शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

Corona virus pandemic

मागे - पुढे

09.04.2020
       
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा सोळावा दिवस . गुरूवार. काल मध्यरात्री मी बेडवर उताणा झोपलो होतो. भिंतीवरच्या घडयाळात बँटरीने पाहिले. अडीच वाजले होते.  झोप येतच नव्हती. डोळे उघडेच होते. अचानक माझ्या चेह-यासमोर गणपतीच्या दोन मूर्त्या आल्या. पहिली अगदी आपण नेहमी बघतो तशीच . पण क्षणात ती जाऊन तिच्या जागी दुसरी फिकट तांबूस रंगाची लांबट तोेंडाची व लांब सोंडेची होती. ती दिसली नाही तोच ती जाऊन  साक्षात श्रीगणेश माणसासारख्या जिवंत स्वरूपात दिसू लागले. त्यांच्या दोन्ही भुवयांचे केस खूप दाट होते . अचानक त्यांची व माझी नजरानजर झाली . त्याचक्षणी मला त्यांचे डोळे मोठे व कानाच्या जवळ जातील इतके मोठे दिसू लागले. क्षणभर ते हसले आणि गुप्त झाले. यानंतर मात्र काही दिसले  नाही. मी हे काय होते याचाच विचार करीत डोळे मिटले. पहाटे कधी तरी झोप लागली. सकाळ झाली तसा मी उठलो. माझे एक बरे आहे. पहाटे साडेपाचला जरी झोप लागली तरी मी फार तर अर्धा तास उशिरा म्हणजे साडेसहाला उठतोच. आज तेच झाले. मग नेहमीप्रमाणे मागच्या दारी जाऊन पाण्याची व्यवस्था केली. आजही मी व्यायाम सुरूच ठेवला.  बरे वाटू लागले आहे. आज बाकीचे सगळे कार्यक्रम बिनभोबाट पार पडले.  
   
           मुंबई आणि पुण्यात कोरोना वाढत चालला आहे. यातच सारी नावाचा नवीन आजार औरंगाबाद आणि पिंपरी चिंचवडला सुरू झाल्याची बातमी टीव्हीवर आली आहे. भारतात आधीच खालावत असलेल्या आर्थिक आघाडीची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. आर्थिक आणीबाणीची शक्यता खुद्द पंतप्रधानांनीच बोलून दाखविली आहे. पण एकूणच देश संपूर्ण आणीबाणीकडे ढकलला जात आहे. कोरोना जगालाच आर्थिक मंदीत ढकलत आहे. जागतिक व्यापार संघटनेने हे स्पष्ट केलेच आहे. आणखी पुढे काय काय वाढून ठेवले आहे , कोण जाणे ! याही परिस्थितीत कोरोनाचे राजकारण होत असल्याचे मत जागतिक स्तरावर व्यक्त केले असल्याचे एबीसी आँस्ट्रेलियाने अलिकडेच दाखविले आहे. आज चीनमध्ये लक्षणे न आढळणारा कोरोना आल्याची बातमीही आजच धडकली आहे.  हाच या दिवसाचा दुर्दैवी शेवट आहे. माणसे अजूनही सुधरत नाहीयत. घाणेरडे राजकारण , माणसातले भेदभाव आणि कोरोना हया सा-यांनी खिन्नता वाढवीत रात्र आली. आजही नीट झोप लागेल की नाही कोण जाणे !


         ( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: