शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

Corona virus plus Saree

मागे - पुढे

16.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग तेवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो.  सकाळी मागच्या पुढच्या दरवाजावर नेहमीच्याच गोष्टी घडत गेल्या. पाणी लावले. पाणी भरले. आठ वाजता सत्त्या जयच्या घराच्या कोरोनामुळे अर्धवट राहिलेल्या बांधकामावर नेहमीप्रमाणे पाणी मारू लागला. नंतर संत्या , सत्तू , बंदू , विशू , विकू यांची रोजची मैफील बंदूच्या दारात सुरू झाली. विशू हा बंदूचा मित्र आहे. तो  विकूच्याच थोडा पुढे राहतो पण उजाडले की सत्त्यासारखाच बंदूकडे येतो. विकू जरा उशिरा येऊन सहभागी होतो. मूळचा आमच्या भागातला विकू गेली काही वर्षे कौटुंबिक विभागणीमुळे दुस-या भागात घर बांधून राहतो . ही एक वेगळी कथा आहे. आमच्याकडे प्रत्येकाची वेगळी अशी खास कथा आहे. कोरोना संपल्यानंतर त्या सर्व कथा आपोआपच मागच्या पुढच्या दारातून व्यक्त होतीलच. आमचा नाश्ता , आंघोळ , देवपूजा , वाचन , मनन, चिंतन संपन्न होऊन दुपार झाली. रोज रोज ते भात आमटी पोळी भाजी जेवायचा कंटाळा आला होता.  त्यामुळे आज नेहमीचे जेवण करू नकोस , काही तरी खीरवगैरे कर , म्हणजे पोटालाही आराम, असे मी हिला सकाळीच बोललो होतो . म्हणून आज तिने शेवयाची खीर केली आहे.  तेच आमचं दुपारचं जेवण.


  1.             आजही कोरोनाचा प्रभाव वाढता आहे. अजूनही काहींचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. भरपूर चिखल ज्यांच्याकडे शिल्लक आहे ते तो उडवत आहेत. फेसबूकवर काही शेंबडी पोरे स्वत:ची अक्कल काहींकडे गहाण टाकून घाणेरडया भाषेत पोस्टस् करत आहेत किंवा अशा पोस्टस् शेअर करीत आहेत , अर्वाच्च्य टीकाटिप्पण्या करीत आहेत. मागच्या पिढीलाही देशप्रेम शिकवणारे आजच्या पिढीतले काही सभ्य संस्कृतीचे आदर्शवीर त्यांच्या आदर्शांकडे पाणी भरीत असल्यासारखे बाललीला करीत समाजमाध्यमांवर लिहिण्याची लायकी नसल्याने ,  दर्जाहीन लेखन करीत आहेत.  कोरोना आपला विळखा क्षणाक्षणाला विळखा घट्ट करतो आहे. वेळ काय, आपण करतो काय , हे ज्यांना कळत नाही ते स्वत:लाच कळते अशा अविर्भावात बोलत आहेत.  तिकडे देशाची अर्थव्यवस्था शुन्याकडे सरकते आहे अशा बातम्या सांगताहेत. म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था ! काहींचे लक्ष काही विषयांवरून वळविण्यासाठी काहींचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. इकडचे आणि तिकडचे आपला तो बाब्या याच न्यायाने एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. त्या वेडयांना आपण सुरक्षित आहोत असेच वाटते आहे.  काहींचा गेल्या काही वर्षापासूनचा उन्माद अजूनही ओसरलेला नाहीय. त्यासाठी चीनमध्ये पुन्हा कोरोना उद्भवतो आहे आणि आपल्याकडे कोरोनामागून सारी आला आहेच . तोही वाढतो आहे.  त्यातच देशात काही ठिकाणी लोक गावी जाण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. यांमागे कटकारस्थाने असल्याचेही संशय व्यक्त होत आहेत. मूळात कोरोनाही एक कट असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काही लोक पायी , काही बाईकने , काही कारने लपूनछपून गावी पळत आहेत. काही पकडले जात आहेत . काही लोक जत्रा , साखरपुडे , लग्ने , वाढदिवस गर्दी करूनच साजरे करीत आहेत. काही प्रार्थनास्थळांचा आधार घेत आहेत. काही अडाणी आणि काही सुशिक्षित अडाणी जुन्याच गोष्टींना धरून अडून बसले आहेत. काही स्वार्थी लोक कोणत्याही परिस्थितीत स्वार्थच साधतात. या काळातही नफेखोरी करणारे लोक आहेत.  यासंदर्भात इथे एक कविता देतो :


रंजलागांजला तुकाराम

ज्ञानेश्वरांच्या निर्मळ मनातून आलेल्या
जो जो वांछील ते तो तो लाहो हया उक्तीला प्रथम उचलून
काही लबाडांनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवणा-या तुकारामाचा खून केला ...
आणि पुंडलिकाला पुढे करून
विठ्ठलाला विटेतच कायमचे बंदिस्त करून टाकले
तेव्हापासूनच प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे हैवान
अधिक मोकाट सुटलेयत...
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लुटालूट करणारे हे संधीसाधू
नफेखोरी करीत राजरोस उजळ माथ्याने फिरत आहेत
ज्ञानेश्वरांना खिशात घालून
आणि
रंजलागांजला तुकाराम
कधीही न सुटू शकणा-या त्यांच्या बेडीतल्या विठ्ठलाचा धावा करतोय
पुन्हा पुन्हा आपलाच खून करून घेत
त्या पापी , बलात्कारी , पापी हातांकडून ..

...देवीदास हरिश्चंद्र पाटील


  1.        दुपार नंतर संध्याकाळ आणि संघ्याकाळ नंतर रात्र ओघाने आलीच. आज काही विशेष झाले नाही. पुढच्या दारी बसायला आज कोणी विशेष आले नाही. काही फोन मात्र या वेळात झाले. दिवाबत्तीनंतर सौ. ने टीव्ही लावला. मी हिला बातम्या बघूच नको , त्यापेक्षा कंटाळवाण्यासुध्दा मालिका बघितल्यास तरी चालतील , असे मी सौ. ला सांगितले. उगाच प्रेशर वाढवून घेण्यात अर्थ नाही. रात्रीही शेवयाची खीर खाल्ली. हल्ली दिवस रात्री कोरोनामुळे तणावच असतो. तणाव कमी होऊन कधी तरी पहाटे झोप लागते.


( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: