आली. तिलाही चहा दिला. दहा मिनीटांनी ही बीनाच्या आईकडे गेली . तिच्याबरोबर लंबूवहिनीही गेली. मी झाडांना पाणी द्यायला गेलो.  नंतर दिवाबत्ती केली. आमच्या अंगणात फिरलो.  तोपर्यंत सौ. इव्हीनिंग वाँक करून आली. तिने टीव्ही लावला.  लॉक्ड डाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढला आहे. 

                मी पुढच्या दाराच्या पायरीवर बसून फेसबूक उघडले. तोच मला कोकण किनारा ग्रूपने जाहीर केलेल्या गुणवंताच्या यादीत पहिला मान देऊन गौरविल्याची पोस्ट दिसली. पाठोपाठ अनेक जण अभिनंदनही करू लागले होते. त्या पोस्टची लिंक सर्व वाचकमित्रांसाठी इथे देत आहे :

Konkana kinara fb post

               हा माझ्यासाठी अचानक आलेला सुखद धक्का होता . कोरोनाने मन विषण्ण झाल्या अवस्थेत तर तो खूपच दिलासादायक व मन दुसरीकडे वळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त होता. मी कोकण किनारा ग्रूपचे आभार मानणारी पोस्ट केली. त्याचीही लिंक अशी :

My fb post

                      अभिनंदनांची नोंद घेता घेता मला काही दिवसांपूर्वी पडलेले स्वप्नं आठवले. ते स्वप्नं मी माझ्या '  ओन्ली देवीदास  ' ( याच ) मराठी ब्लाॅगवर मागे पुढे सदरात नमूद केले आहे.  स्वप्नात माझा मित्र प्रदीप मालगुंडकर हा माझ्या घरी येवून माझ्या लेखनासंदर्भात काही तरी बोलतोय व त्याच्यासोबत असलेल्या मित्राकडे माझे लक्ष जाण्यापूर्वी माझे डोळे उघडतात . तो न दिसलेला मित्र म्हणजेच यासिन पटेल ! त्याचे न दिसणे पण तिथे असल्याची जाणीव होणे म्हणजेच तो स्वत: मागे राहून मला पुढे आणीत असल्याची पावती होती ! मी ती पोस्ट सौ. ला दाखवली. तिलाही आनंद झाला. मग मी पोस्टची लिंक सौ.च्या विभावहिनीला पाठवली. विभा  उच्चशिक्षित आहे. वेंगुर्ल्यात माध्यमिक शिक्षिका आहे. तिला साहित्याची चांगली जाण आहे . तिचा अभिनंदनाचा संदेशही आला. 

            आज दूध प्यावे की जेवावे यापैकी जेवावे हा अाॅप्शन निश्चित करून आम्ही जेवलो. दोनच दिवसांपूर्वी आम्ही दूध पिऊन झोपलो होतो. जेवल्यानंतर आम्ही अंगणात शतपावली करू लागलो. तोच लंबूवहिनी आली. पाठोपाठ तिचा नातू राज आला. तो वीस वर्षाचा आहे. त्याच्या डोक्यात कोरोना प्रसाराबाबत काहीनी भरवलेले गैरसमज काढून टाकले. त्याच्या आजीलाही हे डोस होते. ती त्यावर विरोधात्मक व हिरीरीने असे काही बोलली नाही. तिलाही आता थोडीफार वास्तव बाजू पटू लागली असावी. मानव वंश प्रथम वाचवणे महत्वाचे आहे. काही लोक चुकतात , घाणेरडे वागतात , देशद्रोही असतात हे अगदी खरे आहे. पण ते दोन्हीकडे असतात आणि सगळयानाच एका मापाने मोजणे चुकीचे आहे. त्यातच हेतूपुरस्सर चिथावणीखोर अफवा पसरवणे हा तर गुन्हा आहे. ब-याच कच्च्या मडक्यांना हे माहीतही नाही. गप्पा मारता मारता आम्ही फिरत असतांना पावणे दहा वाजता सौ. ला अस्वस्थ वाटू लागले. ती म्हणाली चला , झोपूया. तिचे डोळे जड होऊ लागले होते. असे कधी झाले नव्हते. पण काल संपूर्ण रात्र ती टक्क जागीच होती , दुपारी कांदा खरेदीत जेवण अर्धवट टाकून उन्हात फिरली होती आणि माणसं येत गेल्याने जमिनीला पाठही लावू शकली नव्हती. तिला चक्कर आल्यासारखे झाले. मी तिला धरून बेडवर झोपवले. थोडया वेळाने मीठसाखरपाणी दिले. ताकत गेल्याने ती घाबरली होती. आम्ही दोघेच असल्याने मला घाबरून जाणे परवडणारे नव्हतेच. मी तिच्या डोक्याला व पोटाला बाम लावला . ढेकर आल्यावर तिला जरे बरे वाटले. तेवढयात विभाचाच फोन आला. तिला मी हिच्याविषयी सांगितले व हिलाही बोलायला दिले. अर्धवट ग्लानीतच ही बोलली. नंतर ग्लानीतच पडून राहिली. मी बारा वाजेपर्यंत बसूनच होतो. पुन्हा साडेबारा वाजता आणि नंतर पावणेतीन वाजता हिला बाथरूमला नेऊन आणले. पाणी प्यायला दिले. तीन साडेतीन वाजता बेडवर खूपच गरम होऊ लागल्याने लादीवर चटई अंथरू की चादर टाकू असे तिला विचारले तर ती म्हणाली चटईच टाका. मी चटई टाकून हिला खाली झोपवली व मीही पाठ टेकली. अधूनमधून मी उठून बघतच होतो. पण ती पहाटे झोपी गेली व मीही तासदीड तास बरा झोपलो. 


( क्रमश: )

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

Corona terrifies

मागे - पुढे

10.04.2020

                  आज लॉक्ड डाऊनचा सतरावा दिवस. काल रात्री अपेक्षेप्रमाणे फारशी झोप लागलीच नाही. कोरोनाच्या बातम्यांनी दोघांवरचा ताण एवढा वाढला की बारा वाजेपर्यंत बेडरूमकडे वळायची ईच्छाच झाली नाही. बारा वाजता बेडवर अंग टाकले. त्यानंतरही अधूनमधून जाग येतच होती. पण काल रात्री मिटलेल्या वा उघडया डोळयांसमोरही काही आले नाही. एकदम पहाटे सव्वापाचच्या दरम्याने मात्र विचित्रच स्वप्नं पडले. मी घरासमोरील प-यात खालच्या अंगणाच्या दक्षिण टोकाला कुठून आलेलो असतो काही कळत नाही. पण प-यात बरेचसे गवत , माडाच्या काही झावळा आणि कचरा असतो. मी त्याच्यावर बसलेला असतो. मी बसलो आहे तो उंचवटा असतो व मी पाय खाली सोडून बसलेला आहे. खाली पाणी आणि वेलीवगैरे आहेत. विशेष म्हणजे पोट-यांपासून खाली माझे पाय पाण्यात असूनही मला पाण्याचा वा वेलींचा स्पर्श अजिबात जाणवत नाहीय. मी पाय हलवू पाहतो पण ते हलतच नाहीत. मी चक्क कमरेखाली लुळा पडल्याचे माझ्या लक्षात येते. प-याच्या टोकाला सागाच्या पानांसारखी अगदी हिरवीगार पाने असलेली एक वेल एका रेषेत असते ती दुस-या  टोकाकडून चक्क हलू लागते आणि माझ्या डाव्या बाजूला येवून थांबते. पुन्हा पाच फुटावर पाण्यात हालचाल होते. त्याचे तरंगही काटकोनात वळतांना दिसतात . तो साप असणार आणि मला चावायला येणार हे मी ओळखतो. मी उजव्या कठडयाला हात धरून पाय हलवण्याचा जोरात प्रयत्न करतो. पण माझा फक्त उजवा पाय हलतो तोही थोडासाच ! आता आपले काही खरे नाही , तो साप आपल्यापर्यंत पोचण्याच्या आत पुन्हा हालचाल केली पाहिजे आणि कठडयावरून उडी मारली पाहिजे , या विचारात असतांनाच माझे डोळे उघडले. तेव्हा साडेपाच वाजल्याचे मी घडयाळात पाहिले. मला परत झोप लागली आणि काही मिनिटातच दुसरे स्वप्नं पडले. माझा मित्र प्रदीप मालगुंडकर हा माझ्या लेखनाबाबत काही तरी बोलायला पुढच्या दरवाज्यातून आत येतो आणि लेखनासंदर्भात काही तरी उभ्याउभ्याच बोलतो. त्याच्यासोबत आणखी कोणी तरी मित्र असल्याचे मला जाणवते .  पण माझे लक्ष त्याच्याकडे जात नाही. त्याअगोदरच डोळे उघडतात. मी जागा होवून घडयाळात पाहिले तर सहा वाजले होते. मग मी सरळ बेडमधून बाहेरच आलोे. म्हटले आता झोपलो तर तिसरे स्वप्नं पडायचे ! स्वप्नांचे असेच असते. त्यांची मालिकाही असू शकते ! सन 1990 मध्ये मला हायपर अॅसिडीटी झाली होती तेव्हा मी अनेकदा भयानक स्वप्नांच्या किती तरी मालिका अनुभवल्या होत्या. त्यातल्या एका स्वप्नात तर मी चक्क अमेरिकेत आयझँक न्यूटनना भेटलो होतो. त्यांच्याशी बराच वेळ बोललो होतो. त्यांच्या प्रयोगशाळेत हिंडलो होतो. विशेष म्हणजे प्रयोगशाळेतून बाहेर पडून रस्त्यात चालू लागल्यानंतर एका ठिकाणी मी थांबतो. प्रयोगशाळेकडे पहावे म्हणून मागे वळून पाहतो आणि दुस-याच क्षणाला माझी बोबडी वळते. मागे रस्ताच नसतो. फक्त आकाशरूपी पोकळी असते. आता पुढे जाण्यावाचून पर्यायच नसतो. मी चार पावले पुढे जाऊन धीर एकवटून मागे बघतो . पुन्हा तेच घडते ! मी जसा पाऊल पुढे टाकतो तसा पावलामागे रस्ता तुटत जात असतो. मी नक्की कुठे चाललेला असतो तेही मला कळत नसते . हया स्वप्नातून जागा झालो तेव्हा माझे पूर्ण अंग घामाने डबडबले होते. त्या रात्री मी झोपलोच नाही ! इतक्या वर्षांनीही मी ते स्वप्नं विसरू शकलो नाही , म्हणजे तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल ते बघा !

                  आज नळाला पाणी येणार नाही. मात्र साठयाचे पाणी वरच्या टाकीत चढवून ती फूल करून घेतली. पुढे आलो तर समोरच्या बंगल्यातल्या भाभीने स्वप्नातल्या त्या प-यालगतच कचरा जाळला होता. वा-याने त्याचा धूर आमच्या अंगणातून घरातही घुसत होता. मी एकदा मासळी बाजाराकडे लक्ष टाकले आणि पुढचा दरवाजा आणि खिडक्या बंद केल्या. पंधरावीस मिनिटांनी धूर ओसरला तसा मी पुन्हा बाहेर आलो. आज शुक्रवार असल्याने मासळी बाजारात गर्दी होती. गेले काही दिवस हया गर्दीचे मला नवल वाटत होते. पण आज सौ. मासे आणायला गेली केव्हा कळले की तिथे गावातल्यापेक्षा शहरातलेच अनोळखी चेहरे जास्त होते ! काल हे नव्हते इथे , आज हे आले कसे ? शहरातून येणारे लोक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती घातक ठरू शकतात , हे गावातल्यांना कळत नसेल काय ? निदान , त्यांना आवश्यक ती खबरदारी तरी घ्यायला सांगायची. पण बहुधा , उपजिविकेपुढे ते हतबल असावेत. पैसा माणसाला इतका हतबल बनवतो की तो आपले आयुष्यही त्याच्यासाठी पणाला लावतो ! सर्वत्र हेच झाले आहे. कोरोनाला देशात आणणा-यांइतकेच कोरोनाच्या प्रसारास हातभार लावणारेही जबाबदार आहेत ! त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत नाहीय. कुणी माश्यासाठी तर कुणी भाजीसाठी गर्दी करतोय . काही ठिकाणी विक्रेताच कोरोनाबाधित होतोय आणि वस्तू घरोघरी जात आहेत ! विनाशकाले विपरीत बुध्दी म्हणतात ती हीच ! संस्कृतीच्या उच्चतेची शेखी मिरवून छाती ताणण्यात अर्थ नसतो , तर ती संस्कृती आचरणात दिसावी लागते. नाही तर मग ते इंग्रजी शाळेत पोरे असणा-यांनी मराठीच्या अस्तित्वाबद्दल गळे काढावेत ना तशी अवस्था होते ! पुन्हा वादाचा मुद्दा आला. सद्य स्थितीत वाद नकोत. वाद निर्माण करणारी लंबू वहिनी सकाळी कुठून तरी फिरून आली ती थेट स्वयंपाकघरापर्यंत घुसत गेली. तिने मास्कही लावलेला नव्हता. तिच्या नंतर विकीला आली ती मास्क लावूनच आली आणि आत बोलावूनही बाहेरच पायरीवर बसते म्हणाली आणि बसलीही.  हा फरक आहे आणि यानेच खूप फरक पडतो , हे आता सिध्द झाले आहे. 

           शहरात आता ताज्या दमाचे गझलकार चांगल्या गझला लिहू लागले आहेत. विजयानंद जोशी , कौस्तुभ आठले,  वसुंधरा जाधव , शुभम कदम , विकास ढोकणे हे छान लिहीत आहेत. कोरोनानंतर त्यांना शहरात व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. सन 1986 पासूनचे माझे ते स्वप्नं आहे. त्याबाबत विजयानंद जोशीना मी सकाळीच मेसेज केला होता व त्यांचे हुरूप वाढवणारे उत्तरही आले आहे. शुभम कदमशी व्हॉट्सॲपवर आज माझा दिवसभर गझल संवाद चालू आहे.  

            उद्या नळाला पाणी  येणार असल्याचे सत्त्याने सांगताच ,  सव्वा सहा वाजले तसा मी झाडांना पाणी लावायला गेलो. सौ. आमचे घर बंद करून खालच्या घराच्या अंगणात इव्हीनिंग वाँक करीत होती.  पाणी शेंदून मी दिवाबत्ती केली. तेवढयात लंबूवहिनी दूधपिशव्या घेऊन आली. मी अंगणातच त्या घेतल्या , बेसीनमध्ये धूतल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या. आता रात्र झाली आहे. टीव्हीवर कोरोनाचा प्रसार वाढल्याच्याच बातम्या. आज शहरात पाचवा कोरोनाग्रस्त रूग्ण झाला. सगळे कठीण होते आहे. लोक अजूनही ऐकत नाहीत. फेसबूकवर तर वेळ काय आणि पोस्टस काय अशी वेळ काहींनी आणली आहे. आज एक रचना मी फेसबूकवर टाकली आहे. ती अशी :

          अता घरी रहायचे  ....

खरोखरी घरोघरी ...  अता घरी रहायचे
स्वतः न जायचे कुठे , कुणा न बोलवायचे

अता न काळही बरा... अता न वेळही बरी..
उगाच हिंडुनी कुठे ... नको तसेच व्हायचे !

खुशाल तू तिथे गडया तुझ्या घरी सुखी रहा  !
घराविना कुठे न तू .... इथे तिथे फिरायचे ...

म्हणेल बायको तसे निमूट वाग राजसा ....
म्हणेल ती तसेच तू ... बसायचे , उठायचे  !

उदंड कालच्या तुझ्या ऊनाडक्या स्मरून तू
घरात आपल्याच रे .... हरी हरी करायचे... !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

         संध्याकाळी सात वाजता गेलेली लंबूवहिनी साडेनऊला परत आली आहे. मी अंगणात फिरतो आहे. ती सव्वा दहा वाजता गेली. तिला दुस-यांच्या बातम्या सांगण्यात आणि काढण्यात आसुरी आनंद मिळतो, हे दुर्दैवी आहे. आम्ही तिच्याशी जेवढयास तेवढेच बोलतो आहेत. ती गेली  , तरी आम्ही अंगणात फिरतच होतो. अखेर अकरा वाजता सौ.ला झोप आली. आम्ही झोपायला गेलो. मात्र तिने झोपेची गोळी घेऊनही रात्रभर तिला झोप आली नाही. मीही जागाच राहिलो.


         ( क्रमश: )

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

Corona virus pandemic

मागे - पुढे

09.04.2020
       
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा सोळावा दिवस . गुरूवार. काल मध्यरात्री मी बेडवर उताणा झोपलो होतो. भिंतीवरच्या घडयाळात बँटरीने पाहिले. अडीच वाजले होते.  झोप येतच नव्हती. डोळे उघडेच होते. अचानक माझ्या चेह-यासमोर गणपतीच्या दोन मूर्त्या आल्या. पहिली अगदी आपण नेहमी बघतो तशीच . पण क्षणात ती जाऊन तिच्या जागी दुसरी फिकट तांबूस रंगाची लांबट तोेंडाची व लांब सोंडेची होती. ती दिसली नाही तोच ती जाऊन  साक्षात श्रीगणेश माणसासारख्या जिवंत स्वरूपात दिसू लागले. त्यांच्या दोन्ही भुवयांचे केस खूप दाट होते . अचानक त्यांची व माझी नजरानजर झाली . त्याचक्षणी मला त्यांचे डोळे मोठे व कानाच्या जवळ जातील इतके मोठे दिसू लागले. क्षणभर ते हसले आणि गुप्त झाले. यानंतर मात्र काही दिसले  नाही. मी हे काय होते याचाच विचार करीत डोळे मिटले. पहाटे कधी तरी झोप लागली. सकाळ झाली तसा मी उठलो. माझे एक बरे आहे. पहाटे साडेपाचला जरी झोप लागली तरी मी फार तर अर्धा तास उशिरा म्हणजे साडेसहाला उठतोच. आज तेच झाले. मग नेहमीप्रमाणे मागच्या दारी जाऊन पाण्याची व्यवस्था केली. आजही मी व्यायाम सुरूच ठेवला.  बरे वाटू लागले आहे. आज बाकीचे सगळे कार्यक्रम बिनभोबाट पार पडले.  
   
           मुंबई आणि पुण्यात कोरोना वाढत चालला आहे. यातच सारी नावाचा नवीन आजार औरंगाबाद आणि पिंपरी चिंचवडला सुरू झाल्याची बातमी टीव्हीवर आली आहे. भारतात आधीच खालावत असलेल्या आर्थिक आघाडीची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. आर्थिक आणीबाणीची शक्यता खुद्द पंतप्रधानांनीच बोलून दाखविली आहे. पण एकूणच देश संपूर्ण आणीबाणीकडे ढकलला जात आहे. कोरोना जगालाच आर्थिक मंदीत ढकलत आहे. जागतिक व्यापार संघटनेने हे स्पष्ट केलेच आहे. आणखी पुढे काय काय वाढून ठेवले आहे , कोण जाणे ! याही परिस्थितीत कोरोनाचे राजकारण होत असल्याचे मत जागतिक स्तरावर व्यक्त केले असल्याचे एबीसी आँस्ट्रेलियाने अलिकडेच दाखविले आहे. आज चीनमध्ये लक्षणे न आढळणारा कोरोना आल्याची बातमीही आजच धडकली आहे.  हाच या दिवसाचा दुर्दैवी शेवट आहे. माणसे अजूनही सुधरत नाहीयत. घाणेरडे राजकारण , माणसातले भेदभाव आणि कोरोना हया सा-यांनी खिन्नता वाढवीत रात्र आली. आजही नीट झोप लागेल की नाही कोण जाणे !


         ( क्रमश: )