शनिवार, २५ एप्रिल, २०२०

Corona progresses

मागे - पुढे

24.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकतीसावा दिवस. काल रात्री मन स्थिर करण्याची गोळी घेऊन झोपलो आणि खरंच मन स्थिर झालं असावं. ब-याच महिन्यांनी शांत झोपलो. रात्रीत एकदाही उठलो नाही. आज पाणी येणार नाही तरी सहा वाजताच उठलोय. साफसफाईत तासभर गेलाच. पिंपळपाने उकळत ठेवलीयत.  सौ.लाही उठवलं आहे. वरच्या टाकीला भर लावायला मागे गेलो तर बीनाचे कुटुंब सत्त्याकडून उर्मिलाच्या विहीरीचे पाणी पंपाने भरून घरात नेतेय. नळाला पाणी नसले की हे असेच हाल होतात. पुढच्या दारी आलो तर आज शुक्रवार असल्याने मासळी बाजार फूल भरला होता. थोडया वेळाने सौ. ने जाऊन रेणव्या (मासे) आणल्या. त्या नीट करायला ही मागे गेली आणि कावळे व मांजरे हाकवायला मी ! आता ते मला एवढं ओळखतात की मी मागच्या दरवाजाकडे येतोय हे दिसले तरी पळत सुटतात ! तर मागच्या दारी बंदूकडे पाण्याचा टँकर आणलाय . काय करणार , नळाला एक तर आठवडयातून दोनदा पाणी नसते आणि आलेच तरी नेहमीच पुरेसे येईल असे नसते. #पाणीहवादिलवस्ती !
         
          आमची माजी विद्यार्थीनी व लोकमत कार्यालयातील शोभना कांबळेकडून स. 09.34 ला मेसेज आलाय .
*काय केले तुम्ही लॉकडाऊनमध्ये*♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

लॉकडाऊनच्या सुरुवातीला सर्वांनाच त्याचं अप्रुप वाटलं. पण कालावधी वाढत गेला तशी बेचैनी आणि कंटाळा वाढत गेला.

पण काही लोक त्यातही मजा शोधली. मन रमवायचा आपापला मार्ग शोधला. गप्पा, पत्ते, कॕरम, बुद्धीबळ यासारख्या बैठ्या खेळांमुळे अनेकांचा वेळ मजेत गेला.. जातोय.

तुम्ही काय केलेत लॉकडाऊनमध्ये? लादलेला असला तरी तो एन्जॉय केलात का? तुमच्या गमतीजमती इतरांपर्यंत नेऊ या आणि इतरांच्या आपणही जाणून घेऊन.... ✒ त्यासाठी अर्थातच *लोकमत* तुमच्यासोबात आहेच.

लॉकडाऊन काळात तुम्ही काय काय धमाल केलीत ते फक्त दहा ओळींमध्ये लिहा आणि आपले नाव व पासपोर्ट फोटोसह 9420528788 या क्रमांकावर शुक्रवार २४ एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत पाठवा..
                  वरील मेसेजला माझा हा प्रतिसाद लगेच स. 10.28 ला पाठवलाय.
मी माझ्या काही इंग्रजी ब्लाॅग्जवर अनेक वर्षे लिखाण करीत होतो . पण त्यामानाने मराठी ब्लाॅगवर लिखाण कमीच होते. लॉक डाऊनच्या काळात मला कोरोना लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर घराच्या मागे पुढे घडणा-या व जगातही घडणा-या घटनांवर मराठीतून लिहिण्याची अभिनव कल्पना सुचली व लॉक डाऊनच्या काळात मी दररोज त्याबाबत एका खेडयातून लेखन करीत आहे. माझ्या हया ब्लाॅगचे नांव ओन्लीदेवीदास (onlydevidas) आहे व त्याची लिंक https://onlydevidas.blogspot.com ही आहे.  कोरोना गेल्यानंतरही एका खेडयात घडणा-या व जगात घडणा-या घटना या खेडयाच्या चष्म्यातून पाहण्याचा हा प्रयत्न सुरूच राहणार आहे. अवश्य वाचा , ही सर्व रसिकांना नम्र विनंती.

नांव : श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील
                   
             दुपारी जेवण झालं. वामकुक्षी कालच्यासारखीच झाली ! म्हणजे ती व्हिडीओ बघत बसली , मी डोळे मिटून ऐकत लवंडलो ! काय करणार ! संध्याकाळ तर होतेच. ती झालीही. आज झाडांना देण्याएवढे पाणी दोन दिवस साठवत होतो त्यामुळे भरपूर पाणी दिले. दिवाबत्ती केली. कोरोनाच्या बातम्यांचा आलेख हेलकावतो आहे. त्याप्रमाणेच आमच्या काळजांचाही ! आज जड जेवण न घेता उकडया तांदळाची पेज प्यायलो. पेज पीता पीता जनसेवा ग्रंथालय वाचकगट या
व्हॉट्सॲप ग्रूप वर श्री. प्रसाद सुजाता सुरेश पाष्टे यांची पोस्ट वाचनात आली. ती अशी :
*https://youtu.be/sSaVwHFY3oQ*
*काल quarantine मध्ये अनेकांनी घराच्या घरी पुस्तक दिन साजरा केला.* *तसा आम्हीही काही प्रमाणात केला. या quarantine मध्ये मी संवेदनशीलतेने पाहिलेलं या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून एक पहिलीच चित्रफीत (video) केली आहे.* *त्यामध्ये पुस्तकांविषयीची एक कविता आणि लीळा पुस्तकांच्या या पुस्तकातील छोटासा भाग वाचलेला आहे. माझा हा पहिलाच प्रयोग आहे, आपल्याला अपेक्षित बदल आणि आपल्या दृष्टीतील नाविन्यता जरूर कळवा. सोबत लिंक जोडत आहे. पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देऊन, चॅनेलला लाईक, शेअर, आणि सबस्क्राईब कराल. धन्यवाद.*
https://youtu.be/sSaVwHFY3oQ या चँनेलला मी लाईक, शेअर, आणि सबस्क्राईबही केले.
          त्यातच,  जनसेवा ग्रंथालय वाचकगटवर लेखकमित्र श्री. अमोल पालये याने आणखी एक यूट्युब चॅनेल https://youtu.be/VHiP5LTRmwM कविता क्वारंटाईन बाबत पोस्ट केली. हेही सुंदर यूट्युब चॅनेल आहे.
                   त्याचवेळी कवयित्री शिक्षिका सौ. वसुंधरा जाधव यांचा व्हॉट्सॲपवर मेसेज आला. https://youtu.be/Y-9NhQadpMg हे यूट्युब चॅनेल मी सूरू केल आहे तरी कृपया याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही करा जेणे करून मला प्रोत्साहन मिळेल🙏🏻🍫🍫 मी जाधवांच्या https://youtu.be/Y-9NhQadpMg या चँनेललाही  लाईक, शेअर, आणि सबस्क्राईबही केले. त्यांची कवितेबाबतची अभ्यासूवृत्ती व चॅनेलची मुख्य कल्पना मला खूप आवडली. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे.
             आमचा रत्नागिरी जिल्हा आजच कोरोनामुक्त झालाय. त्याबाबत सर्व रत्नागिरीकरांचे अभिनंदन करणारा लेख माझ्या mycityratnagiri या ब्लाॅगवर प्रकाशित केला. https://mycityratnagiri.blogspot.com/2020/04/Coronafree-district-ratnagiri.html?m=1 या सगळयात अकरा कधी वाजले ते कळले नाही. चला, तर मग झोपायला. गुड नाईट.
   

( क्रमश: )

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

Jugglery of corona virus

मागे - पुढे

22.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकोणतीसावा दिवस. काल संपूर्ण रात्री दोघांनाही झोप आली नाही. लादीवर झोपूनही उपयोग झाला नाही. पंखा आणि गूड नाईट मँट लाऊनही नाईट काही गूड झाली नाही. तिकडे पुण्यात मुलगा वर्क फ्राँम होम करतोय. अजूनही त्याला रात्रीचेच संगणकावर काम करावे लागते आहे.  रात्री दीड वाजता मुलाला फोन केला , तर तो काम सांभाळून चक्क जेवण बनवत होता ! अर्थात , त्याला जसे जमेल तसे ! कोरोनाने सगळे वेळापत्रकच बदलून टाकले आहे. पहाटे कधी तरी थोडा वेळ डोळा लागला असावा. कारण स्वप्नं पडले . स्वप्नात एका फळयावर भावाने एक कोडे तयार केलेले होते व मुलगा ते सोडवत होता. भाऊ त्याला काही तरी क्ल्यू देणार तोच मी बोलतो की थांब , तू काही सांगू नकोस. त्याचा तोच सोडवू दे. तो ते सोडवीलच. इथपर्यंत सारे नाँर्मल होते. पण दुस-याच क्षणी भावाच्या ठिकाणी मला चक्क देव श्रीकृष्ण हसतांना दिसतो. तोच निळा सावळा, घनश्यामल कृष्ण आपला ! मी कौतुकाने त्याच्याकडे बघत असतांनाच मला जाग आली. चुकचुकल्यासारखे झाले. स्वप्नात का होईना पण साक्षात श्रीकृष्णाशी बोलायची संधी हुकली होती ! जवळजवळ रात्रभर झोप लागली नसतांनाही मी सवयीने सहा वाजता उठलोच. पावणेसात वाजता पाणी आलेच. मी पाण्याची व्यवस्थित व्यवस्था लावली आणि पिंपळपानांकडे वळलो. 

         काल संध्याकाळी खालच्या अंगणात फिरतांना सौ. ने पिंपळपाने खुडून आणली होती. रात्रीच पाण्यात भिजत ठेवली होती. मी ती सकाळी उकळत ठेवली. उकळल्यावर नीट झाकून ठेवली. ही उशिरा उठणार हे नक्कीच होते. तिला सहाच्या दरम्यानच झोप लागली होती. मी तिला स्वत:लाच उठायला द्यायचे ठरवले व इतर कामांकडे वळलो. मागच्या दारावर सगळे संत्याबंत्या आपापल्या उद्योगात मग्न होते. नुकताच सत्त्या जयच्या घराचे बांधकाम शिंपून बंदूच्या घरात शिरतोय. त्याच्याकडे चहापाणी , गप्पाटप्पा होतील. त्यात लमाने , विसू व विकूही यथावकाश सामील होतील . मी मागचा दरवाजा बंद करून पुढे आलो. अंगणात आलो . खालच्या दिशेने मासळी बाजार पूर्ण जोरात आहे. कोरोनाची कुठलीच वार्ता तिथे नसावी असे निदान जे दिसते आहे त्यावरून म्हणता येते. दुपारपर्यंत बीना दोनदा येऊन हिला भेटून गेली. आम्ही जेवतांना तिस-यांदा येऊन गेली. मध्येच चार दिवस ती एकदाही आली नव्हती. तिचे मूडस् वारंवार बदलतात. हे दुष्टचक्र बराच काळ सुरू आहे. सगळयांना तिची काळजी वाटते. जेवतांना घासाबरोबर बातम्याही गिळाव्या लागतात. जेवल्यानंतर मी लिहीत बसलोय. ही वामकुक्षी करतेय. थोडया वेळाने मीही जरा लवंडलो. चार वाजले तोच हिच्या दूरच्या दुर्मिला मावशीचा डोंबिवलीहून फोन आला. त्या अर्धा तास बोलतच होत्या. 

             चहापानानंतर बातम्या लावल्या. अजूनही संचारबंदीत माँर्निंग वाॅक प्रकरण सुरू आहे. लोक खरेदीसाठी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत धावत आहेत. हे सर्वसामान्य लोक इतक्या संख्येने कायदे धुडकावून का लावत आहेत ? कोरोनासोबत एक वर एक मोफत असे काही पँकेज तर आलेले नाही ना , जे सर्वसामान्य जनतेच्या मेंदूवरच आक्रमण करून त्यांना विचित्र वागायला लावेल  ?  अन्यथा ही माणसे अशी वागलीही नसती कदाचित. कोरोनाचे हे काही गौडबंगाल तर नाही ना ? शेवटी हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर ताबा मिळवण्यासाठीचे काहींचे कारस्थान तर नाही ना ? उत्तर कोरियाच्या जोनच्या बातम्याही येत आहेत. ते आणखीच वेगळे प्रकरण निघण्याची शक्यता आहे. तिकडे अमेरिका चीनवर उशिराने आरोप करते आहे आणि चीनही पलटवार करतो आहे. हे काय गौडबंगाल आहे ? भारतातही एकमेकांकडे बोटे दाखवण्याची परंपराच आहे. जगभर मरणारे सर्वसामान्य लोक उल्लू बनत आहेत का ? कोरोनाने असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत व छोटयाश्या खेडयात बसून मी त्याबाबत विचार करतो आहे ! मी बातम्या बंद करून झाडे शिंपायला आलोय. आज पाणी भरपूर मिळाले.  मनसोक्त पाणी शिंपले. बरे वाटले . आज भावाच्या घरात झोपायला जायचे रद्द झाले आहे. आजही उकाडयाने झोप आली नाही तर उद्या तिकडे एसीचा गारवा घेत झोपायचा विचार आहे. बरेच महिने एसी लावलेलाही नाहीय. तो लावला पाहिजे. बघू उद्या काय काय होते ते. आता रात्रीचे अकरा वाजत आले आहेत. मुलाला फोन करून झाला आहे. तर आजपुरते थांबू. उद्या भेटूच. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. तुमच्या घरातच थांबा आणि हो, उद्याही तुमच्याच घरी थांबून कोरोनाला घालवा. 


( क्रमश: )

     








मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

News are not good

मागे - पुढे

21.04.2020

               आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग अठ्ठावीसावा दिवस.  काल रात्री दहा वाजता पुढच्या अंगणात पाणी मारलेले. थंडाव्यासाठी. खूप उकाडा आहे. रात्री बेडवर झोपच येईना. अंग भाजून निघू लागले. शेवटी एक वाजता खाली लादीवर झोपलो. थोडे बरे वाटले पण पुरेशी झोप मिळालीच नाही. पहाटे आम्हां दोघांनाही एकाच वेळेस स्वप्नं पडत होते. गंमत म्हणजे आम्ही प्रवासात होतो. ही तर कर्नाटकात पोचली होती.  मला स्वप्नातले स्थळ काही समजले नाही. आम्ही एकदम जागे झालो तेव्हा पहाट झाली होती.  जराशी झोप लागली नाही तोच सहा वाजले. जाग आलीच. पण पडून रहावेसेच वाटले. नशीब,  सहापस्तीसला धडपडत उठलो. पाण्याची वेळ झाली होती. पावणेसातला पाणी आले. ते भरले. पाण्याची टाकी कालच खाली करून ठेवली होती. ती काठोकाठ भरली. पाणी गेले. 

                 पाणी गेले तसा मी खालच्या कंपाऊंडमधल्या पिंपळाच्या छोटया झाडाकडे वळलो. गेल्या तीन चार महिन्यांपासून पिंपळाच्या पानांचा रस प्यायचा हे आमच्या कुटुंबाने ठरवलेले होते. पण काही ना काही होऊन हा कार्यक्रम पुढेच जात होता. प्रत्येक घटनेची वेळ यावी लागते हेच खरे ! (माझ्या  dehpatilbestwords या ब्लाॅगवरील  What will happennext या लिंकवर what will happen  next ही पोष्ट वाचा ).  तर पिंपळपानांचा रस घेण्याची वेळ आज आली. मी आठ पाने आणून ती पाण्यात उकळत ठेवली. नंतर सौ.ला उठवले. थोडया वेळाने पिंपळपानांचा तो रस प्यालो. चव थोडी ओळखीचा वाटली. कुठल्या तरी काढयासारखी. कोणत्या तरी काढयात पिंपळपाने घातली जात असणारच. आता पंधरा दिवस दररोज पिंपळपानांचा रस प्यायचा आहे.  अकरा वाजता सौ. मिलेशच्या बाईकवरून शहरात गेली ती एक वाजता आली. औषधे व थोडा जिन्नस घेऊन आली. आज मंगळवार. आज शाकाहारीच जेवण.  मी बराचसा शाकाहारीच आहे. अधूनमधून मांसाहारही करतो. दुपारी वाट्याण्याची आमटी मस्त झाली. थोडा भात जास्त खाल्ला. हल्ली आम्ही चपात्या सकाळी नाश्त्यालाच खातो. बातम्या पाहवत नाहीत , ताण येतो. त्यातही काही लोक त्यांच्या सोईचे राजकारण करीत आहेतच. लाखो लोक जगात मरत आहेत. जगातच नव्हे तर आपल्या दारात मरत आहेत. पण काहींना या वेळीही राजकारण केल्याशिवाय चैन पडत नाही. राजकारण ही दारू झाली असावी आणि हे पक्के बेवडे झाले असावेत, अशी अवस्था आहे. जुनेच पत्ते पुन्हा पुन्हा टाकून काहीच साध्य होत नाही , त्यामुळे ते अधिकच वेडे होत आहेत. बातम्यांनी ताण वाढवला तरी पुण्यामुंबईच्या बातम्या बघाव्याच लागतात. मुंबईत भाऊ आणि इतर नातेवाईक व मित्र आहेत , पुण्यात तर मुलगा आहे . मुलगा राहतो ते घरमालक आहेत. परिस्थिती निवळून निदान तीन मे नंतर तरी पुण्याला जायला मिळू दे, या विचारातच आम्ही जेवलो. जेवण तसे वेळेवर झाले . दुपार असल्याने तापमान खूपच वाढले आहे. वामकुक्षीला पाठ लादीवर टाकली तर बेडरूममधली लादीही गरम लागत होती. अवकाळी पाऊस आसपास  घोटाळतो आहे. साडेतीन वाजता हिला स्नेहाचा फोन आला. सुरूवातीचा विषय कधीच बाजुला पडून उखाळयापाखाळ्यांचे विषय सुरू झाले. मी अधूनमधून मुद्याचे बोला, मुद्याचे बोला , असे टोकूनही काही उपयोग झाला नाही. त्यांनी अर्धा तास चैत्रीच्या दिवशीचा एकच विषय चघळला . शेवटी त्या थांबल्या. नंतर आम्ही चहा घेतला. तोपर्यंत पावणेपाच वाजले. 

          मी पुढच्या दारी पायरीवर बसलो . लेखन केले. नंतर झाडांना पाणी दिले. आज दिवसभरात बीना तीनदा येऊन गेली. काय करायचं या मुलीचं ? घडीत असं बोलते, घडीत तसंं बोलते. हीचे भवितव्य काय ? काळजी वाटते. ती ख-या अर्थाने मूळ विषयातून बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणीच काही करू शकणार नाही , हे खरे आहे. संध्याकाळी लंबूवहिनी आणि एक काकी येवून गेली. बाकी कोणी विशेष असे आले नाहीत. गेला तासभर बातम्या बघतोय. पुणे शहर संपूर्ण सील केले आहे. तरी लोक चक्क माँर्निंग वाॅकला रस्त्यावर येत आहेत. पोलीस वेगवेगळ्या शिक्षा करीत आहेत. आता अश्यांचे पार्श्वभाग सुजवण्याबरोबरच त्यांच्या वैचारिक पार्श्वभूमीचाही शोध घेणे गरजेचे झाले आहे, असे दिसते. हे काही विशिष्ट विचारधारेचे लोक तर नाहीत ना ? हे तपासले पाहिजे. संचारबंदीलाच त्यांचा विरोध नाही ना ? हजारोंनी माणसे बाधित होत असतांना हे लोक स्वत:च्याही जीवावर इतके उदार का होत आहेत ? हे तपासावे लागेल.  केवळ हिंडणे हा हेतू फारसा पटण्यातला दिसत नाही.  महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात यावर नियंत्रण ठेवावेच लागेल. या विचारातच आज जेवण न घेता दूध बिस्कीटस् खाऊन आम्ही अंगणात शतपावली करू लागलो आहोत. अजून कोणी बोलायला आले तर ठीकच , नाही तर अकरा वाजता बेडरूमच्या लादीवर अंग टाकूच. थोडक्यात, रात्रीची बात उद्या ! भेटूच तर ...उद्याही !


( क्रमश: )









सोमवार, २० एप्रिल, २०२०

One more day

मागे - पुढे

20.04.2020

              आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सत्तावीसावा दिवस.  काल रात्री सौ. ला साडेनऊ वाजताच झोप आली .  कधी गोळी लवकर लागू पडते. कधी कधी दुस-या दिवशी सकाळी अंमल सुरू होतो. ती दहाच्या सुमारास झोपली पण मला बराच काळ झोप येतच नव्हती. सर्फींग करत बसलो. कधी तरी झोप आली तसा मोबाईल बंद केला व झोपलो. आज पहाटे पाच वाजता जाग आली. काही तरी स्वप्नं पडलं जे नंतर आठवलंच नाही. पुन्हा मी सहा वाजता उठलोच. मागे जाऊन वरच्या टाकीत पाणी फूल केले. आज सोमवार. नळाला पाणी येणार नसल्याने साफसफाईकडे मोर्चा वळवला. पुढचे , मागचे अंगण साफ झाल्यानंतर खालच्या अंगणात गेलो. आज गच्चीच्या पाय-याही साफ केल्या.  परिसर स्वच्छता झाली. घरे साफ झाली. चांगलाच घाम आला. आज पाण्याची गडबड नसल्याने सफाईला बराच वेळ मिळावा. 

             आज दुपारी एक वाजता माझे एक चाहते व दहीगांवचे रहिवासी श्री. सुबोध रेचे यांचा ब-याच काळाने फोन आला. ते बराच काळ बोलत होते. ते सद्या अमरावतीत त्यांच्या घरापासून पन्नास किमीवर असलेल्या मुलीच्या घरी सपत्नीक रहात आहेत. त्यांचा मुलगा व सून रायगडमध्ये अडकून पडले आहेत. त्यांचा मुलगा एस.टी. त कंडक्टर आहे. सुबोधजी माझी आपुलकीने चौकशी करीत होते.  मी माझ्या मुलाचीही हकीगत सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे राजू परत शहरातील त्याच्या निवासस्थानी रहायला गेला. खरे तर तो काल सकाळी माझ्याकडे गप्पा मारायला येणार होता. पण तो असा अचानक गेला. सौ. शेजाराहून येतांना तिला ते कुटुंब रस्त्यात भेटले. राजूच्या मुलीने नेलेल्या दोरी उडया आठवणीने परत केल्या. राजूचीही स्वतंत्र कहाणी आहे. ती नंतर कधी तरी. 

        आजचा कोरोनाचा दिवसही भयावहच आहे. आकडेवारी वाढते आहे. संपूर्ण पुणे शहर सील झाले आहे. आमचे प्राण कंठाशी येऊ लागले आहेत. मुलांच्या काळजीने आमच्यासारखेच किती तरी लोक हैराण असतील. आपल्या भागात रोजगाराच्या संधी नसल्या की मुले अशी नोकरीसाठी  आईवडिलांपासून दूर एकटी राहतात. कोरोनासारख्या परिस्थितीत तर फारच ताण येतो. पण कोणाला सांगणार आणि सांगून उपयोग तरी काय म्हणा !  त्यात सर्वसामान्यांचे हाल तर सर्वत्रच असतात. त्यांना स्वत:च्या मनाप्रमाणे जगताच येत नाही. सुरेश भटांची , कुठे तरी मी उभाच होतो , कुठेतरी दैव नेत होते , सारखीच माझ्याही आयुष्याची त-हा झालेली आहे. सुरेश भट माझ्या मनात घर करून राहण्याचे हेही एक कारण आहे. 

          हळूहळू संध्याकाळ झाली आहे. मुलाला फोन करून झाला आहे. मनात चिंता उरली आहे. सौ. शेजारच्या अंगणात ईव्हीनिंग वॉक करते आहे. मी झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर हे लेखन मोबाईलवर करीत आहे. दिवाबत्तीची वेळ होत आली आहे. थोडया वेळाने शेजारच्या मंदिरात घंटानाद होईल. मग दिवाबत्ती, टीव्ही, जेवण , अजून कोणी शेजारचे आलेच तर, मग झोप आणि पुन्हा उद्या......भेटूच.


( क्रमश: )









Ek mazi Gazal mala pureshi

एक माझी गझल



मांडले मी मला तुझ्या पटावर
खेळणे हे अता तुझ्या मनावर


आसवे रोखली जरी किती मी 
हुंदक्यांचा तरी सुरूच वावर !


हे ऋतू अंग चोरुनी उभे अन्
मी असा आवरूनही अनावर !


एक माझी गझल मला पुरेशी
(भट म्हणाले मला , तिलाच सावर !)
मी कशाला मरू दुज्या कुणावर !


नांव बदलूनही जुना तोच मी !
भ्रमर येतो जसा पुन्हा फुलावर !




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

The carona nightmare

मागे - पुढे

19.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सव्वीसावा दिवस.  काल संपूर्ण रात्रभर झोप आली नाही. नेहमीप्रमाणे दीड वाजेपर्यंत झोप आलीच नव्हती . नंतर झोप लागेल असे म्हणून पडून होतो. दोन वाजल्यापासून मागच्या दारी पत्र्यावर रेवा म्हणजे अगदी बारीक दगड मारल्याचा आवाज येऊ लागला.  एक तर रात्रीचेे दोन वाजलेले.  डावी उजवीकडे शेजार नाही. डाव्या बाजुला तर जंगलच. मागचे पुढचे शेजारी ऐन झोपेत. सकाळीच दंगलीचे स्वप्नं पडलेले. त्यात सोबत पत्नी. तीही भित्री. जाम टरकली होती. मी काय प्रकार आहे ते बघतो म्हटलं तर तिने मला उठूच दिलं नाही. साडेतीन वाजेपर्यंत मी कानोसा घेत होतो. त्यातच उत्तरेकडच्या खिडकीतून जंगलाच्या भागातून विजेरीचा प्रकाशझोत पडला. कोणी तरी आहे तिथे असेच वाटू लागले. मला खिडकीतून बाहेरचे स्पष्ट दिसू शकत नव्हते , पण बाहेरून आतले दिसत असेल तर ? हे कधी आपण तपासलेच नव्हते. अनेक प्रश्न पडू लागले. आता मलाही थोडी भीती आणि काळजीही वाटू लागली. वरच्या बाजुच्या बागेतल्या  अवघ्या दोनच कलमांवर आंबे होते. ते चोरायला कोण आले असावेत , असा एकूण परिस्थितीतून अंदाज येत होता. पण बराच वेळ झाला तरी पुन्हा विजेरीचा झोत पडला नाही , म्हणजेच तो उजेड वरच्या वळणावर गाडी वळतांना पडलेला हेड लाईटसचा असावा. या विचाराने मलाही जरा धीर आला. मी शांत होऊन पत्र्यावरचे आवाज ऐकू लागलो. पुढच्या दारात अधून मधून वा-याचा आवाज येत होता. मग मी पडलेल्या स्थितीतच मागच्या दाराचाही कानोसा घेतला. तेव्हा मला आज वारा सुटल्याचे नक्की कळले. वा-याने पानगळ होत होती व तिचा आवाज मागच्या पत्र्यावर येत होता. बहुतेक अधूनमधून झाडाची एक फांदी वा-यामुळे कोप-यावर पत्र्याला घासतही असावी. पण वारा नसतांनाही रेव्याचा अधूनमधून येतच होता. मग लक्षात आले की झाडावर पक्षी जागे झाले असावेत व त्यांच्या हालचालींनी मोहोर व पाने गळून आवाज येत होते. वारा आणि पक्षी यांचा हा कावा होता तर. मी हे हळू आवाजात सौ.ला समजावून सांगितले व भिण्याचे काहीच कारण नसल्याचेही सांगितले. पण ती घाबरलेलीच होती. अखेर ती आपण हॉलऐवजी बेडरूममध्येच झोपू म्हणाली. तिथे फॅन जवळ असल्याने कसले आवाजच येत नाहीत. मग आम्ही बेडरूममध्ये जाऊन झोपलो. तरी एकदा मोठा वारा आल्याने आवाज आलाच. तो मी सौ. ला दाखवला . ती जरा शांत झाली. पण तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. सहा वाजता मी उठण्याचा प्रयत्न केला पण डोळेच उघडत नव्हते. मग मी झोपून दिले आणि नेमकी मला झोप लागली. सात वाजता शेजारची मम्मी खालच्या रस्त्स्याने चालली होती . तिला खालच्या टाकीतले पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर वाहतांना दिसले, तशी ती बोंबटत आली. तिने पुढच्या दारावर थापा मारल्या. तरी आम्ही डाराडूर होतो. मग तिने बेडरूमच्या खिडकीवर टकटक केली तशी मला जाग आली. सौ.सुघ्दा धडपडत उठली. मम्मीचे धन्यवाद मानून आम्ही पाण्याकडे धावलो. पाणी जातच आले होते. जेमतेम एक हंडा व कळशीभर पाणी भेटले. आम्हां दोन माणसांना दिवसाला ते पुरेसे होते ! पाणी भरून झाल्यानंतर मी साफसफाईला पुढच्या बाजुला आलो तेव्हा माझे लक्ष दरवाजावरच्या तोरणाकडे गेले. ते मध्यभागीच्या चुकेतून निसटून थोडे खाली लोंबत होते. म्हणजे , खरेच कोणी तरी रात्री दरवाजाकडे काही तरी करीत होते की काय ? कदाचित , ते मम्मीचा हात लागून तर खाली आले नसेल ना ? पण मम्मीची उंची पाहता ते शक्य वाटत नाही. मी मम्मीच्या दरवाजावर हात मारण्यामुळेच ते तसे झाले असणार असे बोलून ते तोरण व्यवस्थित लावले. 

             बाकी दिवस नेहमीसारखाच असला तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढवणाराच ठरला. कमी होतोय असे वाटत असतांनाच एकदम वाढ झाली. बहुतेक रविवार असल्याने आज चिकनची दुकाने उघडी ठेवल्याचा हा परिणाम असावा. कोरोना आणला कोणी , सुरूवातीला पसरवला कोणी हे प्रश्न आता मागे पडले असून आता हे गर्दी करणारे , भाजी , चिकन प्रेमी व मॉर्निंग वॉकप्रेमी कोरोना प्रसारक कोण आहेत , याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 

( क्रमश: )


रविवार, १९ एप्रिल, २०२०

ओळ : Marathi Gazal

              ओळ


पान पान आयुष्याचे पलटत गेलो
मी असाच माझा मजला चाळत गेलो


तेवढाच आयुष्याला अर्थ मिळाला
उत्सवात जगण्याच्या मी हरवत गेलो


वेचला न केव्हा कणकण माझा मीही
मी स्वत:स वा-यावर उधळत गेलो


जो दिसून आला तोही भासच होता
त्यात मीच माझी स्वप्नें मिसळत गेलो


मी अजून माझा मजला सुचलो नाही
ओळ येत गेली तीही विसरत गेलो



...देवीदास हरिश्चंद्र पाटील. 

टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  


Home qurantine

मागे - पुढे

18.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग पंचवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो.  आज नळाला पाणी आले. तशी काल रात्रीही गरम्यामुळे नीट झोप लागली नाहीच. डोळा लागला तर भयानक स्वप्नं पडले. खालच्या रस्त्यावरून सुमारे तीस फूट उंचीच्या घोडयावरून  पप्पू चाललेला आहे. त्याच्या हातात तलवार आहे. मी व सौ. दक्षिण दिशेच्या दरवाजात बसलेलो  असतो. मला पप्पू सांगतो की अरे मुंबईला बघ काय चाललंय ते . दंगा उसळलाय . तो पूर्वेकडे बोट दाखवतो तसा मी धावतच पुढच्या दारात येतो. पूर्वेकडच्या डोंगरावरून तलवारी घेऊन काही लोक धावतींना दिसतात .  खरे तर , मुंबई आमच्या उत्तरेला आहे , हे माझ्या पूर्वेकडे पाहतांना लक्षातच आले नाही. 

            आज विशेषत: मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्या स्वप्नात दंगा दिसला होता , तोच तर हा कोरोनाचा कहर नाही ना ? कोरोनाचा दंगाच. पुण्यातही आज कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. कालचा दिलासा आज क्षणभंगूर ठरतो आहे.   लोकांचे नको ते गूण मात्र फारसे कमी झालेले नाहीत.  अजूनही लोक गर्दी करतातच.  अजूनही अवैधरित्या जात आहेत. गर्दीमुळे कोरोना प्रसारक मोकळे फिरत आहेत. एक कोरोनाबाधित पोलीसच मुंबईतून सोलापूरात गेल्याने तिकडे प्रसार वाढला. आपण आपले सैन्य कमकुवत करीत चाललो आहोत. वैद्यकीय , पोलीस आणि सैन्यदलातही कोरोनाचा शिरकाव होतो आहे. आपण आपल्याच सुरक्षा व्यवस्थेला भगदाड पाडत आहोत. सतत बेशिस्त टारगटांना शिस्त लावणा-या पोलीसांवरच हात उगारला जातोय.  संचारबंदी काळात रस्त्यावर हिंडणारे हे बेभान हजारो देशद्रोही गेली काही वर्षे सतत पोकळ देशभक्तीचा डंका पिटणा-यांना दिसत नाहीत का ? ते देशभक्तीवाले लोक आज कुठे आहेत ? आजही भारतीय लोकशाही मतांच्याच विकासाभोवती फिरते आहे आणि लोकशिक्षणाचा विकास शुन्याकडे सरकतो आहे. संस्कृतीच्या उच्चतेचे डंके पिटून उपयोगी नसते , ती योग्य प्रकारे प्रत्यक्षात आचरणात दिसावी लागते. 

             विचार करून मन थकले आणि जेवणानंतर झोपी गेले. संध्याकाळी स्नेहा, क्रांती आणि कलू आते आली. तेव्हा मी खालच्या बागेत झाडे शिंपायला गेलो आणि थोडया वेळाने सौ.सुध्दा गप्पा आटोपत्या घेऊन बीनाच्या आईकडे गेली. काही दिवसांपूर्वी रात्री बीना येवून आमच्याबरोबर बोलत बसली होती. तेव्हा त्यांच्या भावकीत पिशाच्च फिरत राहिल्याने कोणीच सुखी नाही असं काही तरी ती म्हणाली. त्यावर , तुमच्या भावकीत लोक एकमेकांवर खूप जळतात, तेच खरं पिशाच्च आहे , असं स्वाभाविकपणे व सरळ मनाने मी बोललो. थोडयाच वेळात ती येते म्हणून सांगून निघून गेली. तेव्हापासून ती आलेलीच नाहीय. बीनाचा प्रश्न बराच गुंतागुंतीचा आहे. ती लवकर त्यातून बाहेर पडावी, हीच सदिच्छा. 
         


                मी पाणी शिंपत होतो आणि सौ. बीनाकडे होती त्यादरम्याने राजूच्या बायकोचा फोन येवून गेला होता. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. मी दिवाबत्ती व प्रार्थना करून झाल्यानंतर सव्वासात वाजता तो मिसकॉल पाहिला. मग दोघांना फोनवरूनच शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे जाऊही शकत नाही. राजू बराच वेळ बोलत होता. जुन्या आठवणी निघाल्या. तेव्हा ही मुलं बरेचदा आमच्याकडेच असायचीत. तेव्हा भावना प्रबळ होत्या , आता व्यवहार प्रबळ झाले आहेत. माणसाचे माणसाकडे हक्काने जाणे येणे आता होत नाही. आता माणसांमाणसांत भिंती निर्माण झाल्या आहेत. कोरोना ही परिस्थिती बदलण्यासाठी तर आला नाही ना ? किमान हया भिंती तुटण्याची नांदी ठरू दे , या माझ्या शब्दांनी आमचा संवाद संपला.  नंतर रात्र झाल्याने मागची पुढची दारे बंद करून आम्ही कोरोना पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन होऊन गेलो.
          

( क्रमश: )


शनिवार, १८ एप्रिल, २०२०

Nivadnuk Marathi Gazal

            निवडणूक


ते कौलारू घर कुठे दिसते का ते बघ !
गोठयात उभी गाय हंबरते का ते बघ !


उरल्यासुरल्या माणसांचा शोध घे !
मातीत , राखेत कुणी मिळते का ते बघ !


अंतर ठेव , पण कधी अंतर करू नकोस !
कोणासाठी काळीज जळते का ते बघ !


नवे विषाणू येत राहतील , सावध हो !
आयुष्याची किंमत समजते का ते बघ !


मानवाच्या अस्तित्वाचीच ही लढाई !
ही निवडणूक नाही , हे कळते का ते बघ !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

Corona virus pandemic

मागे - पुढे

17.04.2020


  1.                   आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चौवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो.  आज नळाला पाणी येणार नव्हते. आता उन्हाळा कडक होत चालला आहे. पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने दर शुक्रवारी नळाला पाणी येणार नाही. आज शुक्रवार असल्याने पाणी येणार नाही. सबब मी करीत असलेला हलका व्यायाम दहा मिनिटांनी वाढवला. नेमका सात वाजता बंदिनी वहिनीनी फोन केला. मला वाटले पाणी आले की काय ! मी पटकन फोन घेतला. ऐकतो तर पाणी येणार नाहीच. मी म्हटले, छान ! आज सौ.ला (तिच्याच) हुकुमावरून सकाळी सात वाजता उठवले. आज तिच्या आईचा प्रथम स्मृती दिन आहे. गेल्या वर्षी 28 एप्रिलला तिच्या आईचे देहावसान झाले. तिथीनुसार तो मागे आला आहे.  आज आठ वाजताच बीनाची आई मासे आणायला निघाली तिच्याबरोबर हिने जाऊन मासे आणले. त्याची आमटी केली. मग जेवण बनवल्यानंतर तिने तिच्या आईला वाडी दाखवली तेव्हा त्यात मासे ठेवले . तिकडे माझ्या सासरवाडीला वर्षश्राध्दाचे कार्य सुरू झाले तसा आम्हांला फोन आला. तिकडून जतीनने व्हिडीओ कॉल केला. त्यामुळे कोरोनामुळे प्रत्यक्ष जाता आले नाही तरी याचि देही याचि डोळा ते पाहता आले. जतीनने मग पुण्यातल्या माझ्या मुलाला आणि मुंबईतल्या हिच्या मावसबहिणीलाही अॅड केले. ते कार्य संपल्यानंतर आम्ही जेवलो.


            आज प्रथमच कोरोनाचा वेग देशभरात थोडा मंदावलेला दिसला. महाराष्ट्रालाही थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र , लोकांना अजूनही धावणे , गर्दी करणे , अफवा पसरवणे , व्देष पसरवणे , अवैध वाहतूक करणे यात रस आहेच. परिस्थितीचे भान मरणाच्याही दारात नसणारे लोक आपल्या देशात आहेत. मेरा भारत महान ! या महानतेच्या बातम्या टीव्हीवर सुरू आहेत. वाहनावर ' अत्यावश्यक ' असा बोर्ड लावून दारूची वाहतूक करतांना काहींना पकडले आहे. आपल्या महान देशात ' अत्यावश्यक ' काय तर दारू ! दुसरा प्रभावी धंदा म्हणजे अफवा पसरविणे . त्याचीच दुसरी बातमी आहे. एका भागात दरोडेखोर आल्याची अफवा काहींनी पसरविली होती. तिथल्या लोकांनी दरोडेखोर समजून तीन साधूंनाच यमसदनाला पाठवले आहे. हा देश साधूसंतांचा आहे ! चोर , लुटेरे, खुनी , दरोडेखोर , बलात्कारी हे अफवांमधूनच येतात ! आज दुपारपर्यंत तरी लंबूवहिनीसहीत कोणीही आमच्याकडे आलेले नाही. आज आम्ही वामकुक्षी करायला हॉलमध्ये पहुडलो. हिने टीव्ही लावलेलाच होता आणि बाळाचे बाप ब्रम्हचारी हा विनोदी चित्रपट लागलेला होता. मग कसली वामकुक्षी न काय ! ब-याच दिवसांनी मनसोक्त हसता आले , हे मात्र खरे.
       
              संध्याकाळी लंबूवहिनी येऊन गेली. हल्ली तिला जास्त बोलूच देत नाही. तिचे लक्ष इतरांवर जास्त असते. कुणाच्या खात्यात पाचशे रूपये जमा झाले , कुणी दिवे लावले , कोण कुठे चाललाय , कोण कोणाशी केव्हा काय बोलतंय यातच तिला स्वारस्य . बरे कुठली गोष्ट ती स्वत:कडे ठेवीत नाही. कधी एकदा दुस-याला ती बातमी तिखटमीठ लावून सांगते , असं तिला होऊन जातं. बातम्या काढण्यासाठी आणि त्या हव्या तिथे पेरण्यासाठी ती दिवसभर सर्वत्र संचार करीत असते. कामावर येऊ नको सांगितल्यानंतर बरीचशी आमच्याकडे यायची कमी झाली आहे. पण आली की कान , नाक , डोळे आणि जीभ उघडी ठेऊन असते. तिची श्रवणशक्ती इतकी जबरदस्त आहे की मी अंगणात फिरतांना आमच्या पुढच्या दारी मला कोणी रस्त्यावरून जरी हाक मारली तरी ती मागच्या दारावरून कानोसा घेऊन विचारते, कोन हो ता बावा ?म्हणजे बघा ! बरे एवढे करून ती थांबत नाहीच. तिला मी सांगितले की तुझ्यापर्यंत काही नाही म्हणून तरी ती घरातून बाहेर येऊन बघते ! मग डोकं फिरणारच ना !

           अशी दोन चार माणसं येऊन गेली तोवर सात वाजले. देवळात घंटानाद सुरू झाला. मीही दोन्ही घरातली दिवाबत्ती केली. रोजच्याप्रमाणे कोरोना जगातून नष्ट कर म्हणून देवाकडे प्रार्थना केली. नंतर टीव्ही , बातम्या , मालिका , गाणी , यासह रात्रीचे जेवण आणि झोपेकडे मोर्चा ....


( क्रमश: )