मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

Corona virus lock down continues

मागे - पुढे

13.04.2020

                  आज लॉक्ड डाऊनचा विसावा दिवस. काल रात्री  सौ.ची तब्ब्येत व्यवस्थित असल्याने ब-याच काळाने ब-यापैकी झोपलो. एकदा साडेतीनला उठलो तेव्हा काही मिनिटांपूर्वी स्वप्नं पडल्याचे आठवले . एकदम गणपती विसर्जनाची मिरवणूकच दिसते. तीही दरवर्षी विसर्जन करतात त्या खालच्या बाजूच्या समुद्राच्या दिशेने नव्हे तर उलट दिशेने उत्तरेकडून पूर्व भागातील खाडीच्या दिशेने चाललेली. घरापासून वरच्या दिशेच्या चढावावर उत्तरेकडून पूर्वेला वळणारी. माझा मुलगा डोक्यावर गणपती घेऊन सर्वात शेवटी चालत असतो व मी त्याच्याही मागे चालत वळणापर्यंत पोचलेला असतो. त्याक्षणी मला उजवीकडे आणखी एक रस्ता दिसतो पण त्याने हे लोक जात नाहीयत. त्या रस्त्याच्या वरच्या बाजूला लगतच लाकडी कंपाऊंड घातलेले असते . कोणी तरी मला सांगतो तिकडे जाऊ नका. तिथून खालच्या बाजूचा एरिया सील केलेला आहे. मी मुलाच्या पाठोपाठ चालू लागतो . इथेच स्वप्नं संपते. म्हणजे आमच्या गावातही कोरोना येवून जवळचाच भाग सील करावा लागणार की काय ? सील केलेल्या त्या भागात कोणी कोरोनाग्रस्त तर सापडणार नसेल ना  ? हा कोरोना गणपती विसर्जनापर्यंत लांबणार की काय ? महत्वाचे म्हणजे नेहमीच्या दक्षिण समुद्रात विसर्जन का नाहीय ? तिथे काय होणार आहे ? समुद्राऐवजी खाडीत का विसर्जन करायची वेळ येणार आहे ? समुद्राचे पाणी काही भूभाग तर गिळंकृत करणार नाही ना ? पावसाळयात काही विचित्र घडणार आहे का ? की  गणपतीपर्यंत मुलाची भेट होणार नाहीय ? अनेक प्रश्न  ! तणाव वाढवणारे. काल दुपारी मुलाशी झालेले बोलणे मनात होतेच. एका बाजुला पत्नीचा अती चिंता करण्याचा स्वभाव , कोरोनाचा प्रभाव आणि स्वत:ला फीट राखण्याची साठीतली माझी कसरत ! 

           आज सोमवार . नळाला पाणी येणार नाही.  पण बाकीची कामे होतीच. आज सौ. चक्क नऊ वाजता उठली. पहाटे साडेतीननंतर ती चांगलीच झोपली. झोपेची गोळी तिला चांगलीच लागली. चहा घेऊनही तिच्या डोळयांवर झापडच येत होती. कुठे तरी झेप जाऊन पडण्यापेक्षा झोप म्हणून सांगितलं, तशी ती झोपली.  लंबू वहिनी उन्हात गहू सुकत घालायला आली, तेव्हा ही झोपलेलीच होती. वहिनी मग बाहेरच्या बाहेर गेली . तिने अर्ध्या तासाने उठून आंघोळ , जेवण वगैरे केलं. दरम्यान मुलाला फोन केला. मी बोलून हिला बोलायला दिले.  दोघेही नीट बोलल्याने भांडण मिटले .  मला समाधान वाटले. दुपारी जेवलो. ही वामकुक्षीकडे वळली. आज तिचा उजवा पाय पुन्हा दुखू लागला. मी राईच्या तेलाने रगडले.  बरे वाटताच ही झोपली. एका गझलचा एक शेर बाकी होता.  सकाळपासून मनासारखा जमत नव्हता आणि जमवण्याची मन:स्थितीही नव्हती. आता सगळे ठीक होते . मी गझलकडे नजर टाकली. थोडया वेळाने तो शेर जरा मनासारखा झाला.   
       मी दिले व्यथेस माझ्या धुमारे नवनिर्मितीचे अन्
      अश्रुत मिसळले हास्य मी, हुंदक्यांना हसवण्यासाठी !
 या ब्लाॅगवर संपूर्ण गझल मी पोस्ट केली आहे. तसे याच ब्लाॅगवर माझ्या मराठी गझलांचे पान आहे. तिथेही ती मिळेल. आज आम्ही चहा चार वाजताच घेतला. ही टीव्ही लावून बसली तोच काळी भाभी भेटायला आली. ती बोलत असतांनाच अनमोलची आई आली. आज जरा सावरलेली दिसली. तिने गरम गरम फणसाची भाजी आणली ती मी ओट्यावर नेऊन ठेवली व परत अंगणात फे-या मारू लागलो. त्या तिघीही पायरीवर बसून गप्पा मारू लागल्या. अनमोलच्या आईने काल ठरल्याप्रमाणे दारात ज्यादा असलेली जुनी तुळस नेली. तिच्या तुळशीवर गडगा कोसळल्याने आम्ही तिला ही तुळस न्यायला सांगितले होते.  ती पैसे देत होती ते आम्ही घेतले नाहीत.  टीव्ही लावला तर पुण्यात आणखी 22 ठिकाणे सील करणार अशी बातमी आली. चिंता वाढल्याने मी टीव्ही बंदच केला. 

            गंमत म्हणजे , आज दिवसभरात बीना किंवा तिची आई अजिबात आलेली नाही. रात्री नऊ वाजता सौ. ने फोन करून बोलावल्यावर लंबूवबिनी आली. तिचे दोन्ही नातू मोठया पोरांच्या नादाला लागून देवळाच्या आसपास गप्पा मारत बसतात. त्यामुळे ती चिंतेत आहे. पोलीसांच्या राऊंडमध्ये सापडले तर गरीबाला कोणीच मदत करणार नाही. हे तिचे बोल सत्य आहेत. उच्च वर्तुळातील लोकांना सारे माफ होते , पण गरीबांचा कोणीच वाली नसतो . उच्च संस्कृतीचा टेंभा मिरवणा-यांनी आचरणाच्या नावाने शून्य कमाई केलेली असते. माणसामाणसांत भेदभाव करणारी संस्कृती व्यवहाराच्या विळख्यात काहींनी जखडली आहे. स्वाभाविकपणे तिचे महात्म्य घसरले आहे. उच्च मुल्ये पायदळी तुडवल्यानंतरची ही कोरोना स्थिती आली आहे ती उगाच नव्हे. सौ. ने लंबूवहिनीसाठी राखून ठेवलेले जेवण तिला दिले ते घेऊन ती गेली. हया जेवणाची चव लागल्याने लंबूवहिनीचे नातू काकींसारखे जेवण कर म्हणून तिला सांगू लागले आहेत.

           त्याच वेळी माझे जैतापूरचे मुंबईस्थित सहकार्यशील सन्माननीय मित्र जगदीश आडविरकर यांचा मेसेज आला. तो. असा : CM Fund किंवा PM Fund यात दान देताना आपल्या आजुबाजुला पण जरा बघा की कोणी आपला शेजारी, मित्र किंवा नातेवाईक तर आर्थिक विवंचनेत नाहीये ना ? असेल तर पहिली त्यांना मदत करा कारण त्यांच्या मदतीसाठी कोणी PM अथवा CM येणार नाही तर तुम्हीच त्यांच्या पर्यत पोहोचु शकता. हे तुमचे लोक कदाचित तुमच्याकडे मागायला लाजत असतील किंवा फार स्वाभिमानी असतील तरी कृपया त्यांना मदत करा.

 *बघा फार बरे वाटेल.*

           हा माणुसकीचा संदेश .    त्यांना मी जेवण घेवून जाणा-या लंबूवहिनीकडे बघतच लगेच मेसेज केला : अगदी बरोबर. आम्हीही शक्य ती मदत जवळपासच्या गरीब कुटुुंबांना अगोदर पासूनच करतो आहोत. आज हे फारच गरजेचे झाले आहे व हीच खरी माणूसकी आहे. त्याला त्यांनी चिन्हांकित उत्तर दिले ते असे :  👏💐 .  तोवर दहा वाजायला आले. मी खालच्या घरातले दिवे मालवले व ते घर बंद करून आलो. सौ.ला झोप येऊ लागली होती . मग आम्ही बेडरूमकडे वळलो.

( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: